डॉ. अनिल अवचट - बाबा नावाचं एक सदाहरित झाड

डॉ. अनिल अवचट - बाबा नावाचं एक सदाहरित झाड

प्रिय बाबा,
बाबा, तू काल आराम करत होतास. तुझ्या लाडक्या मुक्ता आणि यशो तुझ्याशी बोलत, तुला चमच्याने पाणी पाजत होत्या आणि आम्ही आसपास बसलेलो होतो. त्या वेळी डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, ‘बाबा म्हणजे एक झाड असून आपण सगळे त्याच्याभोवती असलेल्या पारावर त्याच्या सान्निध्यात बसलेलो आहोत.’ खरंच तू आमच्यासाठी एक वटवृक्ष आहेस, हो, होतास असं मी म्हणणार नाही कारण तू आहेसच कायम आमच्याबरोबर, आमच्यासोबत.
बाबा, तू मलाच केवळ तुझी मुलगी मानलं नाहीस, तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी भारताबाहेर असलेल्या अनेक मुलामुलींचा तू बाप झालास, त्याच्या डोक्यावर पितृत्वाचं छत्र धरलंस. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत, त्या दूर केल्यास. तू बरोबरीच्या नात्यानं आमच्याशी वागलास. समोरच्यातले सुप्त गुण ओळखून त्यांचं कौतुक करत राहिलास. तुझे मित्र-मैत्रिणी तर असंख्य, मोजता येणार नाहीत इतके. तुझ्यासारखेच तेही वेगळ्या वाटेनं चालणारे.
शाळेत जायला लागल्यापासून मी तुझी पुस्तकं वाचत आलेय. त्या वाचनातूनच जगण्याबद्दलचे विचार पक्‍के होत गेले. तुझी ओघवती लेखणी, तुझी मूल्यं, तुझ्या लिखाणातून पोहोचत गेले. म्हणूनच मग कर्मकाडं, जुनाट रूढीपरंपरा, अंधश्रद्धा यांना जगण्यातून हद्दपार करता आलं. तू जेव्‍हा बुवावाजीवर लिहिलंस, तेव्‍हा आधारासाठी बुवा-बाबा नव्‍हे तर पुस्तकं आणि त्यातले विचारच कसे आपल्याला सोबत करू शकतात हे कळलं. तुझी लेखणी जेव्‍हा कष्टकरी वर्गाविषयी बोलत राहिली, तेव्‍हा श्रमाच्या महत्वाबरोबरच त्यांचं खडतर जगणं लक्षात येऊन मानवतावाद अंगी रुजत गेला. तू जेव्‍हा ‘मोर’सारखं पुस्तक लिहिलंस, तेव्‍हा ललित लिखाणातलं सौंदर्य कसं असतं ते हळुवारपणे तू सांगत राहिलास. तुझ्या छंदांविषयी वाचलं, तेव्‍हा छंद केवळ छंद  न राहता आयुष्याचा अविभाज्य भाग कसा बनतात हे कळलं. ‘स्वत:विषयी’ लिहितानाही तू किती पारदर्शीपणाने आपल्यातले दोष, झालेल्या चुका सांगितल्यास. आजपर्यंतचं तुझं सगळं लिखाण म्हणजे त्यात कुठल्या अलंकाराचा साज चढवलेला, ना शब्दांच्या झटापटीचा खेळ रचलेला असं आहे. सहज, साधं तरीही समोरच्याला आपलंसं वाटावं असं! तुझ्या लिखाणातून तू प्रत्येक वाचकाशी एक नातं जोडलंस आणि या नात्यात तू त्यांना कायमचं जोडलंस. बाबा, खरं तर तू सुपरहिरो, पण आमच्यात मिळून मिसळून आमच्यातलाच होऊन राहिलास.
बाबा, तू एका ठिकाणी लिहिलंस, की 'मी कधी पैशांसाठी लिहिलं नाही की बक्षिसांसाठी नाही!' असं असताना मात्र काही बक्षिसं तुला खूप आवडायची. ती म्हणजे, जेव्हा जवळचे मित्र, भेटलेले कष्टकरी स्त्री-पुरुष, अनेकजण लिखाण वाचून आवडल्याचं सांगत तेव्हा ते बक्षीस तुला खूप मोठं वाटायचं. 
तुला आठवतं, एकदा अपूर्वने मोबाईलमधून काढलेले फोटो बघून तू त्याचं खूप कौतुक केलं होतंस आणि त्याच दिवशी मी नको म्हणत असतानाही एक नवा कॅमेरा विकत आणून त्याच्या हातात दिला होतास. वर ‘तू आमच्यात पडू नकोस, मी आणि माझा नातू बघून घेऊ’ असं म्हणाला होतास. 
अपूर्व डेंग्यूनं आजारी असताना तू धावत आला होतास. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर महिनाभरात त्याची तब्येत सुधरली पाहिजे म्हणून फळं आणत राहिलास. कितीदातरी स्वत:च्या हाताने तुझी आवडती साबुदाणा खिचडी करून खाऊ घातली आहेस. नाश्ता करायला ये असं सांगायचास, पण मी पत्रकारनगरमध्ये पोहोचेपर्यंत मी कुठपर्यंत पोहोचले आहे हे सतत फोन करून विचारायचास. मला यायला जमलं नाही, तर तू तुझी शबनम खांद्याला लटकवून, हातात कॅमेरा घेऊन आमच्या घरी पोहोचायचास. हक्काने इडली, वडा, कटलेट, करायला सांगायचास. आवडलेल्या पदार्थांचं तोंडभरून कौतुक करायचास. कधी उदासीनं घेरलं, तर तू काय झालं हे न विचारता, बासरी वाजवायचास. माझ्या आवडत्या रागातली ‘सावरियाँ घर नही आये’ ही बंदिश प्रत्येक वेळी गायचास आणि माझा मूड पुन्हा प्रसन्न करायचास.
मी स्वतंत्रपणे लिखाण करावं ही तुझी इच्छा होती, नुकतीच, जेव्‍हा जग बदलणारे ‘ग्रंथ’ ची पहिली प्रत हातात पडली, तेव्‍हा ती घेऊन आधी धावत मी तुझ्याकडे आले, तेव्‍हा तुला किती आनंद झाला होता. तू काढलेलं एक सुरेख छायाचित्र मला लगेच बक्षीस म्हणून देत माझं कौतुक केलं होतंस. 
तुझी सुनंदा तर तुझ्यात इतकी व्‍यापून गेली होती, की बोलता बोलता तुझ्याकडून तिच्याविषयीचे अनेक संदर्भ, अनेक प्रसंग आणि कविता बाहेर पडत. माझे, अपूर्वचे जसे तू फोटो काढायचास, तसेच तुझ्याकडे आलेल्या, तुला भेटलेल्या मुलामुलींचे, मित्रमैत्रिणींचे फोटो तू काढायचास. इतकंच नाही तर स्वखर्चाने ते प्रिंट करून आणून फ्रेम करून त्यांना भेटही द्यायचास. समोरच्याच्या चेहऱ्यावरचा पसरलेला आनंद तुला खूप महत्वाचा वाटायचा.
बाबा, तुझे विचार, तुझं आयुष्य हेच एक पुस्तक होतं आणि आहे. तुला जे वाटलं तेच तू जगलास. तुझं जगणं मीच नव्‍हे माझ्यासारख्या अनेकांसाठी आदर्शवत तर आहेच, पण समृद्ध आणि अर्थपूर्ण जगण्याची एक वाट तू आमच्यासाठी खुली करून दिली आहेस. 
छेद, रिपोर्टिंगचे दिवस, हमीद, मोर, माणसं, धागे आडवे उभे, कोंडमारा, संभ्रम, धार्मिक, गर्द, मुक्तांगणची गोष्ट, मोर, आप्त, स्वतःविषयी, छंदांविषयी, माझी चित्तरकथा, लाकूड कोरताना, पुण्याची अपूर्वाई, अमेरिका, प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत, कार्यमग्न, शिकविले ज्यांनी, कुतूहलापोटी, जिवाभावाचे, आपलेसे, मस्त मस्त उतार, हवेसे, सृष्टीत गोष्टीत, वनात जनात, सरल तरल अशी बाबा तुझी सगळीच पुस्तकं शालेय अभ्यासक्रमात ठेवायला हवीत. याचं कारण आजच्या वेगवान आयुष्यात नातेसंबंधं हरवत चालले आहेत. नितळ, निर्मळ प्रेमाला जागाच शिल्लक नाही. सगळं काही आभासी! अशा वेळी आपल्या लिखाणातून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून तू कधीही कोणालाही उपदेश केला नाहीस, कुठला सल्लाही दिला नाहीस, कुठलीही सक्ती केली नाहीस. फक्त सांगितलंस, ‘बघा माझा प्रवास.....आवडला तर तुम्हीही चला या वाटेवरून!’ 
बाबा, तू कधी स्वत:ची प्रशंसा करत ‘मी किती मोठा’ हे ऐकवलं नाहीस. तू फक्त आणि फक्त आनंद वाटत राहिलास. बाबा, तू एका दीर्घयात्रेवर निघाला आहेस ना? कधीतरी आम्ही होऊ या यात्रेत सामील. पण तोपर्यंत तू आमच्यासाठी ठेवून गेलेला ऐवज आम्ही जपू, त्या विचारांनी त्या वाटेवर चालायचा प्रयत्न करत राहू. 
तुझीच,
दीपा.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.