पंचतंत्र
रमेश दिघे संकलित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘पंचतंत्र’ या तीन पुस्तकांचा रंगीत संच अप्रतिम आहे. मी तर या पुस्तकांच्या प्रेमातच पडले. ज्यांची ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी तर आपल्या मुलांना ही पुस्तकं भेट द्यायलाच हवीत, पण आपणही ती वाचायला हवीत.
या पुस्तकातल्या गोष्टी अगदी छोट्या आणि बोधप्रद आहेत. वाचता वाचताच या गोष्टींमधून काय बोध घ्यावा किंवा काय शिकायला हवं ते कळून येतं. महत्त्वाचा भाग म्हणजे यातली चित्रं आणि मुखपृष्ठ इतकं इतकं सुंदर आहे की ही पुस्तकं सतत बरोबर घेऊन फिरावीत असं मला वाटलं. मी अनेकांना भेटही दिली. विशेषतः माझी प्रिय मैत्रीण सुवर्णसंध्या हिची मुलगी जिविधा हिला ती सर्वात आधी भेट दिली.
मुखपृष्ठ आणि आतली रंगीत चित्रं रेश्मा बर्वे या चित्रकार मैत्रिणीनं काढली आहेत. ही चित्रं आणि हे मुखपृष्ठ मधुबनी शैलीतली आहेत. मधुबनी ही बिहारमधली प्राचीन अशी चित्रशैली आहे. प्राचीन मिथिला प्रांतातली म्हणून तिला मिथिला शैली असंही म्हटलं जातं. यातल्या चित्रांमध्ये पौराणिक कथा, देवदेवता, चंद्र, सूर्य, तारे, प्राणी, सण असे विषय उलगडलेले दिसतात. यातले रंग इतके उठावदार असतात की कोणीही सहजपणे प्रेमात पडावं. मनोविकासनं रेश्मा बर्वेंची चित्रकारितेला डिजिटल माध्यमातून प्रसिद्ध करून अतिशय मोलाची गोष्ट केली आहे.
अभिनंदन मनोविकास टीम आणि अभिनंदन रेश्मा बर्वे!
जरूर जरूर वाचा, मधुबनी शैलीतला चित्रांसह असलेला तीन पुस्तकांचा पंचतंत्र संच!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment