कॉफी

कॉफी

हम दिल दे चुके सनम मधला सलमान खान, रीना रॉय, जितेंदर आणि ऋषी कपूर यांचा बदलते रिश्ते आणि लव्‍ह ट्रिंगल असलेला कुठलाबी एक पिच्चर घ्या आणि मग तयार होईल ती ‘कॉफी’ मगात घिवूनशान प्या.
तर रेणुका राजवाडे म्हणजे स्पृहा जोशी एक इंटेरिअर डिझायनर असती. पोशाखाने एकदम आधुनिक. तिचा नवरा रणजीत राजवाडे म्हणजे कश्यप परूळेकर हा फिल्म डायरेक्टर असतू. असाच मसाल्याबिसाल्याच्या जाहिराती करताना दिसतो. पण तरी त्यांचा फ्लॅट एकदम लक्झरिअस असतू. तर रणजीत एकदम एकदम बिझी माणूस, आपल्या बायकोबरोबर लव्‍ह मॅरेज करूनपण त्याला आता तिच्याबरोबर लव्ह करायला वेळ नसतू. अशी एकटी बाई जेव्‍हा गोव्‍याला कामसाठी जाईन, तेव्‍हा काय व्‍हईन, तेच आपल्या रेणुकाबाईंचं होतं.
तर रेणुका राजवाडे गोव्‍याला येते, तेव्‍हा रोहित सरपोतदार म्हंजी आपला सिद्धार्थ चांदेकर एकदम हँडसम गडी त्याच्याच हाटिलाचं काम रेणुकाबाई करणार असल्यामुळे तिला भेटतो. तिच्यावर लाईन मारतो. पहिल्या पहिल्यांदा रेणुकाबाईला त्याचा राग येतू, पण नंतर तिला बी तो आवडू लागतो आणि मग दोघं काम कमी अन उनाडक्या जास्त असं फिरत राहतात, खातपित राहतात. काय हाटिल, काय डोंगार, काय झाडी असं म्हणत गाणीबिणी बी गात्यात आणि येळ मिळालाच तर तू किती इनोसंट, मी किती इनोसंट असा खेळ पण खेळतात.
रेणुकाबाई मग रोहितनं दिलेला भलामोठा बुके, सिल्कचा वनपिस पार्टी ड्रेस सगळं आनंदाने घेती अन् मग त्याच्याबरोबर पार्टी पण करती. त्या पार्टीत दोघं नाचायला पण लागतात, पण अचानक रेणुकाबाईला साक्षात्कार व्‍हतो की आपण तर मॅरिड बाई हावो, हे असं कसं करून राहिलो आपण? हे काय आपल्यासारख्या बाईला शोभत नाय. मग ती त्याच्याकडे त्यानंच काहीतरी चूक केली असं बघत निघून जाती. ती काय पण न बोलता गोव्‍याहून थेट मुंबईला घरी जाती. रडत रडत नवऱ्याला फोन करिती. पण मसाल्याच्या जाहिरातीचं दिग्दर्शन करणारा रणजीतराव लै म्हंजी लैच बिझी असतू. तो फोनकडे लक्ष देत नाही. मग रेणुकाबाईला लैच रडू येतं. एकटं बाईमाणूस घरात काय करणार? म्हणूनशान ती परत बॅगा उचलती आन परत गोव्‍याला जाती. 
पण आता रेणुकाबाईला कळलेलं अस्तं की आपण मॅरिड बाई हावो, मग ती रोहितबाबा पापी असल्यागत त्याच्याशी वागती. बिचारा रोहित लै प्रयत्न करतो, इचारतो पण की जे झालं त्यात काय माह्या एकट्याचीच चूक हाय काय, पण रेणुकाबाई काय ऐकत नाय. ती एकदमच आपलं छान दिसणारं आधुनिक कपडेलत्ते सोडून भारतीय नारीसारखी साडीतच दिसायला लागती. ती त्याला सांगती मी मॅरिड रेणुकाबाई हाय, अन् तू जिच्या प्रेमात पडलास तिचं नाव  रावी हाय. लैच कन्फ्युज व्हतो मंग गडी.
मंग रोहितबाबा जेव्‍हा दुसऱ्या पोरीसंगंट नाचतू, तेव्‍हा आपल्या रेणुकाबाईला वाईट वाटतंय. मग लव्ह असल्यामुळं दोघं गपगुमान एकमेकांना भेटतात, जिथं रोहित सलमानखानसारखा आपल्या आभाळातल्या आईसंगंट इमोशनल गप्पा मारत अस्तू. मग रेणुकाबाई त्याला समजावती आणि मुंबईला घरी जाऊन प्रामाणिक होवून आपल्या रणजीत नावाच्या नवऱ्याला सगळं काही सांगून टाकती. कपाळावरचं केसांचं एक झुलूप लाल-सोनेरी रंगाचं केलेला रणजीत सत्नारायानाची गोष्ट ऐकल्यागत आपल्या बायकूचं सगळं म्हणणं ऐकून घेतो, मधी मधी तिला प्रश्न पण इचारतो आणि आपली कमेंटपण पास करतू. मग त्याला घरात लैच सफोकेट होवू लागतं, गाडीत रेणुकाबाईला बसवून तो बाहेर घेवून जातू. मग तिथं पण तो रोहित आणि रेणुका यांची लव्‍हइस्टोरी तिच्याकडून ऐकतो. अशा शिरियस प्रसंगी त्यो नवरा नकू नकू म्हणत असताना बी ती बया त्याला कविता ऐकवती.
मग आता हे समंद झाल्यावर रेणुकाबाई रोहितकडे गोव्‍याला जाईन की रणजीतजवळ राहीन असा क्लायमॅक्स करायचा असं काफीवाले ठरवतात. पण आपण मुळात भारतीय संस्कृतीचे पाईक असल्यामुळं त्यानला बी कन्फ्यूजन व्‍हतं आणि मग ते रेणुकाबाईला आपली संस्कृती जप असा सल्ला देत्यात. ती बी ऐकती. 
... अशा तऱ्हेनं तुमची काफी पिवून झाली असन तर करा आपापली कामं न काय?
(यात सिद्धार्थ चांदेकर देखणा तर दिसला आहेच, पण अभिनय देखील उत्तम, पण कंटेंटच फुसकं असल्यावर तो तरी काय करणार बिचारा!) 
दीपा देशमुख, पुणे adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.