ताणतणाव आणि मी - टेंशन कायकू लेनेका - थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2019

ताणतणाव आणि मी - टेंशन कायकू लेनेका - थिंक पॉझिटिव्ह दिवाळी 2019

स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी खूप सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. माझ्या मनात कितीही वाईट प्रसंग आला तरी आजपर्यंत कधी आत्महत्येचा विचार डोकावला नाही. याचं कारण जेव्हा मी शोधायला लागते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. खरं तर आयुष्यात अनेकदा चढउताराचे, नैराश्याचे अनेक प्रसंग आले, मनावर उदासीचे ढगही काही काळ पसरले. पण त्यावर मात कशी करायची हे कळत-नकळत लहानपणापासून मनावर बिंबलं गेलं. कधी भेटलेल्या व्यक्तींमुळे, तर कधी परिस्थितीमुळे, कधी मिळालेल्या चांगल्या-वाईट अनुभवांमुळे, तर कधी वाचलेल्या पुस्तकांमुळे! 

लहानपणी मी खूपच अबोल होते. मनातलं मनातच साठून राहायचं. व्यक्त व्हायला जमायचं नाही आणि मग अशा वेळी मला भेटली एक मैत्रीण, जिच्या सहवासात मी खूप मोकळी होत गेले. या पहिल्यावहिल्या मैत्रिणीचं नाव होतं - डायरी! अगदी तिसरीच्या वर्गात असल्यापासून मी डायरी लिहायला लागले. या डायरीत आवडलेल्या गोष्टी, खटकलेल्या गोष्टी, चांगले प्रसंग, वाचलेले वेचे, कविता अशा अनेक गोष्टीं असत. कधी कधी तर मीही स्वतः लिहिलेलं काहीतरी असायचं. डायरी पुन्हा वाचताना मनातले खंतावणारे विचार आपोआपच बोथट होऊन जायचे. या मैत्रिणीनं मला आपल्याचकडे तटस्थपणे बघायचं कसं हे शिकवलं. 

घरात खूप धार्मिक वातावरण होतं. वर्षंभर वेगवेगळे सण साजरे होत. आईचे उपासतापासही चालत. त्यातच तिला सोबत म्हणून तिच्याबरोबर कधी भगवद्गीतेच्या क्लासला तर कधी चिन्मय मिशनच्या प्रवचंनाना मी जात असे. दोन्हीकडे आजच्या काळाला सुसंगत अशी मांडणी वक्ते करत. मी सहावी-सातवीत असेन त्या वेळी, पण मलाही ते जे काही सांगत ते बर्‍यापैकी समजायचं. त्याच वेळी आपण कधी कोणाची स्पर्धा, तुलना करता कामा नये असंही मनानं बजावलं. कारण ज्या गोष्टी, समोरच्यात असतील, त्या माझ्यात असतीलच असं नाही. जे माझ्याकडे आहे त्याचा मी पूर्ण प्रयत्नांती उपयोग करीन हे मात्र नक्की असंच मनानं सदोदित सांगितलं. यातूनच कायम कष्टकरी वर्गाकडे मनाचा ओढा राहिला. वरवरच्या भौतिक गोष्टीत मन फारसं अडकलं नाही. आता वाटतं, या प्रवचनांनी माझ्यात काही मूल्यांची पेरणी केली. मनाची अस्वस्थता निर्माण झाली की याच मनाचा गाभारा करून त्याला शांत कसं करायचं हे त्या प्रसंगांनी शिकवलं. 

