बहारे फिर भी आयेगी 

बहारे फिर भी आयेगी 

१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी गुरुदत्तनं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि त्याचा अर्धवट राहिलेला ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट शाहीद लतिफ यानं पूर्ण केला. नाव जरी शाहीदचं असलं तरी प्रत्यक्षात अब्रार अल्वी आणि गुरुदत्तचा भाऊ आत्माराम यांनी दोघांनी मिळून हा राहिलेला चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र साहिब, बीबी और गुलाम च दिग्दर्शन करणारा आणि त्याबद्दल फिल्म फेयर अवार्ड मिळवणारा हाच का तो दिग्दर्शक अब्रार अल्वी असा प्रश्न मनात निर्माण होतो.

असं म्हटलं जातं की १०-१२ रीळपर्यंत चित्रिकरण झाल्यानंतरही गुरुदत्त अस्वस्थ होता. त्याच्या मनासारखं झाल्याचं समाधान त्याला मिळत नव्हतं. यात त्यानं चित्रित केलेल ‘वो हँसके मिले हमसे, हम प्यार समझ बैठे’ बघायला आणि ऐकायला खूपच आनंद मिळतो. माला सिन्हावर चित्रित झालेलं हे गाणं बघताना त्यात गुरुदत्त अदृश्यपणे जाणवत राहतो. त्याचा छायाप्रकाशाचा प्रभाव या गाण्यावर दिसतो आणि अशा वेळी हटकून रेम्ब्रा या चित्रकाराची आठवण होते.

या चित्रपटातली ‘कोई कहदे’, ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर है’, 'दिल तो पहलेसे मदहोश है’ आणि ‘बदल जाये अगर माली’ ही सगळीच गाणी श्रवणीय असून संगीतकार ओ. पी. नय्यर आहेत. ओ. पी. नय्यरच्या उत्कृष्ट गाण्यांमध्ये या गाण्यांचा समावेश करता येईल.

या चित्रपटात आपल्या मूल्यांवर निष्ठा असणारा आणि त्यांना घेऊन जगणारा पत्रकार जितेद्र गुप्ता कोळश्याच्या खाणीतलं कामगारांचं दुसह्य जगणं लोकांसमोर आणतो. त्यांच्या आयुष्याला असलेला धोका आणि खाणमालकांची उदासीनता आणि हितसंबंध दाखवतो. मात्र त्यानं ही बातमी मुख्य संपादकाला न विचारता छापलीच कशी असा आरोप करून त्याला कामावरून काढलं जातं. त्या वेळी त्या वृत्तपत्राची संचालक असलेल्या अमिता (माला सिन्हा) ला तो खूप सुनावतो. तिच्या वडिलांनी कुठल्या मूल्यांना समोर ठेवून हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि आज त्याचं काय स्वरूप झालंय याची जाणीव तिला करून देतो. उद्या त्या खाणकामगारांच्या जिवाला धोका पोहोचला तर शेकडो कुटुंब उदध्वस्त होतील आणि त्याचं पाप तुला स्वस्थता लाभू देणार नाही असंही सांगतो आणि निघून जातो.

याच दरम्यान त्याची ओळख एका अवखळ, अल्लड अशा बबली/सुनिता (तनुजा) नावाच्या तरुणीशी होते. तिचं मनस्वीपण आणि निर्व्याज असणं त्याला खूपच भावतं आणि तिच्याबरोबर तोही तिच्या प्रेमात पडतो. अल्लडपणापासून समजंसपणापर्यंतचा बबली/सुनिताचा प्रवास यात खूप सुरेख तर्‍हेनं दाखवला आहे. या दोघांचे प्रसंग पाहताना आपल्याही चेहर्‍यावर तेच आणि त्यांचेच भाव उमटतात. गुरुदत्त गेल्यानंतर हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी धर्मेंद्रला निवडण्यात आलं. गुरुदत्तला पर्याय धर्मेद्र? मुळातच पर्यायच चुकीचा घेतला गेला. त्यातच दिग्दर्शकही तसाच! या चित्रपटात बिचार्‍या धर्मेद्रने त्याच्या परीनं त्याची भूमिका नीट निभवायचा प्रयत्न केलाय, पण त्याच्या मुळातच असलेल्या मर्यादा...त्याला तो तरी काय करणार?

