द फ्री व्हॉईस - रविश कुमार - सुनील तांबे - अक्षरनामा एप्रिल 2019

द फ्री व्हॉईस - रविश कुमार - सुनील तांबे - अक्षरनामा एप्रिल 2019

मधुश्री पब्लिकेशन निर्मित, रविश कुमार लिखित आणि सुनिल तांबे अनुवादित ‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकात बोलते व्हा, यांत्रिक लोक आणि नव्या लोकशाहीची इमारत, भयपेरणीचा राष्ट्रीय प्रकल्प, जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो, आपण जनता आहोत, बाबालोकांचा देश, प्रेमाची गोष्ट, खाजगीपणाचा मूलभूत हक्क आणि चला, स्वातंत्र्यदिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ या या लेखांना समाविष्ट केलं आहे. 

'द फ्री व्हॉईस’  हे पुस्तक संपूर्ण वाचून झालं असलं तरी प्रत्येक लेखावर एक प्रतिक्रिया लिहायला पाहिजे जे जाणवल्यानं आज मला ‘प्रेमाची गोष्ट’ या लेखावर लिहिण्याचा मोह झाला. खरं तर एक बातमी या लेखावर लिहायला कारणीभूत ठरली. ऑनर किलिंगच्या बातम्या सततच वर्तमानपत्रांमधून, टीव्ही चॅनेल्सवरून वाचायला, बघायला मिळतात. आज सकाळी वर्तमानपत्रात सोनई गावातल्या एका प्रेमिकांची बातमी वाचली. या प्रेमिकांची जात वेगळी असल्यानं घरातून विरोध हेाईल हे ठाऊक असल्यानं पळून जाऊन दोघांनी संगमनेर इथं लग्न केलं. लग्नानंतर सुखाचा संसारही सुरू झाला. मात्र काहीच दिवसांत मुलीच्या घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि आमचा आता विरोध मावळला असून, तू घरी परत ये. आम्ही रीतसर पुन्हा तुमचं लग्न लावून देतो असं सांगितलं. आई-वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुलगी माहेरी परतली आणि जन्मदात्यांनीच तिची हत्या करून तिचे अंत्यसंस्कारही करून टाकले. मुलाला जेव्हा आपल्या पत्नीचा मोबाईल लागेना, तेव्हा तो तडक सासुरवाडीला जाऊन पोहोचला, तेव्हा मुलीचा हृदयविकारानं अचानक मृत्यू झाला असून तिचे अंत्यसंस्कार केल्याची बातमी तिच्या घरच्यांनी दिली. मुलाने पोलिस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली. तपास सुरू आहे. 

ही बातमी वाचून 'प्रेम' हा विषय मनात घोळू लागला. या प्रेमी जिवांच्या ताटातुटीबद्दल मन खंतावलं. रविश कुमारचा लेख मनात पिंगा घालू लागला. रविश कुमार म्हणतात, 'भारतात प्रेम करणं एक लढाई आहे.' त्यांचे हे शब्द सत्याची प्रचिती देऊन जातात. या लेखात रविशकुमारांनी चित्रपटातली प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. गरीब-श्रीमंत दरी, जातीच्या भिंती अनेक चित्रपटांतून दाखवण्यात येतात. त्यामुळे प्रेम करताना जातीच्या रिंगणातच प्रेमाच्या शक्यता शोधाव्यात असं उपहासानं रविशकुमार म्हणतात. बहुतांश चित्रपट व्यवस्थेला धक्का न बसू देता तयार केले जातात. यात इतकं पराकोटीचं काल्पनिक विश्व उभं केलेलं असतं, की नायक-नायिका सुंदर असतात, छान छान गाणी गातात. ही गाणी गुलजार किंवा आनंद बक्षी यांच्यासारख्या ख्यातनाम गीतकारांकडून लिहून घेतली जातात आणि कडूगोड प्रसंगानंतर पळून जाण्याचा संदेश यातून दिला जातो. 

