अवघेचि उच्चार

अवघेचि उच्चार

राजू देसले यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. अतिशय मृदू, सौम्य आणि प्रसन्न असं व्‍यक्तिमत्व. मात्र त्यांच्यातल्या कवीला, चित्रकाराला, संगीत-दर्दीला ‘अवघेचि उच्चार’ या काव्‍यसंग्रहाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भेटले. कॉपर कॉईन या प्रकाशनानं काढलेला ‘अवघेचि उच्चार’ हा राजू देसले लिखित कवितासंग्रह पहिलाच असून त्याला राज्य शासनाचा पुरस्कारही नुकताच मिळाला आहे. या काव्‍यसंग्रहाचं अतिशय बोलकं असं समर्पक मुखपृष्ठ विख्यात चित्रकार अन्वर हुसेन यांचं असून आतली रेखाचित्रंही त्यांनीच रेखाटली आहेत. विशेष म्हणजे कवीचे शब्द आणि चित्रकाराची रेखाटनं यांचा असा सुरेख मेळ जमला आहे की यात चित्रं बोलू लागतात आणि शब्दांची वळणं चित्रं रेखाटत राहतात. 
राजू देसले या कवीने यातल्या कविता त्याला समजून उमजून घेणाऱ्यांना अर्पण केल्या आहेत.  आणि म्हणूनच कवीला जो समजून घेईल त्यालाच यातल्या प्रत्येक पानावरचं शब्दचित्र कळेल, दिसेल आणि उमजेलही. 
अवघेचि उच्चार या कवितासंग्रहात एकूण ५१ कविता असून हे पुस्तक म्हणजे मौनाने रेखाटलेलं अमूर्त शैलीतलं जणू एक चित्रच आहे. 
कवी अबोल आहे, मात्र त्याचं मौन बोलत राहतं, पण ते मौन समोरच्याला कळेल का हाही प्रश्नच आहे.  अशा वेळी मौनाच्या झाडाला फुलं बिनवासाची कवी का म्हणतोय ते जाणवत राहतं. त्याच्या मनातलं आणि त्याच्या मनाबाहेरचं चित्र आकार घेत राहतं. 
कवीबरोबर सहप्रवासी होत असताना हलकेच आईची चाहूल लागते आणि झाड आणि आई एकरूप होताना दिसतात. तिची महती सांगताना आई म्हणजेच जणू विश्वरूप असं कवी म्हणतो. तिचं वात्सल्य, तिच्यातला आशावाद, तिची माया, करुणा आणि सोशिकपणा यांच्याविषयी बोलताना कवी तिचं चित्र आपल्या शब्दांमधून रेखाटतो, तेव्‍हा एक घनदाट अरण्य समोर उभं राहतं. कवी म्हणतो :
आई, विश्वाच्या कॅनव्‍हासवरचा
चिरंतन, आशयगर्भ भवताल...
प्रवास निरंतर सुरू...कधी माहीत असलेल्या वाटेवरून चालत, तर कधी अदृश्य वाटांवरून, अशा वेळी मनातल्या ऋतुंचं बहरणं, तर कधी पानगळ होणं कवी दाखवत राहतो. कधी त्याच्या वेदना मनात खोलवर कुठेतरी दडून बसतात, तर कधी त्या ठसठसतात. तो म्हणतो :
मेंदूच्या नसांतून
झडलेल्या दु:खाचं
उदासीन लालजर्द झाड
पेशीपेशी अविरत
फोफावत चाललंय
कवी मनावर पसरलेल्या उदासीचं वर्णन करताना म्हणतो :
झाड उन्मळून पडलं की
झाडाची पानं, फांद्या, मुळंही
उन्मळून पडावीत
तशीच
संथ उदासी
या घरावर झाकोळून आलेली...
आजवरच्या कवितेत फुलपाखराचं अस्तित्व कोमल, हळुवार, प्रेममय भावनेशी निगडित होतं, पण कवीचं फुलपाखरू वेदनेच्या शापानं भिरभिरताना दिसतं. 
प्रत्येकाच्या नशीब नावाच्या 
गंधहीन फुलावर
वेदनेचं भिरभिरतं फुलपाखरू
सैरभैर...
अस्वस्थ वर्तमानात जगताना निष्प्राण, रंगहीन, बधिर, यंत्रवत जगणारी माणसं भिरभिरताना कवीला दिसतात आणि मग अशा दहशतीच्या वातावरणात चांगलं असं कुठे शोधायचं असा प्रश्न त्याला पडतो. इथे तो म्हणतो :
धर्म आणि अध्यात्म विचारवंतांनी एकाच
गाठोड्यात बांधून ठेवलेत....