असंही म्हटलं जातं की ‘बहारे फिर भी आयेगी’ हा चित्रपट खूपच लांबत चालला होता, ज्यांनी फायनान्स केला होता ती मंडळी वैतागली होती. त्यामुळे अनेक वेळा पटकथेत (गुरुदत्तचा भाऊ आत्माराम यानं अनेकदा पटकथा रीराईट केली असंही म्हटलं जातं) बदल करण्यात आले. थोडक्यात, पटकथा बिघडवली गेली, दिग्दर्शनात ढिसाळपणा आणि बघण्यासाठी समोर ठोकळा धर्मेद्र आणि जॉनी वॉकरचा अचकटविचकट अभिनय! चित्रपट कधी एकदा संपतो असं प्रेक्षकांना होतं.

चांगल्या कंटेटचा विचका केल्यानंतर या कथानकात काहीच शिल्लक राहिलं नाही. मग राहिलं ते फक्त दोघी बहिणींचं एकाच नायकावरचं असलेलं प्रेम आणि मग एकमेकींच्या सुखासाठी त्याग करण्याची चढाओढ! तीही नीटपणे जमली नाही. शेवटी अमिता याने के माला सिन्हाचा मृत्यूचा प्रसंग असा काही चित्रित झालाय की असं वाटतं, मर बाई लवकर आणि कर आमची सुटका! त्यातही धर्मेद्रच्या चेहर्‍यावरचे भाव बघायला हवेत. चित्रपटातला एखाद्या पात्राचा मृत्यूही प्रेक्षकाला किती सैरभैर करून सोडतो, आपल्याही डोळ्यातून अश्रू आपल्याला दाद न देता ओघळायला सुरुवात होते. इथे मात्र मुख्य पात्र मरणाच्या वाटेवर असूनही आपण थंडपणे बघत राहतो.

खरं तर हा चित्रपट पूर्ण बघण्याची देखील आवश्यकता नव्हती. पण तरीही गुरुदत्त नावाचं जे गारुड आता मनावर पसरलंय, भिनलंय, त्या नावामुळे बघणं आवश्यक वाटलं. आणि हा चित्रपट बघताना त्यातल्या प्रत्येक प्रसंगी या चित्रपटात गुरुदत्त असता तर तो कसा दिग्दर्शित झाला असता अशीच कल्पना करून बघत राहिले. या चित्रपटात केवळ गुरुदत्त नव्हता, तर त्याचं काय होऊन बसलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘बहारे फिर भी आयेगी’ 'प्यासा’ चित्रपट करताना गुरुदत्तची चित्रपटाची तीन रीळं झाली होती, तरी तो अस्वस्थ होता. अखेर त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं आपला मित्र अब्रार अल्वी याला बोलूनही दाखवलं की त्याच्या स्वतःपेक्षाही यातल्या कवी असलेल्या विजयच्या भूमिकेला दिलीपकुमार हा अभिनेता जास्त चांगला न्याय देऊ शकेल. मग दिलीपकुमारला गळ घालण्यात आली. दिलीपकुमारनं या भूमिकेसाठी त्या काळी २ लाख रुपये एवढं प्रचंड मानधन मागितलं. जे गुरुदत्तच काय पण त्या वेळच्या इतर कुठल्याही निर्मात्याला इतकं सहजासहजी शक्य झालं नसतं. गुरुदत्तनं हे मानधन खूप जास्त होतंय असं सांगितल्यावर दिलीपकुमारनं आपल्याच गुर्मीत सांगितलं, तुमच्या वितरकांना सांगा, या चित्रपटात दिलीपकुमार काम करतोय. आणि ते तयार नसतील तर माझे वितरक उभे करतो. गुरुदत्त आपले वितरक बदलायला तयार नव्हता. एकदा चित्रपटाचे दर ठरवल्यावर त्याच वितरकांकडून वाढीव दर घ्यायचे हे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. त्यानं तसं सांगताच अखेर दिलीपकुमार ‘प्यासा’मधल्या विजय या कवीच्या भूमिकेसाठी तयार झाला. दुसर्‍या दिवशी चित्रिकरण होतं. संध्याकाळचे चार वाजले तरी दिलीपकुमार तिथे फिरकलाच नाही आणि येत नसल्याचंही कळवलं नाही. चार वाजता वाट पाहणं थांबवून गुरुदत्तनं शांतपणे मेकअप केला आणि ‘प्यासा’मधला विजय म्हणून तो कॅमेर्‍याच्या समोर उभा राहिला.

मात्र त्या रात्री त्यानं अब्रार अल्वीजवळ आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, 'आपण कलेच्या जगात अनेकांना अभिजात कलावंत म्हणून बघतो, पण त्यांच्या आत अखेर सौदागरच उभे असलेले दिसतात.’ अशा किती किती प्रसंगांतून गुरुदत्तच्या संवेदनशील मनावर ओरखडे उमटले असतील आणि अखेर ते सहन होण्याच्या पलीकडे गेल्यावर त्यानं या जगाचा निरोप घेतला असेल. कोणास ठाऊक!

