पुणे वेध कट्टा - टॉक शो - साहित्य प्रवास - दीपा देशमुख, डॉ. ज्योति शिरोडकर

पुणे वेध कट्टा - टॉक शो - साहित्य प्रवास - दीपा देशमुख, डॉ. ज्योति शिरोडकर

तारीख
-
स्थळ
पुणे

ज्योति कलश छलके, हुये गुलाबी लाल सुनहरे
रंग दल बादल के, ज्योति कलश छलके

पं.. नरेंद्र शर्मा यांची अतिशय सुंदर गीतरचना, आणि त्याला संगीताचा साज चढवणारे बाबुजी म्हणजेच सुधीर फडके...यांनी हे अजरामर गीत रसिक श्रोत्यांसमोर आणलं. भूप किंवा भूपाली रागातलं हे गाणं ऐकताना पहाटेचं आल्हाददायक वातावरण तर डोळ्यासमोर येतंच, पण ह्दय आनंदानं उचंबळून येतं, डोळ्यातूनही तोच आनंद अश्रूंच्या रुपात बाहेर पडतो...आनंदाश्रू असेच असावेत...त्या ज्योतिकलशाची, त्या गाण्याची आणि त्या वातावरणाची आठवण देणारी ज्योति, डॉ. ज्योति शिरोडकर! तिच्याविषयी बोलण्याआधी मी बोलेन पुणे वेधकट्टयावरच्या झालेल्या कार्यक्रमाविषयी.

पुणे वेध कट्ट्यावर संपन्न झालेला माझ्या म्हणजेच दीपा देशमुख यांच्या साहित्यावरचा टॉक शो. माझ्याच परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला होता, आपल्या परिवाराला आपल्याविषयी वाटणारं कौतुक याच भावनेनं मी या कार्यक्रमाकडे बघत होते. मी कशी अणि काय बोलले यापेक्षा या कार्यक्रमात मला भावलेल्या गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे म्हणून हा शब्दप्रपंच.

वेधचे दरवर्षी होणारे कार्यक्रम असोत, वा वेध कट्टा, यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी किती परिश्रम घेतात हे त्या कार्यक्रमाच्या दिवशी लक्षात येतं. त्यांची टीमही तशीच त्यांच्यासारखी प्रसन्न, हसतमुख आणि अपार परिश्रम करणारी. तर त्यातले पुण्याचे शिलेदार म्हणजे पडद्याआड राहून सगळं काही चोख होतंय ना हे बघणारे दीपक पळशीकर, प्रदीप कुलकर्णी. सगळं काम करूनही श्रेयाची अपेक्षा न करणारी ही सगळी ऋजू, मृदू, सौम्य व्‍यक्‍तिमत्वाची माणसं, मला तर यांना संतांची उपमा द्यावीशी वाटते. 

कालच्या कार्यक्रमात संवादकाच्या भूमिकेत होती ज्योति... वेधनं अनेक चांगली माणसं मला दिली, त्यातलीच एक ज्योति. लेखिका, पेशानं डॉक्टर, पुणे वेधची खंदी कार्यकर्ती!  याही कार्यक्रमाची तयारी करताना तिने आपल्या व्‍यस्त दिनक्रमातून वेळ काढला. एखादा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी किती कष्ट घ्यायला हवेत हे शिकायचं असेल, बघायचं असेल तर ज्योतिकडे बघावं. टॉक शो करायचा ठरल्यानंतर या कार्यक्रमात मनोविकासचे अरविंद पाटकर, बुकगंगाची सुप्रिया लिमये, वाचक म्हणून सुधीर महाबळ, राजेंद्र डांगे सर, नयन कुलकर्णी, अवनीश देशपांडे, वेबसाईट डिझायनर श्वेता मंडलिक/देशपांडे आणि मी सामील होतो. 

ऑनलाईन सहभागी झालेल्या ८ लोकांशी प्राथमिक तयारीसाठी बोलणं, त्यांच्याकडून हव्‍या त्या गोष्टी संवादातून काढून घेणं, त्यावरून त्या त्या व्‍यक्‍तीसाठी योग्य प्रश्नावली तयार करणं, त्यानंतर माझ्याघरी येऊन चक्क दोन तास मांडी ठोकून माझं प्रत्येक पुस्तक बघणं, बघणं म्हणजे हातात घेवून केवळ न्याहाळणं नाही तर प्रास्ताविकापासून महत्वाचं सगळं काही आपल्या भल्या मोठ्या डायरीत टिपून घेणं....त्यानंतर टॉक शोचा क्रम किंवा ओघ ठरवणं, कार्यक्रम रंजक तर झालाच पाहिजे पण त्याची खोली, उंची कुठेही कमी होता कामा नये याची काळजी घेणं, हे सगळं करताना कुठलाही ताण स्वत:च्या चेहऱ्यावर, मनावर न घेणं आणि अत्यंत प्रसन्नपणे या कार्यक्रमात बोलत कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणं, कार्यक्रमाचा अतिशय सुंदर आढावा घेणं, प्रत्येकाला योग्य ती स्पेस देणं असं करणारी ज्योति माझ्या नजरेतून या कार्यक्रमाची सुपरहिरो आहे. 

वेध कट्ट्यावरचे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सायंकाळी संपन्न होणारे कार्यक्रम कोरोनाच्या सावटामुळे थांबले होते. कालपासून ते पुन्हा ऑनलाईन सुरू झाले. गेली ३० वर्षं वेध ही डॉ. आनंद नाडकर्णी यांनी महाराष्ट्रात रुजवलेली एक चळवळ, या चळवळीचा प्रवास माहिती ते प्रबोधन, जीवनमूल्य आणि जीवनकी पाठशाला अशा तऱ्हेनं प्रवास करत राहिली. कोरोनाच्या काळातही डॉ. नाडकर्णींनी सहा देशातले वेगवेगळे सहा व्‍यक्तिमत्वं श्रोत्यांसमोर आणले, त्यांचा प्रवास उलगडून दाखवला. याच काळात कल्याण वेधचे संचालक देवेंद्र ताम्हाणे यांनी पुढाकार घेऊन वेध कट्टा सुरू ठेवला. मात्र पुढे कोरोनाचं सावट जास्त गडद झालं आणि हा कट्टा थोड्या काळासाठी थांबवण्यात आला. कालपासून दुसऱ्या सत्रातलं पहिलं पुष्प वेध कट्ट्यावर गुंफण्यात आलं. त्याविषयी अगदी दीड मिनिटांत दीपक पळशीकर यांनी प्रास्ताविक केलं आणि कार्यक्रमाची सूत्रं ज्योतिवर सोपवली.

गुलाबी रंगाच्या पेहरावातली ज्योति प्रसन्न चेहऱ्यानं सगळ्यांचं स्वागत करत होती. सुरुवातीला तिनं माझ्यासहित सगळ्या सहभागींचा अगदी थोडक्यात परिचय करून दिला. ती मला प्रश्न विचारत होती, मी उत्तरं देत होते.

आणि मग अरविंद पाटकरांना ज्योतिने मराठीचा वाचकवर्ग कमी होतोय अशी ओरड ऐकायला येते, त्यावरचं मत विचारलं. त्या वेळी, ‘तुम्ही पुस्तक विकत घेवून वाचत असाल तर तुम्हाला हा प्रश्न पडणारच नाही’ असं त्यांनी सांगितलं. ‘चांगला वाचक हा चांगली पुस्तकं मिळवून वाचल्याशिवाय राहतच नाही. पुस्तकांची विक्री होते, म्हणूनच आम्ही प्रकाशक नव्‍यानं पुस्तकं काढत असतो. पुस्तकांची विक्री झालीच नाही, तर प्रकाशन व्‍यवसाय बंद पडले असते कारण तोट्याचा व्‍यवहार करेल कोण? दोन नम्बरच्या पैशांनी आम्ही हा व्‍यवसाय करत नसून वाचकांनी दिलेल्या पैशातूनच पुन्हा नव्‍या पुस्तकासाठी पैसा उभा राहतो. कोरोनाच्या काळातही वाचकांनी पुस्तकांना उदंड प्रतिसाद दिला. अर्थात, दारूसाठी जशी रांग लागते, तशी पुस्तक घेणारा रांग लावत नाही हेही खरं. पण ज्याप्रमाणे एखाद्याला दारूचं व्‍यसन असतं आणि तो ते काहीही करून मिळवतोच, त्याप्रमाणे चांगला वाचक हवी ती पुस्तकं काहीही करून मिळवून वाचतोच. तरुण पिढी वाचत नाही असं म्हणतात, ते खरं वाटत नाही. त्यांना हवं ते नक्की ते वाचतात. प्रकाशकांनीही तरुणाईचा कल ओळखून चांगली पुस्तकं काढावीत. वाट्टेल ती पुस्तकं काढू नयेत. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना या सगळ्यांचा परिणाम पुस्तकविक्रीवर झाला हे खरं असलं तरी लोक पुस्तकं वाचतात. मी प्रकाशक नंतर, आधी कार्यकर्ता आहे. डाव्‍या विचारसरणीची बैठक आहे. आमच्याकडचा लेखक पुरोगामी विचारसरणी असलेला, विवेकवादी, असा आहे. अच्युत गोडबोले, दीपा देशमुख, उत्तम कांबळे, नंदा खरे अशा आमच्या लेखकांची पाश्वर्भूमी बघितली तर हे सगळे लोक चळवळीशी निगडित असलेले लोक आहेत. त्यामुळे माणसातलं लेखन या सगळ्या लोकांनी केलं आहे. यांनी निसर्गातलं लेखन केलं असलं, तरी त्यातही माणूस जोडलेला आहे. दीपा देशमुख यांचा विचार केला, तर त्यांनी आदिवासी भागातल्या ७८ पाड्यांवर जे काम केलंय ते बघता त्यांचा अनुभव केवढा मोठा आहे हे लक्षात येतं. हा अनुभव लक्षात घेतला तर दीपा देशमुख ही व्‍यक्ती सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच लिखाण करणार. हवेतल्या, गुडीगुडी बोलणाऱ्या माणसांना समोर ठेवून त्या लिहिणारच नाहीत. म्हणून त्यांचं कॅनव्‍हास, सिंफनी, जीनियस ही पुस्तकं बघितली, तर त्यातली माणसं खूप मोठी आहेत. ही माणसं चळवळीशी, सामान्य माणसाशी जोडलेली आहेत असं दिसतं. त्यांनी कुठल्या राजवटीविरोधात आवाज उठवला, शिक्षा भोगली हे सगळं दीपा देशमुख यांची पुस्तकं वाचताना दिसतं. अशा माणसांवर लिहिणं हे त्या माणसांशी नाळ जोडलेला लेखकच लिहू शकतो. दीपा देशमुख यांनी स्वत:चा असा वाचकवर्ग तयार केला आहे. तो वाचकवर्ग त्यांच्या केवळ समाजकार्यातून तयार झाला असं नसून तो त्यांच्या स्नेहातून, त्यांनी निर्माण केलेल्या घट्ट मैत्रीतून निर्माण झालाय. त्यांनी एखाद्याशी मैत्री केली की ते नातं अत्यंत दृढ होतं, त्या व्‍यक्‍ती त्यांच्या कुटुंबाचा भाग बनतात. त्यांची वाचलेली पुस्तकं तुमच्या मनाला भिडतात आणि मग तुम्ही इतरांना ती पुस्तकं वाचण्यासाठी उद्युक्‍त करता. असा त्यांचा वाचकवर्ग टप्प्याटप्प्यानं वाढत जाणारा आहे. त्या अनेक ठिकाणी व्‍याख्यानांना जातात, तेव्‍हा माझं पुस्तक ही फक्‍त प्रकाशकाची जबाबदारी आहे असं न समजता माझं पुस्तक हे वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही आच त्यांच्यात असल्यामुळे त्या कुठल्याही कार्यक्रमात गेल्या असल्या तरी पुस्तकांवरच त्यांचा फोकस असतो. पुस्तकांवर त्या बोलतात आणि आम्हालाही मग पुस्तक विकत घेणारे ग्राहक मिळतात आणि अशा रीतीनं हे वर्तुळ अधिक विस्तारित होतं.’ असं पाटकर म्हणाले. 

बुकगंगा पब्लिकेशनच्या सुप्रिया लिमये यांनी दीपा देशमुख यांची पाथफाइंडर्स आणि नारायण धारप अशी तीन पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आहेत.रोजच्या दैनंदिन जीवनातून बाहेर नेऊ पाहणारी प्रेरणादायी आत्मचरित्र, सामाजिक, वैचारिक, वैज्ञानिक, इर्न्फमेटिव्‍ह, तत्वज्ञान सांगणारी रहस्यकथा आणि थरार निर्माण करणारी अशी पुस्तकं वाचकांना आवडतात असं त्यांनी सांगितलं.  पुस्तकाची मागणी भारतातल्या छोट्याशा खेडेगावापासून ते परदेशापर्यंतची असते. आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्यापैकी काहीजण चालत असतात, काहीजण पळत असतात. तशीच काही पुस्तकं धावत असतात, काही पुस्तकं रमतगमत बागेत फिरत असतात. यावरून प्रकाशक त्याची आर्थिक गणितं जमवत असतो. 

वाचक म्हणून टॉक शोमध्ये सहभागी झालेले सोलापूरचे शिक्षक राजेंद्र डांगे यांनी आपल्याला दीपा देशमुख यांच्या विशेषत: जीनियस मालिकेतल्या विश्वविज्ञान, सूक्ष्मजीव विज्ञान आणि अणुविज्ञान या पुस्तकांनी सोन्याच्या कोठाराची एक किल्ली सापडली असल्याचं सांगितलं. सुरुवातीला सूक्ष्मजीव विज्ञानाच्या वाचनानं शाळेतला परिपाठाचा तास सुरू झाला. एके दिवशी एक विद्यार्थिनी त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, सर शास्त्रज्ञ तुमच्याआमच्यासारखेच असतात तर...इतके दिवस दूर कुठल्यातरी परग्रहावर असल्यासारखे भासणारे शास्त्रज्ञ तिला आपल्यासारखेच वाटले होते. त्यांच्यातही आपल्यासारखेच गुणदोष असतात, तेही आयुष्यात अयशस्वी होऊ शकतात, हे तिला समजलं. जीनियस मालिकेतली एडवर्ड जेन्नर, रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, ॲलेक्झांडर फ्लेमिंग ही पुस्तकं परिपाठाच्या तासाला वाचली जाऊ लागली आणि एके दिवशी भाग्यश्री जाधव नावाची आठव्‍या/नवव्‍या इयत्तेत शिकणारी ही मुलगी राजेंद्र डांगे सर यांच्याजवळ जाऊन सूक्ष्मजीव विज्ञानात आपल्याला पुढे करियर करायचं असल्याचं म्हणाली. शास्त्रज्ञांविषयीच्या वाचनानं तिच्या मनात तिचं करियर निश्चित झालं होतं हे बघून राजेंद्र डांगे यांचा स्वत:वर विश्वास बसत नव्‍हता. त्यानंतर तिचा ठाम निर्धार बघून राजेंद्र डांगे यांनी अनेक तज्ज्ञ व्‍यक्तींशी बोलून तिच्या करियरबाबत तिला मदत केली आणि आज ही मुलगी अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये संशोधन करत एका गटाची प्रमुख म्हणून काम करते आहे. संपूर्ण जगाला कलाटणी देणारा ठरेल अशा विषयावर संशोधन तिचं सुरू आहे. ज्याप्रमाणे मांसाहार करणाऱ्या पेशी माणसाला आनंद देतात, त्याचप्रमाणे शाकाहार करणाऱ्या व्‍यक्‍तीला वनस्पतीतल्या पेशीतून तसा आनंद मिळू शकेल का हा तिच्या संशोधनाचा विषय असून आता तिचं संशोधन अंतिम टप्प्यात आलं आहे. 

दुसरं उदाहरण सांगताना राजेंद्र डांगे सर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमधलं रांजणी नावाचं एक छोटसं गाव - त्या गावातला सचिन यादव नावाचा एक मुलगा मामाकडे म्हणून सोलापूरला राजेंद्र डांगे शिक्षक म्हणून काम करत असलेल्या शाळेत शिकण्यासाठी दाखल झाला. त्यालाही जीनियस मालिकेतल्या सूक्ष्मजीव विज्ञानाच्या पुस्तकांनी प्रभावित केलं. त्यालाही त्याच्या गावात द्राक्षाच्या बागांवर पडणाऱ्या रोगांवर काहीतरी उपाय करायला हवा या विचारानं अस्वस्थ केलं. पुढे त्यानं ऑर्गनिक केमेस्टी या विषयात एमएस्सी केलं. ॲलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाच्या आयुष्यानं आणि कामानं त्याला झपाटून टाकलं. त्यानं या द्राक्षावर पडणाऱ्या रोगाचा नायनाट करण्यासाठी त्यावर एक किटकनाशक तयार केलं आणि त्याचं कॅनडामध्ये पेटंट नोंदवलं. आज सचिनला या पेटंटपोटी वर्षाकाठी अडीच कोटी रुपये मिळतात. शेतकऱ्यांना दु:खाच्या खाईतून बाहेर काढणारा असा हा विद्यार्थी राजेंद्र डांगे यांनी परिपाठासारख्या उपक्रमातून तयार झाला आणि याला दीपा देशमुख यांचं जीनियस उपयोगी ठरलं याचा आपल्याला अभिमान वाटतो असं राजेंद्र डांगे म्हणाले.  

या कार्यक्रमात वयानं सगळ्यात लहान असलेला जीनियसचा वाचक अवनीश देशपांडे यानं धमाल उडवली. त्याला एन्व्‍हायरमेंटल एज्युकेशन हा विषय जास्त आवडतो. आपल्याला जीनियसमधले रिचर्ड फाईनमन, मेरी क्युरी आणि स्टीफन हॉकिंग खूप आवडतात, सध्या आपण दीपा मावशीचं कॅनव्‍हास वाचत असून त्यातलं लिओनार्दो दा व्‍हिंची आपल्याला आवडतो असं त्यानं सांगितलं. ॲडव्‍हेंचर उभं करणारा जेरोनिमोची पुस्तकं त्याला आवडतात. व्‍हाय नावाचं पुस्तक आवडतं. हा पठ्ठ्या गुरूकुल शाळेत शिकणारा असून त्यांचं माध्यम इंग्रजी असलं तरी घरी त्याला जाणीवपूर्वक त्यांच्या आई-वडिलांनी त्याला मराठी वाचनाची गोडी लावली आहे. आपल्याला आवडत असलेले इंग्रजी लेखक आणि त्यांची पुस्तकं देखील त्यानं सांगितली. इतकंच नाही तर स्टीफन हॉकिंगचं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आपलं आवडतं पुस्तक असून ते वाचायचं असल्याचं सांगितलं. आपण ब्लॅक होलवर सध्या रिसर्च करतोय असं त्यानं निरागस चेहऱ्यानं सांगितलं तेव्‍हा सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या. अवनीशने मात्र अतिशय गंभीरपणे आणि उत्साहाने स्टीफन हॉकिंगची ब्लॅक होलची थिअरी, ताऱ्यांचं नष्ट होणं हे सगळं सांगायलाच सुरूवात केली. आपल्याला मोठा झाल्यावर ॲस्ट्रोनॉट बनायचं असल्याचं त्यानं सांगितलं तेव्‍हा ऐकणाऱ्या प्रत्येकालाच त्यांचं खूप कौतुक वाटलं. 