प्रसिद्ध कवी संदीप खरेनं म्हटलंय, 
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्टयावर बसतो, घुमतो, शिळ वाजवतो

खरं तर ‘आपल्यातच दोन ‘मी’ लपलेले असतात. हे दोन ‘मी’ कसे विचार करतात याचं सुंदर विश्लेषण या कवितेतून कवी आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या आयुष्यात सुखदुःख आणि चढउतार हे येत-जात राहणार. अशा वेळी सुखाच्या क्षणी आपण गाफील राहायचं आणि दुःखाच्या वेळी कोसळून पडायचं असं करून चालणार नाही आणि खरं सांगायचं तर आपल्याकडच्या अनेक तत्वज्ञांनी आणि संतांनी आपल्या चिंतनातून माणसानं आयुष्य जगताना या दोन्ही प्रसंगात कसं वागावं हेच पदोपदी सांगितलं आहे. पण तरीही माणूस स्वतःवर वेळ आली की बिथरून जातो आणि ऐकलेलं, वाचलेलं आणि उमगलेलं सगळं काही विसरून जातो. समोर आलेल्या परिस्थितीसमोर तो हतबल होऊन उभा राहतो. एका वेगळ्या अर्थानं ही कविता मनाला स्पर्शून गेली. 

अगदी छोटेछोटे प्रसंग मला शिकवत राहिले. तेव्हा त्या प्रसंगांचं महत्व जरी कळलं नसलं तरी आज मात्र प्रकर्षानं जाणवतं. वडिलांबरोबर आठवडी बाजारात भाजी आणायला जाणं हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी कोणीही तयार नसायचं. अशा वेळी मी त्यांच्याबरोबर जायची. भाजीबाजाराच्या निमित्तानं प्रतिकूल परिस्थितीत जगणारी कष्टकरी माणसं या मंडईत दिसायची. पण आहे त्या परिस्थितीत हसतमुखानं ती जगताना दिसल्यामुळे नकळतच याही गोष्टींचा परिणाम मनावर झाला. पुढे कॉलेजमध्ये असताना आकाशवाणीच्या युवावाणी कार्यक्रमासाठी कधी स्क्रिप्ट रायटिंग कर, तर कधी ट्रक ड्रायव्हर/क्लिनर यांच्या मुलाखती घे असं बरंच काही करत असे. त्यामुळे या लोकांचं जगणं, त्यांची सततची फिरती, घरापासून/कुटुंबापासून दूर राहणं, त्यांचे कष्ट खूप जवळून बघता आलं. कळत नकळत ही सगळी माणसं मला जवळची वाटू लागली.

घरातलं वातावरण स्त्री-पुरुष समानतेला फारसं पूरक नव्हतं. त्यामुळे कितीतरी गोष्टीत मनाला मारावं लागत असे. उदाहरणार्थ, मला नाटकात काम करायचं, तर घरातल्यांची परवानगी नसे. तीच परवानगी माझ्या भावाला मात्र न विचारताही मिळत असे. भावाला अनेक मैत्रिणी होत्या, मी मात्र इतर मुलांशी सोडाच, पण त्याच्याच मित्रांबरोबरही फार बोललेलं आवडत नसे. अशा वेळी या भेदाचा राग येई, बंडाचे विचार मनात उसळून येत. वाईटही वाटे. पण त्याच वेळी मनानं सांगितलं की मी माझ्या पुढल्या आयुष्यात असं कधीही कोणाशी वागणार नाही. आणि याच कारणांमुळे पुढे माझ्या मुलांबरोबर वागताना देखील लहानपणापासून मैत्रीचंच नातं जपता आलं. ‘मी मोठी माझं ऐकलं पाहिजे आणि तू लहान तर तुला काय कळतंय‘ असे विचार मनाला शिवलेच नाहीत. याचा परिणाम असा झाला की आज अपूर्वच नव्हे तर महाराष्ट्र असो की महाराष्ट्राबाहेर गेलेली माझी मुलं या सगळ्यांबरोबरचं मैत्रीचं नातं खूप दृढ झालं. त्या नात्याला एक पारदर्शीपणा लाभला. मग कोणाचे प्रेमभंग असोत वा नवीन जोडीदार मिळणं असोत, घरातल्यांबरोबर झालेल्या कटकटी असोत वा इतर काही कारणं आमच्यांत तो संवाद घडत राहिला. हा संवाद एकतर्फी कधीच नव्हता/नाही. कारण मलाही कधी अस्वस्थ वाटलं, बेचैनी आली, मनाची द्विधा अवस्था झाली की मी माझ्या या चौफेर पसरलेल्या वैश्विक कुटुंबातल्या व्यक्तींशी संवाद साधते. या संवादानं मनातली खळबळ कमी होते आणि मन शांत होतं. उपाय मिळतो की नाही ठाऊक नाही, पण मनात उफाळून आलेलं वादळ मात्र शांत होत जातं. 

मनातल्या ताणतणावांना दूर करण्यासाठीचा एक अतिशय चांगला उत्तम उपायही नकळत सापडला. कॉलेज संपल्यानंतर लग्न झालं आणि तरीही सतत काहीतरी वेगळं करावंस वाटे. अशा वेळी निसर्गोपचार कोर्सची माहिती मिळाली आणि या कोर्समध्ये जीवनशैलीबद्दल अनेक गोष्टी होत्या. रोग होण्याआधीच आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सांगितलं होतं. आणि मग यातलं रोजचं व्यायामाचं, योगासनांचं महत्त्व, आपला संतुलित आहार, अनेक थेरॅपीज या गोष्टी शिकता आल्या. सकाळच्या हव्याशा वाटणार्‍या हवेत फिरताना मनाचा मनाशी संवाद सुरू झाला आणि या शुद्ध मिळणार्‍या ऑक्सिजनमुळे मनाची सकारात्मकता अधिक वाढते हे रहस्यही कळत गेलं. योगासंनांनी बाहेर बघण्यापेक्षा मनात डोकावून कसं बघायचं आणि आपल्या शरीराबरोबरच मनाचं संतुलन कसं राखायचं हे समजलं. तसंच माणसाच्या आयुष्यात कला सोबत करत असली तरी ती ताणतणावांना दूर करू शकते हे समजलं. त्यामुळे नाटक असो की संगीत या दोन गोष्टी तणावाला मनातून हद्दपार करायच्या आणि आनंदाचं वातावरण निर्माण करायच्या. 

पुढे अनेक वळणं येत गेली आणि मी कामाच्या निमित्तानं आदिवासी भागात जाऊन पोहोचले. तसं बघितलं तर खूप प्रतिकूल परिस्थितीच तिथे होती. म्हणजे सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते 10 असं 8 तास लोडशेडिंग असायचं. खूप आतला भाग असल्यामुळे तिथे मोबाईलचे त्या वेळी टॉवर्सही नव्हते. त्यामुळे फक्त लँडलाईन फोन असायचा आणि वार्‍यामुळे किंवा पावसामुळे त्याची केबल निसटली तर तोही बंद! अशा वेळी जगाबरोबरचा संपर्क आणि संवाद तुटायचा. आठ तास वीज नसल्यानं कपड्यांना इस्त्री करणं, टापटीप राहणं, ब्युटीपार्लरमध्ये जाणं अशा अनेक गोष्टींना सुट्टीच मिळाली होती. कामावर जाताना, अनेक गावांना भेटी देताना ऑफीसची गाडी असायची. पण काही कारणांनी गाडीचं कुठलं दुरुस्तीचं काम निघालं तर कधी टमटम तर कधी चालतही कार्यकर्त्यांबरोबर जावं लागायचं. पावसाळ्यात सूर्या नदीला पूर आला की मग तर कितीतरी दिवस इतर गावांबरोबरचा संपर्क तुटायचा. पावसाळ्यात निघणारे साप अिाण इतर सरपटणारे प्राणी भीती दाखवायचे. अशा अनेक गोष्टी होत्या की ज्यांची सवय नव्हती. पण याच वातावरणानं आणि याच माणसांनी शिकवलं की आत्ता ही परिस्थिती आहे, तर नाक मुरडून, निराश होऊन चालणार नाही. यातही चांगलं शोध आणि चालत राहा. या विचारांनी सगळंच चित्रं बदललं. पायी चालतानाही वाईट वाटण्याऐवजी मनात अनेक गाणी उमटत, तर कधी पथनाट्याच्या संकल्पना मनात तयार होत. बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद करायला वेळ मिळे आणि त्यांच्याशी असलेलं नातं जास्त घट्ट होत असे. जे आजही आहे. या भागात सततच वीज नसल्यानं अनेक गोष्टींना बाद करता आलं आणि भौतिक गरजा कमी होत गेल्या. आदिवासींचं खडतर जगणं जवळून बघितल्यामुळे तर आपण कितीतरी पटीनं सुसह्य परिस्थितीत जगतोय याची जाणीव होऊन तुलना हा विषय औषधालाही जवळ राहिला नाही. 

