नोबेल सन्मान आणि दीपा!
नोबेल सन्मान आणि दीपा! तुडुंब भरलेलं सभागृह, अनेक फोटोग्राफर्स एकत्र येऊन शूट करताहेत, फोटो काढताहेत, दुतर्फा असलेले लोक आपल्या जागेवरून उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करताहेत....त्यांचे हसरे चेहरे न्याहाळीत आपण वाजत असलेल्या संगीताच्या ठेक्यावर पावलं टाकत व्यासपीठाकडे जात आहोत....हे दृश्य मी अनेकदा बघितलं होतं. लहानपणी माझ्या वडिलांच्या बाबतीत आणि त्यानंतर ज्या ज्या वेळी अच्युत गोडबोलेंबरोबर कार्यक्रमांना गेले, त्या त्या वेळी! मात्र या वेळी या दृश्याचे नायक माझे वडील किंवा अच्युत गोडबोले नव्हते तर ती नायिका मी होते.....खूप छान वाटत होतं.
आयोजक आणि जळगावकर यांच्या प्रेमामुळे भारावून गेले होते. माझं जळगावशी असलेलं नातं मला आठवत होतं....माझ्या मैत्रिणीला सुचेताला भेटायला औरंगाबादहून जळगावला येण्यासाठीच्या अनेक कसरती मला आठवत होत्या...त्यानंतर जळगावमध्येच संपन्न झालेला कुसुमांजली हा शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेला काव्योस्तव आणि त्यात मी सादर केलेली माझी पहिली गझल आठवली....त्यानंतर दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन यांच्याबरोबर झालेली भेट आणि स्नेहाचं नातं आठवलं. नोबेल फाऊंडेशन आयोजित ‘जीनियस येती घरा...’ हा कार्यक्रम सुरू झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पी. पी. माहुलीकर, दीपस्तंभचे यजुवेंद्र महाजन, खानदेश शिक्षण प्रसारक मंडळाचे नीरज अग्रवाल, निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, प्रा. एस. जे पाटील आणि नोबेल फाऊंडेशनचे जयदीप आणि विशाल पाटील आणि त्यांची टीम असे सगळे व्यासपीठावर उपस्थित होते. ‘अच्युत गोडबोलेंचा वेग अफाट आहे. त्या वेगाबरोबर धावताना दमछाक होते....अशा वेळी त्यांच्याबरोबर लिहिण्याचं आव्हान पेलणं ही साधी गोष्ट नाही’ असं कुलगुरूंनी म्हटलं तेव्हा माझ्याजवळचे सगळे शब्द स्तब्ध झाले.
याच वेळी जळगावच्या व्यासपीठावर जीनियस मालिकेतल्या विदेशी जीनियस, भारतीय जीनियस आणि नंतर तिसर्या टप्प्यातल्या तंत्रज्ञ जीनियसचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं! सायन्स ऑलम्पियाड आणि होमी भाभा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. त्यांनतर या कार्यक्रमात मी आणि यजुवेंद्र महाजन यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. (यजुवेंद्र महाजन यांच्या गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या आगळ्या-वेगळ्या कामाविषयी लवकरच लिहीन.) मानपत्राचं वाचन सुरू होतं.....(मानपत्र लिहिणार्या कवीला माझा सलाम!) माझ्याविषयीच्या आदराच्या, कौतुकाच्या, स्नेहाच्या भावना त्यातल्या प्रत्येक शब्दांतून मला जाणवत होत्या....आपल्या जबाबदारीची जाणीव वाढत होती....आत्ता तर चालायला सुरुवात केलीये, अजून खूप प्रवास बाकी आहे असं मन म्हणत होतं.....आजच्या प्रसंगासाठी, इथंपर्यंत येण्यासाठी वाटेत भेटलेले अनेक लोक, ती ती प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती आठवत होती....यात सगळ्यात जास्त कृतज्ञता व्यक्त करावी अशी या लेखनप्रवासातली व्यक्ती म्हणजे अच्युत गोडबोले! मी माझ्या प्रवासात लिहीत राहिले असते, पण त्यांच्याबरोबरच्या लिखाणानं मला समृद्ध केलं, माझ्यातल्या विद्यार्थ्याला सतत अभ्यास कर हा मंत्र मिळाला...विषयाची व्यापकता लक्षात घे, खोलवर जा, त्याचबरोबर विषयातली रंजकता आणि सोपेपण कसं अबाधित राहील हे कायम लक्षात ठेव....लिहीत असतानाच शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न कर....नंतर दुरूस्त करू ही गोष्ट उद्यावर ढकलू नकोस....काम करत राहा.....प्रसिद्धी, पैसा, अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून लिहू नकोस..... स्वतंत्रपणेही लिही....हे सगळं अच्युत गोडबोलेंचं बोलणं मला आठवत होतं.....
मी बोलायला सुरूवात केली. सावित्रीबाईंची आठवण झाली. त्यांच्यामुळेच तर इतक्या आत्मविश्वासानं व्यासपीठापर्यंत येण्याची प्रक्रिया घडली. त्याचबरोबर मला राजा राममोहन राय यांची तीव्रतेनं आठवण झाली. आजही तो काळ असता, किंवा राजा राममोहन रॉय नसते, तर मी जिवंत असते का हा प्रश्न मला पडला......माझा प्रवास उलगडताना अच्युत गोडबोलेंची भेट ही माझ्या आयुष्याला वळण देणारी कशी ठरली हे मी सांगत होते....त्या वेळी घडलेले गमतीदार प्रसंग आठवून मला आज हसायला येत होतं. लोकही ते सगळं ऐकताना रंगून गेले होते.... एक चांगला शिक्षक कसा असतो हे अच्युत गोडबोलेंमध्ये मला दिसल्याचे अनुभव मी सांगितले....त्यातूनच मग कॅनव्हासची निर्मिती...मायकेलअँजेलो आणि लिओनार्दो, पिकासो समोर येत राहिले....मायकेलअँजेलो आणि घिरलँडियो यांच्यामधलं गुरू-शिष्याचं अनोखं नातं, लिओनार्दोमधली प्रचंड कल्पकता आणि बुद्धिमत्ता पण नियोजनाचा अभाव, पिकासोचं बालपण आणि त्यानं केलेले चित्रकारीतेतले प्रयोग......कलेचं आपल्या आयुष्यातलं स्थान सांगत असताना जिनियसचे सगळेच शास्त्रज्ञ माझ्यासमोर येऊन उभे राहिले.....लहानपणी घडलेले वाईट प्रसंग, अनुभव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर कसे परिणाम करतात हे सांगताना मला न्यूटनचा विक्षिप्तपणा आणि विचित्रपणा आठवला, तर ओपेनहायमरच्या लहानपणचा तो शिबिरात गेल्यावर त्याच्या मित्रांनी त्याच्याबरोबर मुद्दाम केलेला खोडसाळपणाचा प्रसंग आठवला.....
जीनियस म्हटलं तर आपल्यासारखेच, पण त्यांचं वेगळेपण कुठे दिसतं, तर त्यांच्यातलं कुतूहल, चिकाटी, झपाटलेपण, परिश्रम आणि लोककल्याणाची लागलेली आस त्यांना आपल्यापासून वेगळं करते ही गोष्ट सांगत असताना लुई पाश्चर, जगदीशचंद्र बोस, डॉ. जयंत नारळीकर, माझा आवडता रिचर्ड फाईनमन, असे अनेक शास्त्रज्ञ त्यांच्यातल्या गुणांचं वैविध्य घेऊन पुन्हा माझ्यासमोर उभे राहिले. त्यांच्यातला चित्रकार, त्यांच्यातला संगीतकार, त्यांच्यातला संशोधक, त्यांच्यातला मानवतावाद..... आपल्या आयुष्यातला अंधार दूर करणारे आणि आपलं आयुष्य सुलभ करणारे एडिसन, मार्कोनी, टेस्ला, अॅलन ट्युरिंग, लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन असे तंत्रज्ञ मला साद घालत होते.... मी बोलत होते, लोक ऐकत होते.....मी पूर्णविराम घेतला, लोक भारावून गेले होते.
समोर तरुणाई मोठ्या प्रमाणात होतीच, पण त्यांचे पालक आणि प्रौढ श्रोतेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे सगळ्यांनाच भेटता आलं. सगळ्यांबरोबर सेल्फी आणि फोटो सेशन झालं. 'आजपर्यंत आपण फारसं वाचलेलं नाही, पण आता सुरुवात करणार आणि पहिल्यांदा जीनियसचे सगळे भाग वाचून काढणार' असं जेव्हा गृहिणी सांगत होत्या, तेव्हा आपलं बोलणं पोहोचलं याचा आनंद शब्दातीत होता. कार्यक्रम आवडल्याची पावती प्रत्येकजण येऊन देत होता. त्या जमा झालेल्या इतक्या सार्या पावत्या जपून जवळ ठेवताना तारांबळ उडत होती. बालसाहित्यिक आबा महाजन यांनी आपलं पुस्तक भेट दिलं. फेसबुक मित्र महेश सूर्यवंशी बर नसतानाही कार्यक्रमाला आवर्जून आला होता. shortfilm चा उत्साही दिग्दर्शक सचीन हाही भेटला.
भुसावळला जाऊन ट्रेन पकडायची होती. त्यामुळे यजुवेंद्रच्या मनोबल प्रकल्पाला भेट देणं (याविषयी लवकरच सविस्तर वृत्तांत आपल्यासमोर येईलच.), जेवण करणं आणि दिवसभर मला साथ दिलेल्या शुभा जोशी आणि सुचेता थोरात या मैत्रिणींना निरोपाचा हात दाखवणं पार पडलं. (सुचेतानं भेट दिलेली कॉटनची सुरेख साडी आणि शुभानं संक्रात लक्षात ठेवून भेट दिलेली काळी साडी म्हणजे माझ्यासाठी ‘किती सांगू मी सांगू कुणाला....’ अशी अवस्था होती.) पुण्यापासून ते पुन्हा पुण्यापर्यंत आसावरी या माझ्या मैत्रिणीनं जी सोबत केली त्याबद्दल तिला ‘लव्ह यू’ मनातल्या मनात! नोबेल फाऊंडेशनच्या जयदीपनं सहा महिन्यांपासून या कार्यक्रमासाठी केलेला पाठपुरावा, प्रत्यक्ष तारीख ठरल्यापासूनचं त्याचं चोख आयोजन, संपूर्ण टीमनं घेतलेली काळजी आणि प्रेम याबद्दल मी काय बोलू? खूप लहान वयात सामाजिक भान लक्षात ठेवून नोबेल फाऊंडेशन करत असलेलं काम, विज्ञानाच्या जागृतीसाठी त्यांनी उचललेलं पाऊल आणि या सगळ्यांमधली विनम्रता आणि माणुसकी माझ्याबरोबर कायम राहील आणि आपल्यातल्या स्नेहाचं हे नातं आता आणखी मजबूत असेल ही खात्री आहेच!
दीपा देशमुख, पुणे.