एस. पी. कॉलेज मधला नीलिमा सरंजामे/आपटे स्मृति-पुरस्कार कार्यक्रम

एस. पी. कॉलेज मधला नीलिमा सरंजामे/आपटे स्मृति-पुरस्कार कार्यक्रम

तारीख
-
स्थळ
SP Collage Pune

एस. पी. कॉलेज मधला नीलिमा सरंजामे/आपटे स्मृति पुरस्कार कार्यक्रम कालची सायंकाळ एसपी कॉलेजमध्ये! मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर, प्राचार्य, मुली, श्रीनिवास आपटे, मुकुंद आपटे यांचे नातेवाईक आणि स्नेही यांनी हॉल भरून गेला होता. सर्वगुणसंपन्न असलेली, सामाजिक भान असलेली नीलिमा सरंजामे ही एसपी कॉलेजच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेली तरूणी! पुढे तिचं लग्न मुकुंद आपटे यांच्याशी झालं. २७ वर्षांचा सुखी संसार झाला आणि तिनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. तिचं वर्षश्राद्ध करणं किंवा काही धार्मिक विधी करणं हे न करता मुकुंद आपटे यांनी गेली १८ वर्षं आपल्या पत्नीच्या स्मृती जागवताना त्याच एस. पी. कॉलेजमधल्या शिकणार्‍या मुलींसाठी दरवषी कार्यक्रम करायचं ठरवलं. त्या वेळचे प्राचार्य विजय देव यांनी या कल्पनेचं स्वागत केलं. त्यानुसार मुकुंद आपटे आणि त्यांचे साठ वर्षांपासून असलेले मित्र श्रीनिवास पेंडसे यांनी एस.पी. कॉलेजच्या वसतिगृहातल्या मुलींसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली. एक प्रश्नावली देखील तयार केली. अभ्यास सोडून त्या मुलीचे सांस्कृतिक, सामाजिक बाबतीतले विचार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी ही प्रश्नावली होती. या सगळ्यांमधून ज्या मुली निवडल्या जातील त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून तीन मुलींची निवड करून त्यांना पुरस्कारानं सन्मानित करायचं असं या जोडगोळीनं ठरवलं.

या पुरस्कार वितरणाच्या वेळी एक चांगला व्याख्याता किंवा व्याख्याती बोलवायची आणि त्यांचे विचार मुलींपर्यंत पोहोचवायचे असंही त्या वेळी ठरलं आणि गेली १८ वर्षं हा कार्यक्रम सातत्यानं सुरू आहे. कालचा १९ वा कार्यक्रम होता! या वेळी अच्युत गोडबोले आणि मला या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं होतं. दोन तीन महिन्यांपासून अच्युत गोडबोले यांचा घसा खराब असल्यानं ते बोलणार नसून फक्त उपस्थित राहतील असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे बोलण्याची जबाबदारी पूर्णतः माझ्यावर होती. मी, अपूर्व आणि गीताली पाच वाजता एस. पी. च्या परिसरात पोहोचलो. पाच ते सहा या वेळात आम्हाला निवडलेल्या मुलींच्या मुलाखती घेऊन त्यातून तीन क्रमांक काढायचे होते. मुकुंद आपटे, श्रीनिवास पेंडसे, गीताली आणि मी मिळून या मुलाखती घेत राहिलो. सगळ्याच मुली खूप आत्मविश्वासपूर्वक बोलत होत्या. प. महाराष्ट्र, मराठवाडा अशा अनेक भागांतून पुण्यात त्या शिकायला आलेल्या होत्या. यातल्या काहींचे वडील शेतकरी होते. या मुलींनाही शेती करण्याची सवय होती आणि शेतीतल्या प्रश्नांची, समस्यांची जाणही होती. आपल्या करियरच्या बाबतीत या मुली जागरूक होत्या आणि येणार्‍या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी सज्जही होत्या. यातल्या दोघींपैकी एक जन्मापासून अंध, तर दुसरी डॉक्टरांच्या चुकीच्या निदानामुळे पाय गमावून बसलेली होती. दोघींमधला सकारात्मक दृष्टिकोन थक्क करणारा होता. त्यांना कोणाचीही सहानुभूती नको होती. आपल्या बळावर आपली वाटचाल करण्यासाठी त्या तयार होत्या.

या मुलींशी मुलाखती म्हणण्यापेक्षा गप्पा मारून खूप खूप बरं वाटलं. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या हॉलमध्ये आम्ही त्यानंतर पोहोचलो, तर प्राचार्य आणि अच्युत गोडबोले आधीच येऊन पोहोचलेले दिसले. दोनच मिनिटांत कार्यक्रम सुरू झाला. मुकुंद आपटे आणि श्रीनिवास पेंडसे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका सांगितली. वसतिगृहाच्या रेक्टर यांनी स्पर्धेमागची प्रक्रिया सांगितली. त्यानंतर गीतालीनं अच्युत गोडबोले आणि माझा परिचय करून दिला. आपलीच जवळची मैत्रीण आपला व्यासपीठावरून जाहीर परिचय करून देते आहे यामागचा तिचा स्नेह, प्रेम मला खूप आनंद देऊन गेला. अच्युत गोडबोले यांनी मुलींशी थोडक्यात संवाद साधला. 'आपल्या मनाचा आवाज ऐका आणि त्याप्रमाणे जगा' असं त्यांनी सांगितलं. एरिक फ्रॉम या जगविख्यात मानसशास्त्रज्ञाचे दाखले त्यांनी दिले. काही विनोदही सांगितले. त्यानंतर मी बोलायला उभी राहिले. हॉस्टेलमधले दिवस आपल्याला काय काय शिकवतात, मुकुंद आपटे आणि नीलिमा सरंजामे-आपटे यांच्यातलं उत्कट नातं, माझ्या लेखनप्रवासातलं अच्युत गोडबोले नामक व्यक्तीचं योगदान, प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता जगाच्या पटावर नावं झळकवणारी माणसं, त्यांचं परस्परांमधलं नातं, आपल्याकडल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे बसणारे फटके, इतिहास का लक्षात ठेवायचा आणि त्यातून काय घेऊन पुढे जायचं, कृतीची आवश्यकता किती महत्त्वाची, असं बरंच काही बोलून मी थांबले.

पण मुलींनी मला आणखी बोलायला भाग पाडलं. कौन्सिलिंग दरम्यान घडणारे किस्से आणि माझी एखादी कविता त्यांना ऐकायची होती. त्यांच्या दोन्हीही गोष्टींना मी अर्थातच होकार दिला. वैभवची कविता गाऊन मी शेवट केला. कार्यक्रम संपला. उपस्थित सर्वांना कार्यक्रम खूप आवडला होता. प्राचार्य आणि रेक्टर यांनी मी पुन्हा यावं आणि अगदी दिवसभर मुलींसाठी कार्यशाळा घ्यावी अशी विनंती केली. आलेल्या ज्येष्ठांनाही कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींचा तर चिवचिवत आम्हा दोघांभोवती गराडा पडला होता. सेल्फी प्रकरण पार पाडावंच लागलं. त्यानंतर गरमागरम उपम्याचा आस्वाद घेवून आम्ही निघालो.

या कार्यक्रमानं एस. पी. कॉलेजशी नातं जोडलं. मुकुंद आपटे हा माणूस केवळ गीतालीचा भाऊ न राहता माझाही मोठा भाऊ झाला. त्यांनी माझा एकेरीत केलेला उल्लेख मला या नात्याची जाणीव देऊन गेला. गीताली, मुकुंदा आणि गिरीजा यांच्याशी तर कित्येक वर्षांपासूनचा स्नेह....तिनं सांगावं आणि मी ते ऐकावं....खरं तर वयानं मोठी असूनही ती आपल्या वयाच्या मोठेपणाचा, अनुभवाचा फायदा घेऊन तिनं कुठली गोष्ट कधी लादली नाही. कायम बरोबरीच्या नात्यानंच मला वागवलं. कालचा कार्यक्रम गीतालीमुळेच घडून आला. त्यामुळे औपचारिकतेनं असं काही म्हणायचं नसलं, तरीही सगळ्यांनाच खूप खूप थँक्यू!

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो