काजवा

काजवा

मनोविकासच्या ऑफीसमध्ये गेले असताना तिथे एका व्‍यक्‍तीने समोर येऊन मला नमस्कार केला. अतिशय सौम्य व्‍यक्‍तिमत्व असलेली ती व्‍यक्‍ती बघून मला आमची ओळख आहे की नाही याबद्दल मनात काही क्षण संभ्रम निर्माण झाला. त्यांच्याशी बोलताना अचानक ट्यूब पेटली. मध्यंतरी अरविंद पाटकर मला काजवाच्या प्रकाशनासाठी जायचं आहे असं म्हणत होते, तसंच आल्यानंतर कार्यक्रम खूप चांगला झाला, उत्तम कांबळे छान बोलले असं म्हटल्याचं आठवलं. माझ्याशी बोलत असलेली व्‍यक्‍ती होती शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे. त्यांनी त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं ‘काजवा’ हे आत्मकथन माझ्या हातात ठेवलं.
पुस्तक वाचण्याची अपार उत्सुकता होतीच, त्यातून अन्वर हुसेनचं अतिशय बोलकं मुखपृष्ठ आतल्या रेखाचित्रांकडे लक्ष वेधत होतं. आधाशासारखी प्रस्तावना वाचून काढली. खरोखरंच उत्तम कांबळेंची ‘अंधार भेदणारं उजेडसूत्र’ ही प्रस्तावना इतकी अप्रतिम झाली आहे की अशी प्रस्तावना कोणी लिहू शकेल का असा प्रश्न पडावा. सच्चेपणा, पारदर्शीपणा आणि निखळ अनुभवांची सहजसोपी मांडणी ही या आत्मकथनाची काही अप्रूप वैशिष्ट्यं असं त्यांनी म्हटलंय. तसंच वास्तवाशी हे आत्मकथन बेईमानी करत नाही, दु:खाची सजावट करत नाही असंही उत्तम कांबळे म्हणतात आणि अर्थातच त्याचा प्रत्यय वाचताना येतो.
ऊसतोड मजूर दांपत्याचा पोपट नावाच्या मुलाचा प्रवास या आत्मकथनात अनुभवायला मिळतो. आपल्या मुलाच्या वाट्याला आपल्यासारखंच खडतर आयुष्य येऊ नये यासाठी आई-वडील त्याच्या हातात पाटी-पेन्सिल देतात. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे एका क्षणात जांदूची कांडी फिरावी तशी मधली सगळी वर्षं गायब होऊन त्यातल्या नायक अथवा नायिकेचा उत्कर्ष बघायला मिळतो. तसं प्रत्यक्षात, वास्तवात घडत नसतं. इथे हातात पाटी-पेन्सिल आल्याने पोपट नावाच्या या मुलाचा संघर्ष, त्याची फरफट थांबतच नाही. 
ज्या वयात आई-वडील-भावंडं यांच्या सहवासात राहून खेळायला मिळतं, लाड करून घेतले जातात अशा कोवळ्या वयात हा मुलगा आई-वडील ऊस तोडणी करण्यासाठी गेल्यावर एकटा आपल्या खोपटात राहतो. ज्यांनी दोन भाकरी करून घालू तुझ्या मुलाला अशी जबाबदारी घेतलेली असते, त्यांनी कपाळावर आठ्या आणताच हा स्वाभिमानी मुलगा स्वत: चूल पेटवून भाकरी करून त्याच पीठाचं पिठलं बनवून जेवतो. त्या दोन स्त्रियांमुळेच आपण स्वावलंबी बनलो असं म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञताच व्‍यक्त करतो. मुलगा शाळेत जातो, मिणमिणत्या प्रकाशात अभ्यासही करतो. नापास झालास तर शिकवणार नाही हे वडिलांचं वाक्य तो कधीच विसरत नाही. शिकत असताना शाळेत शिक्षकांची, गावातल्या शेठजींच्या घरची/दुकानातली कामं तो न कंटाळता करत राहतो. सुट्टीच्या काळात कधी एखाद्या टेलरच्या हाताखाली काम कर, तर कधी आई-वडिलांबरोबर कष्टाची कामं कर असं करत राहतो. या सगळ्या प्रवासात कितीही अपमान झाले तरी तो त्या त्या व्‍यक्‍तींविषयी, परिस्थितीविषयी मनात आकस ठेवत नाही हे विशेष! प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याच्यात कुठेही कडवटपणा येत नाही, तर त्याची संवेदनशीलता जास्त जागरूकतेने इतरत्र बघायला लागते. आपल्याबरोबरच आपल्या मित्रांचं, आपल्या कुटुंबाचं चांगलं कसं होईल याचाच तो सदैव विचार आणि कृती करताना दिसतो. त्याच्यातला कार्यकर्ता सदैव जागा असतो. विशेषत: आपल्या कल्याण नावाच्या मित्राला नोकरीची संधी मिळून निवड होऊ शकते हे कळताच मिळेल त्या वाहनानं, रात्रीच्या अंधारात हा तरूण नदीपात्रात झेपावून पोहत किनारा गाठतो. कल्याणची प्राध्यापक म्हणून निवड होताच सगळ्यात जास्त आनंद यालाच होतो.
शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत हा मुलगा स्पर्धा परीक्षेत यश मिळवतो आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत होतो. इतरांसारखा चौकटीतला दृष्टिकोन न ठेवता शिक्षण क्षेत्रात सर्जनशीलतेने नवनवीन प्रयोग करतो आणि ते प्रयोग यशस्वीही करतो. काम करताना अनेक अडचणी, अडथळे आणि संकटांना सामोरंही जातो, पण आपल्या मूल्यांची कास सोडत नाही. धमक्यांना घाबरत नाही. त्याचे कष्ट, त्याचा अभ्यास आणि त्याचा आत्मविश्वास हेच त्याला बळ देत राहतात असं लक्षात येतं.
‘काजवा’ हे शीर्षक लेखकाच्या नम्रतेला अधोरेखित करत असलं, तरी काजव्‍याचं रुपांतर त्यानं आपल्या अथक परिश्रमातून एका तेजस्वी सूर्यात केलं आहे हे मात्र खरं. अनेक प्रसंग मनात घर करून आहेत, पण मी सांगण्यापेक्षा वाचकांनी ते वाचून त्याचा अनुभव घ्यावा. लेखकानं आपल्या कार्यात किती झोकून दिलं होतं तेही काजवा वाचताना लक्षात येतं, त्यामुळेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यानं संक्षिप्त लिहिलं आहे. आपल्या कुटुंबाविषयी यात आणखी आलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं असं पुसटसं वाटून गेलं.
एखादी गोष्ट न मिळाल्याने अनेकदा बरीच मुलं खचून जातात, आयुष्य आता संपलं असं समजून निराश होतात. अशा वेळी विद्यार्थ्यांनी त्या अपयशाला कसं पचवावं आणि पुढे जावं हे समजून घेण्यासाठी काजवा जरूर वाचावं. विद्यार्थीच नव्‍हे, तर कुठल्याही वयोगटातल्या कोणीही हे पुस्तक वाचावंच कारण हे पुस्तक सहानुभूती दर्शवत नाही तर तुम्हाला प्रेरित करत पुढे जाण्यासाठी उद्युक्त करतं, त्यामुळे नक्‍की वाचा – काजवा – लेखक पोपट श्रीराम काळे – मनोविकास प्रकाशन.
दीपा देशमुख, पुणे
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.