आठवणी जुन्या, शब्द नवे
दारावरची घंटी वाजली आणि पोस्टमननं साधनाचं एक पार्सल हातात ठेवलं. उघडून बघते तर त्यात हिरव्या रंगातलं ‘आठवणी जुन्या, शब्द नवे’ नावाचं मोहिब कादरी या लेखकाचं पुस्तक!
हातातलं काम नुकतंच संपलं होतं. त्यामुळे पुस्तक चाळून तर बघावं म्हणून उघडलं आणि पूर्ण पुस्तक वाचूनच काढलं. खरं तर काल मी बिमल रॉय यांचा 'सुजाता' चित्रपट पुन्हा एकदा बघितला आणि त्यातल्या सुजाताच्या अनुभवांनी मी नव्यानं अस्वस्थ झाले होते. आजही अनेक ठिकाणी ही परिस्थिती दिसते. जात, धर्म, भेदाभेद यांनी मन दुःखी झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि माझ्या मनातल्या विचारांना बरोबर घेऊनच मी मोहिब कादरीचं पुस्तक वाचायला घेतलं होतं.
पुस्तकातल्या पहिल्याच लेखानं माझं मन शांत होत गेलं. शाळेतला पहिला दिवस आणि त्या वेळी मुलांची बसण्याची असलेली व्यवस्था! विशेष म्हणजे संपूर्ण गावालाही ही भेदाभेद असणारी व्यवस्था मान्यच होती. पण अशा वेळी शिक्षक ही व्यवस्था अमान्य करतात आणि समानता कृतीत उतरवायला गावकर्यांना भाग पाडतात हे बघून खरोखरंच डोळे भरून आले. शिक्षकांचं मुलांवरचं कुठलाही भेदभाव न करता असलेलं प्रेम बघून सानेगुरूजींच्या प्रेमळ अंतःकरणाची साक्ष पटली. या पुस्तकात असे अनेक अनुभव आहेत. अनेक भली माणसं आहेत. मात्र या सगळ्यात मला जाणवलं ते मोहिब कादरी याचा जगण्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. कुठेही पूर्वग्रहदूषित नजरेनं या मुलानं बघितलं नाही. प्रत्येक चांगले क्षण वेचून ठेवले. चालताना अनेक काटे टोचले असतील, पावलं रक्तबंबाळ झाली असतील, पण तरीही प्रत्येक क्षणाबद्दल, प्रत्येक भेटणार्याबद्दल कृतज्ञतेची भावना घेऊन हा तरूण चालतो आहे.
याआधी मी साधनेतले हे लेख वाचले नव्हते. त्यामुळे आज पुस्तक वाचताना मला एक ताजा अनुभव मिळाला. निर्मळ मनाचा एक छोटा दोस्त मिळाला. याबद्दल साधनेचे मनःपूर्वक आभार आणि मोहिब कादरी याला पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment