नातं तुझं नि माझं - ग्रंथ

नातं तुझं नि माझं - ग्रंथ

खरं तर नातं म्हणजे काय हे कळायच्या आतच त्यांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. मला कळायला लागलं तसं, मी पकडलेलं त्यांचं बोट त्यांनी कधी सोडलं नाही हे विशेष! प्रवास कसाही असो, चढ असो वा उतार असो, पाऊस असो वा उन, ते मूकपणे माझी सोबत करत राहिले. ते माझ्या आयुष्यात नसते तर? ही कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही इतकं हे नातं आता घट्ट झालं आहे. 

आमच्या नात्याची सुरुवात होण्याआधीची पार्श्वभूमी अशी : औंदुबर नावाचा माझा एक मावसभाऊ होता. मुळात औंदुंबर धिप्पाड शरीरयष्टीचा, सावळ्या वर्णाचा, उंचापुरा आणि चित्रपटातल्या अमरिशपुरी वगैरे सारखा दिसायचा. तो कधीही कुठेही स्थिर राहिला नाही. काही कालावधी त्यानं आमच्या घरी काढला. आम्ही सगळीच भावंडं त्या वेळी लहान होतो. रात्रीची जेवणं झाली की औदुंबर आम्हाला गोष्टी सांगायचा. या गोष्टी बरेचदा भुताखेताच्या असायच्या. गोष्टी इतक्या रंगवून तो सांगायचा की ते भूत त्यानं प्रत्यक्ष बघितलंच असावं इतका विश्वास आमचा बसायचा. गोष्टीतल्या वातावरणाप्रमाणे चेहऱ्यावरचे त्याचे हावभाव आणि आवाजातले चढ-उतार बदलत राहायचे. मग रात्रीच्या काळोखात एकटं असण्याची भीतीच वाटायची कारण अचानक औदुंबरच्या गोष्टीतलं भूत प्रत्यक्षात अवतरलं तर, असंही वाटायचं. 

मी तिसरीच्या वर्गात असताना माझ्या वडिलांनी औदुंबरला एक फिरतं वाचनालय काढून दिलं होतं. त्यासाठी त्यांनी मासिकं, दिवाळीअंक, बालसाहित्य आणि मोठ्यांसाठीचीही अनेक पुस्तकं विकत घेतली होती. औदुंबर भल्या मोठ्या पुस्तकांनी भरलेल्या पिशव्या घेऊन सायकलवर टांग मारून वाचनालयासाठी नवीन सदस्य घरोघर जाऊन तर करायचाच, पण सदस्य झालेल्यांना पुस्तकं द्यायलाही जायचा. त्या दोन पिशव्यांव्यतिरिक्त कितीतरी पुस्तकं घरातदेखील असायची आणि मग ती बघताना एक अद्भुत खजिना सापडल्यासारखं वाटायचं. खरं तर वाचनाची सवय ही त्या नकळत्या वयातच लागली. घरात कोणीही हेच वाच आणि असंच वाच असं सुचवलं नव्हतं. पण त्या पुस्तकांनीच ‘ये, आमच्याशी दोस्ती करायला` असं म्हणून बोलावलं होतं. या वयात किशोर, चांदोबा, किलबिल, चंपक, अमृत, दक्षता, पासून बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक, बाबा कदम, नारायण धारप, रत्नाकर मतकरी असे अनेक लेखक आणि त्यांची पुस्तकं वाचत गेले. या सगळ्याच पुस्तकांनी त्या त्या वयात भरभरून दिलं. त्यामुळेच तिसरीच्या वर्गात असतानाच गोष्टी लिहिण्याचा नादही लागला होता.

