अरे गा रे मेरे संग मेरे साजना......
अरे गा रे मेरे संग मेरे साजना...... मला तो नेमका कधी आवडायला लागला माहीत नाही. पण जेव्हा त्याला बघितलं तेव्हा तो परका कधी वाटलाच नाही. अतुट विश्वासाचं नातं त्याच्याशी जोडलं गेलं. माझा मित्र असेल तर.....माझा जोडीदार असेल तर.....माझं पालकत्व निभावणारा असेल तर.......हो, तो हा असाच असेल असं मन म्हणायचं. शशी कपूरमध्ये मला हवं असणारं सगळं काही दिसायचं. खरं तर त्या वेळच्या प्रत्येक मुलीची स्वप्नं माझ्यापेक्षा वेगळी नसतील! दिसायला देखणा, मीश्कील, खट्याळ, अवखळ वागणारा, कायम हसतमुख, कष्टासाठी मागे न हटणारा, हळवा, संवेदनशील, न बोलता समजून घेणारा ....
अशा या अभिनेत्यानं माझ्या मनातली एक नाजुक जागा राखून ठेवली होती. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं दिसणं सगळं सगळं मला आवडायचं...... त्याच्यातला अवखळपणा कधीही उथळ आणि थिल्लर वाटला नाही. त्याचं व्यक्तिमत्व त्याच्या सुसंस्कृतपणाची साक्ष द्यायचं. मी शाळेत असताना त्याचा ‘दिवार’ हा चित्रपट बघितला होता.....अमिताभच्या तोडीस तोड, त्याच्या उंचीपुढे कुठेही कमी न पडणारा त्याचा अभिनय, आपल्या मूल्यांना सोबत घेऊन चालणारा शशी कपूर इतका आवडला की मीच त्याची नीतू सिंग काही काळ झाले होते. आणि ‘मैने तुझे मॉंगा तुझे पाया है’ हे गाणं इतकं आवडायला लागलं की घरातल्या रेकॉर्ड प्लेअरवर ते तासन्तास ऐकायला लागले. अर्थातच ‘कहदू तुम्हे, या चूप रहूँ’ हेही गाणं मला आवडायचं.
एके दिवशी ‘अभिनेत्री’ हा हेमामालिनीबरोबरचा शशीकपूरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट मी बघितला. त्यातलं ‘सारे गम प....’ हे गाणं इतकं आवडलं की शास्त्रीय संगीताच्या क्लासला जायचा कंटाळा करणारी मी त्यानंतर मात्र क्लास कधी बुडवला नाही. शशी कपूरनं बोटाला धरून जणू काही क्लासपर्यंत रोज पोहोचवायचा ठेका घेतला होता. मी अकरावीत असेन. औरंगाबादला औरंगपुर्यातल्या अप्सरा टॉकिजमध्ये त्या वेळी ‘जब जब फुल खिले’ हा चित्रपट लागला होता. कॉलेजच्या मैत्रिणी आणि मी घरी न सांगता या चित्रपटाला गेलो होतो. कोणी बघू नये आणि घरापर्यंत ही गोष्ट जाऊ नये ही धाकधूक मनात होती. वडलांपेक्षाही ज्यांची भीती वाटावी असे घरात तीन तीन मोठे भाऊ असल्यानं चित्रपट बघतानाही मनातली भीती मी दूर करू शकत नव्हते. भित्यापाठी ब्रह्मराक्षस प्रमाणे चक्क आमच्याच समोरच्या रांगेत माझ्याहून मोठा भाऊ सुनिल आणि त्याचे मित्र बसलेले मला माझ्या मैत्रिणीनं सुचेतानं दाखवले. आम्ही सगळ्याच घाबरलो. त्यानं चुकून जरी मागे वळून बघितलं तर बातमी घरापर्यंत जाणार हे नक्की होतं. चित्रपट सुरू झाला आणि शशी कपूरनं माझ्या मनाचा ताबा घेतला. त्याचा तो काश्मिीरी पेहराव, त्याचा निरागस स्वभाव, त्याची मान किंचित कलती करून 'परदेसियोंसे ना अखियॉं मिलाना' गाणं असो .......किती स्वप्नवत होतं सगळं......मीही नंदाच्या कायेत प्रवेश करती झाले होते आणि ‘ये समॉं समॉं है ये प्यार का’ आणि ‘ना ना करके प्यार तुम्हीसे कर बैठे’ गाणी जगत होते. शशी कपूरमुळे हा चित्रपट खूप खूप आवडला. नशिबानं घरी काही कळलं नाही. कदाचित भावानं मागं वळून पाहिलं नसावं किंवा तोही माझ्यासारखाच चोरून आला असावा. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला असावा.
मात्र हा चित्रपट आठवताना शशी कपूर आणि या आठवणी सोबतच येतात! ‘शर्मिली’ बघताना ‘खिलते गुल यहॉं’ या गाण्यानं मन हळवं करून सोडलं होतं. तसंच जब जब फूल खिले मधल्या ‘यहॉं मै अजनबी हूँ मे जो हूँ ’ ....या गाण्यानं त्याचं दुखरं मन मलाच कासावीस करून गेलं होतं.....थोडं खुट झालं की आजही डोळे पाझरायला लागतात. त्या वेळीही मी अशीच त्याच्यासाठी खूप खूप रडले होते.....! 'चोर मचाये शोर’ बघताना, त्याचं ‘ले जायेंगे ले जायेंगे’ या गाण्यानं त्याच्यातला धीटपणा सुखावून गेला होता. परिस्थिती आली तर कच खाता कामा नये हे त्यानं दाखवलं ... तसंच त्या वेळी ‘एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना’ हे रोमँटिक गाणंही अंगावर रोमांच उठवून गेलं होतं. नंतर कधीतरी ‘त्रिशुल’ बघितला. ‘मोहोब्बत बडे काम की चीज है’ म्हणणारा शशी कपूर जास्तच भावला. अमिताभचं ते कोरडं वागणं, प्रेमापासून दूर पळणं यापेक्षा शशी कपूरचा ताजेपणा, प्रेमात आकंठ बुडणं कसं असतं ते दाखवणं जास्तच आवडलं. त्याची ‘प्यार का मोसम’ चित्रपटातली ‘तुम बिन जाऊ कहा’ असो की ‘निसुलताना रे प्यार का मोसम आया’ ही गाणी असो त्यानं ‘कायम उत्साही राहा’ हेच मनावर बिंबवलं. मी प्रेमात पडले तेव्हा त्याचं ‘लिखे जो खत तुझे’ हे गाणं तर मी शेकडो वेळा ऐकलं. माझ्या प्रियकरानं लिहिलेली ती हिरव्या शाईतली पत्रं चहुबाजूंनी माझ्यावर बरसण्याचा फील मला शशी कपूरनंच दिला.
एकदा आम्ही सगळेच ‘फकिरा’ हा चित्रपट बघायला गेलो होतो. घरी परतल्यावर आई हळू आवाजात वडलांना ‘कार्टीसाठी स्थळ बघून ठेवा, नाहीतर एके दिवशी ‘फकिरा’तल्या शशी कपूरसारख्या मवाल्याचा हात धरून पळून जाईल...’ म्हणाली होती. मुलीचे म्हणजे शबाना आझमीचे वडील पोलिस अधिकारी असतात आणि शशी कपूर गुंड असतो. मला आईच्या त्या बोलण्याचा राग येण्याऐवजी जास्तच छान वाटलं होतं आणि त्यातलं शबाना आझमीनं ‘दिल मे तुझे बिठा के, कर दुँगी मै बंद आखें पूजा करूंगी तेरी.....’ हे शशी कपूरसाठी गायलेलं गाणं खूप खूप आवडलं होतं. त्या वेळी स्त्री मुक्ती वगैरे कळत नसल्यानं माझ्या शशी कपूरची मी पूजा करणं चुकीचं आहे असं मला मुळीच वाटलं नव्हतं.
'हसीना मान जाएगी' चित्रपटातलं त्याचं 'चले थे साथ मिलके, चलेंगे साथ मिलकर तुम्हे रुक ना पडेगा मेरी आवाज सुनकर' हे गाणं आजही तितकंच आवडतं. बबिताची आर्जव करत गाणारा असा शशी कपूर आपल्याला भेटला असता तर ब्रेक अप कधीच झाला नसता! 'काला पत्थर', 'प्रेमकहाणी', 'दो और दो पॉंच', 'सिलसिला', 'सुहाग',' कभी कभी' या चित्रपटातला त्याचा अभिनय तितकाच आवडला होता. 'काला पत्थर'मधली त्याची ‘एक रास्ता है जिन्दगी’ ही मोटारसायकलवरची एन्ट्री म्हणजे रसरशीत जगणं काय असतं ते दाखवणारी होती. 'दो और दो पॉंच'मधलं हेमामालिनीला इंप्रेस करण्यासाठी म्हटलेलं, 'मेरी जिन्दगी ने मुझपे एहसान क्या किया है’ हे गाणं असो....'वक्त'मधलं 'दिन है बहार के' गाणं असो. किंवा ‘आ गले लग जा’ मधलं 'वादा करो नही छोडोगी मेरा साथ' किंवा 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई' ही गाणी आजही तितकीच शशी कपूरला डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा आणून उभं करतात. खरं तर शशी कपूरचा कुठलाही चित्रपट असो, त्याची भूमिका तो ताजीतवानी करायचा. हिट चित्रपटांबरोबरच त्याचे 'कलयुग', 'विजेता', 'जुनून' सारखे चित्रपटही तितकेच अप्रतिम होते/आहेत. 'इजाजत' मधली त्याची एवढीशी भूमिका पण त्यानं त्याच्या फक्त हसण्यातून सगळं काही व्यक्त केलं होतं. नासिरुद्दिन सारख्या अभिनयाचा बादशहा असलेल्या कलाकारालाही त्यानं तिथेच खाऊन टाकलं होतं.
शशी कपूरला भारत सरकारनं पद्भभूषण देऊन गौरवलं. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फिल्म फेअरचा जीवन गौरव पुरस्कार सह अनेक नामांकित पुरस्कार त्याला मिळाले. पण तरीही तो तसाच सौम्य आणि जमिनीवर ठामपणे पाय रोवून असलेला मनुष्य म्हणून जास्तच जवळचा वाटला. चार डिसेंबर २०१७ या दिवशी मी मुंबईत असताना शशी कपूरच्या जाण्याची बातमी अचानक कळली आणि आपलंच कोणीतरी जणू काही कायमचं दूर निघून गेलंय अशी कळ हृदयातून निघाली. समोर टीव्हीवर कुठल्याशा चॅनलवर 'दिवार' चित्रपट सुरू होता.....बातम्यांमध्येही शशी कपूरचा ‘मेरे पास मा है’ चा डायलॉग सारखा दाखवत होते. 'दिवार' जेव्हा बघितला, त्या वेळी मी खूप लहान होते. पण आता तो पुन्हा बघताना डोळे सारखे भरून येत होते. मित्र म्हणाला, 'हा चित्रपट मला पाठ आहे' आणि कुठलाही प्रसंग किंवा डायलॉग येण्याआधी तोच आधी बोलत होता. मला त्याच्या स्मरणशक्तीची कमाल वाटली. .......चित्रपट संपला आणि आम्ही ‘झी मराठी दिशा’ च्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी चक्री वादळाचं सावट आणि पाऊस यांची तमा न बाळगता घरातून निघालो.
रस्त्यावर शुकशुकाट असल्यानं आम्ही खूपच लवकर नियोजित स्थळी जाऊन पोहोचलो. वेळ असल्यानं आम्ही नरिमन पॉइंटला पूर्वीच्या हॉटेल ओबेरॉयच्या पोर्चमध्ये शिरलो..... एकदम वरच्या म्हणजे ३३ व्या वगैरे मजल्यावर पोहोचलो. पावसामुळे समुद्र दिसतच नव्हता. फक्त धुक्याची एक उंचच उंच भिंत दिसत होती. काही वेळानं निघालो तेव्हा मित्रानं 'दिवार'मधला अमिताभ कसा याच कॉरिडॉरमधून निघतो, बाहेर त्याला परविन बाबी येऊन कशी भेटते आणि एका अपघातातून तो कसा बचावतो हा प्रसंग तिथेच घडल्यानं मला ती एक एक जागा तो दाखवत होता. मी मात्र त्याही वेळी आपला भाऊ खोटीनाटी कामं करतोय हे कळल्यावरची शशी कपूरची मनःस्थिती दाखवणारा चेहरा आठवण्यात गुंग झाले होते. आज माझ्यासाठी कधीकाळी कोणीतरी लिहिलेली हिरव्या शाईतली अंगावरून मोरपिसासारखी अलगद भिरभिरणारी ती पत्रं स्तब्ध झाली आहेत ......
अलविदा माय डिअर शशी कपूर!
दीपा देशमुख
७ डिसेंबर २०१७.
Add new comment