शिक्षणानं इंजिनिअर असलेल्या आणि अनेक वर्षं परदेशात आयटीमध्ये काम करणाऱ्या सुधीर महाबळ या वाचकमित्राने चांगला वाचक असण्यासाठी स्वत:शी प्रामाणिक असावं लागतं हे सांगितलं. वाचकानं पूर्वग्रहदूषित असायला नको. कुठलीही गोष्ट स्वीकारण्याची तयारी असली की तो वाचक खूप काही वाचू शकतो. या वाचनप्रवासात तो समृध्द होत जातो. कॅनव्‍हास पुस्तकाविषयी बोलताना सुधीर महाबळ यांनी दीपाने या पुस्तकाच्या वेळी जे कष्ट घेतले ते बघितले असल्याचं सांगितलं. जेवढे कष्ट घेतले तेवढा जास्त तिला आनंद होतोय की काय असं मला वाटायचं. जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या ग्रंथालयातून मिळवलेला माहितीचा ऐवज आणि मग तो एखाद्या लहान मुलीसारखं उत्साहानं मला भेट झाल्यावर सांगणं हे मला आठवतंय असं ते म्हणाले.  दीपा माहितीचा प्रचंड साठा गोळा करते अणि मग तो चिवळत बसते. त्यातूनच मग पुस्तक आकाराला येतं असं त्यांनी सांगितलं. चित्र/शिल्प/संगीत/चित्रपट अशा सगळ्या कलांबद्दल लोकांना आपल्याला त्यातलं सगळं कळलंय असं वाटत असतं. आपली तशी समजूत असते. त्यातही चित्र/शिल्पकलेबद्दलची आपल्याकडे माहिती खूप कमी आहे अशा वेळी दीपा जेव्‍हा अशा विषयावर लिहिते म्हणाली तेव्‍हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण मला स्वत:ला चित्रकलेतल्या उष्ण रंग, शीत रंग यापलीकडे फारसं काही माहीत नव्‍हतं. जेव्‍हा मी कॅनव्‍हास तयार झाल्यावर वाचायला लागलो, तेव्‍हा त्यातल्या चित्रकाराची प्रतिमा हळूहळू धूसर होऊन त्यातला माणूस ठळकपणे स्पष्टपणे दिसायला लागला. तो माणूस समोर आल्यावर तो व्‍हिएन्नामधला आहे की चेकोस्लोव्‍हियामधला आहे, पार्ल्यातला आहे की पुण्यातला आहे हा मुद्दा राहिलाच नाही. त्याचं एकदेशीय असणं महत्वाचं उरत नाही. त्याच्यातलं माणूसपण समोर आल्यानं तो भांडून का उठतो आहे, तो पेटून का उठला आहे आणि का चिडलेला आहे या सगळ्या त्याच्या व्‍यक्‍तिरेखेत एक प्रचंड नाट्य आहे. पण हे नाट्य लिहायला घेतलं की ते कधी कधी नाटकी होवून जातं. लिहिताना लेखकाला याचा खूप मोठा तोल सांभाळावा लागतो. दीपा हा तोल सांभाळत अत्यंत सहजसोप्या भाषेत त्या व्‍यक्‍तीला उभं करते ही तिची विशेषत: आहे. आपण जसं बोलताना तुमच्या जाणिवांच्या परिसिमा वगैरे असे शब्द बोलताना वापरत नाहीत, त्याचप्रमाणे दीपा कधीही लिखाणात असे अलंकारिक शब्द न वापरता सहज पण ओघवत्या आणि रंजक भाषेत ती व्‍यक्‍ती तिचं काम उभं करते. ज्या विषयातलं मला कळत नाही, अशा चित्रकलेसारख्या विषयातल्या कॅनव्‍हासनं मला खूप आनंद दिला हे  सुधीर महाबळ यांनी आवर्जून सांगितलं. दीपाच्या लिखाणाचा पट खूप व्‍यापक, मोठा असल्यानं तिचे पुस्तकातल्या व्‍यक्‍तिरेखा जुन्या काळातल्या आहेत, तेव्‍हा त्यांचा रिलेव्‍हन्स आजच्या काळात कितपत आहे असा प्रश्न सुधीर महाबळ यांना विचारल्यावर त्यांचं उत्तर होकारार्थी होतं. अवनीशसारखा मुलगा आज ॲस्ट्रोनॉट व्‍हायचं म्हणत असेल आणि त्याला पुस्तकांची साथ मिळाली तर त्याच्या समोर एखादा चित्रकार असो वा शास्त्रज्ञ त्याला त्याच्यापासून ॲस्ट्रोनॉट होण्याची प्रेरणा मिळतेच म्हणून दीपाच्या पुस्तकांचा रिलेव्‍हन्स आजही आहे. 

या टॉक शोमधली चवथी वाचक नयन कुलकर्णी हिने दीपाचं पुस्तकाशिवाय लिहिलेलं लिखाण आवडण्याचं कारण ते लिखाण नयनला खूप प्रामाणिक वाटतं. जो लेखक आपलं लिखाण प्रामाणिकपणे करतो ते वाचकाला आवडतं असं नयननं आपलं मत व्‍यक्‍त केलं. दीपाची सगळी पुस्तकं लिहिताना ती त्यावर अपार कष्ट घेते, ती त्यांचं नियोजन करते आणि ठरवून ही पुस्तकं तयार होतात. फेसबुक, व्‍हॉटसअप लिखाण केलेले तिचे विषय बहुरंगी, बहुढंगी असतात त्यात नाटक, सिनेमा तेही मराठी, हिंदी, इंग्रजी अगदी मल्याळम भाषेतूनही तिनं त्यावर लिहिलेलं असतं. मग तो महेशिंते प्रथिकारमसारखा चित्रपट असो की न्यूटनसारखा चित्रपट. ती जेव्‍हा एखाद्या जुन्या/नव्‍या गाण्यावर लिहिते तेव्‍हा ते गाणंही तिला आनंद देऊन गेलेलं असतं. बलात्काराचा वेध घेणारं नग्नसत्य सारखं एखादं पुस्तक असेल किंवा रवींद्रनाथ टागोरांच्या कथांचा वेध घेणारं एखादं पुस्तक असेल, इतकंच काय पण शशीकपूरसारख्या नटावर देखील दीपा भरभरून लिहिते/बोलते. मुख्य म्हणजे हे तिचं सगळं लिखाण उत्स्फूर्त असतं. या सगळ्यातून दीपा एक व्‍यक्‍ती म्हणून आणि एक लेखिका म्हणून कशी उलगडत जाते असा प्रश्न ज्योतीने विचारल्यावर नयनचं उत्तर होतं, इतर पुस्तकं लिहिताना तिचे कष्ट आणि अभ्यास असतो, पण या इतर लिखाणात तिची उत्स्फूर्तता रंजकता असते. हे तिचं लिखाण पुस्तकासारखं कायमचं टिकाऊ या प्रकारातलं नसतं. ते त्या वेळेपुरतं, त्या क्षणापुरतं असतं. म्हणजे ते सकाळी उमललं आणि संध्याकाळी मावळलं असा तिच्या या प्रकारच्या लिखाणाचा जीव असतो. पण ती अशा प्रकारच्या लिखाणातही इतका जीव ओतते, ते लिखाण फुलवते, त्याला छान वास आणते, तो दरवळतो, त्याला सुगंध येतो, त्यामुळे मला तिचं तेही लेखन अतिशय आवडतं. ते विषय तात्कालिक असले तरी त्यात विविधता असते. गणेशसारख्या तिच्या मित्राचं अकाली जाणं असो, त्या लिखाणातून तिच्या मनाचा कोमलपणा दिसून येतो. त्यातून ती स्वभावानं किती चांगली, निर्मळ आहे, किती संवेदनशील आहे ही तिची ओळख त्या लिखाणातून आपल्याला होते, असं नयन कुलकर्णी यांनी सांगितलं. 

