फिर आयी हसीन दिलरुबा
फिर आयी हसीन दिलरुबा
तीन वर्षांपूर्वी ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट बघितला होता. त्या वेळी तापसी पन्नू माहीत होती. पण विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे हे अभिनेते ठाऊक नव्हते. चित्रपट बघताना कधी काळी वाचलेल्या रोमँटिक/खुनी/थ्रिलर/सस्पेन्स असलेल्या कहाण्या आठवल्या. इतकंच काय पण कटी पतंग वगैरेसारखे चित्रपट देखील गुलशन नंदा या लेखकाच्या कादंबरीवर बेतलेले होते, तेही आठवले. बस स्टँड असो वा रेल्वे स्टेशन अशी पुस्तकं त्या वेळी सर्वत्र दिसायची. सगळं कथानक काल्पनिक असलं, काहीसं भडक असलं, काहीसं अवास्तव असलं तरी त्या वेळी खूप आवडायचं. (जशी गोविंदाची गाणी आणि डान्स असतो. मै तो रस्तेसे जा रहा था, मै तो भेलपुरी खा रहा था यासारखी निरर्थक गाणी आजही मला आवडतात. फार डोक्याला ताप देत नाहीत. )
तर - तीन वर्षांनतर ज्या सिक्वेलची मी आतुरतेने वाट बघत होते, तो ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट 9 ऑगस्ट 2024 या दिवशी नेटफ्लिक्सवर झळकला. जिमट्रेनरचं सगळं म्हणणं धुडकावून मी कोक आणि लेज खात हा चित्रपट बघितला. तर या चित्रपटाबद्दल बोलण्याआधी प्रिक्वेलबद्दल बोलावं लागेल, म्हणजे ‘हसीन दिलरुबा’बद्दल बोलावं लागेल. ज्यांनी पहिला भाग बघितला नाही, त्यांनी जरूर बघा.
ज्वालापूरमध्ये इंजिनिअर असलेला साधासरळ स्वभावाचा रिषू म्हणजे विक्रांत मेस्सी लग्नाळू असतो. त्याला दाखवण्यात आलेली मुलगी म्हणजे राणी - तापसी पन्नू त्याला आवडते आणि त्यांचं लग्न होतं. राणी ही दिनेश पंडितच्या पुस्तकांची जबरदस्त फॅन असते. त्यामुळे ती वास्तवापेक्षा कल्पनेत जास्त जगत असते. लग्नानंतर आपल्या नवऱ्याने आपल्यावर जिवापाड प्रेम करावं, दोघांमधलं नातं खूपच रोमान्सने भरलेलं असावं अशा तिच्या स्वप्नाळू कल्पना असतात. त्या साध्यासरळ रिषूकडून पूर्ण होत नाहीत, किंबहुना त्याला तिच्या मनात चाललेले हे खेळ कळत नाहीत.
राणीच्या आयुष्यात हर्षवर्धन राणे यानेकी नील हा रिशूचा दूरचा भाऊ येतो. त्याचं अँडव्हेचरस जगणं, दिसायला देखणं असणं सगळं काही राणीला भुरळ पाडतं आणि दोघं एकमेकांच्या जवळ येतात. त्याच्यासोबत आयुष्य काढायचं राणी ठरवते, पण नीलला ती कमिटमेंट नको असते. तो निघून जातो. रिशूला जेव्हा राणीकडून तिच्या प्रेमाची गोष्ट कळते तेव्हा सुरुवातीला तो खूप चिडतो, रागावतो, दु:खी होतो. तिरीमिरीत नीलला जाब विचारायला त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याचा मार खाऊन परततो.
त्यानंतर राणी आणि रिषू दोघं जवळ येतात. पण गोष्ट एवढ्यावर थांबत नाही. नील एके दिवशी पुन्हा राणीकडे येतो आणि तिला ब्लॅकमेल करू पाहतो. यात दिनेश पंडितच्या एका कादंबरीचा संदर्भ घेत, रिषू आणि राणी एक प्लॅन आखतात आणि त्यात नील ठार होतो. पण जगाच्या आणि पोलिसांच्या दृष्टीने राणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने भोळ्या भाबड्या रिषूला मारलं समजून ते राणीला पकडून खूप टॉर्चर करतात, पण पुराव्याअभावी ते काही करू शकत नाहीत आणि राणीला सोडून देतात. चित्रपटाच्या शेवटी रिषू आणि राणी एक होतात. त्यांनी केलेला प्लॅन काय होता याचं उत्तर पोलिस अधिकारी आदित्य श्रीवास्तव याने की दया याने की इन्स्पेक्टर किशोर रावत याला अचानक हातात पडलेल्या दिनेश पंडित यांचं पुस्तक वाचून सापडतं. मात्र आता त्याची ट्रान्स्फर झालेली असते आणि फाईल क्लोज झाल्यामुळे तो काहीच करू शकत नाही. इथे ‘हसीन दिलरुबा’ संपतो.
‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट विनील मॅथ्यू याने दिग्दर्शित केला होता. मात्र ‘फिर से आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट आमच्या जयप्रद देसाई याने दिग्दर्शित केलेला आहे. ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाच्या शेवटामुळे राणी आणि रिषू यांचं काय होतं, त्यांची आणि पोलिस अधिकारी किशोर रावत यांची भविष्यात टक्कर होते का? असे अनेक प्रश्न मनात होतेच. त्यांची उत्तरं या सिक्वेलमधून सापडणार होती. तसंच या चित्रपटाच्या ट्रेलरने उत्कंठा वाढवलेली होतीच. ट्रेलरमधून राणीच्या आयुष्यात कोणी तिसरा येतो का हेही बघायचं होतं.
‘फिरसे आयी हसीन दिलरुबा’ मध्ये रिषू आणि राणी आग्रा शहरात वेगवेगळे राहत असतात. राणी एका ब्युटीपार्लरमध्ये काम करत असते, तर रिषू रवि या नावाने वेगवेगळी कामं करून पैसे जमवून दोघांनी थायलंडला जायचं असा बेत तडीस नेण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात नीलचा पोलिस अधिकारी असलेला काका मॉन्टू म्हणजे जिमी शेरगील हा राणी आणि रिषूला शोधत आग्र्यात येतो. चित्रपटाचं पुढचं कथानक सांगत नाही, पण सस्पेन्स राखण्यात आणि प्रेक्षकांची उत्कंठा अबाधित राखण्यात जयप्रदमधल्या दिग्दर्शकाला यश आलं आहे. यात रिषू आणि राणी या दोघांमध्ये आलेला तिसरा म्हणजे अभिमन्यू याची भूमिका विकी कौशलचा भाऊ सनी कौशल याने साकारली आहे.
अभिनयाच्या बाबतीत सगळ्यांनीच छान कामं केली आहेत. सनी कौशल आणि जिमी शेरगिल मला जास्त आवडले. तसंच विक्रांत मेस्सी आणि तापसी हेही कुठे कमी पडले नाहीत. मात्र पहिल्या चित्रपटामुळे ते असंच चांगलंच काम करणार याची खात्री होतीच. चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. कधी कधी सिक्वेलची तुलना पहिल्या भागाशी होऊन तो पडतो. इथे तसं घडत नाही. तसंच दोन्ही भागांचे दिग्दर्शक वेगळे असूनही चित्रपटाची पकड सुटत नाही. प्रेक्षक आपल्या जागेवरून चित्रपट संपेपर्यंत उठत नाही. राणी आणि रिषू यांचं प्रेम तसंच राहतं का, की अभिमन्यू आयुष्यात आल्यावर राणी त्याचं प्रेम स्वीकारते? या चित्रपटात देखील ‘खून’ आहेतच, मग ते कोणाचे आणि का होतात? पोलीस या भागात आरोपींना जिवंत पकडू शकतात का? एक तास तेहेतीस मिनिटांच्या कथानकामध्ये काय काय घडतं? याही चित्रपटात राणीच्या डोक्यातलं दिनेश पंडितचं भूत तसंच असतं का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘फिरसे आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटातून मिळाली.
अनेक वर्षांनी पुन्हा एकदा भूतकाळातले अशा प्रकारची पुस्तकं वाचल्याचे ते दिवस आठवले. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’सारखे चित्रपट बघताना फार लॉजिक, वास्तव, असं कुठे असतं का? वगैरे वगैरे गोष्टींचा फारसा विचार करायचा नसतो. त्यामुळे मी हा चित्रपट खूप एन्जॉय केला. लगेचच जयप्रद देसाई या दिग्दर्शकाला मेसेज करून कळवलं. त्याच्याशी बोलले देखील.
जयप्रदचा ‘नागरिक’ बघितला, तेव्हा त्याच्यावरच्या प्रेमाखातर तो चांगला वाटला होता, ‘कौन प्रवीण तांबे?’ बघितल्यावर मात्र जयप्रदबद्दल खूप अभिमान दाटून आला होता. आणि आता ‘फिरसे हसीन दिलरुबा’ बघताना जयप्रद देसाईमधला दिग्दर्शक अशा वेगळ्या जॉनरचा (जो त्याच्या जॉनरचा नाही) चित्रपट तितक्याच ताकदीने केलाय म्हंटल्यावर जुग जुग जियो जयप्रद असे उद्गार तोंडून बाहेर पडले.
दीपा देशमुख
Add new comment