त्या वेळी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं मिळायची. राजा-राणी, परी, ठकसेन वगैरे....त्यानंतर हळूच चांदोबा आयुष्यात आला. मग किशोर, अमृत, किलबिल, फास्टर फेणे......या सगळ्या पुस्तकांनी पऱ्यांचं राज्य दाखवलं. उडत्या गालिच्यावर बसून आकाशात सैर करवली, तर राक्षसाच्या तावडीतून राजकन्येला कसं सोडवायचं याचेही धडे दिले. या पुस्तकांनी कधी आजीच्या मायाभरल्या स्पर्शाची आठवण दिली, तर कधी मनातल्या द्विधा अवस्थेला निर्णायक स्थितीपर्यंतही पोहोचवलं. ही पुस्तकं कधी मित्र बनली, कधी मार्गदर्शक आणि कधी सल्लागार झाली कळलंच नाही. वयाच्या त्या त्या टप्प्यांमध्ये त्या त्या लेखकांनी, त्या त्या कवींनी साथ दिली. `मामाची रंगीत गाडी` असो की `सदैव सैनिका पुढेच जायचे` असो पुस्तकातली गाणी मनात कितिक वेळ रेंगाळत राहू लागली. `अनामविरा कुठे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात`.....या कवितेनं डोळे भरून आले होते. वसंत बापटांच्या फुंकर आणि इतर अनेक कवितांनी तर मनाच्या तळाशी प्रवेश केला होता....मग अनेक पुस्तकं येत राहिली. दहावीच्या परीक्षेच्या वेळी आदल्या दिवशी रात्रभर जागून वाचलेली `मर्मभेद` कादंबरी आजही विसरता आली नाही.....भयकथा, गूढकथा, साहसकथा, रहस्यकथा, प्रेमकथा, जगभराची सैर करवणारी पुस्तकं आयुष्यात मित्र म्हणून येत गेली. यातून जगभरातली माणसं वाचता आली, त्यांची सुखदुःखं, त्यांचं कार्य, त्यांचं झपाटलेपण अनुभवता आलं. या पुस्तकांमधून अनेक कलाकार भेटले, अनेक वैज्ञानिक भेटले आणि अनेक तत्वज्ञही भेटले. तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, भूगोल अशा एरवी किंचित रुक्ष वाटणाऱ्या विषयांत सुद्धा कादंबरीसारखा थरार असू शकतो, हे समजलं. तुकाराम आणि कबीर यांनी तर `इतरांच्या मनापर्यंत पोहोचणारी भाषा बोला` असं म्हटलं. बालसाहित्यानं मनाला कल्पनेचे पंख दिले. त्यामुळे रोज नवी स्वप्नं बघायची सवय लागली. साहस कथांनी आणि रहस्यकथांनी रहस्य उकलण्याचा नाद लागला. शूरांच्या कथांनी आपणही हातात तलवार घेऊन पराक्रम करायला निघायला हवं असं वाटायचं. तर श्‍यामची आई आणि साने गुरूजींच्या इतर गोष्टी वाचल्यानंतर डोळ्यातल्या अश्रूंनी मुक्त वाट करून दिली होती. त्यांच्यामुळेच तर मानवता हाच खरा धर्म हे समजलं. महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथाचं महत्व विशद केलं, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘पुस्तक आणि भाकरी यापैकी एकाची निवड करायची वेळ आली तर मी भाकरीऐवजी पुस्तकाची निवड करेन.` असं सांगितलं. हेमिंग्वे, गॉर्की, टॉलस्टॉय आणि चेकॉव्ह यांच्या कथा-कादंबऱ्यांनी एक अदभुत प्रवास तर घडवलाच, पण जीवन क्षणभंगुर असून त्यातल्या मूल्यांनाही अधोरेखित केलं. प्रवासवर्णनपर, निसर्गवर्णनांनी सजलेल्या पुस्तकांनी शरीर एकाच जागेवर असलं, तरी मनाला मात्र जगभर फिरवून आणलं. चरित्रपर लिखाणानं मनुष्याचा संघर्ष, वाटेवरचे काटे, त्याची घुसमट, त्याचा आनंद, त्याची जडणघडण उलगडलं. या सगळ्या पुस्तकांनी समानतेचा/समतेचा धागा मनात नकळत पक्का केला होता. खरंच, पुस्तकांनी समृद्ध जीवन कसं असावं याची दिशा दाखवली. 