दीपाची वेबसाईट बनवणारी सॉफ्टवेअर इंजिनिअर श्वेता मंडलिक/देशपांडे हिने आपण ही वेबसाईट का बनवली याविषयी सांगितलं. श्वेताला काम करणाऱ्या प्रत्येकाची वेबसाईट असावी असं वाटतं. कोरोनाच्या काळात एक मोठी डिजिटल क्रांतीच झाली असं ती म्हणाली. मोबाईलपासून लॅपटॉपपर्यंतच्या डिव्‍हाइसचा लोक जास्त वापर करू लागले. दीपाताईचं लेखक इतकं विस्तृत आहे की ते एका ठिकाणी संग्रहित व्‍हावं, त्या लिखाणाचा पुढल्या पिढीला उपयोग व्‍हावा, त्यातून त्यांना मार्गदर्शन मिळावं या हेतूनं आपलं दीपाताईची वेबसाईट केली असं तिनं सांगितलं. ही वेबसाईट बनवताना दीपाताईच्या लिखाणातून तिचा साधेपणा जाणवतो, तसाच साधेपणा वेबसाईट मधून दिसला पाहिजे याकडे श्वेताने विशेष लक्ष दिलं. कुठल्याही डिव्‍हाईसवरून ही वेबसाईट सहजपणे ॲक्सेसेबल असण्याकडे तिनं लक्ष दिलं. गडद रंग, ठळक चित्रं वापरली तर लिखाणापेक्षा त्याकडे वाचकाचं लक्ष जाईल त्यामुळे रंग कुठले असावेत, फोटोग्राफ कसे असावेत याची काळजी वेबसाईट करताना श्वेताने घेतली. या वेबसाईटमुळे दीपाचं सगळंच लिखाण तिच्या वाचकांना एका ठिकाणी वाचता येईल. दीपा देशमुखची व्‍याख्यानं, मुलाखती, तिचे लेख, पुस्तकांविषयी, तिच्या कथा, तिच्या कविता, ब्लॉगवरचं लिखाण, सगळं काही या वेबसाईटवर वाचायला मिळेल. श्वेताने हे सांगत असतानाच आपला मुलगा अवनीश हा तिचा कसा ब्रँड ॲम्बेसॅडर आहे याविषयी सांगितलं. अवनीश स्वत:च आपल्या दीपामावशीच्या वेबसाईटची लिंक आता आपल्या शाळेतल्या मित्रांना त्यांच्या व्‍हॉट्सअपवर पाठवतो, त्यांना त्या त्या गोष्टी बघायला/वाचायला सांगतो. 

लेखकाचं यश नक्‍की कशात असतं असा प्रश्न ज्योतीने अरविंद पाटकर, सुधीर महाबळ आणि नयन कुलकर्णी यांना विचारला. त्या वेळी अरविंद पाटकर यांनी लेखकाचं यश ते पुस्तक प्रकाशकाच्या नजरेतून किती खपतं यावर असतं. कधी कधी एखादं पुस्तक खपत नाही, पण ते प्रकाशकाला आणि लेखकाला भावलेलं असतं. त्या भावण्यातच प्रकाशकाचं आणि लेखकाचं त्या पुस्तकातलं यश दडलेलं असतं असं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. वाचक कुठल्याही वर्गातला असो, पण तो त्या पुस्तकातल्या व्‍यक्‍तिमत्वांशी/पात्रांशी एकरूप होऊ शकत असेल, त्या पात्रातल्या काही भागाशी त्याला रिलेट होता येत असेल, तर त्यात त्या पुस्तकाचं यश आहे असं आपल्याला वाटतं असं सुधीर महाबळ यानं सांगितलं. व्‍यावहारिक अर्थानं त्या पुस्तकाच्या किती आवृत्या विकल्या गेल्या यावर तर त्या पुस्तकाचं यश मोजलं जातंच, पण दीपासारख्या लेखिकेचं यश म्हणजे जेव्‍हा तिच्या पुस्तकांनी डांगेसरांनी सांगितलेले विद्यार्थी प्रेरित होतात आणि आपल्या आयुष्यात काहीतरी घडवतात तेव्‍हा ते त्या पुस्तकाचं १०० टक्के यश असल्याचं नयन कुलकर्णी ने सांगितलं. एखादं पुस्तक चवथीतल्या अवनीशसारख्या मुलाला भावतं आणि तेच पुस्तक नयन कुलकर्णीसारख्या साठी/सत्तरीकडे जाणाऱ्या व्‍यक्तीलाही भावतं तेव्‍हा तो दीपा देशमुख यांच्यासारखा लेखकही यशस्वी, ते पुस्तकही यशस्वी आणि तो प्रकाशकही यशस्वी असतो असं अरविंद पाटकर म्हणाले.

आजचा कार्यक्रम म्हणजे एक त्रिकोण पूर्ण झालाय, लेखक, वाचक आणि त्यांच्यातला दुवा असणारा प्रकाश असा तो त्रिकोण असं सांगत डॉ. ज्योति शिरोडकर हिने कार्यक्रमाचा आढावा आणि समारोप केला. तिच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘पुस्तक का आवडतं, का भावतं, का विकत घेतलं जातं, आणि का प्रकाशित केलं जातं या सगळ्या मुद्दयांवर आजच्या कार्यक्रमात थोड्या प्रमाणात प्रकाश पडला आहे. चळवळीतून आलेल्या अरविंद पाटकरांनी मराठीचा वाचकवर्ग कमी होतोय या गोष्टीला छेद दिला आहे. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपण जायला पाहिजे हेही ते सांगतात. मनोविकास प्रकाशन हा समाजाचाही मनोविकास करायला कारणीभूत आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. बुकगंगाच्या सुप्रिया लिमये आणि मंदार जोगळेकर यांनी मराठी पुस्तकांना ई-बुक आणि ऑडिओ माध्यमातून सातासमुद्रापलीकडे पोहोचवलं आहे. खरं तर प्रकाशक हा वाचक आणि लेखक यांच्यामधला दुवा आहे आणि त्यांचं हे कार्य व्‍यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक स्तरावर खूप मोठा परिणाम करणारं आहे हे निश्चित. परतवारी पुस्तकाचे लेखक, चौफेर वाचक आणि समीक्षक सुधीर महाबळ यांनी वाचक कसा असावा हे सांगितलं. लेखकाच्या आणि वाचकाच्या जाणिवा आणि ज्ञानकक्षा या समांतर जातात तेव्‍हाच उत्तम साहित्याची कदर होते, असं मला वाटतं. अन्यथा चांगलं पुस्तक सुध्दा मागे पडतं. त्यामुळे या त्रिकोणातलं वाचकाचं स्थान खूप महत्वाचंय आणि त्यामुळेच सुधीरसरांनी जे सांगितलं की उत्तम वाचक कसा असायला पाहिजे ते मुद्दे मला खूप महत्वाचे वाटतात. राजेंद्र डांगे यांनी जे अनुभव सांगितले, त्यातल्या अमूल्य कार्याचा उत्कृष्ट परिणाम त्यांनी अधोरेखित केला. काम करणारा, कर्तृत्व करणारा गाजवून गेला, दीपाताई पुस्तक लिहून गेली, पण तिच्या या कर्माची अनेक कर्मफळं या रूपांत आपल्याला आज दिसताहेत. छोटा अवनीश ही उद्याची आशा आहे. जेव्‍हा जीनियस वाचून तो पूलकित होतो, किंवा रिचर्ड फाईनमन त्याला भारावून सोडतो, किंवा स्टीफन हॉकिंगची ब्लॅक होल थिअरी त्याच्या मेंदूचा आणि मनाचा ठाव घेते तेव्‍हा आपल्या सर्वांच्याच आशा पल्लवीत होतात. नयनताईने दीपाताईची लेखिका म्हणून व्‍यक्‍ती म्हणून मेख ओळखलीय असं मला वाटतं. कारण वाचक हा साहित्याच्या माध्यमातून लेखकाच्या लेखनापर्यंत किंवा त्याच्या व्यक्‍तिमत्वापर्यंत किंवा त्याच्या मुळाशी पोहोचत असतो. लेखकाच्या अंतरंगाचा अंदाज तो बांधत असतो आणि ही वाचकाची शक्‍ती असते. त्यामुळे लेखकाला आपलं अंतरंग आणि बाह्यरंग तितकेच पारदर्शी ठेवावे लागतात, हे मला अगदी प्रकर्षानं जाणवलं. एका लेखिकेची वेबसाईट उत्स्फूर्तपणे करणारी श्वेता हा या साहित्याचा वाचकावर होणारा परिणाम अधोरेखित करते. कारण तिला ती वेबसाईट करावीशी वाटली. त्याच्याही आधी ती करायला उद्युक्‍त करायला लावणारा अवनीश हाही एक मोठा परिणाम दीपाताईच्या साहित्याचा आहे. आणि आजच्या या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू असलेली दीपाताई - शास्त्रज्ञांपासून तंत्रज्ञांपर्यंत तिने लिहिलं, किंवा अतिसामान्यातलं असामान्यत्व तिने हेरलं. मराठी वाचकाला जगभरातले चित्रकार, शिल्पकार, पाश्चात्य संगीत आणि संगीतकारांची ओळख तिने आपल्या लिखाणातून करून दिली. हा प्रचंड मोठा कॅनव्‍हास तिने आपल्यासमोर उलगडून ठेवलेला आहे. त्यातूनच विवाल्डी, बाख, बीथोवन, मोत्झार्ट यांची एक सुंदर सिंफनी तयार झालीये. सगळ्यात महत्वाचं मला आज एका पुस्तकावर बोलायचं राहिलं, पण मला  उल्लेख करावासा वाटतो, स्त्रीच्या जीवनातली तिच्या प्रत्येक टप्प्यातली जी भावनिक आंदोलनं असतात त्याचा वेध १२ कथांमधून घेणारा गुजगोष्टी हा दीपाताईचा कथासंग्रह किंडलवर उपलब्ध आहे. मराठी मासिक असो, दिवाळी अंकातलं लिखाण असो, व्‍याख्यानं असोत, मुलाखती असोत, चित्रपटांचा/नाटकांचा/पुस्तकांचा आस्वाद असो, तिने केलेली पुस्तकांची मुखपृष्ठ असोत, दीपाताई सातत्यानं व्‍यक्त होत राहिली. स्वतंत्र लेखिका म्हणून तिने एक अढळ स्थान प्राप्त केलं. तिची स्मरणशक्ती तीव्र आहे, आपण त्याला फोटोग्राफिक मेमरी तिला लाभली आहे. ती परफेक्शनिस्ट आहे. दुसऱ्याला ॲप्रिशिएट करण्याचं मोठं मन तिच्याकडे आहे. पण ॲट द सेम टाईम समीक्षणाचा तेवढाच अंकुश तिचा जबरदस्त आहे. तिच्या लेखनाला केवळ कल्पनाशक्‍ती किंवा लेखनशक्‍तीचीच नव्‍हे तर सामाजिक कार्याची जोड मिळालेली आहे. त्या अनुभवांची झालर तिच्या लिखाणाला लाभली आहे. मला एवढंच म्हणावसं वाटतं की दीपाताई, यू आर जीनियस!’ 

