इत्यादी दिवाळी २०१८

इत्यादी दिवाळी २०१८

'इत्यादी' हा दिवाळी अंक मनोविकास प्रकाशनातर्फे निघतो. प्रत्येक वेळी मला या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आकर्षित करतं. या वेळी मात्र जास्तच प्रेमात पडावं असं मुखपृष्ठ बघितलं आणि दिल खुश हो गया! माझे मित्र आणि विख्यात चित्रकार अन्वर हुसेन यांनी गावातल्या रोजच्या रहाटीचं दर्शन घडवणारं चित्र चितारलं आहे. याची रंगसंगती अप्रतिम आहे. अन्वर हुसेन यांची सगळीच चित्र आपल्याशी बोलत असतात, त्या चित्रातल्या वस्तू, माणसं, निसर्ग काहीतरी सांगत असतो. सर्वसामान्यांचं जगणं अतिशय हुबेहूब चित्रीत करण्यात अन्वर हुसेन यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. 

या वेळचा 'इत्यादी' हा दिवाळी अंक दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मनोविकासचे अरविंद पाटकर यांच्या हस्ते मिळाला. सोबत रीनाच्या हातचा चविष्ट फराळही! घरी आल्याबरोबर आधी अंक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत चाळला आणि मग वाचायला घेतला. यातला पहिलाच संत ठोकारामचा 'गर्व से कहो हम अडगळ' लेख खूपच भन्नाट आहे. यातल्या कथा, लेख, अनुवादित कथा आपलं वेगळेपण दाखवणार्‍या आहेत. चिन्मय दामलेचा 'सराई'वरचा लेख खूपच अभ्यासपूर्ण आहे. खरं तर तारा भवाळकर, उमा कुलकर्णी, प्रसाद नामजोशी, डॉ. प्रदीप पाटकर या सगळ्यांचेच लेख वाचनीय आहेत. 

या अंकात मी 'आत्महत्यांच्या छायेत' हा लेख लिहिला असून आमचं आगामी पुस्तक ‘मृत्यू’ यावर हा लेख आधारलेला आहे. या लेखात आत्महत्या करणारी अनेक जगप्रसिद्ध माणसं, आत्महत्या करण्यामागची कारणं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला विचार, आत्महत्या कशा टाळता येतील, बदलती समाजव्यवस्था अशा अनेक प्रश्नांवर बोट दाखवत उपाय शोधणारा हा लेख असून जरूर वाचा आणि प्रतिक्रिया कळवा. 

मला 'इत्यादी'मधला सगळ्यात आवडलेला लेख म्हणजे ‘क्लुप्ती - पत्रक’ हा मनस्विनी लता रवींद्र या लेखिकेनं लिहिलेला! म्हटलं तर ही एक कथा आहे पौंगडावस्थेतल्या एका मुलीची! या मुलीवर घरातून होणार्‍या संस्कारांचा आणि त्या निमित्त अ‍ॅक्टिव्हिटीजचा मारा, त्यातून ही मुलगी कुठल्या कुठल्या क्लुप्त्या शोधत मार्ग काढते, तिच्या वयानुसार तिच्या मनात येणारे विचार, एकूणच सगळ्या वातावरणाशी जुळवून घेत असताना पुन्हा बदलवण्यात आलेला तिचा मार्ग आणि तिची होणारी दमछाक, त्या वेगाबरोबर धावताना आपण काय काय गमवतो आहोत हे पालकांना आणि पर्यायानं मुलांना कळत असूनही वळत नसल्याची अवस्था सांगणारी ही गोष्ट आहे. यातली मुलगी खूप आशावादी विचारांची आहे. मला ही गोष्ट खूप खूप आवडली. जरूर वाचा. 

थोडक्यात, 'इत्यादी' हा दिवाळी अंक २०१८ जरूर जरूर वाचा. मिळत नसल्यास मनोविकास प्रकाशनाशी संपर्क साधा. आणि हो चित्रकार अमोल पवार यांनी या अंकाची मांडणी अतिशय सुरेख केली आहे!!!!

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.