वाचन जागर अभियान, शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर
वाचन जागर अभियान, शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर विनागर्दी अगदी छानपैकी पुणे ते जुन्नर काल प्रवास झाला. जुन्नरला घालवलेली काही काळापूर्वीची नाणेघाटातली बुद्धपोर्णिमा आठवली. हिमोग्लोबिन सहावर गेलेलं असताना, मी नाणेघाट चढायचं केलेलं धाडस आठवलं. बोचरी थंडी आणि तडाखेबंद वारा यातून आम्ही रात्रीच्या वेळी नाणेघाट सर केला होता. वरती गेल्यावर सैराटच्या निमित्तानं प्रत्येकाला आपआपली आर्ची आठवत होती. त्यांची आर्ची आणि माझा परशा अशा गप्पा रंगल्या. काहींची गोष्ट जीवघेणी होती, तर काहींच्या स्टोरीचा 'दी एंड' खूपच सुखद होता. प्रत्येकानं आपल्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेले ते अनुभव बाहेर काढले होते.
या सगळ्यात मला राजूनं दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही. वर जाताना आणि खाली परत येताना त्यानं माझा हात सोडला असता, तर .....ठाऊक नाही काय झालं असतं ते! या आठवणींमधून बाहेर येईपर्यंत जुन्नर आलेलं. महाविद्यालयाचा परिसर निसर्गरम्य आणि ऐसपैस....तरुणाईची लगबग सुरू होती....प्रवेशद्वारात डायमंड प्रकाशनाचे श्री. पाश्टे, एस. के. जोशी यांनी माझं स्वागत केलं. प्राचार्य चंद्रकांत मंडलिक यांनीही स्वागत केलं. प्राचार्यांचं शिक्षण, त्यांचे रिसर्च पेपर्स, त्यांची प्रसिद्ध असलेली पुस्तकं यावरही चर्चा झाली. आपली पहिली भेट आहे असं वाटलंच नाही. आम्ही व्याख्यानासाठी हॉलमध्ये पोहोचलो.
तरतरीत चेहर्याच्या उत्साही मुली आणि मुलं यांनी हॉल भरलेला, प्राध्यापक वर्गही उपस्थित होता. बारावीची परीक्षेची गडबड सुरू असतानाही वाचनवेडे मुलं-मुली हॉलमध्ये दिसत होते. अर्थातच मुलींची संख्या मुलांपैक्षा जास्त होती. आपल्या जीवनातलं विज्ञानाचं महत्व मला अधोरेखित करायचं होतं. त्याचबरोबर वाचन जागर अभियान असल्यामुळे वाचनापासूनच मी सुरूवात केली. वाचलेली पुस्तकं, वाचनानं काय दिलं, त्यातूनच गवसलेली लिखाणाची दिशा, वाचन आणि लिखाणानं भेटलेली जागतिक स्तरावरची माणसं आणि समृद्ध होत चाललेलं जगणं, विज्ञानातले आणि कलाविश्वातले काही किस्से आणि उदाहरणं, असं करत वेळ भुर्रकन उडाला. मुला-मुलींची उत्स्फूर्त मिळालेली दाद खूप समाधान देऊन जाते.
त्यातच कार्यक्रम संपल्यावर जर धीटपणे मुलं-मुली भेटायला आली, त्यांना सेल्फी काढायचा असेल तर त्यांना आपलं बोलणं आवडलंय हेही लक्षात येतं. इथं तर मुलामुलींबरोबर प्राध्यापकवर्गही फोटो सेशनमध्ये सामील झाला होता. आमची सगळी पुस्तकं वाचून फोन करणारा प्रसन्न इथंच भेटला. त्याच्या भेटीनं खूप आनंद झाला. जुन्नरमध्ये शाकाहारी जेवण करून पुण्याच्या रस्त्याला लागलो, तसं बरोबर असलेले एस.के. जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या पत्नीनं आणि मुलीनं त्यांना 'सिंफनी' भेट दिल्याचं आणि ते पुस्तक आपल्याला खूप आवडल्याचं सांगितलं. रस्त्यात ऊसाचा ताजा रस पित मग संगीतकारांवर खूप छान गप्पा झाल्या. लगेचचं पुण्यनगरी आली आणि पुढल्या कामाचे मार्ग खुणाऊ लागले.
दीपा देशमुख, पुणे.