ज्योतिनं कार्यक्रमाचा आढावा घेतला होता आणि मी थक्‍क होऊन तिच्याकडे बघत होते...
या कार्यक्रमात मला स्वत:ला काय भावलं तर ज्योती हिचं गोड मधाळ, आटोपशीर, नेमकं, सुरेख असं बोलणं, तिचा अभ्यास, तिची भाषा, तिचे शब्द, तिचे बोलके डोळे आणि आवाजातले चढउतार सगळं काही. असं वाटलं हिचं कौतुक करायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. ज्योती, खरंच सांगते, तुझ्यातलं हे सहज वाटणारं पण त्यामागे भरपूर परिश्रम असलेलं कौशल्य मला एक टक्‍का जरी माझ्यात आलं, मला शिकता आलं तरी मी स्वत:ला धन्य समजेन. तुला ठाऊक नाही, पण माझ्या खिशात असे भारतरत्न वगैरे अनेक मानाचे पुरस्कार आहेत. त्यातलं एक भारतरत्न आज तुला! तू हुशार आहेस, संवेदनशील आहेस, तुला सामाजिक भान आहेच, पण तरीही मला तुला एवढंच म्हणावसं वाटतं, ‘ज्योति, यू आर सो लव्‍हेबल!’

घर आंगन वन उपवन उपवन
करती ज्योति अमृत के सिंचन
मंगल घट ढल के, ज्योति कलश छलके
अम्बर कुमकुम कण बरसाये
फूल पंखुडियों पर मुस्काये
बिंदू तुही जल के, ज्योति कलश छलके

आपली मैत्रीण, दीपा. 

(या कार्यक्रमात सहभागी असलेले अरविंद पाटकर, सुप्रिया लिमये, डांगेसर आणि श्वेता, अवनीश, नयन, माझा मित्र सुधीर महाबळ, दीपक पळशीकर आणि प्रदीप कुलकर्णी यांनी माझ्यातल्या लेखिकेला प्रोत्साहित  केलं आहे आणि त्याबद्दल त्यांची मी कृतज्ञ आहे. आजच्या वेध कट्ट्यासाठी तांत्रिक साहाय्य प्रनोती आणि यशवंत शितोळे यांनी केलं. त्यांचे मनापासून आभार.   मला या सगळ्याविषयी काय वाटतं ते ज्योतीच्या शब्दातून आधीच व्यक्त झालंय.  आजचा दिवस विशेष करून ज्योतिने उजळून टाकल्यामुळे आज तिच्याविषयी विशेषत्वानं जे मनात उमटलं ते उतरलं आहे. वेध कट्ट्याच्या या कार्यक्रमात मी काय बोलले, मला काय प्रश्न विचारले गेले हे जाणून घ्यायचं असेल तर कार्यक्रमाची लिंक तुम्हाला बघावी लागेल. ती तुम्ही जरूर बघा, ऐका आणि मला कळवा. आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत)