दिवाळी अंक 2020 - चांगुलपणाची चळवळ प्रकाशन - पत्रकार भवन, पुणे

दिवाळी अंक 2020 - चांगुलपणाची चळवळ प्रकाशन - पत्रकार भवन, पुणे

तारीख
-

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन, दोन-तीन तुरळक प्रसंग सोडले तर गेले 8 महिने मी घरातच...अशा सगळ्या वातावरणात डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन निर्मित चांगुलपणाची चळवळ दिवाळी अंकाचं प्रकाशन पत्रकार भवन इथे 12 नोव्हेंबर 2020 या दिवशी सायंकाळी 5 वाजता ठरलं. कोरोनाच्या सावटामुळे जाऊ की नको अशी मन:स्थिती होती आणि अपूर्व तर मी जावं यासाठी अजिबात तयार नव्हता. पण मग शुभांगी मुळे, यशवंत शितोळे आणि अश्विनी दरेकर यांच्या आग्रहामुळे मनाचा निर्धार पक्का झाला आणि कोरोनाला न भिता मी पत्रकार भवनला जाऊन पोहोचले. जातानाच प्रभाकर भोसलेंना फोन केल्यामुळे ‘राग का येतो’ हा थिंक पॉझिटिव्हचा देखणा दिवाळी अंक घेऊन ते पत्रकार भवनात आले, थिंक पॉझिटिव्हचा अंक, निलेश आणि प्रभाकर भोसले यांना बघून खूप आनंद झाला.

तेवढ्यात अल्पावधीत चांगली दोस्ती झालेली मधुरा विप्रा ही मैत्रीण भेटली. नेहमीच प्रसन्न, हसतमुख असणारी ही मैत्रीण संशोधक असून मला फार आवडते. तिच्याशी बोलते न बोलते तोच आमची आणखी एक मिळून सार्‍याजणीच्या परिवारातली मैत्रीण जी कार्यकर्ती आहे, लेखिका आहे आणि उत्तम सूत्रसंचालक आहे ती, नीना भेडसगावकर भेटली. ख्यालीखुशाली विचारत आत प्रवेश करताच चित्रपट निर्माती अश्विनीही आली. आमच्यातल्या दोन स्मगलरमधली दिवाळीसंदर्भातली देवाणघेवाण करून आम्ही स्थानापन्न झालो. याच वेळी यशवंत शितोळे, प्रणोती शितोळे, शुभांगी मुळे, शुभांगीचे आई-वडील, कल्याण तावरे, किरण केंद्रे, उषा नवले, श्रीनिवास वायकर यांचीही भेट झाली.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या चांगुलपणाच्या चळवळीचं दिवाळी अंकाचं अपत्य समोर येणार होतं. काहीच क्षणात शुभांगी मुळे आणि राज देशमुख यांनी माईकचा ताबा घेतला. आम्ही व्यासपीठावर विराजमान झालो आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कालचा कार्यक्रम म्हणजे एक अपूर्व अशी मेजवानी होती. सभागृहात निमंत्रित सुरक्षित अंतर राखून बसलेले होते. चांगुलपणाची चळवळ हा दिवाळी अंक तसा पहिलाच. पण दर्जामध्ये कुठेही कमी न पडणारा. अंकाची मांडणी, सजावट, छपाई असं सबकुछ पुण्यातल्या अमोघ आर्ट्स यांनी केलं आहे. अप्रतिम असं मुखपृष्ठ राजेंद्र गिरधारी यांनी केलेलं... चांगलं काम करणार्‍या अनेक हातांनी सूर्य पेलला आहे. हे सामर्थ्य त्यांच्या हातात आहे अणि त्या सूर्याच्या ओजस्वी प्रकाशकिरणांनी आसमंत प्रकाशमान तर झालाच आहे पण अफाट अशी ऊर्जा तो देतो आहे. काही नकारात्मक हात सरसावण्याचा प्रयत्न करत असले तरी ते या ऊर्जेपुढे क्षीण झाले आहेत. सूर्याचा तांबुस सोनेरी रंग डोळ्यांना सुखावणारा आणि वरती असलेलं शीर्षक ‘चांगुलपणाची चळवळ’ हे उत्कृष्ट अशा कॅलिग्राफीनं दमदारपणे आपलं अस्तित्व दाखवणारं...ही कॅलिग्राफी अर्थातच पुण्यातले नामांकित चित्रकार प्रभाकर भोसले यांची आणि तीही त्यांनी अर्ध्या रात्रीत हाक देताच, करून दिलेली. चांगुलपणा कसा असतो आणि चळवळ कशी मजबूत असावी ही प्रभाकरच्या निर्मितीतून समोर आलेली अक्षरं दिवाळीअंकातून बोलत होती...संपूर्ण रंगीत असलेला हा अंक इतका देखणा झालाय की बघत राहावं.

अंकाच्या आतमध्ये चांगुलपणाच्या सफरीबद्दल बोलताहेत अनेक दिग्गज मान्यवर..डॉ. प्रकाश आमटे, अरूणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, शर्वरी जमेनीस, कौशल इनामदार, हनुमंतराव गायकडवाड, शेखर गायकवाड, डॉ. चारुदत्त आपटे, निशिगंधा वाड, डॉ. मदन कटारिया, वर्षां गजेंद्रगडकर, डॉ. आनंद नाडकर्णी, दीपा देशमुख, डॉ. शमसुद्दिन तांबोळी, राजीव खांडेकर, रश्मी कुलकर्णी, नीना भेडसगावकर, अश्विनी दरेकर, श्रीकांत बडवे, संदीप वासलेकर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, शुभांगी मुळे आणि खुद्द डॉ. ज्ञानेश्वर मुळे. कार्यक्रमात शुभांगी मुळे हिने संपादक म्हणून या दिवाळी अंकाच्या निर्मितीमागचा प्रवास सांगितला.

त्यानंतर मी म्हणजे दीपा देशमुख, शमशुद्दिन तांबोळी आणि अश्विनी दरेकर - चांगुलपणाच्या चळवळीला, दिवाळी अंकाला शुभेच्छा देत उपस्थितांशी संवाद साधला आणि आपले अनुभव, तसंच माणसाच्या अंगी असलेला चांगुलपणा यावर भाष्य केलं. त्यानंतर अभिनव देशमुख या आयपीएस अधिकार्‍यानं चांगुलपणाच्या चळवळीला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रामध्ये बौद्घिक दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून दिवाळी अंक त्याचंच एक प्रतीक आहे. त्यांनी पोलिसांच्या कामातही चांगुलपणाच्या चळवळीनं कसं योगदान दिलं याविषयीचे आपले अनुभव सांगितले. चांगल्या व्यक्ती एकत्रित येण्याची खरं तर समाजाची गरज असते. पण अशी माणसं कमी वेळा एकत्र येतात आणि वाईट प्रवृत्तीची माणसं मात्र नेहमीच एकत्रित दिसतात. अशा वेळी व्यक्तीपातळीवर प्रत्येकजण चांगुलपणा जपत असतो, पण सामाजिक पातळीवर हाच चांगुलपणा जपण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो आणि तो डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी घेतला आहे.

यानंतर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी उपस्थितांशी दिल्लीहून संवाद साधला. प्रत्येकाचा स्वतंत्र उल्लेख करून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. ते म्हणाले, कोरोनाचं वैशिष्ट्य असं की जर रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर ते पॉझिटिव्ह समजलं जातं. थोडक्यात, सध्या प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण निगेटिव्ह असावं. निगेटिव्हीटीचा किती प्रभाव असू शकतो याचं हे उदाहरण. प्रकाशाची आणि ज्ञानाची दिवाळी साजरी करूया असं म्हणत त्यांनी ज्ञानेश्वरांची ओवी उदृत केली, प्राचि अधिष्ठिनी सूर्ये, जगा जाणीव दे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी चांगुलपणाची चळवळ सुरू करण्याचं कारण काय याबद्दल बोलताना ते म्हणाले, आजवर झालेल्या चळवळींपासून प्रेरणा घेऊन, समग्र आढावा घेऊन आपल्याला काय करता येईल यासाठी उचललेलं हे पाऊल आहे. शोषणाची नवी साधनं तयार झाली असून यात संवादाचा अभाव जाणवत असल्याचं ते म्हणाले. लहान-मोठे अनेक विवाद आपल्याला आसपास बघायला मिळताहेत. या सगळ्यातून एक नकारात्मकता, वैफल्य आणि काही अंशी उदासीनता समाजामध्ये निर्माण झाली आहे. याचा विचार करत असतानाच चांगुलपणाची चळवळ हिचा जन्म झाला असल्याचं मुळे म्हणाले. आपल्याला बदल आणायचा असेल तर तो लोकशाहीच्या, संविधानाच्या चौकटीत आणणं आवश्यक आहे. संविधानामध्ये न्याय, स्वातंत्र्य आणि समता या तिन्ही मूल्यांचा जरी समावेश असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याची दोन कारणं आहेत. लोकशाहीमध्ये प्रजा किंवा नागरिक आणि प्रशासन हे दोन महत्वाचे घटक आहेत. संविधानामध्ये आपण तीन स्तंभ मानले आहेत. कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारीमंडळ आहे. एका अर्थानं हे तिन्ही स्तंभ सक्षमतेनं, पारदर्शकतेनं काम करत नाहीत, किंवा समग्र समाजाच्या प्रगतीच्या आकांक्षा घेऊन काम करत नाहीत, तेव्हा निश्चितच स्वातंत्र्य, समता आणि न्याय याची अंमलजबजावणी होत नाही. यातून मग अनेक प्रश्न निर्माण होतात. यावर उपाय म्हणजे तळागाळातून जाणिवेचा हुंकार उमटला पाहिजे. सगळीकडे अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे. या चळवळींच्या माध्यमातून पुढे कसं जायचं हे ठरवलं पाहिजे. तो मार्गदर्शक पथ वैचारिकतेतूनच आपल्याला सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लोकांसमोर ठेवता आला पाहिजे. तळागाळातून आपल्याला कार्यप्रवण होणं आवश्यक आहे आणि प्रशासनाला सक्षम करण्याची गरज आहे. स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही तिन्ही मूल्यं प्रशासनाच्या अहोरात्र कार्यपद्घतीतून दिसली पाहिजेत. असं झालं तर समाजामध्ये विश्वासाचं वातावरण तयार होईल. यासाठी उत्तम प्रकारचं सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक नेतृत्व तयार करावं लागेल आणि या नेतृत्वाला सकारात्मकता काय, सर्जनशीलता काय, सर्वसमावेशकता काय असते हे समजेल. आणि हे सगळं समजण्यासाठी एक सह्दय मन लागतं, अंत:करण असावं लागतं. थोडक्यात, ही आपल्यासमोरची आजची आव्हानं आहेत. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ असं म्हणताना आज सकारात्मकता घेऊन पुढे गेलो तर पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, विषमता कमी होईल, समाजात असणारा असंतोष आणि अन्याय राहणार नाही. शेवटाकडे जाताना डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, मित्रहो, आज आपण ही चांगुलपणाची छोटीशी ज्योत लावली आहे. चांगुलपणाची चळवळ बुध्दापासून, गांधीपासून ते आजच्या अनेक विचारवंतापर्यंत नेणारी अशी आहे. चांगुलपणाच्या चळवळीचं ब्रिदवाक्य सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असं आहे. आज अशा चळवळीची देशाला नितांत आवश्यकता आहे जी देशाला दिशा देऊ शकेल आणि जगालाही दिशा शोधण्यास साहाय्यभूत होऊ शकेल. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ हा मंत्र आपण लक्षात ठेवून चालत राहिलो तर खर्‍या अर्थानं आपण चांगुलपणाची दिवाळी साजरी करू. हा अंक त्यातलं छोटंसं पाऊल आहे. असं म्हणतात, एक हजार मैलांचा प्रवास हा पहिल्या पावलानंच सुरू होतो. काही पावलं आपण टाकलेली आहेत आणि अशी अनेक पावलं टाकायची आहेत. यातून समग्र परिवर्तनाची सकारात्मक चळवळ उभी राहावी असा आपला प्रयत्न आहे. चला आपण या चांगुलपणाच्या चळवळीला यशस्वी करू.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मनोगतानंतर पुढल्या दोन दिग्गजांची म्हणजे अनंत ताकवले आणि शेखर गायकवाड यांची भाषणं ऐकणं म्हणजे दिवाळी साजरं करण्यासारखं होतं. आयपीएस अधिकारी अनंत ताकवले.... रिजनल पासपोर्ट अधिकारी म्हणून पुण्यातल्या ऑफीसची जबाबदारी पार पाडणारा तरुण....याआधी उत्तराखंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारा...चाइल्ड तस्करी रोखण्यासाठी केलेलं अभिमानास्पद काम....लिखाणाचा आणि कार्यकर्त्यांचा पिंड अंगी असलेला हा तरुण...याआधी मी ज्ञानेश्वर मुळे, त्यानंतर अतुल गोतसुर्वे आणि एकूणच त्यांचा स्टाफ यांची तत्पर कार्यपद्घती आणि औदार्यपूर्ण वागणूक बघितली/अनुभवली होती. त्यातच ज्ञानेश्वर मुळे यांचं संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व, अनेक संतांचे श्लोक आणि सुर्वे, मर्ढेकर, अनिलपासून अनेक कविंच्या कविता तोंडपाठ बघितल्या/ऐकल्या होत्या. बोलता बोलताही ते सहजगत्या एखादं संस्कृत सुभाषित जेव्हा टाकत, तेव्हा चकित व्हायला होत असे. मला वाटतं पासपोर्ट कार्यालयाची जबाबदारी सांभाळणार्‍या प्रत्येक व्यक्तीला संस्कृत भाषा, संतांचा दांडगा अभ्यास आणि भाषेवर प्रभुत्व, तसंच उत्तम वर्क्तृत्व यायलाचं हवं असा भारतसरकारचा अलिखित नियमच असावा. कारण हा अनंत ताकवले माणूस याच गटात मोडणारा. या तरुणाचं बोलणं संपूच नये असं....माईक हाती येताच ते म्हणाले, ‘आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे‘ असं म्हणत उपस्थितांची मनं पठ्ठयानं एका क्षणात जिंकली. ते म्हणाले ‘दुर्जनांची चाळ असू शकेल, पण गड मात्र सज्जनांचाच असतो.’ त्यांनी अथर्वशिषातले श्लोक, गॉड पार्टिकल, अध्यात्म यांची सांगड अतिशय सुरेख प्रकारे घातली. त्यांनी उदृत केलेले ते श्लोक अतिशय सुंदर होते, पण ऐकण्यातच इतकी गुंगून गेले की लक्षातच ठेवू शकले नाही. त्यांचं बोलणं ऐकत असताना आपण प्राचीन काळातल्या गुरूकुलात किंवा नालंदा विश्वविद्यापीठात शिष्य होऊन शिक्षण घेत आहोत असंच काहीसं वाटायला लागलं.

अनंत ताकवले बोलत होते, हजारो वर्षांच्या इतिहासात आपण डोकावून बघितलं तर माणसाची मूलभूत गरज काय, तर आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा असंच शालेय शिक्षणापासून सांगितलं जातं. पण खरंच ते सत्य आहे का? फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा ही मूलभूत गरज असती, तर राजपुत्र सिद्घार्थाला आपलं घर सोडायची आवश्यकता भासली असती का? यात सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशनवा विचार किती महत्वाचा आहे तो ताकवले यांनी मांडला. त्यातूनच आपल्याला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आणि ध्येय पक्कं माहीत असेल, तर पुढे आपल्याला प्रेम, आनंद, शांती या गोष्टी प्राप्त होतात. पुन्हा एक अप्रतिम असा श्लोक सादर करत ते म्हणाले आपल्यातला प्रत्येकजण पूर्णच आहे. आपल्या शरीरातली एक पेशी जरी घेतली तरी ती पूर्णच आहे. अशा अनेक पूर्ण पेशी एकत्र येऊन पूर्ण शरीर बनतं. अशी अनेक शरीरं एकत्र येऊन एक पूर्ण समुदाय बनतो. एक पूर्ण ग्रह बनतो, एक सोलार सिस्टिम बनते, एक गॅलक्सी बनते, अनेक गॅलक्सीज बनतात, युनिव्हर्स बनतं.....थोडक्यात, एकात्मता आल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. परिपूर्णता तेव्हाच येते, जेव्हा आपण एकत्र येतो. म्हणूनच हा सज्जनांचा गड ही आजची गरज आहे. आपल्या सज्जनांमध्ये एकच कमकुवतपणा असतो. तो म्हणजे मी एकटा चांगला वागतो, नियम पाळतो, मला इतर कोणाची गरज नाही. पण दुर्जनमात्र संघटित असतात. त्यांचं एक नेटवर्क असतं. म्हणूनच या एकट्यांना जर एकात्मतेची जोड नसेल तर मग अशा वेळी हे दुर्जनांचं नेटवर्क सज्जनांवर हावी होतं. सज्जन एकटे पडतात, निष्क्रिय होतात. सज्जनांची निष्क्रियता खर्‍या अर्थानं महाभारत घडायला कारणीभूत ठरते. या कोरोनाच्या साथीनं आपल्याला जागतिक स्तरावर एकत्र येण्याची एक खूप मोठी चांगली संधी दिली आहे. डॉ. ज्ञानेश्वरांनी ही चळवळ सुरू केली आहे आणि आता ती पुढे नेण्याचं, त्या चळवळीला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हा चांगुलपणा जो आपल्यामध्येच आहे, ज्याला बाहेरून कुठून आणायचं नाहीये, तो घेऊन आपल्याला या चळवळीत सामील व्हायचं आहे.

त्यानंतर आले आयएएस अधिकारी शेखर गायकवाड....कोरोनासारखं संकट आलेलं असताना केवळ 4 महिन्यांच्या अवधीत त्यांनी पुणे मनपाचं आयुक्तपद ज्या रीतीनं भूषवलं, त्याचा प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटावा असा डॅशिंग आणि कार्यप्रवीण अधिकारी. खरं तर अनंत ताकवलेंचं इतकं सुंदर भाषण ऐकल्यावर दुसर्‍या कोणाचंही भाषण फिकं पडलं असतं...पण शेखर गायकवाड या माणसानं बॅट आपल्या हातात घेतली आणि सेंच्युरी वर सेंच्युरी अशी फटकेबाजी सुरू केली. हसवत हसवत कधी त्यांनी विषयाच्या खोलात सूर मारला कळलंच नाही. मी अशी नास्तिक, कर्मकांडांना महत्व न देणारी...पण त्या क्षणी मला अनंत ताकवले आणि शेखर गायकवाड यांच्यावरून मीठमोहर्‍या उतरून टाकाव्या वाटल्या. अगदी दृष्ट काढावी लागली तरी बेहत्तर असंही वाटलं. शेखर गायकवाड यांनी सुरुवात करतानाच म्हटलं, इतकं सुंदर भाषण करणारे आयपीएस अधिकारी अनंत ताकवलेसारखे आणखी 500 अधिकारी असले तरी भारत चांगला होईल. प्रशासकीय काम करताना एक दुसरी बाजू आम्हाला रोज दिसत असते, भेटत असते असं ते म्हणाले. ही दुसरी बाजू इतकी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, की 20 पुस्तकं माझी लिहून झाली तरी लक्षात येतं की हे चक्र कधीच संपणारं नाहीये. प्रशासकीय काम करताना समाजाचं दाहक वास्तव फार चटकन समोर येतं. शेखर गायकवाड यांनी एक गोष्ट सांगितली, फार पूर्वी शुद्रक नावाचा एक ऋषी होऊन गेला, त्यानं म्हटलं की माणसं साधी राहिली असती तर न्यायही साधा राहिला असता. पण माणसं साधी नाहीत, एकमेकांवर कुरघोड्या करणारी आहेत. ती एकमेकांचा द्वेष करणारी आहेत. ती मत्सर करणारी आहेत, ती स्पर्धा करणारी आहेत. त्यामुळे सगळी गुंतागूंत आहे. शेखर गायकवाड यांनी जवळजवळ 25000 केसेस जमिनींच्या हाताळल्या. त्यात त्यांना इतकी अतरंगी माणसं भेटली की त्यांना वाटलं ही माणसं जरी बाजूला काढली तरी आपोआपच देश चांगला होईल. स्वातंत्र्याच्या वेळी आपण जर अशी 15-15 माणसं इंग्लंड, अमेरिका आणि इतर देशांत निर्यात केली असती तर...त्यांनी तिकडे थँचरबाईच्या जमिनीला कूळ लावलं असतं, त्यांनी ट्रम्पच्या रस्त्यात पाणी सोडलं असतं, त्यांनी पोर्तुगालच्या प्रेसिडेंटच्या दारात म्हसोबा बसवला असता, अशी अद्भभुत माणसं आपल्याकडे भरलेली आहेत. शेखर गायकडवाड कार्यक्रमाला बिहारमधून पुण्यात पहाटे 4 वाजता पोहोचले होते, आणि वेळ दिल्यामुळे कार्यक्रमात योग्य वेळी पोहोचले होते.

या प्रसंगी त्यांना बिहारमधले अनेक प्रसंग आठवत होते. ते ज्या मोतिहारी भागात पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे जॉर्ज ऑरवेल हा जगविख्यात साहित्यिक तिथे जन्मला असल्याचं कळलं. मोतिहारी भागातल्या अंबिका नगर इथे 1903 मध्ये जॉर्ज ऑरवेलचा जन्म झाला. त्याची 1984 ही कादंबरी, शिवाय अ‍ॅनिमल फॉर्म सारख्या पुस्तकांनी जगावर प्रभाव पाडला. तो जन्मलेला त्या ठिकाणाची इतकी दुरावस्था असलेली बघून शेखर गायकवाड यांना खूप वाईट वाटलं. त्यांना जॉर्ज ऑरवेलचं प्रसिद्घ वाक्य आठवत होतं, तो म्हणाला होता, काही लोक समान असतात आणि काही जास्त समान असतात. शेखर गायकवाड यांना वाटलं हेच जास्त विसंगतीचं कारण असावं. अशा माणसाचं घर चांगलं ठेवू नका कारण तो ब्रिटिश होता, ही मानसिकता तिथल्या लोकांची. या विसंगतीची सुसंगती कशी लावायची? हा प्रश्न प्रशासक म्हणून शेखर गायकवाड यांना पडला. बुद्घाची मूर्ती तोडायची जी वृत्ती तालिबान्यांची आहे, तीच वृत्ती जॉर्ज ऑरवेलचं घर चांगलं न ठेवणार्‍या बिहारमधल्या गावकर्‍यांची आहे. गांधीजींना गोळ्या लागल्यानंतर रक्ताचे जे दोन थेंब खाली हिरवळीवर पडले, तो एवढासा हिरवळीचा तुकडा जसाच्या तसा चाकून कापून तो आज ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. समजा, आताच्या काळात एखाद्या व्हीआयपी व्यक्तीच्या बाबतीत अशी दुर्घटना घडली, तर असं काही जतन करण्याचं पोलिस अधिकार्‍यांना सुचेल का? इथल्या पोलिसांनी 100 फूट जमीन धावाधाव करत पायाखाली चिरडून टाकली असती.

चांगुलपणा म्हणजे काय, तर चांगुलपणा म्हणजे दया, चांगुलपणा म्हणजे परोपकार, चांगुलपणा म्हणजे दुसर्‍याबद्दल चांगला विचार करणं, दुसर्‍याचा आदर करणं, स्त्रियांचा आदर करणं आहे. चांगुलपणाचे डिक्शनरी म्हणजे शब्दकोषात समानार्थी 229 अर्थ दिलेले आहेत. या 229 शब्दांचं पालन करणं म्हणजे चांगुलपणाची चळवळ पुढे नेणं आहे. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाजवळ 229 पैकी 150 पेक्षा जास्त गुण आहेतच. शेखर गायकडवाड हे कृषीचे पदवीधर असल्यानं त्यांना एक उदाहरण आठवत होतं. शेतीमध्ये एक सिद्घांत आहे. समजा रबीच्या हंगामात ज्वारी पेरली आणि तिला पाणी कमी पडलं. ती खुरटली आणि ती एकदीड फूट उभी असतानाच दुष्काळ पडला. पण तरीही ज्वारीचं कणीस टाकूनच ते झाडं मरतं. हा निसर्गाचा सिद्घांत आहे. याचा अर्थ चांगुलपणाला नॅचरल टेन्डसी असते. ही नैसर्गिक उर्मी टॅग करायला पाहिजे. शेखर गायकवाड यांचा रोज 300 लोकांशी सामना होतो आणि त्यातली 275 लोक खोटं बोलणारी भेटतात. माझ्याकडे येणारा एखादा साधा अडाणी माणूस इथे उपस्थित असलेल्यांना 25 वेळा विकून खाईल. जो जास्त शिकला असेल, तो फसण्याची जास्त शक्यता आहे. एका ग्रामपंचायतीच्या 150 केसेस शेखर गायकवाड यांनी नाशिकमध्ये असताना चालवल्या. माणूस, कायदा, संपत्ती आणि माणसाचं वर्तन अशी तुलना ते करत होते. कायद्यामध्ये एका ओळीचा बदल केला होता आणि शेखर गायकवाड यांना आश्चर्य वाटत होतं. ज्या ग्रामपंचायत सदस्याला तिसरं मूल होईल त्याचं ग्रामपंचायतीचं सदस्यतव रद्द होईल असा तो बदल होता. प्रशासनाला वाटलं, तीन मुलं असणारा स्वत: होऊन राजीनामा द्यायला येईल. पण असं काही घडलं नाही. तर तीन मुलं किंवा जास्त मुलं असणारे 150 लोक, त्यांच्या बाजूनं लढणारे तेवढेच वकील आणि यांना दोनच मुलं कशी आहेत हे सिद्घ करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड...सगळ्यात अडाणी सरपंचाचा सगळ्यात शिकलेला वकील, प्रत्यक्षात जरी 5 मुलं असली, तरी कागदोपत्री 2च कशी दाखवायची यासाठी त्यांची चाललेली खलबतं सुरू...अ‍ॅफिडिविएट नावाचा काय कागद असतो...भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता असं मला कोणी विचारलं, तर मी जाहीरपणे सांगेन की वेद,उपनिषध, ज्ञानेश्वरी नसून अ‍ॅफिडिविएट हा कागद...या कागदावर या लोकांनी लिहिलेला मजकूर शेखर गायकवाड यांनी सांगितला, मी अमूक अमूक गावचा सरपंच असून मला दोन मुलं आहेत, तिसरं मूल मला नसून माझ्या बायकोला झालेलं आहे. त्यापुढे त्यानं लिहिलं होतं, माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. आणि याची योग्य ती चौकशी अ‍ॅडिशनल कलेक्टर शेखर गायकवाड यांनी करावी....कधी कधी मला असं वाटतं की अशा माणसांचे पुतळे चौकाचौकात उभे करायला हवेत.... शेखर गायकवाड यांनी हा किस्सा इतका रंगवला की उपस्थितांनी हसून हसून जमिनीवर लोळण घ्यायचंच बाकी राहिलं.

अशा वातावरणात चांगुलपणाची चळवळ पुढे नेणं एक आव्हान असल्याचं ते म्हणाले. कुणाकडे चांगलं हस्ताक्षर आहे, तर कोणाकडे दोन अनाथ मुलांना खाऊ घालण्याची इच्छा आहे, अशा लोकांचा वापर मी प्रशासनात करत गेलो, असं गायकवाड यांनी सांगितलं. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असताना शेखर गायकवाड यांनी केवळ 4 महिन्यांच्या कोरोना काळात एक आवाहन पत्र तयार केलं, तसंच पुण्यातल्या डॉक्टरांची एक मिटिंग बोलावली. त्यांना काय काय आवश्यक आहे याची यादी केली. स्टेथोस्कोपपासून मास्कपर्यंत जवळ जवळ 350 वस्तू त्यात होत्या. आपलं निवेदन देताना त्यांनी ही यादी जोडली आणि पुण्यातल्या चांगल्या लोकांनी 20 दिवसांमध्ये जवळजवळ साडेबारा कोटींची मदत केली. ही मदत पैशांच्या स्वरूपात न घेता, वस्तूंच्या स्वरूपात घेतली गेली. जे लोक चेक घेऊन आले, त्यांचे चेक नम्रपणे परत केले आणि त्यांना वस्तू देण्याची मागणी करण्यात आली. शेखर गायकवाड आयुक्त असेपर्यंत त्यांना या काळात एकही वस्तू विकत घ्यावी लागली नाही. या चांगुलपणाची सांगड फक्त घालण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. त्याच्याकडे नसलेली गोष्ट मागण्यापेक्षा त्याच्याकडे असलेली गोष्ट मागितली, तर चांगुलपणाचा हेतू साध्य होतो. चांगुलपणाची चळवळ पुढे नेण्यासाठी एक पोर्टल असायला हवं, त्यात कोण काय देऊ शकतो हे मांडण्याची आवश्यकता आहे. कोणी वेळ देऊ शकेल, तर कोणी आपलं कौशल्य, कोणी वस्तू देऊ शकेल, तर कोणी इतर सेवासुविधा. यात लचचिकताही आणायला हवी, तरच चांगुलपणाची चळवळ पुढे जाईल. या चळवळीचं पहिलं पाऊल म्हणजे दिवाळी अंक निघाला आणि आता या चळवळीचा रोड मॅप आपण बनवणार आहोत. या मॅपमधून पुढली दिशा ठरेल. आपल्याकडली विषमता, जाती-धर्माचा भेद अशा अनेक गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलं. 200 रूपयांवरून होणारे खून, शिक्षणक्षेत्रातली दादागिरी अशा अनेक गोष्टी त्यांनी समोर मांडत शेखर गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले. खरं तर हे व्यवस्थेचं अपयश आहे. विसंगतीपूर्ण चित्र बंद होणं हीच चांगुलपणाची सुरुवात असल्याचं त्यांनी सांगितलं.

चांगुलपणाची चळवळ हा दिवाळी अंक प्रकाशित झाला होता, मान्यवरांचे उत्कृष्ट बोल ऐकले होते, पण यानंतरही एक अतिशय ह्द्य कार्यक्रम संपन्न व्हायचा होता...तो होता अतिशय उत्कृष्ट काम केलेल्या वुई पुणेकर, जागृती, हेल्प रायडर्स, डब्ल्यूएमओ महाराष्ट्र या संस्थांचा सन्मान. खरोखरं भूषण म्हणावे असे मीतेश घट्टे, श्रीनिवास वायकर, दिलीप शेलवंटे, यशवंत/प्रणोती शितोळे यांच्यासारखे तरुण व्यासपीठावर सन्मान स्वीकारायला आले आणि अभिमानानं ऊर भरून आला. वुई पुणे यांनी नदी स्वच्छ करण्याचा विडा उचललेला असून ते या कामात उतरलेले आहेत. पराग मतेंसारख्या उद्योगपतीनं निवृत्ती घेऊन याच कामावर लाखो रूपये खर्च केले आहेत. अनेक तरुणांना या कामासाठी त्यांनी प्रेरित केलेलं आहे. बारामतीच्या श्रीनिवास वायकरची सायकल क्लबनं कोरोनाकाळात पोलिसांना रोज घरून जेवणाचा डबा नेला आणि त्यांची काळजी घेतली, तर दुसर्‍या संस्थेचे तरुण कचर्‍यावर काम करणारे... पुण्यात कुठेही कचरा दिसला तर ते मनपाला कळवतात, त्याचा पाठपुरावा करतात आणि प्रश्न निकाली लावतात. एक संस्था इतकी मोठी की तिचे फेसबुक सदस्य 16 लाखांच्या वर आहेत. कोणीही संकटात सापडलं आणि मदतीसाठी या फेसबुकपेजवर कळवलं की जिल्ह्यात पसरलेले या संस्थेचे सदस्य धावून जातात. त्यानंतरची अंध तरुणांची संस्था...हे तरुण भारत-श्रीलंका, भारत-ऑस्ट्रेलिया अशा क्रिकेट संघात सामना खेळले असून दणदणीत विजय मिळवला आहे. स्वत:च्या अंधत्वाचा बाऊ न करता तो स्वीकारून उत्साहाने जगताहेत आणि इतरांना जगण्यासाठी प्रेरित करताहेत. जागृती या संस्थेनं तर मागच्या वर्षी पावसानं कहर केलेला असताना, कोल्हापूर, सांगली, सातारा या सर्व भागात कित्येक कोटी रुपयांचा वस्तूंची मदत केली. दिवसरात्र हे कार्यकर्ते झटत राहिले. या सगळ्यांत राज देशमुख सारखा धडाडीचा तरुण यानं कार्यक्रमाची केलेली मांडणी आणि त्यातला नेटकेपणा याबद्दल किती कौतुक करावं? असे तरुण म्हणजे देशाची खरोखरंच शान. अतिशय उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेल्या राजने कार्यक्रम वेळेवर कसा सुरू होईल आणि वेळेत कसा संपेल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. हा कार्यक्रम नितांत सुंदर होण्याचं श्रेय मी त्यालाच देऊ इच्छिते.

या अंकाची संपादक शुभांगी मुळे ही खरं तर गायिका. पण तिने डॉ. ज्ञानेश्वर मुळेंना दिवाळी अंक काढण्यासाठी शब्द दिला आणि आपलं हे क्षेत्र नसतानाही त्यात उडी मारली. फक्त लेखकांशी संपर्क साधून त्यांना बोलतं करणं इतकंच नाही, तर या अंकाची तांत्रिक बाजूही समर्थपणे बघितली आणि एक सर्वांगसुंदर असा अंक वाचकांसमोर आणला. शुभांगीला नीना भेडसगावकरसारख्या अनुभवी मैत्रिणीनं, तिच्या आई-वडिलांनी, मुलाने, नवर्‍याने देखील आपलंच काम समजून मोलाची मदत केली. शुभांगी, अग इतकं झोकून देऊन पर्फेक्ट काम केलंस आणि तरीही ऋजुतेनं विनम्रभाव जपत समोर आलीस, खूप खूप कौतुक. ही कृतज्ञता शब्दांत व्यक्त करायलाच हवी...

यशवंत शितोळे आणि प्रणोती शितोळे हे खास कोल्हापूरवरून आले होते...जाताना त्यांना प्रवासात वेळ लागेल याची जाणीव मनात ठेवून शुभांगी मुळे हिने कार्यक्रमाला येण्यापूर्वी आमच्यासाठी घरी जेवण तयार करून ठेवलं होतं. कार्यक्रम संपल्यावर तिने आम्हाला आग्रहाने तिच्या घरी नेलं. अतिशय सुग्रास असं जेवण, दिवाळी भेटवस्तू, दिवाळी फराळ असं सगळं साग्रसंगीत पार पाडूनच आम्हाला निरोप दिला. (पुण्यातल्या माणसांचे अनेक किस्से प्रसिध्द असतात, त्या पार्श्वभूमीवर पुण्यातली सह्दय माणसं खरी कशी असतात ते कळावं म्हणून ...) कार्यक्रम संपला खरा, पण त्या कार्यक्रमाची रंगत तशीच मनात घेऊन पत्रकार भवनच्या पायर्‍या उतरत होते. इतक्या प्रतिकूल काळात, आशेचा दीप घेऊन, चांगुलपणा जपत, दिवाळी सुरू झाली असं मन सांगत राहिलं!

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो