महाराज
महाराज
आज नेटफ्लिक्सवर ‘महाराज’ हा चित्रपट बघितला. ज्या वेळी भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. काहीजण देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा यासाठी लढत होते, तर काहीजण लोकांना अज्ञान, अनिष्ट प्रथा, परंपरा यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जागरूकता आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यातलाच एक गुजराथी पत्रकार म्हणजे करसनदास मूलजी. त्याच्यावरचा हा चित्रपट. आज या चित्रपटाच्या निमित्ताने 1862 साली सुप्रिम कोर्टात चाललेल्या केसबद्दल समजलं. खरं तर स्वातंत्र्यापूर्वीचा हाही इतिहास कळला.
करसनदास मूलजी हा पुरोगामी विचारांचा आणि दादाभाई नौरोजींच्या विचारांमुळे प्रभावित झालेला एक तरुण. या तरुणाने धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनिष्ट प्रथांविरोधात दिलेला लढा बघून एकाच वेळी मन अभिमानाने भरूनही आलं, पण त्याच वेळी आपण सर्वसामान्य लोकांनी किती अज्ञानी असावं याचा विषादही वाटला. धर्म, प्रथा, रीती-भाती, परंपरा आपल्याला जर विचार करू देत नसतील, डोळे उघडे ठेवायला नकार देत असतील, मेंदूचा वापर करूच नका असं सांगत असतील, आपली बायको आणि लेकीसुनांना प्रथेच्या नावाखाली परपुरुषाच्या हवाली करत असतील आणि त्या दिवशी घरात गोडधोड बनवून खात असतील, तर आपल्याला अशा प्रथा विकृत बनवत आहेत असंच म्हणावं लागेल. करसनदास याने विधवाविवाह, स्त्री शिक्षण यासाठी आपल्या लेखणीतून प्रयत्न केले. ‘सत्यप्रकाश’ या नियतकालिकाद्वारे जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. या मार्गात त्याला किती अडथळे आले आणि तरीही त्याने आपला मार्ग बदलला नाही हे बघून मन खरोखरच नतमस्तक झालं. हा चित्रपट बघताना मनात अनेक उलटसुलट विचार येत गेले.
परवाच वटसावित्री पोर्णिमा प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावर जोरदार साजरी झाली. त्यावर झालेली चर्चाही दिसली. आमच्याही सोसायटीत वडाच्या झाडाभोवती दोरे गुंडाळले गेले. सर्व वयोगटातल्या उच्चशिक्षित स्त्रियांनी भक्तिभावे पूजाअर्चा केली. सोशल मीडियावर अनेक स्त्रियांनी नटूनथटून वडाची एक फांदी त्यांच्या हॉलमधल्या कुंडीत रोवून त्याची पूजा करतानाचे फोटो टाकले. काहींनी माझ्य सासूने माझ्यानंतर माझ्यासाठी एवढं तरी कर बाई असं सांगितल्यामुळे त्यांचा मान राखलाच पाहिजे म्हणून मी करते असं सांगितलं. काहीजणी अनेक कर्मकांडं करताना घरं कसं प्रसन्न वाटतं, मुलांना कशी आपली संस्कृती कळली पाहिजे, पैठण्यांना उन त्या निमित्ताने लागतं तरी, अशी समर्थनं करताना दिसल्या. असो.
करसानदास मूलजी सारखा तरुण दीडदोनशे वर्षांपूर्वी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याची फरफट करून घेत आपल्यासाठी लढला आणि आपण जागरूक होणं तर सोडाच, पण आणखी व्रतवैकल्य, बुवाबाबा, मठमहाराज यांच्या दिक्षा घेत त्यांचे गंडे बांधून कृतकृत्य होण्यात समाधान मानतो आहोत.
‘महाराज’ या चित्रपटातल्या हवेलीतल्या जेजेच्या भूमिकेत जयदीप अहलावत याने जान आणली आहे. त्याचा सगळा खुनशीपणा त्याने इतक्या शांतपणे दाखवला आहे की बस्स. आमीर खानचा मुलगा जुनैद खान करसनदास च्या भूमिकेत चपखल बसला आहे. मात्र पुढे त्याचं भवितव्य काय असेल आत्ताच सांगता येत नाही.
मला ‘महाराज’ चित्रपट आवडला. असे चित्रपट जाणीवपूर्वक निघायला हवेत असंही वाटतं. याचं कारण देशाला मिळालेलं स्वातंत्र्य, सहजासहजी मिळालं नाही. तसंच करसनदाससारख्या अनेक समाजसुधारकांचे प्रयत्न, आज समजणं गरजेचं आहे. तसंच आज विचार करताना, आपलं पाऊल पुढे पडतंय की मागे? हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. जरूर बघा नेटफ्लिक्सवर ‘महाराज’.
दीपा देशमुख
Add new comment