सिंफनी - पाश्चात्त्य संगीताची सुरीली सफर!

सिंफनी - पाश्चात्त्य संगीताची सुरीली सफर!

सिंफनी - पाश्चात्त्य संगीताची सुरीली सफर!
नुकतंच अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख या लेखकद्वयींनी लिहिलेलं ‘सिंफनी’ हे पाश्चात्त्य संगीत आणि संगीतकार यांच्यावर आधारलेलं पुस्तक वाचलं. जगावर ज्यांच्या कार्यांनी परिणाम केला असे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, गणितज्ञ यांच्यावर आधारित याच लेखकद्वयींचा याआधीचा 'जीनियस' प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात चांगलाच रुजलेला आहे. तसंच पाश्चात्त्य चित्र-शिल्प कलेवर आधारित त्यांचा ‘कॅनव्हास’ हा ही ग्रंथ तितकाच वाचनीय आणि वाचकाची ज्ञानलालसा पूर्ण करणारा! या पुस्तकांमुळे अर्थातच 'सिंफनी'विषयीची उत्सुकता आणि अपेक्षा वाढलेल्या होत्या. 
पाश्चात्त्य संगीत क्षेत्रातले बाख, बीथोवन, मोत्झार्ट, चेकॉव्हस्की, विवाल्डी, जॉर्ज हँडेल, शास्ताकोविच, वॅग्नर हे अभिजात काळातले तर मायकेल जॅक्सन, एल्व्हिस प्रीस्ले, मीरियम मकेबा, बीटल्स, लुई ऑर्मस्ट्राँग, नोबेल पारितोषिक विजेता बॉब डीलन यांच्यासारखे आधुनिक (पॉप, रॉक वगैरे संगीतप्रकारांतले) काळातले संगीतकार ‘सिंफनी’मध्ये भेटले. हे आणि याप्रमाणे अनेक संगीतकार यांचा संघर्षमय जीवनप्रवास आणि त्यांची संगीतातील भरीव कामगिरी ‘सिंफनी’मध्ये वाचायला मिळाली. या सगळ्यांचा प्रवास अनुभवताना त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षाला त्यांनी दोन हात करताना बघून त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायला झालं. इतकी संकटं, पराकोटीची गरिबी, उपेक्षा, कटकारस्थानं असं सगळं काही वाट्याला येऊनही यांनी आपली संगीतसाधना सोडली नाही. हे सगळे संगीतकार आपल्या खडतर अशा वाटेवरून चालतच राहिले, हे सगळं वाचून मनाची मरगळ दूर होऊन त्यांच्याकडून ते झपाटलेपण, तो दुर्दम्य आशावाद घ्यायला हवा ही भावना मनात पक्की झाली.  ‘सिंफनी’मध्ये फक्त इतकंच नाही, तर  पाश्चात्त्य संगीत कसं ऐकावं, पाश्चात्त्य संगीताचा इतिहास, त्या त्या काळाप्रमाणे बदलत गेलेले संगीतातले प्रकार, तो काळ, ती परिस्थिती, त्या त्या ठिकाणचं वातावरण असं सगळं काही या पुस्तकात सामील आहे. त्यामुळे पाश्चात्त्य संगीत हा आपल्यासाठी दूरस्थ विषय न राहता तो अगदी जवळचा वाटायला लागतो. तसंच या संगीतकारांच्या जीवनप्रवासामुळे हे सगळे संगीतकार आपल्याला आपल्या भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, बेगम अख्तर,  वसंतराव देशपांडे यांच्याइतकेच जवळचे वाटायला लागतात.
‘सिंफनी’मधली भावलेली आणि नव्याने प्रयोगाद्वारे यशस्वी केलेली गोष्ट म्हणजे यातले क्यूआरकोड ही संकल्पना! अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांनी सिंफनी पुस्तकात क्यूआरकोड देऊन हे पुस्तक केवळ वाचनीयच आणि  श्रवणीयच नव्हे, तर बघणीय करून सोडले आहे. आपल्याजवळच्या स्मार्ट मोबाईल फोनच्या मदतीने या क्यूआरकोडवर टिचकी मारली की मोत्झार्टची जगप्रसिद्ध ४० क्रमांकाची सिंफनी सहजपणे ऐकता येते. मायकेल जॅक्सनची थिरकती अदा प्रत्यक्ष 'याचि नयनी याची डोळा' बघता येते. बीटल्स आणि एल्व्हिस प्रीस्ले यांनी जगभरच्या रसिकांना वेड कसं लावलं होतं हे या क्यूआरकोडमुळे अनुभवता येतं, तर विवाल्डीची फोर सिझन्स रचना ऐकून कान तृप्त होतात.  
अच्युत गोडबोले यांचा सर्वच क्षेत्रांत (विषयांमधला) अधिकारवाणीनं केलेला वावर सर्वश्रुत आहेच, त्याचबरोबर त्यांच्याबरोबरीनं दीपा देशमुख यांचे या पुस्तकातले योगदान, अभ्यासपूर्ण परिश्रम आणि त्यांच्या भाषेमधली सहजसुलभता जाणवते. 
याच पुस्तकावर आधारित नगरमध्ये थिंक ग्लोबल फाउंडेशनतर्फे आयोजित अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांची नुकतीच दृक-श्राव्य मैफल संपन्न झाली. या मैफलीत पाश्चात्य संगीतानं प्रभावित झालेली हिंदी चित्रपटातली गाजलेली गाणी, मूळ संगीतरचना, तसंच पाश्चात्त्य संगीतकारांचे किस्से, भारतीय संगीतकारांचे किस्से, सिंफनीच्या निर्मितीची प्रक्रिया याबद्दल रसिकांशी संवाद साधत लेखकद्वयींनी अतिशय सुरेल असा कार्यक्रम सादर केला आणि त्यामुळे आपलं संगीत, त्यांचं संगीत यातलं द्वैत संपून संगीत हे वैश्विक असून ते जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात विहरत जाऊन आपल्या अस्तित्वानं लाखो/करोडो लोकांच्या मनात कशी रुंजी घालतं हे जाणवलं. 
 ‘सिंफनी’ हे पुस्तक प्रत्येक वाचनप्रेमींनी जरूर वाचायला हवेच, पण त्याचबरोबर जे संगीतातले औरंगजेब असतील त्यांनीही जरूर वाचावे. कारण या पुस्तकाच्या वाचनाने आपला दृष्टिकोन नक्कीच बदलेल. नगरकरांनी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांना लवकरच ‘सिंफनी’चा दुसरा भाग काढावा अशी आग्रहाची विनंती देखील केली आहे. 
मनोविकासने नेहमीप्रमाणेच ‘सिंफनी’ची दर्जेदार निर्मिती केली आहे. पुस्तकाची किंमतही अगदीच माफक असल्यामुळे ५५० पानी पुस्तक वाचकांसाठी केवळ ३८० रुपयांत उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या शेवटी पाश्चात्त्य संगीताशी साधर्म्य दाखवणारी हिंदी चित्रपटातली दीडशे गाण्यांची यादी देखील समाविष्ट केलेली आहे. ‘सिंफनी’ वाचून आता अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या नव्यानं येणार्‍या  पुढल्या पुस्तकाची ओढ लागली आहे!
किरण काळे, अहमदनगर.
thinkglobalfoundation@gmail.com
मोबाईल - ९०२८७२५३६८

पुस्तक - सिंफनी 
लेखक - अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या - ५५०,  शुल्क - रु. ३८०/-