इंडिका - नंदा खरे

इंडिका - नंदा खरे

काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात नंदा खरे यांच्या 'इंडिका' या पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानिमित्त गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. नंदा खरे हे निर्माणींचे लाडके नंदाकाका म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. नंदाकाका आणि विद्याकाकू यांचं नागपूरमधलं घर कुठल्याही तरुणाईसाठी २४ तास खुलं असतं. वैयक्तिक अडचणी असोत, वा सामाजिक अडथळे - प्रत्येकजण नंदाकाकाजवळ आपलं मन मोकळं करतो, त्यांचा सल्ला घेऊन पुढे जातो. यात नंदाकाकांची भूमिका उपदेश करण्याची कधीच नसते, तर ते या सगळ्या तरुणांचे मित्रच असतात. 

तर अशा या नंदाकाका ऊर्फ नंदा खरे यांची यापूर्वीही अनेक पुस्तकं वाचकांना सुपरिचित आहेत आणि आवडलेली आहेत. त्यात बखर अंतकाळाची, कहाणी मानवप्राण्याची, अंतोजीची बखर, नांगरल्याविण भुई, कापूसकोंड्याची गोष्ट, उद्या, ऐवजी, वारूळ पुराण, दगडावर दगड...विटेवर वीट, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य,  ज्ञाताच्या कुंपणावरून ही पुस्तकं विशेष करून वाचकांच्या पसंतीस पावलेली. 
'इंडिका' हे पुस्तक प्रणयलाल यांनी लिहिलेलं असून मराठीतून त्याचा अनुवाद नंदा खरे यांनी केला. या अनुवादाची देखील एक गंमतच आहे. प्रणयलालचं 'इंडिका' नंदाकाकांच्या हातात पडलं आणि त्यांना या पुस्तकानं झपाटून टाकलं. त्यांनी स्वतःसाठीच एक आनंद या भावनेतून या पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केली. अवघ्या चार महिन्यांत या पुस्तकाचा अनुवाद तयार झाला. मग नंदाकाका त्यांच्या नेहमीच्या प्रकाशकाकडे हे पुस्तक घेऊन गेले, तेव्हा ते प्रकाशक म्हणाले, हे पुस्तक रंगीत चित्रांनी युक्त आहे, याची पृष्ठसंख्या खूप आहे. हे पुस्तक करायचं झालं तर किंमत १००० रुपये तरी कमीत कमी ठेवावी लागेल आणि एवढं करूनही पुस्तकाची विक्री किती होईल याचा अंदाज बांधता येत नाही. नंदाकाका आपलं बाड घेऊन घरी परतले. 

त्याच वेळी त्यांना कळलं शरद अष्टेकर हा तरूण 'इंडिका'च्या अनुवादासाठी चांगला लेखक शोधतो आहे आणि विशेष म्हणजे शरदनं या अनुवादाचे रीतसर हक्कही मिळवले आहेत. शरद आणि नंदाकाका जेव्हा भेटले तेव्हा शरदला हे पुस्तक तयारच पाहून अत्यानंद झाला आणि त्यानं आपण हे पुस्तक प्रसिद्ध करूच, पण किंमतही वाजवी म्हणजे ६०० रुपये ठेवू असं सांगितलं. बोलल्याप्रमाणे मधुश्री प्रकाशनाच्या वतीनं 'इंडिका' प्रसिद्ध झालं. त्याचं पहिलं प्रकाशन नागपूर इथे झालं आणि या पुस्तकाविषयी खूप उत्सुकता असल्यानं पुणेकरांच्या आग्रहामुळे काल महाराष्ट्र साहित्य परिषदेत नंदाकाकांच्या गप्पा आणि त्यानिमित्त पुण्यातलं प्रकाशन असा कार्यक्रम आयोजित केला होता. 

'इंडिका' या पुस्तकात आश्चर्यकारक अनेक गोष्टी आहेत. जो वाचायला लागेल तो या पुस्तकाच्या प्रेमातच पडेल. मुखपृष्टावर जरी भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास असं लिहिलं असलं, तरी प्रत्यक्ष वाचताना भौगोलिक रचनेतले बदल घडताना काय काय गमतीजमती झाल्या ते सगळं यात लिहिलं आहे. भारतात सापडलेली डायनॉसॉरची घरटी असोत, वा अंडी असोत, बंगालच्या उपसागराच्या तळाशी असलेल्या ग्रँड कॅनियनपेक्षाही मोठमोठ्या असलेल्या दर्‍या असोत याविषयी आपण पूर्णपणे अनभिज्ञ आहोत. प्रणयलालसारखा जिज्ञासू लेखक भारतभर फिरतो आणि आपल्या संशोधनातून हे सगळं लिहितो. आपण जिथे राहतो, त्याबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाही हे पुस्तक वाचताना जाणवतं. भारतापासून खंड कसे सरकले, नंगा पर्वताची उंची कशी वाढतेय, जिवाश्मांचं स्वरूप अशा अनेक गोष्टींवर नंदाकाका भरभरून बोलले. 

नंदाकाकांच्या बोलण्यानंतर अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले. त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीनं नंदा खरे यांनी दिलं. एकूणच कार्यक्रम रंगतदार झाला. सायली ताम्हाणे हिने नंदा काकांची ओळख करून दिली. मधुश्री प्रकाशनानं म्हणजेच शरद अष्टेकरनं हे देखणं पुस्तक काढलं आहे. या पुस्तकातली जागोजागी असलेली रंगीत चित्र आकर्षित करतात आणि पुस्तकातला मजकूर समजण्यास आणखीनच मदत करतात. पुस्तकपेठेत तर काल इंडिकाची किंमत अवघी ४०० रुपये ठेवली होती. आताही संभा नक्कीच मोठा डिसकाउंट देतील ही खात्री आहे. 

शरदला मी एवढंच म्हणेन, की अनुवाद ज्याने केलाय, त्याची कामगिरी मोलाची असते. त्यामुळे पुस्तकात नंदाकाकांचा परिचय आणि मनोगत असायला हरकत नव्हती. मूळ लेखनाला जो अनुवादक उत्तम न्याय देतो तो प्रकाशात आणणं प्रकाशकाचं काम आहे असं मला वाटतं. अर्थात त्यामागे प्रकाशक आणि अनुवादक यांची काही कारणं असतील. असो. शरद तुझ्या पुढल्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. 'इंडिका' जरूर वाचा.

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.