वर्तमानात जगावं कसं, आपल्या अस्तित्वाचे उद्धस्त अवशेष कवीला दिसायला लागतात. या वर्तमानाचं भेसूर चित्र आपोआपच कवीच्या कॅनव्‍हासवर रंगत जातं. वर्तमानाचा सांगाडा असा शब्द जेव्‍हा कवी वापरतो, तेव्‍हा हादरून जायला होतं. शहरातली धाव धाव धावणारी माणसं दिसायला लागतात आणि कवीचे शहराविषयी बोलणारे शब्द मनावर घाव घालत राहतात :
सूर्याचं कपाळ 
पांढरंफटक झालं की, 
महानगर नावाच्या फुलावर
भिरभिरत राहतात
संवदेनाहीन
पक्षी...
कवीमधला कॉमन मॅन इथे भेटतो. त्यानं वापरलेला ‘दु:खलिपी’ हा शब्द आतवर रूतत जातो. तो म्हणतो :
सुख नावाचा शब्द
पुसट झालाय,
त्याच्या आयुष्याच्या
पुस्तकातून...
कवीला शब्द शोधावे लागत नाहीत, ते त्याच्या सुखदु:खात त्याला कायमच सोबत करत राहतात. जेव्‍हा अगदी जवळचं कुणी आकस्मिक निघून जातं, तेव्‍हा त्या पोकळीत अडगळीत पडलेल्या आठवणींची माती ढासळत राहते असं कवीला वाटतं आणि त्याचा हा शोक आपलाही बनून जातो. प्रवासात पावलोपावली दु:ख सोबत करत राहणार आहे हे कवीनं स्वीकारलं असल्यामुळेच तो म्हणतो :
दु:ख नावाचं आदिम
झाड
कितीही रोखलं तरी पुन्हा पुन्हा
उगवतच राहतं
शरीरभर...
त्याची ‘मौनाच्या लाटा’ ही कविता लाजबाब! जितकी कविता अप्रतिम तितकंच अन्वर हुसेन यांनी काढलेलं रेखाटन! कवी म्हणतो :
आत आत खोल
स्वत:ला शोधत जाणं म्हणजे
मौनाची वीण हलकेच
उसवत जाणं
दहशत, हिंसा, मूल्यांची घसरण, अशा वातावरणात कवीचं मौन अधिक गडद होताना दिसतं.
वेदनेने भरलेल्या, नकोश्या वाटेवरून चालत राहावं लागतं आणि मग मनात भावभक्तिचा कोंब उमलून येतो. श्रद्धा मनाला दिलासा देते आणि पुढली वाट तुडवण्यासाठी मन सज्ज होतं. 
त्याच वेळी सर्वसामान्यांचं खडतर जगणं, त्यांची बिकट वाट आणि प्रतिकूल परिस्थिती असं सगळं चित्र दिसत असताना कवी त्या चित्रात एक आशेचा किरण रंगवतो. त्यामुळे जगणं सुसह्य होतं आणि चांगुलपण पुढे साथ देत राहतं असं कवीला वाटतं. 
अशा सगळ्या वातावरणातही कवीचं मन मात्र नितळ, शुद्ध, स्वच्छ असं, ते सुंदराचा वेध आणि शोध घेत राहतं...बाहेरचा कोलाहल जास्त झाला की त्याची पावलं आपसूकच आत वळतात, तिथे पोहोचलं की मळभ जणू दूर होतं आणि अमूर्त मन त्याला समजून घेतं.
कवी फक्‍त शब्दांची भाषा जाणत नाही, तर त्याच्या शब्दांतून चित्र जशी उमटतात, तसंच संगीतही विहरतं. सर्वत्र असलेल्या अमानुष जगण्यावर त्याचं व्‍हायोलिन करुणेचा स्वर काढत राहतं. कवीला युद्ध नकोय, कुठल्याही स्तरावरची हिंसा त्याला कासावीस करते. त्याचं मन शांतीचा संदेश दूरवर पोहोचवण्यासाठी सज्ज होतं.
‘अवघेचि उच्चार’ हा कविता संग्रह का वाचायला हवा, तर त्यात कवीचीच नव्‍हे तर आपल्या सगळ्यांच्याच जगण्यातली घुसमट, आकांत, वेदना साकारली गेली आहे, मात्र हा दु:खद प्रवास सुसह्य करण्याची ताकदही कवीने अनेक कवितांमधून स्वत:ही मिळवली आहे आणि अर्थातच वाचकांनाही दिली आहे. 
राजू देसलेंची कविता प्रवाही असून ती कधी हळुवार संगीत ऐकवते, तर कधी अंगावर तुषारांचं शिंपण करते, ती कधी वेदनेचा हुंकार भरते, तर कधी नव्‍या पहाटेची चाहूल देते. राजूची कविता चौकटीत चिकटून बसलेल्या त्याच त्याच शब्दांना मोकळं करते आणि त्यांना नव्‍या अर्थाचा आयाम देते. खरं तर समरगीत असो, वा काळ नावाची कविता असो, प्रत्येक कवितेवर लिहीत राहावं, तिला रुजवावं, फुलवावं, न्याहाळावं आणि तिच्या अमूर्ततेला समजून घ्यावं हेच खरं!
राजू, पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख.
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.