बालकुमार साहित्य संमेलन, आंबाजोगाई ११ फेब्रुवारी २०१८.

बालकुमार साहित्य संमेलन, आंबाजोगाई ११ फेब्रुवारी २०१८.

तारीख
-
स्थळ
Ambajogai

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अंबाजोगाई आणि मानवलोक या दोन संस्थाच्या वतीने जिल्हास्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन संपन्न झालं. संमेलनाच अध्यक्ष म्हणून तरूण साहित्यिक बालाजी मदन इंगळे या तरूणाची निवड करण्यात आली होती. मुलांशी उत्तम नाळ असलेला हा तरुण खूप चांगलं लिहितो. आपल्या अध्यक्षीय भाषणात बालाजीनं मुलांसाठी लिहिणार्‍या साहित्यिकांचा उल्लेख करत मुलांनी काय वाचायला हवं, कसं ऐकायला हवं आणि प्रामाणिकपणे मनात उमटलेलं कसं लिहायला हवं हे तर सांगितलंच, पण त्याचबरोबर त्यानं मुलांशी कवितेतून केलेलं हितगुज मुलांना खूप भावलं. त्याच्या रावणाच्या कवितेला मुलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मुलांना खुलवण्याची, त्यांना समजून घेण्याची ताकद या तरुण साहित्यिकात असल्यानं या भेटीनं आनंद झाला.

या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाचं स्वरूप रटाळ नव्हतं, तसंच निव्वळ भाषणबाजीनं ते रंगलेलं नव्हतं. या संमेलनाच्या आयोजनामागे खूप मोठे परिश्रम होते. मानवलोकची टीम, डॉ. नरेंद्र काळे, अभिजीत जोंधळे, मुख्याध्यापक, शिक्षक, देशमुखमॅडम, उषा दराडे, दीपा क्षीरसागर या सगळ्यांचं योगदान या संमेलनाला लाभलं होतं. तरुण शिक्षकांची कल्पकता या संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. म्हणूनच संमेलनात मुलं कंटाळलेली न दिसता, प्रत्येंक सत्राची उत्सुकतेनं वाट बघताना आणि प्रतिसाद देताना दिसत होती. या संमेलनात मुलांचा सक्रिय सहभाग होता. मुलांनी एडिसन पासून अनेक विषयांवर उत्कृष्ट कथाकथन केलं. मुलांनी चित्रं चितारली होती, पुष्परचना केल्या होत्या. आधुनिक तंत्रज्ञान आणि कला यांचा सुरेख संगम या पुष्परचनेतून बघायला मिळाला. ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्यानं शेतातले तुरे, काड्या तसंच प्लास्टिकच्या टाकाऊ पिशव्या यांचा वापर त्यांनी केला होता. अतिशय कल्पकतेनं केलेल्या या पुष्परचना संमेलनांचं खास आकर्षण होत्या. जिल्ह्यातल्या सर्व शाळांमधल्या मुलांनी हस्तलिखितांचे अंक तयार केले होते. प्रत्येक हस्तलिखित अनोखं होतं. प्रवास, साहित्य, कविता, तंत्रज्ञान, विज्ञान अशा अनेक विषयांची संकल्पना घेऊन मुलांनी सुवाच्य अक्षरांत, सुरेखशा चित्रांनी सजवून ही हस्तलिखितं तयार केली होती. त्यांच्या कल्पकतेला खरोखरंच दाद द्यावी वाटली.

संमेलनात आदित्य या मुलाच्या कवितासंग्रहाचं प्रकाशन केलं. संमेलनात मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे आणि कौतुकाच्या थापेमुळे आदित्यला लिखाणासाठी आणखी प्रोत्साहन मिळेल असं वाटलं. संमेलनात शुभेच्छा देताना उषा दराडे आणि दीपा क्षीरसागर यांनी मुलांनी खूप वाचावं आणि व्यक्त व्हावं असं म्हटलं. तर मानवलोकचे द्वारकादासजी लोहिया यांनी सानेगुरुजींच्या साहित्यासारखं कसदार साहित्य निर्माण व्हावं आणि जबाबदार समाज घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कालच्या संमेलनात सामील झाल्यानं मनाला आणखीनच टवटवी आली. या कल्पकतेनं नटलेल्या, सृजनाचा अविष्कार करणार्‍या आणि संघभावनेतून साकारलेल्या संमेलनाचं उद्धघाटन करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप खूप आणि खूप समाधान मिळालं.

मी केलेल्या भाषणाचा थोडक्यात वृत्तांत खाली देते. ‘आज आंबाजोगाई बालकुमार साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित राहताना मला खूप आनंद होतो आहे. आयोजक आणि सहभागी या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांचा माझ्या सामिाजक प्रवासात खूप मोठा वाटा आहे. तसंच मानवलोकच्या शैलाताई मी आयोजित केलेल्या युवती मेळाव्याला जेव्हा औरंगाबादला आल्या, तेव्हा त्यांनी खूप मनापासून माझं कौतुक केलं होतं. त्यांचं साधेपण, त्यांचा मृदू, सौम्य स्वभावानं मी भारावून गेले होते. त्यामुळे या दोन्ही संस्थांसोबत पुन्हा संवाद साधताना खरंच खूप आनंद होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये बालकुमारांच्या वयोगटाकडे लक्ष जाऊन सर्वत्र नवनवीन उपक्रमांची आखणी होताना बघून छान वाटतं आहे. आमच्या लहानपणी घरात चांदोबा, किलबिल, अमृत, चंपक, ठकठक, किशोर, ही पुस्तकं असायचीच. तसंच भारा भागवत, फास्टर फेणे, स्पायडरमॅनची कार्टून्सची पुस्तकं, श्यामची आई, दक्षता हे मासिकही वाचलं जायचं. दक्षतामधल्या पोलिसी तपासावरचं कोडं सोडवताना खूपच मजा यायची. चांदोबानं परी दाखवली. राक्षस, वेताळं, भुतं यांची वेगवेगळी रुपं दाखवली. राजाराणी आणि जादुगारांच्या गोष्टींची पुस्तकांनी स्वप्नांच्या दुनियेतून सैर करून आणली. असं सगळं वाचत असतानाच केव्हातरी बालपण संपलं आणि मग व.पू. अण्णाभाऊ साठे, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, अत्रे, पुल, गौरी, सानिया, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांनी हात घट्ट पकडला. या पुस्तकांनी काय वाचावं आणि काय वाचू नये हे शिकवलं. कुठलाही उपदेश न करता चांगल्या जगण्याचा मार्ग दाखवला. आज चांदोबा बंद झालाय. लहान मुलांसाठीचं साहित्य कमी कमी प्रसिद्ध होताना दिसतं आहे. वीणा गवाणकर, रेणू गावस्कर, शोभा भागवत, आशा साठे , लीला शिंदे, राजीव तांबे, ल. म. कडू, पृथ्वीराज तौर, आबा महाजन, एकनाथ आव्हाड, बालाजी मदन इंगळे अशी काही मोजकी मंडळी मुलांसाठी लिहिताना दिसतात. त्यांचं मनापासून अभिनंदन. शुभदा चौकर यांचं 'वयम', किरण केंद्रेचं संपादन असलेला 'किशोर', अमृता वाळिंबेचं 'माऊस' ही मासिकं मुलांसाठी सुरू आहेत आणि ती खूप चांगली आहेत.

माझ्या मनात या संमेलनाच्या निमित्त खूप वेगवेगळे विचार येऊन गेले. विज्ञान माणसाला डोळसपणे चालण्याचा मार्ग दाखवतं, तर कला आयुष्याला सुंदरता बहाल करते. या दोन्हीचा मिलाफ साहित्यात व्हायला हवा. माझा बालपणाचा काळ आजच्या तुलनेत कितीतरी संथ होता. आज सगळं बदललं आहे. या वेगाबरोबर धावताना सगळ्यांचीच दमछाक होते आहे. अशा परिस्थितीत मुलांना काय हवंय याचा विचार करणं खूप गरजेचं झालं आहे. मूल्यं बदलत नसली तरी जुना साचा बदलणं आवश्यक आहे. मुलं जास्त स्मार्ट झाली आहेत. साने गुरुजींची शामची आई नव्या रुपात त्यांच्यासमोर येणं आवश्यक आहे. मला आवडणारी फॅन्टसी आताच्या मुलांना बाळबोध आणि हास्यास्पद वाटू शकते. पण हास्य, करूणा, शोक, कल्पनारंजन हे सगळं त्या त्या वयात मुलांना मिळणंही आवश्यक आहे. मग यासाठी करायचं काय? यावरचा उपाय मला दिसतो तो मुलांना विश्‍वासात घेणं. त्यांना काय आवडतं याबद्दल त्यांच्याशीच संवाद साधणं आणि त्यातून नवं लिखाण, नवी नाटकं, नवे विचार रुजवण्याचा प्रयत्न करणं! आजची मुलं बदलत्या जगाबरोबर जास्त स्मार्ट झाली आहेत. त्यांचा तंत्रज्ञानाशी खूप लवकर परिचय होऊन त्यातही ती तरबेज झालेली दिसतात.

अशा वेळी मुलांना खोट्या जगात न रमवता याच फॅन्टसीचा उपयोग विज्ञानकथा, तंत्रज्ञानाच्या कथांमध्ये करता येईल का याचा आजच्या मुलांसाठी लिहिणार्‍या लेखकांनी विचार करावा लागेल. त्यामुळेच मला डॉ. जयंत नारळीकर, जगदीशचंद्र बोस, सत्यजीत रे, रवींद्रनाथ टागोर, अरविंद गुप्ता अशी काही नावं दिसतात. जगदीशचंद्र बोस यांना तर बंगाली विज्ञानकथांचा जनक म्हणून संबोधलं जातं. त्यांच्या कथा रवींद्रनाथ टागोरांना खूप आवडत. त्यांच्या बंगाली कथांचे अनुवाद मराठीतून व्हायला हवेत. जसे सत्यजीत रे यांनी लिहिलेल्या मुलांच्या गोष्टी मराठीतून विलास गीते यांनी अनुवादित अतिशय सुंदररीतीने केल्या आहेत.

अरविंद गुप्ता यांची वेबसाईट मुलांसाठीच नव्हे तर आबालवृद्धंसाठी मोफत आहे. त्यावर अनेक पुस्तकं असून ती मोफत डाऊनलोड करायची सुविधा आहे. जयंत नारळीकरांना मुलांशी संवाद साधायला आवडतं. त्यांच्या गोष्टींचं शाळाशाळांमधून वाचन व्हायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी मी युवांसाठीच्या निर्माण या डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाचा पाया रचण्यामध्ये यशवंतराव चव्हाण, प्रतिष्ठान, मुंबईचे दत्ता बाळसराफ यांचा मोलाचा वाटा आहे. त्या वेळी युवांचं सामाजिक भान तयार होण्यासाठी पाया हा किशोरवयापासूनच मजबूत व्हायला हवा ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही कुमार निर्माण हा उपक्रम तयार करायला घेतला होता. महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काम करणार्‍या लेखकाना आमंत्रित करून त्यावर विचारविनिमय करण्यात आला होता. बाल आणि कुमार वयोगटासाठी लिहिलेलं साहित्य आम्ही एकत्रित केलं होतं. त्यांना संक्षिप्त रूप देऊन शाळाशाळांमधून अभिवाचनाचे कार्यक्रम करणं आणि सामील मुलामुलींशी चर्चा संवाद करणं असं सुरुवातीचं स्वरूप आम्ही ठेवलं होतं. या उपक्रमाची सुरूवात करण्यापूर्वी आमच्या चाचपणीला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. पुढे काही कारणानं ते काम थांबलं. पण मला त्या उपक्रमाची आठवण आज इथे आवर्जून होते आहे. कारण मुलांना बोलायचंय, मुलांना खूप काही ऐकायचंय आणि त्यासाठी मुलांना समजून घेणारे कान आज हवेत.

माझा स्वतःचा पिंड कुमारवयीन मुलांमध्ये जास्त रमण्याचा असल्यामुळे अच्युत गोडबोले आणि मी आम्ही काही वर्षांपूर्वी चर्चा केली आणि शालेय वयापासून पुढे कोणीही वाचू शकेल, समजू शकेल अशी पुस्तकं लिहूयात असं ठरवलं. या लिखाणातून वास्तवाचं भान असावं, सामाजिक भावना जोपासल्या जाव्यात, कुतूहल जागं व्हाव, विज्ञाननिष्ठतेकडे पावलं वळावीत, समतेची वाट अंगिकारली जावी अशा अनेक गोष्टी मनात होत्या. यातूनच आम्ही आमच्या जीनियस प्रकल्पाची आखणी केली. जगावर आपल्या कार्यानं आणि आपल्या आयुष्यानं ज्या जीनियस, दिग्गज लोकांनी प्रभाव गाजवला अशा निवडक लोकांची आम्ही यादी केली आणि त्यातून ७२ लोक समोर आणायचे ठरवलं. यात वैज्ञानिक, क्रांतिकारक, समाजसुधारक, कलाकार, गणितज्ञ, तंत्रज्ञ असतील याची दक्षता आम्ही घेतली. आमच्या आत्तापर्यंत आलेल्या १२ जगप्रसिद्ध वैज्ञानिक जीनियसला आणि १२ भारतीय जीनियसला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. केवळ छापीलच नाही तर ऑडिओ, ई-बुक या माध्यमातून आम्ही या मंडळींना समोर आणलं. यापुढचं लेखनही याच प्रकारचं असेल हेही नक्की.

मुलांना हवं ते मुलांच्या कृतीतून, मुलांच्या अनुभवातून साकारलेलं संमेलन पुढल्या वर्षी इथे भरवलं जावं अशा शुभेच्छा देत, मला इथं बोलावलंत याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. दीपा देशमुख १२ फेब्रुवारी २०१८. deepadeshmukh7@gmail.com माझ्या भाषणात मी लुई पाश्‍चरचे शोध आणि त्याच्या आयुष्यातले काही प्रसंग, तसंच जगदीशचंद्र बोस यांचं साहित्य आणि प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी केलेलं संशोधन, विख्यात गणितज्ञ, नॅनो टेक्नॉलॉजीचा जनक, चित्रकार, इतिहास संशोधक, खगोलशााज्ञ असलेल्या रिचर्ड फाईनमन विषयी तसंच त्याचे पालक आणि त्याची जडणघडण याबद्दलचे किस्से संगितले. घराघरामध्ये कुठल्यातरी बाबालोकांचे फोटो लावण्यापेक्षा आपल्या आयुष्यातला अंधार दूर करणार्‍या एडिसन, जेन्नरसारख्या वैज्ञानिकांचे फोटो लावूयात, असं सांगितलं. मातृभाषेतून शिक्षण होणं का गरजेचं आहे आणि त्यामुळे मजबूत होणार्‍या पायाविषयी देखील मुलांशी उपस्थितांशी साधला.

कार्यक्रमाचे फोटो