सिंफनी- थिंक ग्लोबल फाउंडेशन द्वारा आयोजित मैफल, अहमदनगर
१३ ऑक्टोबर, शनिवार, सायंकाळी ५.३० वाजता नगर इथे 'सिंफनी' या आमच्या पाश्चात्त्य संगीतावर आधारित असलेल्या पुस्तकाच्या निमित्तानं एक दृक-श्राव्य मैफल नगरच्या थिंक ग्लोबल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. अपूर्वला शनिवारची सुट्टी असल्यानं अपूर्व, मी आणि अच्युत गोडबोले सकाळी १० वाजता नगरला जाण्यासाठी निघालो. प्रथम पुस्तकवेड्या अप्पांच्या गॅरेजवर गाडी ठीकठाक आहे ना बघण्यासाठी पोहोचलो. अप्पांची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही, आम्ही येणार म्हणून ते आमच्याही आधी गॅरेजवर येऊन आमची वाट बघत बसले होते. त्यांना बघून ‘का आलात’ असं म्हणत त्यांच्यावर थोडं खोटं खोटं रागावले! घरी भरपूर नाश्ता झालेला असतानाही अप्पांनी ताजा ढोकळा आणि अंबा बर्फी आग्रहानं पुन्हा खाऊ घातली. तोपर्यंत गाडी तयार झाली होतीच.
पुण्यातल्या गर्दीतून निघायला साडेबारा वाजले आणि गाडी नगरच्या रस्त्यावर धावू लागली. गाडीत नेहमीप्रमाणे मी आणि अच्युत गोडबोले - आम्ही पुढल्या प्रकल्पावर चर्चा केली. मध्ये साधारणपणे २ च्या दरम्यान एका रेस्टारंटमध्ये पिठलं, बाजरीची भाकरी, मटकीची उसळ असं साधं रुचकर जेवण केलं आणि नगरच्या माऊली सभागृहात पोहोचलो. स्वागताला गेटजवळ किरण Kiran Kale उभा होताच. भव्य अशा माऊली सभागृहात पाऊल टाकताच नवरात्रीच्या दांडियाच्या उत्साहात आज कार्यक्रमाला लोक येतील का असा प्रश्न मनात आला. इतकं मोठं सभागृह जर फक्त पाच-पन्नास लोक आले तर कसं केविलवाणं दिसेल असेही विचार मनात आले. मात्र नकारात्मक विचार मी लगेचच झटकून टाकले. किरणची टीम व्यासपीठावरच्या तयारीत गुंतली होती. किरणबरोबर अतिशय उत्साही असे तरूण तर दिसलेच, पण कार्यक्रमाच्या नंतर त्याच्या बरोबर काम करणारी काही निवृत्त मंडळीही भेटली.
किरणनं मैफलीच्या सुरुवातीला त्या सगळ्यांचे सत्कार करून त्यांना सन्मानित केलं होतं. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार्या किरणचं खरोखरंच कौतुक वाटलं. थिंक ग्लोबल फाउंडेशनच्या टीममधल्या तरुणांबरोबर गप्पा मारल्या. कोणी नाटकात काम करत होतं, तर कोणी फिल्म बनवत होतं. कोणी मिठाईचा व्यवसाय करताना त्यात आपलं कौशल्य दाखवत होतं, तर कोणी शिक्षक म्हणून कार्यरत होतं! कार्यक्रम थोडा उशिरा सुरु झाला, मात्र पडदा उघडला, तेव्हा सभागृह भरलेलं बघून खूप छान वाटलं. याचं श्रेय अर्थातच किरण काळे आणि त्याचे सहकारी यांना! लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे हे पुण्याहून एक मिटिंग आटोपून थेट सभागृहात कार्यक्रमासाठी आले होते. अतिशय मृदू आणि सौम्य व्यक्तिमत्व असलेल्या निमसे सरांशी गप्पा मारताना आनंद मिळाला. प्रशांत गडाख यांनी पुस्तकप्रसार करून वाचन संस्कृती वाढवण्याचा विडा उचललेला बघायला मिळाला. किरणच्या पाठीशी भरभक्कम साथ देत उभे असलेले गुलाबराव काळेही उपस्थित होते. आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या निवेदिका वीणा दिघे होत्या. त्यांनी खूप नेमकेपणानं आपल्या गोड आवाजात सूत्रसंचालन केलं. सुरुवातीचा औपचारिक कार्यक्रम आटोपताच आमच्या सिंफनीच्या दृक-श्राव्य मैफलीला सुरुवात झाली.
या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणार्या अपूर्व देशमुखने क्यू आर कोड वापरून सिंफनीमधल्या संगीतरचना कशा ऐकायच्या आणि बघायच्या याविषयीची माहिती रसिकांना दिली. सिंफनीची निर्मिती प्रक्रिया, पाश्चात्त्य संगीताचा इतिहास, अभिजात, बरोक, रोमँटिक काळापासून आधुनिक काळापर्यंत संगीतात झालेले बदल, त्या त्या वेळची परिस्थिती, सिंफनीमध्ये असलेले संगीतकार, त्यांच्या आयुष्यातला संघर्ष आणि संगीतातलं त्यांचं झपाटलेपण यावर आम्ही थोडक्यात रसिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर पाश्चात्त्य संगीतातली मूळ संगीतरचना आणि त्या संगीतानं प्रभावित झालेली हिंदी चित्रपटातली प्रसिद्ध गाणी, त्यांचे किस्से अशा पद्धतीनं कार्यक्रम सुरू झाला. प्रत्येक गाण्याला रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळत असल्यानं कार्यक्रम रंगत गेला. कार्यक्रम संपल्यावर आमच्या पुस्तकांचा स्टॉल असलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो.
लोक सिंफनी, जीनियस खरेदी करत होते. आमच्या स्वाक्षर्या आणि सेल्फी याचा आनंद ते आणि आम्ही घेत होतो. मला ज्यांचं लिखाण आवडतं, ते नगरचे साहित्यिक विलास गीते सपत्नीक आले हेाते. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. तसंच अंबिका टाकळकर, तिचे पती बाळासाहेब टाकळकर, निधेय आणि श्रीहरी यांनाही भेटून खूप आनंद झाला. रूद्र आणि त्याचा मित्र आमच्या कार्यक्रमासाठी गावी न जाता खास थांबले होते. त्यांचीही भेट झाली. श्रीगोंद्यावरून अनंत झेंडे आणि त्याचे सहकारी आवर्जून आले होते. तसंच दादासाहेब आगळे आणि त्यांचे मित्र यांनीही भेट घेतली आणि त्यांच्या संस्थेविषयीची माहिती दिली. किरणची पत्नी स्नेहल आपल्या सव्वा महिन्याच्या परीला घेऊन कार्यक्रमाला आवर्जून आली होती. हेमंत मिरीकर या फेसबुक मित्रानं येतो सांगितलं होतं, पण त्यांची भेट होऊ शकली नाही.
परतताना हॉटेल संदीपमध्ये नागलीचा पापड, भरल्या वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी असं जेवण करून आम्ही नगरहून पुण्याच्या रस्त्याला लागलो. मनात सिंफनीच्या आणि नगरकरांच्या प्रतिसादाच्या सुखद आठवणी घेऊन - तृप्त मनानं! थँक्स किरण!
दीपा देशमुख, पुणे.