पुढे कामानिमित्त अनेक आदर्शव्रत वाटाव्यात अशा व्यक्ती भेटल्या तर काहींनी मनातल्या प्रतिमतेला तडे दिले आणि आदर्शाच्या कल्पना ढासळल्या. पण या अनुभवांनी हेच शिकवलं की बरं झालं ही माणसं भेटली. यांच्यामुळे ही माणसं किती दुहेरी, दुटप्पी वागतात, स्वतःच्या प्रतिमेला जपतात हे आपल्याला कळलं आणि यातून आपण असं कधी वागायचं नाही हीच शिकवण त्यातून घ्यायची आहे. आणि मग हळूहळू त्यांच्याविषयीचा मनातला राग नष्ट झाला आणि आपण कसं वागायचं हे मनात पक्वं झालं. 

पुढे ‘मनात’ या मानसशास्त्रावरच्या पुस्तकावर काम करताना मनाचे अनेक कंगोरे, त्यातल्या विविध शाखा, अनेक शास्त्रज्ञांनी केलेलं त्यातलं संशोधन कळत गेलं आणि आरईबीटी (विवेकनिष्ठ मानसोपचार पद्घती) हा समुपदेशनाचा कोर्स करावा अशी इच्छा मनात निर्माण झाली. ठाण्याच्या आयपीच या संस्थेमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे हा कोर्स करता आला आणि इतरांशीच नव्हे, तर आपल्या मनाशी आपण कसं वागायला हवं याचा विचार मनात पक्का रुजला गेला. आपणच आपले खूप चांगले मित्र असतो आणि त्यामुळे आपण एकटे आहोत का, एकाकी आहोत का याचा विचारच कोसो दूर पळाला. मनात येणारे ताणतणाव कसे रोखायचे किंवा त्यांना मार्ग कसा काढून द्यायचा हे समजत गेलं. एखादी व्यक्ती आपल्याशा वाईट किती वागली याचा विचार करत त्या व्यक्तीचा द्वेष करण्याऐवजी मला तिच्याकडून चांगलं काय काय मिळालं हा विचार करून आपल्या कामावर, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची समज वाढली. 

मानसशास्त्रावरचा अभ्यास करताना ताण-तणाव शरीर आणि मन दोन्हींवर हल्लाबोल करतात आणि मग ताणामुळे आनंद कमी होणं, चिडचिड होणं, चटकन् राग येणं, उदास वाटणं, आयुष्य अर्थहीन वाटणं, कार्यक्षमता घटणं, आत्मविश्वास कमी होणं, परस्परसंबंधात अंतर निर्माण होणं, गैरसमज, संघर्ष वाढणं, झोप व्यवस्थित न होणं, झोपेतून उठल्यावरही ताजतवानं न वाटणं, काम करूनही समाधान न वाटणं, सतत आरोग्याच्या कुरबुरी चालू होणं, आळस आणि व्यसन लागणं असे परिणाम होतात. ताण आणि चिंता यांच्यामुळे राग, भीती, मत्सर, चिंता, अपराधी वाटणं हे सगळे प्रकार वाढायला लागतात. ताणाचं स्वरूप हळूहळू वाढत जाऊन ते इतकं उग्र रूप धारण करतात की औषधोपचारांनीही ते आटोक्यात येणं कठीण होतं, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यामुळे आपल्या मनाची उत्तम मशागत करून त्यात चांगल्या विचारांचं बीज पेरणं आणि त्याची वाढ त्याचं संगोपन याकडे लक्ष देणं हेच आपल्या हातात आहे ही गोष्ट समजली. 

खरं सांगायचं झालं तर ताण हा अपायकारक असला तरी आपल्या जीवनात ताण आवश्यकही असतो. थोडा ताण वाढला तर कार्यक्षमता वाढते. अजून थोडा ताण वाढला तर कार्यक्षमतेत अजून वाढ होते. म्हणजे कसं? तर घरी पाहूणे येणार म्हटलं की आपण नेहमीची कामं लवकर करून घर स्वच्छ करतो, तयारी करतो. रोजच्या न होणार्‍या गोष्टीही घडून जातात. कशा काय, तर थोडा जास्त घेतलेला ताण. अजून थोडा ताण वाढला तर उदाहरणार्थ, परीक्षेच्या काळात खूप टेन्शन आलं होतं, रात्रभर अभ्यास केला आणि मग पेपर सोपा गेला. म्हणजे वर्षभर जे जमलं नाही ते या ताणाच्या वातावरणात जमलं. आता आणखी ताण वाढला तर काय होतं बघू. चिडचिड होते, नैराश्य येतं, कशात रस वाटत नाही आणि परिणाम आपण बघितलाय, गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण सहन न होऊन आत्महत्या केल्या. अनेक शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड न करता आल्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. 

जास्त ताण वाढला तर मात्र कार्यक्षमतेवर परिणाम होऊन ती कमी होऊ लागते. म्हणून ताण हा एका मर्यादेपर्यंत हवा. वाजवीपेक्षा जास्त ताण आरोग्याला हानी पोचवू शकतो. ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेस’ या संस्थेच्या संचालकांनी केलेल्या निरीक्षणात त्यांना अशी एक विचित्र गोष्ट आढळून आली की सतत ताणाखाली काम करणाची सवय झालेली माणसं ताण नसलेल्या वातावरणात कामच करू शकत नाहीत. गंमत म्हणजे इतर फावल्या वेळी ते ताण पडेल असेच खेळ शोधून खेळतात. अशा लोकांना ‘थ्रिल सीकर्स’ असं म्हणतात. (उदाहरण द्यायचं झाल्यास जत्रेत मौतका कुवाँमध्ये मोटरसायकल चालवणारे मोटरसायकलस्वार वगैरे.) अमेरिकेतल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’ चे प्रमुख डॉ. फ्रेड गुडविन यांच्या मते, खूप ताण पडला तरी तो सहन करण्याची ताकद मनुष्यात असते. पण थोड्या थोड्या वेळानं सतत पडणारा ताण हा जास्त त्रासदायक असतो. कारण थोड्या थोड्या कालावधीनंतर येणार्‍या ताणाची वाट पाहणं आणि नवा दाब निर्माण होणं यामुळे आणखीनच ताण वाढू शकतो.

चिंता, ताणतणाव यातून अनेक मनोविकार निर्माण होतात. यात सर्वसामान्य माणसंच नाहीत, तर जगप्रसिद्ध हस्तीही होरपळून निघाल्या आहेत. अब्राहम लिंकन यांचंच उदाहरण घेतलं तर वयाच्या नवव्या वर्षी आईचा मृत्यू झाला. घरची गरिबी आणि शेतकर्‍याच्या मुलगा असल्यानं शिक्षण जेमतेमच झालं. तरूण वयात निवडणुकीतही अपयश आलं आणि व्यवसायातही अपयश आलं. मात्र या सगळ्या गोष्टी पचवून तो पुढे जात राहिला आणि वयाच्या 52 व्या वर्षी अमेरिकेचा अध्यक्ष हे पद भूषवलं. हा अपयशाचा, नैराश्याच आणि औदासिन्याचा प्रवास या माणसानं कसा पार केला असेल, कुठल्या प्रेरणांनी त्याला या ताणतणावांपासून दूर जायला मदत केली असेल? दुसरं उदाहरण बघायचं झालं तर जगप्रसिद्ध शााज्ञ आयझॅक न्यूटन याचं! वडलांचं छत्र हरवलेलं आणि त्यातच आईनं दुसरं लग्न करून आपल्या या लहान मुलाला स्वतःबरोबर न नेता स्वतःच्या आई-वडलांकडे ठेवलेलं. न्यूटनच्या आजी-आजोबांना त्यांच्या वृद्धत्वामुळे त्याला सांभाळायचं नव्हतं. आपल्या मनाविरूद्ध सांभाळ करावा लागत असल्यानं त्यांच्या वागण्यातला तो दुरावा न्यूटननं अनुभवला. या उपेक्षित अवस्थेत तो एकाकीपणा अनुभवू लागला आणि त्याचा स्वभाव विचित्र आणि विक्षिप्त बनला. गुरुत्वाकषर्णाचा शोध असो, वा गतीच्या नियमाबद्दलचं त्याचं संशोधन असो आयुष्यभर त्याच्या स्वभावात झालेले पडसाद त्याच्या कृतीमधूनही दिसत राहिले. न्यूटनला निद्रानाश, भूक न लागणं, लक्ष केंद्रित न होणं असे अँक्झायटी डिसऑर्डरचे बरेच त्रास त्याला होते.  टेनिसन, शार्लोट ब्राँटे, जॉन स्टाईनबेक या साहित्यिकांना तर निकोल किडमन, अँथनी हॉपकिन्स, मायकेल जॅक्सन या कलाकारांना तसंच अ‍ॅसिमोव्ह या शास्त्रज्ञाला अशा अनेक लोकांना चिंतेनं ग्रासलं होतं. 

ताण कमी करण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणं, साध्या जीवनशैलीचा अंगीकार, गरजा कमी ठेवणं, स्वतःतल्या उणिवा आणि क्षमता ओळखणं आणि त्यांचा स्वीकार करणं, व्यसनांपासून दूर राहणं, मनोरंजन, विनोदबुद्धी जोपासणं, छंद जोपासणं, मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवणं, इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवणं, दैनंदिन जीवनात नियमितपणा आणणं, नियमित व्यायाम करणं रोजच्या कामांची ‘टू डू लिस्ट’ करणं, तसंच कोणत्याही कार्यक्रमाची किंवा कामाची पूर्वतयारी करणं, या गोष्टी केल्या तर ताणातून नक्कीच मुक्ती मिळू शकते. ताणापासून मुक्ती मिळवण्याचे अनेक छोटे-छोटे उपाय असतात आणि ते फारसे खर्चिकही नसतात. आपल्या आयुष्यात घडलेले चांगले, आनंदाचे आणि उत्साहाचे काही प्रसंग कायम आपल्या लक्षात राहिलेले असतात. आपल्यावर जेव्हा खूप दडपण आलेलं असतं, आपण त्रासलेलेा असतो तेव्हा गर्दीपासून दूर, एखाद्या शांत ठिकाणी बसून आपल्या आजवरच्या आयुष्यात घडलेल्या आनंदाच्या प्रसंगांची, घटनांची मनात उजळणी करावी, ते प्रसंग पुन्हा आठवावेत. शक्य असल्यास अशा आठवणी ज्यात साठवल्या असतात असे फोटो पहावेत. आपल्या ताणतणावावर उत्तम उपाय म्हणजे एखादी कला आहे किंवा संगीत हा आहे. हलकं फुलकं आनंद निर्माण करणारं संगीत ऐकलं तरी अनेक ताणांपासून सुटका होऊ शकते. तसंच सतत कार्यमग्न राहणं हाही ताणांपासून दूर राहण्याचा खूप चांगला उपाय आहे हे मला या प्रवासात समजलं. चांगले मित्र-मैत्रिणी असतील, तर ताणतणाव लवकर आपला गाशा गुंडाळतात हेही कळलं.

मी तरी माझ्या आयुष्यात ताणतणावांपासून दूर राहण्यासाठी असेच छोटेछोटे मार्ग निवडलेत, जे मला मित्र बनून आजही साथ देताहेत, जे मला सतत ‘बी पॉझिटिव्ह’ चा संदेश देताहेत. 

दीपा देशमुख 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.