प्रत्यक्षातही ज्यांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, विशेषतः राजकारणातल्या व्यक्ती असतील तर सार्वजनिकरीत्या ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. मतदार नाराज होतील अशी भीती त्यांना वाटत असते. खूप क्वचित वेळा काही लोक हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस करतात आणि त्याची किंमतही मोजतात. रविश कुमार म्हणतात, आपल्याकडे प्रेम करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत. निर्धास्तपणे आपल्या प्रियकरांच्या खांद्यावर डोक ठेवून विसावण्यासाठीची जागा मी शहरात जागोजागी प्रेमाची उद्यानं बांधून निर्माण केली असती. हुंड्याच्या अर्थशााावरही रविशकुमार प्रकाशझोत टाकतात. प्रेम असलं तरी हुंडा देणं-घेणं यात त्या तरुणालाही वावगं वाटत नाही याबद्दलची खंत व्यक्त करून रविश कुमार अशा तरुणांना ‘चुल्लूभर पाणीमे डूब मरो’ असं वैतागून म्हणतात.

प्रेम माणसाला जबाबदार बनवतं. प्रेमानं त्यांना जग बदलायचं असतं. ऋतुंचा ताल प्रेमिकांच्या हृदयात असतो अशी हळुवारपणे प्रेमाची ताकद सांगत असतानाच प्रेमाचं दुबळेपणही रविशकुमार सांगतात. प्रेम करणं म्हणजे केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणं नसून दुसर्‍याबरोबरच स्वतःलाही ओळखणं असतं. ऑनर किलिंगची उदाहरणं देताना रविश कुमार प्रेम, हिंसा, धर्म,  याबरोबरच मुलगी नको म्हणून पोटातच मारून टाकणार्‍या पालकांच्या मानसिकतेवरही प्रहार करतात. 

प्रेमाला मोकळं अवकाश मिळायला हवं. त्या मोकळ्या अवकाशात प्रेम बहरायला हवं आणि प्रेमातून माघार घेणार्‍या प्रेमिकांनी डरपोक व्हायचं की स्वतः निर्णय घेऊन आपलं प्रेम यशस्वी करायचं हे ठरवायला हवं.  

रवीश कुमार हे भारताचे ज्येष्ठ पत्रकार तर आहेतच, पण त्याचबरोबर निर्भिड पण तटस्थ अशी पत्रकारिता हे त्यांचं खास वैशिष्ट्य! वैयक्तिक नफा किंवा तोटा यांचा जराही विचार न करता, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, जनसामान्यांचं हित पाहणारी आणि सत्य कथन करणारी अशी त्यांची पत्रकारिता आहे. त्यांना ऐकणं हा जेवढा आनंददायी अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचं लिखाण वाचणं हाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा अनुभव आहे. 

मधुश्री पब्लिकेशननं ‘द फ्री व्हॉईस’ या पुस्तकाची निर्मिती अतिशय दर्जेदार केली असून या पुस्तकाची अल्पावधीतच नवी आवृत्ती निघाली आणि ती बाजारात नव्या दमाने दाखल झाली आहे. रविश कुमार यांचं हे पुस्तक सुनिल तांबेंनी अनुवाद केलं आहे. अनेकदा मूळ कथानक वाचलं, किंवा मूळ चित्रपट बघितला की त्याचा अनुवाद किंवा इतर भाषेतलं त्याचं रुपांतर तितकंच सरस होईलच याची खात्री बाळगता येत नाही. लिखाणाच्या बाबतीत तर अनेक वेळा अचूकता जपण्याच्या नादात मूळ भाषेतला गोडवा नष्ट होऊन एकप्रकारचा रूक्षपणा, कोरडेपणा त्यात उतरतो आणि मग ते लिखाण वाचकाच्या मनाला भिडत नाही, त्याच्या अंतःकरणाला स्पर्शून जात नाही. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे रविश कुमारचं मूळ लिखाण वाचल्यावर अनुवादीत लिखाणाच्या बाबतीत तुलना होण्याची दाट शक्यता होती. मात्र असं झालं नाही. याचं कारण सुनिल तांबेंनी इतका सुरेश अनुवाद केला आहे की जणू काही रविश कुमार महाराष्ट्रीयन असावेत आणि त्यांचं मूळ पुस्तक मराठीत असून ते त्यांनीच लिहिलेलं असावं इतका जिवंतपणा, रसरशीतपणा त्यात उतरला आहे. आणि अर्थातच हे सगळं श्रेय सुनिल तांबे यांचं आहे. जरूर वाचा ‘ द फ्री व्हॉईस’. 

दीपा देशमुख, पुणे 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.