भेट आनंदाशी
डॉ. आनंद नाडकर्णी यांचा फोन वाजला आणि मी तुझ्याकडे बरोब्बर सव्वा आठ वाजता येतो असं त्यांनी सांगितलं. नाश्त्याला काय चालेल विचारल्यावर ते म्हणाले, काहीही. पोहे देखील चालतील. मग माझ्यातल्या आळसवीराला मी सक्तीच्या रजेवर पिटाळून कामाला लागले. बरोबर सव्वा आठ वाजता दारावरची बेल वाजली आणि डॉ. आनंद नाडकर्णी सुहास्य मुद्रेनं गुडमॉर्निंग म्हणत घरात आले. बरोबर आमच्यासाठी पौष्टिक खाऊ देखील त्यांनी आणला होता.
चहा-पोहे होताच गप्पांचा सिलसिला सुरू झाला. अपूर्वही त्यात सामील झाला आणि माझ्याविषयीच्या तक्रारी त्यानं त्यांच्याजवळ मांडल्या. डॉक्टरांबरोबरच्या गप्पा कधीच संपू नयेत असं वाटतं. ज्या वेळी मी आरईबीटी हा कोर्स डॉक्टरांकडे ठाण्याला जावून केला, त्या वेळी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेलं सत्र ५.३० वाजता संपत असे. मधल्या लंच टाईम मध्ये देखील डॉक्टर आमच्याबरोबरच असत. तब्बल ८ तासांचा हा कालावधी एकही सेकंद कंटाळवाणा होत नसे. दिवसभराचा थकवा येण्याऐवजी आम्ही सगळेच क्लासमेट आणखीनच ताजेतवाने होत असू. ही सगळी किमया घडवून आणण्याची ताकद या आनंद नावाच्या माणसांत आहे. महाराष्ट्रात १० जिल्ह्यात होणाऱ्या वेधच्या वेळी डॉक्टरांनी अर्थपूर्ण जीवन जगणाऱ्या अनेकांशी साधलेला संवाद ऐकताना/पाहताना, डॉक्टरांचा दिवसभराचा स्टॅमिना त्यात सामील होणाऱ्यांनी अनुभवला असेलच.
डॉक्टरांबरोबर झालेल्या आजच्या सगळ्याच गप्पा खूप खूप देवून जाणाऱ्या होत्या. चांगली माणसं नेहमीच सहजपणे किती काय काय पेरून जातात हे त्यांच्याशी भेट झालं की कळतं. मला भेटलेल्या व्यक्तींमधली मला सर्वाधिक भावलेली व्यक्ती म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी. त्यांच्यातला उत्साह, त्यांचं अनेकविध क्षेत्रातलं काम, त्यांचा विनम्र, मधुर स्वभाव, काय काय आणि कशाकशाबद्दल बोलावं? त्यांचं ‘मी‘ च्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व!
लवकरच डॉक्टरांचं ‘मनमैत्रीच्या जगात’ (मन मैत्रीच्या देशात असावं बहुतेक...) हे पुस्तक आपल्या भेटीला येणार आहे. मला तरी वाटतं हे पुस्तक डॉक्टरांच्या आत्तापर्यंतच्या पुस्तकातलं सर्वोत्कृष्ट असं पुस्तक असणार आहे. कारण विषयच तसा आहे, प्रत्येकाला सोबत करणारा, त्याचा मित्र बनणारा, वेळप्रसंगी त्याचा मार्गदर्शक होणारा, त्याची भेट आनंदाशी करणारा...!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment