असं वाटलं होतं.....

असं वाटलं होतं.....

'माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे पुस्तक बाबानं मला दिलं आणि आपण एका दमात वाचून काढू असं पुस्तक हातात पडताक्षणी मला वाटलं होतं. पण..........असं झालं नाही. याला कारण मी दिवसभर कम्प्यूटरच्या बाजूलाच हे पुस्तक उभं करून ठेवलं होतं. त्यामुळे काम करता करता  मधूनमधून माझी नजर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जात होती. मुखपृष्ठ मला खूपच आवडल्यामुळे मी त्याच्याशीच गप्पा मारत सुटले होते. अखेर बाबाला फोन केला आणि थोड्या गप्पाही मारल्या. 

मुखपृष्ठाकडे वारंवार बघण्याचा मोह आवरून मी पान उलटवलं आणि लक्षात आलं, हे पुस्तक बाबाच्या आजपर्यंतच्या लिखाणावर आहे. त्याच्याच लिखाणाकडे आज तो फिरून कसा बघतोय याबद्दल आहे. छेद, रिपोर्टिंगचे दिवस, हमीद, मोर, माणसं, धागे आडवे उभे, कोंडमारा, संभ्रम, धार्मिक, गर्द, मुक्तांगणची गोष्ट, मोर, आप्त, स्वतःविषयी, छंदांविषयी, माझी चित्तरकथा, लाकूड कोरताना, पुण्याची अपूर्वाई, अमेरिका, प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत, कार्यमग्न, शिकविले ज्यांनी, कुतूहलापोटी, जिवाभावाचे, आपलेसे, मस्त मस्त उतार, हवेसे, सृष्टीत गोष्टीत, वनात जनात, सरल तरल अशा पुस्तकांविषयी त्यानं लिहिलंय. ही सगळी पुस्तकं मी वाचली असली, तरी प्रत्येक पुस्तकाविषयी बाबानं काय लिहिलं असेल, आज त्या त्या पुस्तकाकडे तो कसा बघतोय, त्याला काय वाटतंय असे अनेक प्रश्न मनात येत होते.
मी त्याचा पहिलाच लेख जडणघडण वाचायला सुरुवात केली. 

मी का लिहायला लागलो, किंवा कसं लिहायला लागलो असं सगळं लिहीत असतानाच बाबानं ठरवलं की लिहीत जायचं, कंटाळा आला तर सोडून द्यायचं. पण अर्थात तसं घडणार नव्हतं. मनात येईल तसं तो आपल्याशी बोलत गेलाय. गावातलं वातावरण, तिथली भाषा, तिथले मनात रुजलेले शब्द, गावातल्या किर्तनाचा प्रभाव, अशा सगळ्यांचा परिणाम त्याच्या भाषेवर होत होता. अशा वेळी शहरामधून सुट्टीत आलेली भावंडं बाबाच्या भाषेला हसत, तेव्हा काहीसा न्यूनगंडही मनात तयार होत होता. वाचन फारसं नव्हतं. आणि जे वाचायचं त्यातले जडबंबाळ शब्द कधी फारसे आवडलेही नाहीत. बाबानं या लेखात लहानपणी मित्रांमधली चिडवाचिडवीची तयार केलेली गाणीही लिहिली आहेत. लई आणि खूप या दोन्ही शब्दांविषयी, त्यातल्या केलेल्या भेदभावाविषयी तो खूप छान सांगतो. 

असं करत करत बाबा पुण्याला आला. लिहायला लागला, तेही ठरवून नाही. मनाला भावेल तेच तो लिहीत गेला. त्याच्या लिखाणाला कुठल्या प्रकारात बसवावं याचा विचार त्यानं कधी केला नाही आणि त्याला ते ठाऊकही नव्हतं. यातूनच आसपास घडत असलेल्या घटना, त्याचे मनावर उमटलेले पडसाद, आसपासच्या कष्टकर्‍यांचं जगणं, त्यांचे प्रश्न असे अनेक विषय त्याच्या लिखाणात सहजगत्या उतरू लागले. आपण जसं बोलतो तसंच लिहायचं हे त्याला उमगलं. त्यामुळे त्याच्या लिखाणात कधी कोरडेपणा, रूक्षता आली नाही. 

अगदी जवळच्या मित्रांनी, सदाशिव अमरापूर असो की विजय तेंडूलकर या सार्‍यांनी 'तू नाटक लिही, कादंबरी लिही' असा आग्रह करूनही बाबाला ते लिहावं असं कधी वाटलंच नाही. तो त्याच्याच वाटेनं चालत राहिला. प्रस्थापित लेखक जसं लिहितात त्याची नक्कल कधी त्याला करावीशी वाटली नाही. त्यांच्या लिखाणात जसे काही शब्द किंवा काही ठरावीक वाक्यं नेहमी येतात ते शब्द किंवा तशा प्रकारची वाक्यं बाबानं कधीही आपल्या लिखाणात येऊ दिली नाहीत. जे आपण अनुभवलंय, तेच आपण आपल्या शब्दांत लिहायचं हेच त्यानं केलं. 

या लेखातलं बाबाचं एक वाक्य मला खूपच आवडलं. तो म्हणतो, 'मी कधी पैशांसाठी लिहिलं नाही की बक्षिसांसाठी नाही!' मात्र काही बक्षिसं त्याला खूप आवडतात. ती म्हणजे, जेव्हा त्याचे जवळचे मित्र, भेटलेले कष्टकरी स्त्री-पुरुष, त्याचं लिखाण वाचतात आणि त्याला आवडल्याचं सांगतात तेव्हा त्याला ते बक्षीस खूप मोठं वाटतं.

'जडणघडण'मधलं बाबाचं मनोगत खूप प्रामाणिक आहे. खरं तर त्याचं आजपर्यंतचं  50 वर्षात केलेलं सगळं लिखाणच तसं आहे. त्यात कुठल्या अलंकाराचा साज चढवलेला नसतो, ना शब्दांच्या झटापटीचा खेळ रचलेला असतो. सहज, साधं तरीही समोरच्याला आपलंसं वाटावं असं! बाबाच्या प्रत्येकच लिखाणातून तो वाचकाशी एक नातं जोडतो आणि या नात्यात तो वाचक कायमचा बांधला जातो. त्यानंतर तो वाचक बाबानं कुठल्याही विषयावर लिहिलं तरी वाट बघत राहतो. म्हणजे एखादा सामाजिक प्रश्न असो, वा छंदाविषयी असो, कवितेविषयी असो वा रिपोर्ताज असो प्रत्येक प्रकारचं लिखाण वाचकाला ओढ लावतं.

आज मी एकाच लेखावर लिहिलंय. जसजसे या पुस्तकातले इतर लेख वाचेन, तसतसं त्याबद्दल लिहीनच. पण अनिल अवचट यांचं ‘माझ्या लिखाणाची गोष्ट’ हे समकालीन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं, गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी सुरेख मुखपृष्ठ केलेलं हे पुस्तक जरूर जरूर वाचा.

दीपा देशमुख, पुणे. 

Comments

Submitted by अरुंधती मधुसूदन Sat, 06/05/2021 - 00:51

अनिल अवचट हा अवलिया माणुस आहे. अनिल अवचट या त्यांच्या नावापेक्षा बाबा हेच नाव आणि नातं प्रत्येकाशी नकळतपणे जोडलं गेलं आहे. बाबांच्या स्वभावातला साधेपणा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही आपसूकच जाणवते. त्यामधे वास्तव असतं. काही लेखक प्रवास न करताच प्रवासवर्णन लिहितात आणि प्रसिद्धी मिळवितात. पण बाबांची प्रवासवर्णनं आपला प्रवास घडवून आणतात, विषयाच गांभीर्य त्याचा सखोल अभ्यास वाचकाना गुंतवून ठेवतो..खुप छान विश्लेषण केले आहे.. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा..

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.