पुस्तक दिनानिमित्त - गांधी
कोरोनाच्या आधी एके दिवशी मंजुल पब्लिशिंग हाऊसमधून चेतन कोळी याचा फोन आला आणि दोनच दिवसांत त्यानं कुरियरनं पाठवलेलं अतिशय सुरेख असं ‘गांधी’ नावाचं अतिशय देखणं असं पुस्तक हातात पडलं. हे पुस्तक ३५० पानी असून अतिशय जाडजूड तर होतंच, पण त्याचबरोबर या पुस्तकाचा हिंदी, इंग्रजी, डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि जर्मन भाषांमध्ये अनुवाद झाला होता. सध्या कितीतरी दिवस हे पुस्तक मी माझ्या बरोबरच ठेवते आहे. अगदी झोपताना कॉटवरसुद्धा! एखादी सोबत असावी तसं. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मी वाचायला घेतलं.
प्रमोद कपूर लिखित आणि सविता दामले अनुवादित ‘गांधी’ हे पुस्तक आपल्याजवळ असणं ही खूपच आनंददायक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. सविता दामले यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नसली, तरी त्यांच्या लिखाणातून मी त्यांना ओळखते. त्यांची स्वतः लिहिलेली असोत की अनुवादित असो त्यांची सगळीच पुस्तकं मला आवडतात. त्यातली त्यांची भाषा वाचकाला पटकन आपलंसं करते.
‘गांधी’ या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे गांधीजींच्या आयुष्याचं आणि कार्याचं सचित्र दर्शन वाचकाला घडवतं. १८६९ ते १९४८ पर्यंतचा गांधीजींचा प्रवास यात अधोरेखित केला आहे. 'जीनियस' मालिका लिहिताना एखाद्या शास्त्रज्ञाची इंटरनेटवर टाईमलाईन बघताना 'अबब' असं व्हायचं, तसंच या ग्रंथाच्या सुरुवातीला गांधीजींच्या जन्मापासूनची टाईमलाईन सुरू होते, ती मृत्यूपर्यंत आणि ती वाचताना अक्षरशः दमायला होतं. किती आणि काय काय या माणसानं करून ठेवलंय हे बघून खरंच थक्क व्हायला होतं.
लहानपणापासूनच गांधी नावाचा माणूस ओळखीचा झाला. पण प्रत्येक वेळी या गांधीचं वेगळं रूप दिसलं. कधी गांधींजींबद्दल कुतूहल वाटलं, तर कधी गांधींचा रागही आला. वयाचे ते ते टप्पे ओलांडताना गांधी भेटतच गेले. लहानपणी वाटणारा गांधींबद्दलचा आदर किशोरवयीन अर्धवट वयात थोडा कमी झाला होता. अगदी 'गांधीबुढ्ढा' म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. पण गांधींनी कधीच त्या वाटण्याला विरोध दर्शवला नाही. पुढे पुढे चालताना हा माणूस वाटेत येतच राहिला आणि मग नकळत या माणसाला जाणून घेण्याचा प्रवासही सुरू झाला. आता मात्र त्या किशोरवयीन वयात संबोधलेल्या 'गांधीबुढ्ढा' या शब्दांचीही लाज वाटते. सार्या जगाचा आवडता असलेला शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यानंही गांधीच्या असण्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘या भूतलावर असा हाडामांसाचा मनुष्य खरोखरंच होऊन गेला आहे, यावर भावी पिढ्या विश्वासही ठेवणार नाहीत.’ असे उद्गार त्यानं काढले आहेत आणि ते खरेच आहे याची प्रचिती वारंवार येत राहते. गांधींबद्दल लहानपणापासून आजपर्यंत किती तरी वाचलं, अजूनही वाचते आहेच, पण तरीही प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गवसत जातं. याही ग्रंथाचं तसंच काहीसं आहे.
‘गांधी’ या ग्रंथात गांधींचं बालपण, शिक्षण, त्यानंतर शिक्षणासाठी इंग्लंडमधलं वास्तव्य, दक्षिण आफ्रिकेतला काळ, भारतात आल्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारताला जाणून घेण्यासाठी आधी भारतभर फिर असा दिलेला सल्ला आणि त्याप्रमाणे गांधींची भारतभर केलेली भ्रमंती, (या भ्रमंतीमध्ये त्यांनी आपले कान उघडे ठेवले आणि तोंड बंद ठेवलं!) त्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात घेतलेला सहभाग, असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, गोलमेज परिषद, चले जाव चळवळ, भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, त्यानंतरचं फाळणीचंही विदारक चित्र आणि गांधी हत्येचा प्रसंग चित्रित केला आहे. या ग्रंथात सगळं काही मांडत असताना लेखकानं गांधींचं उदात्तीकरण कुठेही केलेलं नाही, तर अतिशय तटस्थपणे लेखन केलं आहे. गांधींमधल्या विसंगती, आपल्या जवळच्या माणसांबरोबर हुकूमशाही पद्धतीनं वागणं, हट्टीपणा, ब्रह्मचर्याचे प्रयोग (ज्यावर अत्यंत जहाल भाषेत त्यांच्यावर टीकाही झाली!), त्यांच्या जडणघडणीतला सुटाबुटापासून ते पंचापर्यंतचा टप्पा, गांधींच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित झालेल्या स्त्रिया, भारतीय राजकारणातला त्यांचा प्रभाव, असं सगळं या पुस्तकात आहे. विशेष म्हणजे वाचताना त्या त्या वेळेची चित्रं (किंवा फोटो) समोर येत राहतात आणि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातली सगळी दृश्यं समोर उभी राहतात. गांधींच्या जीवनाचा पट इतका मोठा आणि व्यापक आहे की हा ग्रंथ असा चटकन वाचून संपवता येत नाही. आत मुरवत तो वाचावा लागतो. आपल्याला गांधी पूर्णपणे माहीत आहेत, आपण त्यांच्याविषयी सगळं वाचलंय असं वाटत असलं, तरी या ग्रंथाचं वेगळेपण शिल्लक राहतं आणि हा ग्रंथ हाती घेतला की वाचक त्यात गुंतून जातोच!
‘गांधी’ या ग्रंथात त्यांचा मुलगा हरिलाल यानं आपल्या वडिलांना लिहिलेलं एक विस्तृत पत्र देखील छापलेलं आहे. या पत्रातून त्याच्या व्यथा समोर येतात. अंबरिश मित्र यांच्या पुस्तकातून बर्यापैकी हरिलाल समोर आला होता, पण याही ग्रंथात हे पत्र पुन्हा अंगावर काटा आणणारं आहे. यातले अनेक प्रसंग साधे असले तरी त्यातून गांधींचा स्वभाव दर्शवतात. गांधींनी अनेक नियम फक्त स्वतःलाच लागू केले नाहीत, तर ते आपल्याजवळच्यांवरही ते लादत असत. समोरच्यांची मतं आणि मर्जी यांचा ते विचारही करत नसत. एकदा कस्तुरबांनी त्यांना कामं करताना आपल्याला खादीची साडी खूप जड होते आणि ती सांभाळणं कठीण जात असल्याचं सांगितलं. या जड साडीपेक्षा एखादी वजनानं हलकी साडी नेसली तर काम करणं सुसह्य होईल असं त्यांना वाटत होतं. गांधींजवळ तसं बोलून दाखवताच, त्यांनी ‘तू स्वयंपाक करू नकोस’ असं स्पष्ट शब्दात बजावलं. रवींद्रनाथ टागोर असोत की पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर गांधींचं जितकं प्रेम होतं, तितकेच अनेक बाबतीत मतभेदही होते.
गांधीहत्येच्या दिवशीचा सविस्तर वृत्तांतही या ग्रंथात वाचायला मिळतो. त्या दिवशी अनेक कामं आटोपत असतानाच नेहरू कुटुंब त्यांना भेटायला आलं, त्या वेळी चार वर्षांचा राजीव तिथे असलेली फुलं गांधीजींच्या पायाभोवती गुंडाळत बसला. त्या वेळी ते त्याला म्हणाले, 'बेटा अशी फुलं मेलेल्या माणसांच्या पायांवर वाहिली जातात.' गांधींच्या हत्त्येनंतर पं. नेहरू आणि इतर अनेक मंडळी पुढली सगळी व्यवस्था करत होती. मात्र कुणालाही काहीही सुचत नव्हतं. एकप्रकारचा बधिरपणा आलेला होता. अशा वेळी नेहरू मणीबेनला म्हणाले होते, 'हे सगळं नियोजन/व्यवस्था कशी करायची हे आपण आता बापूंनाच विचारून करू.’ गांधीजींचं जाणं सगळ्यांनाच किती धक्कादायक होतं याचा प्रत्यंतर त्यांच्या अंत्ययात्रेच्या फोटोंवरून येतो.
विख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट कंट्रीजचे मानव सदस्य असलेले आशिष नंदी, लंडनच्या किंग्ज् कॉलेजचे संचालक असलेले सुनील खिलवानी, कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉसएंजेलिस इथे प्रोफेसर असलेले विनय लाल, अॅडव्होकेट विक्रम राघवन,न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्र संघाचे माजी साहाय्यक सरचिटणीस ई. एस. रेड्डी या सगळ्यांनी ‘गांधी’ या ग्रंथाला एकमुखानं वाखाणलं आहे.
‘गांधी’ या दर्जेदार ग्रंथाबद्दल लेखिका सविता दामले आणि प्रकाशक मंजुल प्रकाशन यांचं मी अभिनंदन करते. वाचकांनी हा ग्रंथ जरूर जरूर वाचावा.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
Add new comment