'प्यासा’चं चित्रिकरण करताना अब्रार अल्वीबरोबर गुरुदत्तही रेडलाईट एरियातल्या एका कोठ्यावर गेला होता. तिथे दिवस गेलेली सात महिन्यांची एक गरोदर असलेली तरुणी गिर्‍हाइकासमोर नाचत होती. ते दृश्य गुरुदत्त बघूच शकला नाही. त्यानं तिच्या हातावर खिशात असलेले १००० रुपये ठेवले. तेव्हा तिच्या हाताच्या गरम स्पर्शांन ती तापानं किती फणफणलीये हे त्याच्या लक्षात आलं आणि तो तिथून मागे न पाहता बाहेर पडला. म्हणूनच ‘प्यासा’मधल्या ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहॉं है’ किंवा ‘जला दो ये दुनिया’ या गाण्यातल्या ओळी साहिरची खंत, रफीच्या आवाजातली आर्तता आणि गुरुदत्तच्या हळव्या दिग्दशर्कानं टिपलेली वेदना जिवंत होऊन आपल्यासमोर उभ्या राहतात.

अखेरच्या दिवसांत गुरुदत्त खूप चिडचिडा झाला होता. गीता दत्त त्याला सोडून आपल्या मुलांसह वेगळं राहत होती. तो एकटाच पेडर रोडवरच्या आर्क शॉयर नावाच्या इमारतीत किरायानं राहत होता. मृत्यूपूर्वी एक दिवस आधी म्हणजे ९ ऑक्टोबरला त्यानं गीता दत्तकडून आपली दोन्ही मुलं घरी बोलावली आणि त्यांच्याबरोबर दुपारी मनसोक्त पतंग उडवले. गुरुदत्तला पतंग उडवायला खूप आवडायचं. संध्याकाळी मुलं परत आईकडे गेली आणि गुरुदत्तला खूप एकटं वाटायला लागलं. दिवसभर मुलं त्याच्याचजवळ असल्यानं पुन्हा मुलांना गुरुदत्तकडे पाठवायला गीता दत्त तयार नव्हती. गुरुदत्त खूप चिडला आणि त्यानं तिला त्या संतापाच्या भरात इथं मुलांना पाठवलं नाहीस तर उद्या तू माझं प्रेत पाहशील असं ऐकवलं.

गीता दत्तशी त्याचे संबंध बिघडले होते आणि वहिदा रेहमानही दुरावली होती. याच गीता दत्तशी त्यानं प्रेमात पडून घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं होतं. मात्र प्रेमाची पूर्ती झाल्यानंतरही गुरुदत्तच्या आयुष्यात वहिदाचं येणं तो रोखू शकला नाही. तिच्या येण्यानं त्याच्या प्रतिभेला आणखीनच धुमारे फुटले. पण या दोघींना कसा न्याय द्यायचा याचं उत्तर त्याला सापडलंच नाही. बायको आणि मुलं जवळ नाहीत, प्रेयसी सोडून गेली आणि व्यावसायिक जीवनातही अपयश...या सगळ्या गोष्टींमुळे त्याला एकाकीपण खूपच जाणवत होतं.

त्या रात्री अब्रार अल्वीबरोबर गुरुदत्त बराच वेळ जागला. दुसर्‍या दिवशी तो राजकपूरबरोबर रंगीत चित्रपट निर्मितीविषयी चर्चा करणार होता. पण त्याच्या निराश मनानं उचल खाल्ली आणि त्यानं झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचाच निर्णय घेतला. गुरुदत्तच्या मृत्यूनंतर त्याचा जिवलग मित्र देवानंद धावतच तिथे पोहोचला. राजकपूरनं अंत्ययात्रेची सगळी तयारी केली. गीता दत्तपासून वहिदा रेहमानपर्यंत सगळे त्याच्याभोवती त्याचं अंतिम दर्शन अश्रूपूर्ण नयनांनी घेत होते. तो मात्र शांत प्रसन्न चेहर्‍यानं जणू काही झालंच नाही असा गाढ झोपेत होता. आपल्या चित्रपटातून ‘ये है बॉम्बे मेरी जान’ असं म्हणून ज्या मुंबईतली ऊर्जा त्यानं दाखवली होती, त्याच मुंबईत त्यानं आपला अखेरचा श्‍वास सोडला!

गुरुदत्त, तू आपल्याबरोबर आणलेली बहार घेऊन गेलास. खरंच मित्रा, तुझी वेळच चुकली. तू वेळेआधी आलास आणि वेळेआधीच निघून गेलास.....! 

दीपा देशमुख 
deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.