स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) - 18 डिसेंबर 2018

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) - 18 डिसेंबर 2018

तारीख
-
स्थळ
S M Joshi Pune

स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) - 18 डिसेंबर 2018 नाही हाकारा, पण उठले रान घरटे सापडेना वाट बेभान पाखरू, समजेना कोणा का कल्लोळ कल्लोळ....... स्किझोफ्रेनियाचं वर्णन करणारी अभिनेता अतुल कुलकर्णींची ही कविता! मराठीत २००४ साली प्रदर्शित झालेला स्किझोफ्रेनियावरचा ‘देवराई’ हा पहिला चित्रपट! डॉ. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर दिग्दर्शित या स्किझोफ्रेनियावर अप्रतिम भाष्य करणार्‍या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, देविका दफ्तरदार आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येकानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. यशवंत ओक आणि डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या पुढाकारातून या चित्रपटाची निर्मिती झाली.

डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या पत्नीला स्किझोफ्रेनिया झाल्याचं निदान झालं आणि त्यानंतरचा काळ त्यांच्यासाठी खूपच कसोटीचा होता. पत्नीची शारीरिक आणि मानसिक स्तरावर काळजी घेण्याबरोबरच स्वतःलाही खंबीर ठेवणं अशा दोन्हीही गोष्टी करणं अत्यंत कठीण होतं. या दिव्यातून जात असताना त्यांना अनेकविध अनुभव आले. स्किझोफ्रेनियाच्या शुभार्थीला (रुग्णाला) सतत भ्रम होत राहतात, तो विस्कळित किंवा असंबंद्ध बोलायला लागतो, असंबद्ध लिहायला लागतो, असंबंद्ध वागायला लागतो, त्याच्या मनात नकारात्मक विचार बळावतात आणि तो एका आभासी जगाला खरं समजायला लागतो. स्किझोफ्रेनिया या विकाराचं गांभीर्य कळल्यामुळेच डॉ. जगन्नाथ वाणी यांनी पुढे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) या संस्थेची स्थापना केली. त्यांचं 'बिनघडीचा डाव' हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवं. ‘सा’ तर्फे प्रत्येक वर्षी स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त जनजागृतीच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

या वर्षी १८ डिसेंबरला एस. एम. जोशी हॉलमध्ये संपन्न होणार्‍या या कार्यक्रमात डॉ. मोहन आगाशे, अच्युत गोडबोले, डॉ. सुखदा चिमोटे आणि राजेश मेहता असे दिग्गज सहभाग घेणार होते. ‘सा’ परिवारातल्या हरिभाऊ आठवले यांचा मला मी मॉडरेटर आणि पार्टिसिपंट म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्यांना मी अतिशय आनंदात होकार दिला. याचं कारण अच्युत गोडबोलेंबरोबर 'मनात' हे मानसशास्त्रावरचं जवळजवळ ६०० पानी पुस्तक लिहिताना मनाच्या संदर्भात, मेंदूच्या संदर्भात, वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या थेरपीज वर घडलेलं काम अशा कितीतरी गोष्टी अभ्यासता आल्या होत्या. ८ ते १० मनोविकार अभ्यासताना त्यांचं गांभीर्य लक्षात आलं होतं. 'मनात'मध्ये हे मनोविकार खूपच संक्षिप्तपणे आम्ही घेतले असले, तरी काही दिवसांनी आपण 'मनोविकार' नावानंच आणखी विस्तृत पुस्तक लिहूया असंही आम्ही ठरवलं होतं. तसंच माझ्या वडिलांना मी मानसशास्त्र विषय घेऊन त्यात शिक्षण घ्यावं अशी इच्छा होती. पण त्या वेळी मी त्यांचं ऐकलं नव्हतं. अच्युत गोडबोलेंमुळे मला ती संधी मिळाली. पुढे डॉ. आनंद नाडकर्णींवर सुपरहिरो मालिकेत पुस्तक लिहिताना त्यांच्याचकडे आरईबीटी हा कोर्सही करता आला. या कोर्समुळे स्वतःला वैयक्तिक फायदा तर झालाच, पण माझ्या सहवासात असलेल्या तरुणाईच्या प्रश्नांना हाताळताना कुठपर्यंत जायचं, कधी आणि कुठे थांबायचं, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांची गरज कधी लागू शकते अशा अनेक गोष्टींचा माझ्या मनातला गुंता सुटत गेला.

अच्युत गोडबोले यांच्या 'मनात' आणि 'मनकल्लोळ' या पुस्तकानंतर आम्ही दोघांनी मिळून 'सोशल सायकॉलॉजी' (समाजाचं मानसशास्त्र) या विषयावर लिहायचं ठरवलं आणि लिखाण सुरु असतानाच हरिभाऊ आठवले यांचा मला फोन आला होता. माझ्यासाठी ही खूप चांगली संधी होती. या सगळ्या तज्ज्ञ व्यक्तींबरोबर संवाद साधताना खूप शिकायलाही मिळणार होतं. थोडा ताण मनावर नक्कीच होता, पण त्या ताणाला घाबरून संधीला नकार देणं माझ्या स्वभावात नाही. हरिभाऊंबरोबर मी कार्यक्रमाच्या आधी पुण्यातल्या धायरी भागात असलेल्या ‘सा’ संस्थेला भेट देऊन आले. ही संस्था बघून, या संस्थेचं काम बघून मी थक्क झाले. स्किझोफ्रेनिया या आजारावर काम करताना किती किती गोष्टींचा सखोलतेनं विचार केलाय हे इथं आल्यावर मला जाणवलं. आपले दैनंदिन ताण-तणाव बाजूला सारून दिवसभर प्रसन्नचित्तानं राहणार्‍या इथल्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मनापासून सलाम! इथले अनेकविध उपक्रम बघून इथे येणार्‍या शुभार्थींना (रुग्णांना) व्यस्त ठेवण्याचे, त्यांच्या मनातल्या कोलाहलाला आळा घालण्याचे प्रयत्न इथे दिसत होते. या उपक्रमातून त्यांना आर्थिक कमाई देखील होत होती. हे उपक्रम सुरू असताना त्यांना एकटंही सोडलं जात नव्हतं. त्यांच्याबरोबर त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्यासोबत होत्याच. 'सा' बघितल्यामुळे आणि निष्ठेनं कार्य करणार्‍या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटल्यामुळे कार्यक्रमाविषयीचा माझ्या मनातला ताण पूर्णपणे नष्ट झाला.

१८ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. त्याआधी मी सहभागी व्यक्तींपैकी डॉ. मोहन आगाशे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी माझी पूर्वतयारीची कल्पना सरळ धुडकावूनच लावली. 'त्यांच्या काही सूचना आहेत का' असं मी विचारताच, 'मी कोण सूचना करणार' असं मीश्किलपणे मला ऐकवत, उत्स्फूर्तपणे जे होईल ते होईल असं म्हणून मला आश्वस्त केलं. आयबीएममध्ये अधिकारपदावर असलेले राजेश मेहता यांनी आपल्या अंधत्वावर मात करत आपलं शिक्षण आणि आपलं करियर घडवलं आहे. त्यांच्याशी बोलताना सतत आव्हानं स्वीकारण्याचा त्यांचा प्रसन्नचित्त स्वभाव मला खूपच भावला. डॉ. सुखदा चिमोटे ही आयपीएच, पुणे इथली जबाबदारी सक्षमपणे सांभाळते आहे. अतिशय बुद्धिमान असलेली आणि गोड व्यक्तिमत्वाची ही तरुणी डॉ. आनंद नाडकर्णींची मानसकन्या आहे. सुखदा म्हणजे मूर्तिमंत उत्साह! तिच्याकडे बघताच, तिला भेटताच सगळी दुःखं, सगळे ताण, सगळा थकवा दूर पळतो असं मला वाटतं. मी तिच्या प्रेमातच आहे म्हणा हवं तर. मानसशास्त्राच्या शाखेत सुखदासारख्या हजारो/लाखो तरुणी असायला हव्या आहेत. तिच्याशी बोलून कार्यक्रमाची रुपरेषा बर्‍यापैकी स्पष्ट झाली. अच्युत गोडबोले हा माणूस तर कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक, मित्र आणि पालकाच्या भूमिकेत माझ्यामागे समर्थपणे उभा असतो. त्यांनी मला सतत 'तुला हे जमेल, तू हे करू शकतेस' असा विश्वास कायम दिला आहे. याही वेळी त्यांनी माझी पूर्वतयारी पाहून समाधानानं मान डोलावली.

१८ डिसेंबरला बरोबर पाच वाजता अच्युत गोडबोले, अपूर्व आणि मी एस. एम. जोशी हॉलला पोहोचलो. हॉलमध्ये जाण्यापूर्वी माझं लक्ष एका हिरव्यागार झाडाकडे गेलं. पुण्यातल्या एसपीच्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी पुढाकार घेऊन हे झाड तयार केलं होतं. या झाडाला येणारा प्रत्येक जण एक एक पान लावत होता. या पानावर त्या व्यक्तीला मानसिक आजार असलेल्या व्यक्तीकडे आपण कसं बघतो आणि त्याला संबोधताना कुठले कुठले शब्द वापरतो त्यातला एक शब्द लिहायला होता. या झाडाला शेकडो पानं लागली होती आणि प्रत्येक पानावर वेडा, चक्रम, विक्षिप्त, मंदबुद्धी, वेडा, येडा, मॅड, मेंटल असे अनेक शब्द वाचायला मिळत होते. हॉलमध्ये जाताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात ‘सा’ मध्ये येणार्‍या शुभार्थींनी स्वागतगीत गायलं. त्यानंतर 'सा' या संस्थेची ओळख आणि कार्य याविषयी अमृत बक्षी यांनी थोडक्यात माहिती सांगितली. अमृत बक्षी हे तर 'सा' संस्थेच्या इमारतीतच राहून काम बघतात. हरिभाऊ आठवले, अमृत बक्षी यांच्या सहा-साडेसहा फूट उंचीनं आणि कामानं मी भारावून गेले होतेच. त्यानंतर स्मिताताईंनी आम्हा सर्वांची ओळख अतिशय अनौपचारिक पद्धतीनं करून दिली. डॉ. मोहन आगाशे नाटकात काम करतात ऐवजी डॉ. मोहन आगाशे नाटकं करतात असं म्हटल्यामुळे सभागृहात आणि व्यासपीठावर एकच हशा पिकला. डॉ. मोहन आगाशे यांनीही हसून मान डोलावली आणि वातावरण आणखीनच हलकंफुलकं झालं.

आमचं सगळ्यांचं स्वागत डॉ. जगन्नाथ वाणी यांचं 'बिनघडीचा डाव' हे पुस्तक आणि ‘सा’ मधले शुभार्थी करत असलेल्या वस्तू bभेट देऊन करण्यात आलं. माझ्या हाती आयोजकांनी सगळी सूत्रं सुपूर्त करताच मुख्य कार्यक्रम सुरू झाला. स्किझोफ्रेनिया या विषयावर काम करत असताना लोकांच्या मनात घट्टपणे चिकटलेले पूर्वग्रह दूर करणं, माहितीपट, लेख, कार्यशाळा, चर्चासत्रं, साहित्य, पोस्टरप्रदर्शनं, परिसंवाद, अशा अनेक माध्यमांच्या साहाय्यानं जनजागृती करणं, स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय यांनाही सक्षम करणं हा संस्थेचा हेतू असल्यामुळे हे विषय याही कार्यक्रमातून पुन्हा एकदा लोकांसमोर आले. स्किझोफ्रेनिया असो, वा इतर मानसिक विकार असोत, याकडे आपण, समाज कसे बघतो, मानसिक विकारानं ग्रस्त असलेल्या त्या व्यक्तीपेक्षाही आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपलं त्यांच्या त्रासाकडे लक्ष जातं ही दृष्टी कशी बदलली जाईल, आपलं काम करत असताना आलेले प्रत्येकाचे अनुभव, मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची आजची आकडेवारी, त्यावर काम करणार्‍यांची अतिशय नगण्य असलेली संख्या, माध्यमांचा अतिशय सशक्त पण संवेदनशीलतेनं हाताळलं जाणं, या विषयांवर डॉ. मोहन आगाशे, अच्युत गोडबोले, डॉ. सुखदा चिमोटे आणि राजेश मेहता बोलले. प्रत्येकाचे अनुभव, त्यांनी त्या प्रश्नाची केलेली हाताळणी, हे सगळं ऐकताना त्या प्रत्येकाच्या बोलण्यात वैविध्य तर होतंच, पण प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारा विचार होता आणि यामुळेच दोन तास कसे संपले कळलंच नाही.

कार्यक्रमानंतर उपस्थित सुजाण श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरं दिली. त्याच वेळी हॉलबाहेर जाताना येताना बघितलेलं झाड आणि जाताना कार्यक्रमानंतर बदललेलं झाड प्रत्येकानं बघून जावं अशी मी सूचना केली. संवादानंतर जेव्हा दृष्टिकोनात बदल होतो, तेव्हा झाडावरच्या पानांपानांवरचे नकारात्मक शब्द मिटले गेले होते. नवा विचार, नवे शब्द घेऊन एक नवं झाडं सगळ्यांसमोर उभं होतं. या उत्साही तरुणाईबरोबर, त्यांच्या कामाची आठवण म्हणून एक फोटो तो बनताही था. आठ वाजून ५ मिनिटांनी कार्यक्रम संपला, मात्र सभागृहातली एकही व्यक्ती आपल्या जागेवरून हलली नव्हती. मला न कळवता कार्यक्रमाला आलेले धनू आणि शरद हे माझे मित्र माझ्यासमोर येऊन उभे राहिले. माझ्याविषयीचं कौतुक त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. तिथं शब्दांची गरज नव्हतीच. पुस्तकवेडे अप्पा तर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला असो, वा डोळ्यांचं मोतिबिंदूचं ऑपरेशन झालेलं असो, ते या गोष्टींचा बाऊ न करता आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येतात. सीमा आणि तिचे पती दोघंही आठवणीनं आले होते. आमच्या पुस्तकांचे चाहते असलेले सायबर क्राईमचे अधिकारी देखील कार्यक्रमाला आले होते. या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. कार्यक्रमानंतर सगळ्याच मान्यवरांभोवती गराडा पडला. मात्र या गर्दीला सारून अच्युत गोडबोले माझ्याजवळ आले आणि 'काय सुंदर रीतीनं कार्यक्रमाची हाताळणी केलीस. किती प्रसन्नपणे तू हा कार्यक्रम केलास' असं म्हणत मला शाबासकी दिली. इतकंच नाही तर मला भेटायला आलेल्या लोकांजवळही त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. त्यांचं कौतुक मला नेहमीच आणखीन आव्हानं पेलण्याची, नवं काही करण्याची ताकद देतं!

धन्यवाद, डॉ. मोहन आगाशे, अच्युत गोडबोले, राजेश मेहता, सुखदा आणि 'सा' चे अमृत बक्षी, हरिभाऊ आठवले, यशवंत ओक, अनिल वर्तक, स्मिताताई आणि सर्व सहकारी! ‘सा’ शी आता एक जवळकीचं नातं अतिशय दृढपणे जोडलं गेलंय, त्यामुळे लवकरच येण्याचं मी कबूल केलं आहेच. तोपर्यंत तात्पुरता निरोप! आपणही ‘सा’ च्या परिवारात, त्यांच्या कार्यात कार्यकर्ता म्हणून, देणगीदार म्हणून सहभागी होऊ शकता. जरूर संपर्क साधा!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो