प्रभाकर भोसले
खूप दिवसांपासून प्रभाकर भोसले यांना भेटायला जायचं होतं.....आज ती भेट झाली! अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकांत मदत करताना हळूहळू त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ करायला लागले. त्यानिमितान फोटोशॉप, कोरल ड्रॉ थोडं थोडं कळायला लागलं. नंतर पुस्तकं प्रकाशित होण्यापूर्वीचे संस्कार होताना, म्हणजे त्याचं ले-आऊट वगैरे करतानाही अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत मनोविकास प्रकाशनानं त्यात सहभागी होण्याची संधी दिली आणि काय वाईट दिसतं आणि चांगलं कसं दिसतं हेही मग थोडंसं कळायला लागलं. याच दरम्यान मधली चार-पाच वर्षं ‘चांदोबा’ या मुलांच्या मासिकाचं ट्रान्सलेशनचं काम करत असताना इनडिझाईनमध्ये काम करावं लागलं, त्यामुळे इनडिझाईनचीही थोडीफार ओळख झाली. मात्र हे सगळं एका ठरावीक आणि वरवरच्या पातळीवरच कळत होतं. या सगळ्यातली खोलवर माहिती असायला हवी असंही वाटायचं. पण आपल्याला हवं तसं शिकवणार कोण, असा प्रश्न मनाला पडायचा.
याच दरम्यान यमाजी मालकर या मित्रानं पत्रकारांसाठी महाराष्टभर अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. त्यात युनिकोडचा प्रसार करणं आणि ते कसं वापरायचं हे सांगणं याबद्दलचं सत्र मी घेत असे. त्याच कार्यशाळेत माझी यमाजीचे मित्र प्रभाकर भोसले यांच्याशी ओळख झाली. एकदम बडबडा स्वभाव, आतूनबाहेरून पारदर्शी वागणं, यमाजीविषयी असलेला प्रचंड आदर! ...या कार्यशाळेत प्रभाकरचं जाहिरात, रंगसंगती आणि पेपरचं ले-आऊट कसं असावं यासंबंधीचं सत्र खूपच रंगतदार होत असे. प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो, त्यात एक संगीत असतं आणि त्या शब्दालाही एक लय असते हे प्रभाकरच्या शब्दांच्या मांडणीतून कळायचं. नाजूक शब्द कसा लिहावा, त्याचा फॉन्ट त्याला शोभेसा कसा असावा किंवा अगदी म्हैस शब्द लिहिताना त्याचा फॉन्ट कसा असावा आणि त्या शब्दाचं वजन कसं असावं, ते त्या फॉन्टमधून कसं व्यक्त व्हायला हवं, तसंच रंगसंगती त्या त्या फॉन्टची त्या शब्दाला अनुसरून कशी असावी अशा अनेक गोष्टी प्रभाकरकडून शिकायला मिळाल्या. कॉलमचं महत्त्व काय असतं, वाचकाला रिलॅक्सेशन कशामुळे मिळू शकतं अशा अनेक गोष्टी....
एकदा आम्ही नगरजवळच्या अकोले या गावी कार्यशाळा घ्यायला गेलो, तो प्रवास तर अविस्मरणीय होता. खरं तर संपूर्ण प्रवासात अनेक अडथळे आले, परतीच्या प्रवासात तर ऑईलचा एक टँकर रस्त्यात आडवा झाल्यानं कितीतरी मैल वाहतूकीची कोंडी झालेली...पण अशा वेळी यमाजीचा संयमशील शांत स्वभाव आणि संतोष देशपांडे, प्रभाकर भोसले यांचे विनोद, वातावरण हलकंफुलकं ठेवणं यानं तो प्रवास वैतागाचा न ठरता अतिशय सुखाचा झाला. त्यानंतर काहीच दिवसानंतर मी यमाजीबरोबर पर्यावरण, शिक्षण अशा विषयांवरच्या मासिकांवर संपादकीय काम करायला लागले. त्या वेळी बोलता बोलता मला ले-आऊट, डिझायनिंग या सगळ्या गोष्टी शिकाव्या वाटतात असं बोलून दाखवताच यमाजीनं प्रभाकरचा नम्बर डायल केला आणि मला दुसर्याच दिवशी १२ वाजता अमूक एका पत्त्यावर जावं असं सांगितलं. पण प्रभाकरची फी परवडली पाहिजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न मनात येऊन गेले. पण मनातले प्रश्न मनातच ठेवून दुसर्याच दिवशी मी प्रभाकरच्या ऑफीसमध्ये पोहोचले. खूप छोटंसं ऑफिस म्हणजे त्या एकाच छोट्याशा खेालीत प्रभाकरचं टेबल, काम करणार्या मुलांचे कम्प्युटर्स, येणार्यांसाठी एक छोटासा सोफा, येऊन पडलेला माल....चहाकॉफीची व्यवस्था...सगळं काही तिथेच पण तिथलं वातावरण खूप हसतंखेळतं होतं. प्रभाकरनं मनापासून स्वागत केलं. प्रभाकरची बहीण ममता, तीही त्याच्यासारखीच हसतमुख आणि कष्टाळू. अतिशय साधी, हळवी, संवेदनशील! प्रभाकरच्या तालमीत तयार झालेली! मी रोजच जायला लागले. एके दिवशी हळूच फीचा विषय काढला. पण प्रभाकरनं तो उडवून लावला. मला या स्वभावाचं खूप आश्चर्य वाटलं. पण हळूहळू प्रभाकरला मी रोज बघत होते. नवीन काही बघितलं की सगळ्यांना सांगणं.....त्याच्या ग्राफिटी .....!!!
कामाचा व्याप वाढत असल्यामुळे मदतीसाठी आर्टिस्ट मुलं-मुली हवी असायची. इंटरव्ह्यूसाठी आर्ट स्कूलमधून शिकून आलेली मुलंमुली यायची. एकदा दोन मुलं आली होती. एकजण खूपच एक्स्पर्ट होता आणि कॉन्फिडेंटही! त्यानं अनेक ठिकाणी कामं केली होती. त्याच्या आयपॅडवर ती सगळी कामं नीटपणे ऑर्गनाईज केलेली होती. प्रभाकरच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो मनमोकळेपणानं आणि अचूक असं देत होता. त्याच्याशी छान बोलत प्रभाकरनं नंतर त्याला निरोप दिला आणि दुसरा मुलगा प्रभाकरसमोर येऊन बसला. हा मुलगा खूपच बावरलेला होता. आळंदीहून आला होता. अजून शिक्षण चालू होतं. डोळ्यात स्वप्नं होती, पण नेमकं काय करायचं माहीत नसावं. प्रभाकरच्या प्रश्नांची उत्तरं त्याला नीट देता येत नव्हती आणि त्याला या कामातलं फारसं काही येतही नव्हतं. प्रभाकरनं त्याला उद्यापासून कामाला ये असं सांगितलं. प्रभाकरकडे मी प्रश्नार्थक नजरेनं पाहताच तो म्हणाला, ''मॅडम, तो एक्सपर्ट मुलगा मी घ्यायला हवा होता, माझं काम खूप हलकं झालं असतं असं तुम्हाला म्हणायचंय ना! पण त्या मुलाला कुठेही जॉब मिळेल हो. पण हा मुलगा खूप गरजू आहे. याला काही येत नसलं तरी हे कच्चं मडकं आहे. हा शिकेल. चांगला तयार होईल.’’ आणि खरंच काहीच दिवसांत तो मुलगा प्रभाकरच्या हाताखाली खूप चांगला तयार झाला. प्रभाकरचा हा दृष्टिकोन मला खूपच भावून गेला.
मधल्या काळात प्रकृतीच्या काही प्रश्नांमुळे माझं प्रभाकरचं इनडिझाईनचं शिक्षण अर्धवट राहिलं आणि नंतर पुस्तकांच्या लिखाणात व्यस्त झाल्यामुळे माझं तिथे जाणं थांबलं. यानंतर काहीच दिवसांत प्रभाकरनं स्वतःचं नवीन ऑफीस घेतलं. 'ऑफीस बघायला तरी या मॅडम' असं निमंत्रणही असायचं. पण आज जाऊ उद्या जाऊ असं करत ते राहूनच जायचं. आज मात्र आपण 'कॅनव्हास' घेऊन प्रभाकरकडे जायलाच हवं असं मनानं घेतलं आणि फोनाफोनी होऊन मी प्रभाकरच्या नव्या ऑफीसचा पत्ता शोधत एकदाची पोहोचले.
ऑफीसमध्ये प्रभाकरनं प्रसन्नपणे स्वागत केलं. प्रभाकरच्या स्वागताचा स्वीकार करण्याऐवजी माझी नजर त्याच्या ऑफीसच्या प्रत्येक गोष्टींवरून फिरू लागली. स्वप्नं बघणं आणि ती खरी करणं समोर दिसत होतं. माझ्या आवडीचे दोन रंग म्हणजे हिरवा आणि पिवळा.....इथंही या दोनच शेडमध्ये ऑफीसचं इंटेरियर केलेलं होतं. ऐसपैस जागा आणि कलात्मक सजावट....मन वेडं झालं. काहीच बोलू नये, बस...शांतपणे आस्वाद घेत बसून राहावं असं मन हट्ट करत होतं....पण औपचारिकता सांभाळत मी प्रभाकरच्या केबिनमध्ये त्याच्या पाठोपाठ शिरले. मला आठवत होता, जुन्या ऑफीसमधला प्रभाकर....त्या छोट्या ऑफीसमध्ये सगळ्यांमध्ये रमणारा, हास्यविनोद करणारा, सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून केक आणून ते साजरे करणारा, कामाचा लोड वाढला की सगळ्यांना पिक्चर बघायला पाठवून स्वतः राक्षसी पातळीवर कामाचा फडशा पाडणारा... अशा अनेक रुपात मी प्रभाकरला बघितलं होतं. पुण्यातल्या एका प्रथितयश वर्तमानपत्रातली स्थिर नोकरी सुटल्यावर किंवा सोडल्यावरचा काही काळ किती सैरभैर अवस्थेत गेला असेल या माणसाचा....पण आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग पुढच्या सुरेख भविष्याची कधी कधी चाहूल देत असतात. तसा आजचा प्रभाकर शून्यातून पुन्हा उभा राहून आपल्या सुंदर...म्हटलं तर कार्पोरेट आणि म्हटलं तर कलात्मक अशा ऑफीसमध्ये कामात गुंग आहे. आता या ऑफीसमधला प्रभाकर वेगळा वाटतोय का, या विचारांनं मी प्रभाकरकडे बघितलं. पण त्याच छोट्या ऑफीसमधला प्रभाकर भोसले मला समोर दिसला....तसाच....अगदी तसाच!
आणि हो, मुख्य म्हणजे नवीन ऑफीसच्या प्रेमात पडलेली मी १६ नोव्हेंबरपासून पुन्हा अर्धवट शिकलेल्या गोष्टी प्रभाकरकडून शिकायला जाणार आहे!
दीपा देशमुख
Add new comment