तलवार
'तलवार' हा चित्रपट बनायला हवा होतं की नाही यावर दुमत होऊ शकेल. मेघना गुलजारनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आज आर डेक्कनला सकाळी ९ वाजता बघितला. त्याआधी अनेक वेळा बघितलेली नुपूर तलवारची मुलाखत, प्रत्येक चॅनेलवर बघितलेली बातमी, प्रत्येक वेळेला आरुषी हत्याकांडानं घेतलेलं वळण माहीत होतंच. त्यामुळे हा चित्रपट बघायचाच हे मनाशी नक्की झालं होतं. प्रत्यक्ष चित्रपट बघताना मेघना गुलजारनं इतक्या लहान वयात किती संयतपणे हा चित्रपट हाताळलाय याची साक्ष पटली.
कुठेही फिल्मी न वाटता हा चित्रपट पुढे सरकतो, कलाकृती म्हणून बघावा की वास्तव किती हुबेहूब रेखाटलंय म्हणून या चित्रपटाला गुण द्यावेत हेच कळेनासं झालं. इरफान खान, कोकणा सेन, नीरज काबी आणि इतर सगळ्याच अभिनेत्यांची काम अतिशय उत्कृष्ट झाली आहेत. या चित्रपटातलं प्रत्येक पात्र जिवंत आणि खरंखुरं वाटतं हेही आणखी एक विशेष. कलाकृती म्हणून तर हा चित्रपट उत्तम आहेच, पण आरुषी हत्याकांड समजून घ्यायचं असेल तर त्यांनाही हा चित्रपट यातले अनेक बारकावे दाखवतो. या चित्रपटात नेमका खून कोणी केला असेल हा प्रश्न घेऊनच आपण चित्रपटगृहाबाहेर पडतो हेही खरं. खून झाल्याची बातमी कळताच तिथे पोहोचलेल्या पोलिसांचा गलथानपणा बघून त्यांनी तपासातल्या किती किती महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, बेफिकिरी दाखवली हेही लक्षात येतं. नीरज काबी आणि कोकणा सेन यांनी आई-वडील म्हणून असलेलं दडपण, बसलेला मानसिक धक्का, आलेला सून्नपणा, सगळीकडून होत असलेली विटंबना हे सगळं खूप प्रभावीपणे मांडलं आहे.
गंमत म्हणजे या चित्रपटातल्या दोन्हीही बाजू तितक्याच ताकदीनं उभ्या केल्या आहेत. गुलजारची दोन्हीही गाणी मनाला बैचेन करतात. प्रत्येकानंच हा चित्रपट म्हणून जरूर पहावा.
दीपा देशमुख
Add new comment