भारतीय जीनियस द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन - गोविंदभाई श्रॉफ सभागृह, औरंगपुरा, औरंगाबाद

भारतीय जीनियस द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन - गोविंदभाई श्रॉफ सभागृह, औरंगपुरा, औरंगाबाद

तारीख
-
स्थळ
औरंगाबाद

'भारतीय जीनियस'च्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं औरंबादला २१ डिसेंबर २०१६ या दिवशी जाण्याचा योग आला. औरंगाबादची प्रगतिशील लेखक संघटना आणि मनोविकास प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. चोपडेसर आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू मा. पंडित विद्यासागर हे दोघं प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष म्हणून लाभले हेाते. प्रगतिशील लेखक संघटनेचे प्रा. सुधाकर शेंडगे आणि मनोविकासचे अरविंद पाटकर हेही उपस्थित हेाते. 
कार्यक्रमाला बोराडेकाका (रा. रं. बोराडे), सुनिती धारवाडकर, मा. देसरडा, रवी, पळसवाडीकर, जगन्नाथ दीक्षित-अंजली दीक्षित, प्रिया, शरद, ज्योती, अनिता, विरा, त्रिशुल, रघू, मारुती, महेश-निखील साखरे, जोशीकाकू असे अनेक स्नेही आले होते. कार्यक्रम चांगला झाला. विशेष म्हणजे दोन्हीही कुलगुरू भारतीय जीनियस आणि त्याआधीचे विदेशी जीनियस यांच्याबद्दल भरभरून बोलले. ‘बहुतेक वेळा विज्ञानावर लिहायचं झालं की ते लिखाण रूक्ष होतं किंवा ते पहिल्याच पायरीवर जाऊन थांबतं, मात्र अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी या मालिकेतून विज्ञान समजवताना पहिली पायरी केव्हाच ओलांडली असून यात त्या जीनियसचं चरित्र आणि कार्य दोन्हींचा समतोल साधला गेला आहे असं ते म्हणाले. विज्ञानावरची अशी पुस्तकं अभ्यासक्रमात लागली तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, तंत्रज्ञान यांची गोडी आपोआपच निर्माण होईल असंही ते म्हणाले. ही पुस्तकं कुठल्याही वयोगटाच्या आणि कुठल्याही शाखेतलं शिक्षण घेणार्‍या, घेतलेल्या किंवा न घेतलेल्या प्रत्येकानं वाचायला हवीत, यात व्यक्तींचं कुठेही उदात्तीकरण नाही आणि तीही आपल्यासारखीच गुणदोष असलेली माणसं होती हे लेखकद्वयींनी खूप चांगल्या रीतीनं मांडलंय’ असंही ते म्हणाले. 

या वेळी लिखाणानं काय दिलं, लिखाण काय काय देतंय आणि अच्युत गोडबोले या व्यक्तीबरोबर लिखाणाचा प्रवास करताना काय काय शिकायला मिळालं आणि सुपरहिरो, कॅनव्हास आणि जीनियसच्या प्रवासातले भेटलेले जगप्रसिद्ध जीनियस यांच्याबद्दल मी बोलत गेले. त्यानंतर अच्युत गोडबोले यांनी आपण का लिहितो, लिहिण्यामागची प्रेरणा आणि दीपाला सहलेखनाबद्दल का विचारलं हे सांगताना त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ‘दीपाची भाषा अतिशय अप्रतिम असून, मी एक इंटिग्रेटर आहे तर ती एक चांगली क्रिएटिव्ह रायटर आहे’ असं ते म्हणाले. ‘दीपामध्ये अथक परिश्रम करण्याची तयारी, सातत्य, चिकाटी आणि नवनवीन शिकण्याची तयारी’ हे गुण आपल्याला भावले आणि आपण तिला लिखाणाविषयी विचारलं असं ते म्हणाले. दीपाबरोबर जी पुस्तकं लिहिली, ती चांगली झाली असतील तर याचं श्रेय फक्त तिचंच आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

माझ्याच गावी (शहरी) माझ्याविषयी माझ्या स्नेहीजनांसमोर हे कौतुक ऐकताना मला खरंच खूप छान वाटलं. औरंगाबाद हे माझं खूप आवडतं शहर....लहानपणापासून प्रत्येक रविवारी दौलताबादचा किल्ला चढणं-उतरणं, मैत्रिणीबरोबर हत्ती हौदाजवळ बसणं, तिथल्या ओळख असल्यागत जवळ आलेल्या खारींचं निरीक्षण करणं, पहिलं प्रेम, प्रेमभंगही इथेच.......या शहरात किती किती आठवणी साठलेल्या.....औरंगाबादनं सांस्कृतिक आणि सामाजिक भान दिलं, आकाशवाणी रेडिओकेंद्रावरच्या कामानं आत्मविश्‍वास दिला, विश्‍वास-अभिजीतसारखे सख्खे-सावत्र म्हणून चिडवणारे भाऊ दिले, दत्ता बाळसराफसारखा कार्यकर्ता मित्र दिला, ज्याच्यामुळे आयुष्याला नवं वळण मिळालं. याच औरंगाबादमध्ये अच्युत गोडबोले यांच्याशी पहिली ओळख झाली. या नव्या मित्रानं लहानपणापासून मी लिहीत असलेली डायरी आणि माझ्या हातात घेतलेली लेखणी घट्ट पकडायला शिकवली. मला व्यापक पातळीवरनं बघायला शिकवलं. मासवणच्या विंचूकाट्यांच्या प्रवासात याच मित्रानं मला घाबरू नकोस, चालत राहाचा सूर दिला. वैभव-मनोजबरोबर किती कविता, किती गझल आणि किती गाणी याच औरंगाबादमध्ये गायिली, आजही त्याच्या गझल गाताना मला औरंगाबादचे तेच क्षण पुन्हा पुन्हा आठवतात....औरंगाबाद सोडताना खूप खूप रडले होते.....ते शहर त्या त्या वेळी खूप सुंदर वाटलं होतं....मग मात्र पुढल्या प्रवासात जाईल ते ठिकाण आपलं झालं. जाईल तिथली माणसं माझी झाली आणि प्रवासही वळणावळणाचा झाला तरी सुंदरच झाला!

या प्रकाशनाच्या वेळी हे सगळं सगळं आठवत होतं. कार्यक्रम संपल्यावर आपल्यांची छबी कॅमेर्‍यात बंदिस्त करताना छान वाटत होतं. या वेळी ज्योती धर्माधिकारी ही एक छानशी लिहिती मैत्रीण मिळाली. तिला मुलाखत देताना तिच्याविषयीचा स्नेहभाव आणखी वाढला. हे सगळं अनुभवताना औरंगाबादविषयीची कृतज्ञता पुन्हा पुन्हा मनात दाटून येत होती!

दीपा देशमुख

२१ डिसेंबर २०१६

कार्यक्रमाचे फोटो