आशा साठेंनी सादर केलेला, बळ देणारा प्रेरणादायी चंद्र!
आशा साठेंनी सादर केलेला, बळ देणारा प्रेरणादायी चंद्र! कोजागिरी जवळ आलीय, पण कोजागिरीची पूर्वतयारी म्हणून साजरा व्हावा असा एक सुरेख कार्यक्रम 'अथश्री' इथं बघायला/ऐकायला मिळाला. आशा साठे या माझ्या मैत्रिणीनं 'अथश्री'मध्ये सायंकाळी सहा वाजता चंद्र या विषयावर माझा कार्यक्रम आहे, तर तू ये असं हक्कानं सांगितल्यामुळे मी साडेपाच वाजताच 'अथश्री'त दाखल झाले. 'अथश्री' ही परांजपे बिल्डर्स यांची ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली घरांची योजना आहे. तसंच हे एका तर्हेचं सेकंड होम आहे. इथं राहण्याची, मेडिकल उपचारांची, जेवणाची आणि इतर सगळीच सुरेख व्यवस्था आहे. इथे राहणार्या सगळ्याच व्यक्ती आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात मोठमोठ्या पदांवर राहिलेल्या आहेत. कोणी अधिकारी, तर कोणी प्राध्यापक, तर कोणी नाटकात कामं केलेल्या अशा आहेत. त्यांना साहित्याची, कलेची, गाण्याची आवड आहे. 'अथश्री'मधल्या प्रशस्त अशा हवेशीर हॉलमध्ये पोहोचताच तिथं टाकलेल्या सगळ्या खुर्च्यांवर अथश्रीचे सदस्य स्थानापन्न झालेले बघायला मिळाले.
आशाताईंची ओळख आणि प्रास्ताविक सरिता आवाड (जिचं 'हमरस्ता नाकारताना' हे आत्मचरित्र सध्या गाजतं आहे!) हिनं थोडक्यात केलं आणि माईक आशा साठेंकडे सुपूर्त केला. मनाच्या अवकाशात आलेला चंद्र, साहित्यातून दिसलेला चंद्र आशा साठेंनी श्रोत्यांसमोर समोर उभा केला. आशाताई नेहमीच खूप आपलेपणानं, अनौपचारिकरीत्या वाचकांशी/श्रोत्यांशी संवाद साधतात. त्यामुळे त्या फक्त आणि फक्त आपल्याशीच बोलताहेत असं वाटायला लागतं. चंद्राची ओळख अशी जुनी आहे.
लहानपणापासून ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या कवितेतून कविता कळायच्या आतच हा चंद्र आपल्याला भेटतो.. शाळेत गेल्यावर भूगोलातून चंद्र शिकवला जातो. चंद्राबद्दलच्या अनेक दंतकथा आपण ऐकत असतो. पृथ्वीचं प्रेमगीत या कवितेमध्ये पृथ्वीवर प्रेम करणारा चंद्रही बघायला मिळतो. चंद्राला विविध भूमिकेतून बघणं खूपच आनंददायी असतं. त्याची शीतलता, त्याचं प्रसन्न असणं मनाला भावतं. एका गोष्टीनुसार सूर्य आणि चंद्र यांच्यात एकदा भांडण होतं. आपल्याला खूप नक्षत्रं मिळावीत म्हणून ते परमेश्वराकडे मागणी करतात. परमेश्वर त्यांना सांगतो, मी सगळी नक्षत्र पसरवली आहेत जा आणि घ्या. सूर्य आपल्या ताठ्यात असतो. तो जातो आणि आजूबाजूचे नक्षत्र त्याला दिसतही नाहीत. चंद्र मात्र तसा नसतो. तो रमतगमत जातो तेव्हा वाटेत त्याला इतकी नक्षत्र भेटतात, की त्या नक्षत्रांची त्याची मैत्री होते. मैत्री करण्याचं गमक चंद्राकडून शिकावं. सगळ्यांशी कसं जुळवून घ्यावं हेही चंद्र शिकवतो.
मुलांना चांगल्या साहित्याची ओळख व्हावी म्हणून एका शिबिरात आशा साठेंनी आचार्य अत्रेची गोष्ट मुलांना सांगितली. अत्रेंची नवयुग वाचनमाला तर प्रत्येकानं वाचावी अशी. त्यांची 'चांदोबाचा अंगरखा' ही गोष्ट त्यांनी सांगितली. चंद्राला आईनं अंगरखा शिवला. दुसर्या दिवशी त्याला तो लहान होतोय असं वाटलं तेव्हा आईनं तो वाढवला असं करत करत पोर्णिमेच्या दिवशी तो चंद्र पूर्ण मोठा झाला होता आणि त्याचा अंगरखाही मोठा त्याला मिळाला होता. चंद्र पोर्णिमेला पूर्ण कलेनं कसा वाढलेला असतो हे त्यातून दाखवलं होतं. त्यानंतर पोर्णिमेनंतर त्याचा अंगरखा त्याला कसा सैल होत गेला हेही अत्रंनी अत्यंत रोचक पद्धतीनं या गोष्टीतून सांगितलं होतं. आपल्या मनाच्या अवकाशात अत्रेंची ही गोष्ट प्रसन्न करते, पण मुलांच्या कल्पकतेत यामुळे किती भर पडते असं आशाताईंना वाटलं होतं. पण या शिबिरात एका मुलानं म्हटलं, कशाला अंगरखा रोज एवढा मोठा करायचा, मॉलमध्ये जायचं आणि सगळ्या साईजचे अंगरखे विकत आणायचे आणि घालायचे. दुसरा म्हणाला, १५ अंगरखे कशाला आणायचे, स्ट्रेचेबल अंगरखा आणायचा. खरं तर ही त्यांची हुशारी होती. पण तंत्रज्ञानामुळे ही कल्पकता, संवेदनशील आता आहे की नाही हा प्रश्न आशाताईंच्या मनाला पडला. अर्थात हे आणि असे अनुभव अपवादात्मक असतात.
कुसुमाग्रजांची एक अतिशय बोलकी बालकविता ः भर माझ्या डब्यात खूप खूप खायचं आई मला उद्या चंद्रावर जायचं माझं मी बांधीन अवकाशयान माझ्या खेालीत तोवर कुणी नाही यायचं माझ्या अवकाशयानाला लालनिळे दिवे ते तुफान वेगानं नभावर न्यायचं आई मला उद्या चंद्रावर जायचंय मेघांची गावं, तार्यांची देवळं जाता जाता सगळं पाहून यायचंय आई मला उद्या चंद्रावर जायचंय चंद्राच्या चंदेरी होडीवर उतरेन चंद्रावर गेल्यावर चंद्राचं व्हायचं आई मला उद्या चंद्रावर जायचं चंदेरी झाडावर, चंदेरी गवतात, चंदेरी किरणांत खूप खेळायचं चंदेरी तळ्यावर, डब्यातलं खाऊन चंदेरी अमृत पोटभर प्यायचं चंदेरी मातीत खेळून लोळून आकाशयानानं मग परतायचं मग म्हणायचं नाही हं मला कुणी कार्ट्याबिर्ट्या आणि घरी कुणी नाही मला रागवायचं आई उद्या मला चंद्रावर जायचं चंद्राचा आनंद सगळ्यांना मिळतो. सरोजिनी बाबरनं चंद्रावरची खूप सुंदर आठवण सांगितली आहे. रेल्वेनं एकटीनं प्रवास करताना खिडकीतून त्यांना दिसलेला चंद्र आजोबांसारखा वाटला. त्या चंद्राकडे बघताना त्यांना खूप बरं वाटलं. तो क्षण त्यांच्यासाठी खूप आनंदाचा होता. त्या गाडीच्या दारात एक कातकरी वाळलेली गरीब बाई बसलेली होती. इतका वेळ मख्ख असलेली बाई तिला चंद्र दिसल्यावर ती आनंदानं त्यांना म्हणाली, ‘बघा, चंद्र कसा दिसतोय, कसा शुभ्र नाण्यासारखाच किनई’ तिच्या तोंडातून आलेले ते शब्द, तिनं चंद्राला जोडलेले हात, तिच्या भाषेत ती सरोजिनीशी बोलत सुटली. चंद्रदर्शनातला उत्सवच जणू तिनं साजरा केला.
चंद्रदर्शनाचा उत्सव आपणही नियमित करतो. पोर्णिमेचा चंद्राचा उत्सव भारतात केला जातो. हा उत्सव सगळ्यांनी मिळून करायचा असतो. अनेक प्रथेद्वारे चंद्राचा उत्सव साजरा केला जातो. चंद्राचं निर्मळ मन, शांतपणा, त्याचं फुलणं, त्याचा धवलपणा या सगळ्यांचं प्रतीक म्हणूनही लोक उत्सव साजरा करतात. गरबा खेळणं असो की आनंद व्यक्त करण्याची एखादी गोष्ट असो. घरातल्या ज्येष्ठ मुलाची अश्विनी करण्याची प्रथा असो. म्हणजेच त्या मुलानं चंद्रासारखं व्हावं असं कुठेतरी वाटतं. भाऊ नसेल तर चंद्रालाच भाऊ म्हणण्याची, मामा म्हणण्याची प्रथाही रूढ झाली. हीच बहीण भावाला ओवाळण्याआधी चंद्राला ओवाळते. हा चंद्र आयुष्यभर अगदी चढउतारातही बरोबर राहतो. चंद्रांवर अनेक भावगीतं रचली गेली. या गाण्यांत खूप विविधता आणि संवेदनशीलता दिसते. वारा कांत यांची 'आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको'....यातल्या 'बोल हलके बोल' थोडक्यात, चांदण्यात बोलण्याचीही गरज नाही. इतकं हळुवार मन या गाण्यातून व्यक्त होतं. अनंत काणेकरांचा 'चांदरात' हा कविता संग्रह आहे. 'चांद मातला मातला' ही कविता वसंत बापट यांची पुढे 'उंबरठा' चित्रपटामध्ये वेगळ्या संदर्भात आली.
प्रतिभावंत लोकांनी कशा रीतीनं चंद्र अनुभवला हे अनेक कवितांमधून दिसतं. चंद्र मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा चेतला त्याला कसे सावरू विंदा करंदीकरांच्या कवितेतला चंद्र ः खरं तर यात चांदोबाच कविता करतो आणि म्हणतो ः चांदोबानं कविता केली, हातामधून पडली खाली एका परीनं झेलली हातात, आणि काढली चित्रं त्यात मग कवितेत शिरला सूर, आणि गेली उडून दूर चंद्राबद्दल एकही कविता माहीत नाही असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. ना. सि. फडके यांनी व्यक्त केलेला चंद्रही आशाताईंनी उलगडून दाखवला. एकच चंद्र पुरेसा नाही तेव्हा परमेश्वराला दुसर्या चंद्राची मागणी केल्यावर काय घडतं याची गंमत दाखवणारी गोष्ट! शांता शेळके यांचं 'तोच चंद्रमा नभात' हे गाणंही खूपच अप्रतिम! प्रेमभावाचा अनोखा अविष्कार यात दिसतो. आकाशातला चंद्र कसा बघायचा हे सर्वप्रथम कोणी दाखवलं असेल तर बालकवींनी!
बालकवींच्या दृष्टीतून कविता बघणं, दिसणं आणि अनुभवणं बालकवी दाखवतात. बालसुलभ औत्सुक्यानं ते निसर्गाकडे बघतात ः संध्येच्या खिडकीत येऊन ती हसरी तारा हळूच पाहते खुणावतेही त्या कुणाला, पलीकडचा तो तेजोमय पडदा सारून चंद्रावर प्रेम करणारे दुसरे कवी म्हणजे बा. भ. बोरकर! त्यांच्या कवितेतलं चांदणं अनेकविध भाव धारण करून येतं. 'चांदणवेळ' नावाचं त्यांचं पुस्तक आहे. आपल्याला विश्वाकडून आंदण मिळालं आहे असं ते म्हणतात. चांदणकाळी आदणवेळ, दलदल फुलते रंजनवेल.... अशा रीतीचं ते वर्णन करतात. विश्वचैतन्यांशी हे कवी नातं जोडू बघतात. आपल्या आयुष्यातलं कुठलं चांदणं आपण जपलेलं आहे, कुठला चंद्र आपण अनुभवला आहे त्या शीतल आठवणी आपल्याबरोबर चंद्रासारख्याच शीतल आनंददायी आहेत त्या आठवूया. त्या चंद्राला आठवूया असं म्हणत आशाताईंच्या चंद्रानं सगळ्यांचा तात्पुरता निरोप घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी आशाताईंनी मला एक चंद्रावर कविता किंवा गाणं म्हणायला सांगितलं. त्यांना माझ्या कविता आणि गायलेली गाणी नेहमीच आवडतात. मी सादर केलेल्या वैभव देशमुखच्या कवितेला भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमानंतर आशाताई आणि मला 'शेफ आनंद करंदीकर' यांच्या हातची मिसळ खाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सरितानं खास केलेली अंबाडीची भाजी (जी मी अनेक वर्षांनी खाल्ली.) आठवणीनं डब्यात भरून दिली. आपापल्या मनातले चंद्र घेऊन आशाताई आणि मी घराची वाट पकडली!
दीपा देशमुख, पुणे.