लहान असताना गंगापूरच्या विठ्ठल मंदिरात हातात छोटीशी गीता घेऊन मी सायंकाळी पाच ते सहा रोज जायची. तिथे एक गुरूजी गीतेचे पाच श्‍लोक रोज मुखोदगत करून घ्यायचे आणि अर्थही समजून सांगायचे. त्या वेळी अर्थ फारसा कळला नाही, तरी ‘धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे समवेता युयुत्सवा` असे ते श्‍लोक, तालात पाठ करायला खूप आवडायचं. आजही ते सगळे श्‍लोक तसेच पाठ आहेत. त्यानंतर साधारणतः पाचवीत असताना आईबरोबर औरंगाबादच्या स. भू. शिक्षणसंस्थेच्या पटांगणावर चिन्मय मिशनच्या व्याख्यानांना मी जात असे. खूप काही कळत होतं असं नाही, पण तरीही ती व्याख्यानं ऐकताना कधी कंटाळा आला नाही. या व्याख्यानांमध्ये भगवद्गगीतेबद्दल बरंच काही असायचं. तसंच जगण्याविषयीचं तत्वज्ञानही असायचं. तेव्हापासून भगवद्गीता, ज्ञानेश्‍वरी, संतवाडमय वाचण्याकडचा ओढा वाढला.  सातवीत असताना ख्रिश्‍चन धर्माविषयीचं कुतूहल वाढीला लागलं होतं. त्या वेळी बरेचदा ख्रिश्‍चन धर्मप्रसारक हातात बायबल घेऊन फिरताना दिसायचे. एकदा तर मी स्वतःच धाडस करून त्यांच्याशी बोलल्यावर ते चक्क आमच्या घरी आले आणि त्यांनी अतिशय प्रेमळपणे गप्पा मारत मला मराठी भाषेतली बायबलची एक प्रतही भेट दिली होती. त्या वेळी त्या मुखपृष्ठावरची येशूची मूर्ती मात्र मनावर घट्ट कोरली गेली. 

वय जसंजसं वाढत गेलं तसतसे त्यात व. पू. काळे, गो. नि. दांडेकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, वि. दा. सावरकर, ह. मो. मराठे, विजय तेंडुलकर, रणजीत देसाई, पु. ल. देशपांडे,  प्र. के. अत्रे, आनंद यादव, रत्नाकर मतकरी, सानिया, गौरी देशपांडे, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चटर्जी, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, वि. स. वाळिंबे, रजनिश, आर. के. नारायण, रस्किन बाँड, विवेकानंद, नामदेव ढसाळ, रामचंद्र गुहा, अमर्त्य सेन, देवदत्त पटनायक, शशी थरूर, अरुंधती रॉय असे अनेक लेखक वाचनात येत गेले. तर दुसरीकडे बा. भ. बोरकर, बालकवी, वसंत बापट, मर्ढेकर, अनिल, भा.रा. तांबे, आरती प्रभू, पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, विं.दा. करंदीकर, कवी जवळचे झाले.  विशेषतः पुल, अत्रे यांचं वाचन जास्त आवडायला लागलं. यातूनच चरित्रपर लिखाण वाचायची गोडी लागली. त्यातून माणूस जाणून घेण्याचा नाद लागला. 

गोविंद पानसरे यांचं ‘शिवाजी कोण होता?` ही पुस्तिका तर घराघरात असायला हवी इतकं तिचं मोल आहे, असं जाणवायला लागलं. पं. जवाहरलाल नेहरूंचा ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया` ग्रंथ वाचून भारताच्या इतिहासाचं एक नवं दालन खुलं झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ‘जातिसंस्थेचे उच्चाटन`, ‘द बुद्घा अँड हिज धम्म`, बुद्घिझम अँड कम्युनिझम`  आणि इतर सर्वच 22 खंडातली ग्रंथसंपदा मानवाच्या मानसिक प्रगतीसाठी किती आवश्‍यक आहेत हे समजलं. साने गुरुजींचं ‘भारतीय संस्कृती` प्रत्येकानं वाचायला हवं, हेही लक्षात आलं.

हळूहळू पुस्तकांनी माझ्या मनात आणि माझ्या घरात आपापली जागा निर्माण केली. बांबूच्या रॅक्नी सगळ्या भिंती भरून गेल्या. जिथे जागा दिसेल तिथे मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषांमधली पुस्तकं विराजमान झाली. खरं तर मला मराठीतून पुस्तकं वाचायला आवडत असलं, तरी हिंदी आणि इंग्रजी यातलंही वाचन हळूहळू वाढत गेलं. कधीतरी गांधीजी एखाद्या पुस्तकातून बाहेर येत आणि मला सांगत,  ‘हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांपेक्षाही अनमोल रत्न कुठलं असेल तर ते म्हणजे पुस्तक`, तर कधी  मार्क ट्वेन म्हणे, ‘चांगले मित्र आणि चांगली पुस्तकं ज्याच्या जवळ असतील, त्याचं जगणं आदर्श असेल.‘ 

वयाच्या टप्प्यात मंगेश पाडगावकरांपासून वसंत बापटांपर्यंत, कुसुमाग्रजांपासून बोरकरांपर्यंत, करंदीकरांपासून नारायण सुर्वेंपर्यंत अनेकांच्या कविता वाचल्या आणि त्यांचा प्रभावही मनावर पडला. गुलजार आणि सफदर हाश्मी यांनी पुस्तकांविषयीचं कवितांमधून केलेलं भाष्य मनाला स्पर्शून गेलं. नव्या पिढीतले वैभव देशमुख, साहिल कबीर, हनुमंत चांदगुडे, देवा झिंजाड, यांसारखे कवी आज आपलेसे वाटायला लागले.  कमीत कमी शब्दांत किती मोठा आशय सांगता येतो हे समजलं. पद्याशी माझी जवळीक कायमची झाली.

खरं तर पुस्तकं माझ्या आयुष्यात आली आणि माझं जगणं त्यांनी बदलून टाकलं. त्यांच्या सान्निध्यात असताना मला लक्षात आलं, मानवी संस्कृती, इतिहास आणि ज्ञान यांची जोपासना करणारे असतात ते ग्रंथ, माणसामधल्या माणुसकीला सतत जागं ठेवण्याचं काम करतात ते असतात ग्रंथ! झाडाची जुनी, वाळलेली पानं गळून पडावीत तशा कित्येक विचारांची पानगळ ही पुस्तकं आपल्यात करवून आणतात. आणि मग नवी पालवी फुटलेल्या मनाला ती नव्या विचारांचे रस्तेही दाखवतात. ही पुस्तकं, हे ग्रंथ भूत, वर्तमान आणि भविष्य काळातल्या गोष्टी, आसपासच्या, ओळखीच्या, अनोळखी असणाऱ्या माणसांच्या गोष्टी, त्यांची सुखदु:खं, यश-अपयश, आशा-निराशा अशा कितीतरी गोष्टींबद्दल आपल्याशी बोलतात, ते जाणवत गेलं.  ‘मिळून साऱ्याजणी‘ च्या परिवारातली माझी मैत्रीण नीलिमा पालवणकर हिची पुस्तकांवर अतिशय सुंदर कविता आहे. ती म्हणते:

पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्यात....
पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या
मग पुस्तकं उधळून टाकतात
वसंतातले सगळे रंग....

खरंच, हे जग देखील हजारो रंगांनी चितारलं गेलंय. त्या प्रत्येक रंगांच्या परत अनेक तरल छटा आणि त्या सगळ्या रंगांना घेऊन कितीतरी पुस्तकांनी माझ्या मनात प्रवेश केला होता. त्याआधी कित्येक रंगांना तर मी बघितलेलंही नव्‍हतं. पुस्तकांची शक्ती दृश्‍य माध्यमापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे ही गोष्ट लक्षात आली. एखादा चित्रपट आपण बघतो तेव्हा ते कथानक काय सांगू पाहतं ते दिग्दर्शक आपल्याला त्याच्या नजरेतून बघायला लावतो. पण पुस्तकं वाचकागणिक एक वेगळंच दृश्‍य तयार करतात. कथा तीच असते, पण वाचणारा त्याच्या नजरेतून वेगळे रंग भरतो. या संदर्भात लॅटिन अमेरिकन नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक गैब्रियल आर्सिया मार्क्वेज याचा एक किस्सा खूपच बोलका आहे. या लेखक महोदयांकडे कोणी चित्रपट निर्माता परवानगी मागण्यासाठी आला की आपल्या पुस्तकांवर चित्रपट करायला ते मनाई करत. त्याचं प्रसिद्ध पुस्तक ‘हंड्रेड ईयर्स ऑफ सॉलिट्यूड` या पुस्तकावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हॉलिवूडवाल्यांनी मार्क्वेजसमोर करोडो डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला.  पण तरीही महाशय आपल्या मतावर आणि आपल्या नकारावर ठामच होते. कोणा एकाने त्याला विचारलं, की ‘तू  लिहिलेल्या तुझ्या पुस्तकांवर चित्रपट बनवण्यास नकार का देतोस?` उत्तरादाखल तो म्हणाला, ‘माझ्या लाखो वाचकांच्या मनात माझ्या पुस्तकातल्या पात्रांच्या प्रतिमा त्यांनी वाचून बनवल्या आहेत. त्या त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. आणि जर चित्रपट बनवला तर या प्रतिमांचं बहुवैविध्य नष्ट होईल, त्यांची कल्पनाशक्ती थांबेल तिचाही एकप्रकारे तो अंतच होईल आणि नेमकं तेच मला नकोय.` खरंच, पुस्तकं ही अशी असतात, सच्ची असतात हे त्यांनीच तर येऊन हितगुज करत माझ्या कानात सांगितलं.

एके दिवशी याच पुस्तकांनी मला ‘अग, तू वाचू शकतेस, तशी लिहू शकतेस’ असंही सांगितलं आणि मला लिहितं केलं. मग त्यातूनच माझ्याकडून तुमचे आमचे सुपरहिरो ही सहा पुस्तकांची मालिका लिहिली गेली. त्यानंतर चित्र-शिल्प कलेवरचं ‘कॅनव्‍हास’ हे ६०० पानी पुस्तक आकाराला आलं, तर पाश्चात्य संगीतावरचं ५५० पानी ‘सिंफनी’ हे पुस्तक जन्माला आलं. जगभरातले आणि भारतातले, ३६शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, गणितज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांच्या आयुष्यावरची आणि कार्यावरची ‘जीनियस’ मालिका तयार झाली. नारायण धारप सारखा गूढ, रहस्य, थरार कथा लिहिणाऱ्या लेखकावर लिहिता आलं, अनवट वाटेवरून चालणाऱ्या पाथफाइंडर्सची ओळख वाचकांना करून देता आली. याच ग्रंथवाचनातून जग बदलणारे ग्रंथ हेही पुस्तक लिहिता आलं.

जे वाचलं होतं, तेच इतरांना सांगण्यासाठी, इतरांना त्या त्या ग्रंथाचा आस्वाद घेण्यासाठी, त्यांची ओळख करून देण्यासाठी मन उत्सुक झालं आणि मग जगावर प्रभाव टाकणाऱ्या, जग बदलणाऱ्या एक एक ग्रंथांविषयी लिहायला सुरुवात झाली. खरं तर  या निमित्ताने मी एका नव्या जगात प्रवेश केला. ‘भगवद्गगीते’वर लिहिताना जाणवलं की गीता ही माणसाला सत्य आणि सदाचार यांचा मार्ग दाखवते. खरं तर भगवद्गीता म्हणजे आयुष्य समृद्ध करण्यासाठी चढायची एक एक पायरी आहे. गीतेच्या अध्ययनामुळे आत्मपरीक्षण, संयम, ध्यान, योग, दया यांचं ज्ञान प्राप्त होतं. अनेक प्रसंगात माणसाचं मन द्विधा होतं आणि मनात कोलाहल माजतो. अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नाही अशा वेळी गीतेच्या पठणानं त्याचं मन शांत होतं. ’त्रिपिटक’ या ग्रंथाचा अभ्यास करताना गौतम बुद्घामधला वैज्ञानिक दिसला. ‘मी सांगतो म्हणून त्यावर विश्‍वास ठेवू नका, तर कुठल्याही प्रश्‍नाची चिकित्सा करा, प्रश्‍न विचारा आणि त्यानंतर डोळसपणे निर्णय घ्या` असं म्हणणारा बुद्ध खूप भावला. बायबलचा अभ्यास करताना अंधारातून आशेचा किरण दिसावा तसंच काहीसं वाटलं. कुरआन अभ्यासताना तर कायदे, कर, व्यापार,  न्याय, नैतिक कर्तव्य, स्त्रियांचें हक्क आणि अधिकार, यासारख्या अनेक बाबतीतली माहिती मिळून अनेक गैरसमज दूर झाले.

इ.स. पूर्व 5 व्या शतकाच्या वेळी सन त्सूनं लिहिलेलं ‘आर्ट ऑफ वॉर` हे पुस्तक आजही तितकंच उपयोगी असल्याचं पाहून धक्काच बसला. त्याचा लेखक सन त्सू याच्या दूरदृष्टीची कमाल वाटली. आजही मॅनेजमेंटपासून अनेक क्षेत्रात या पुस्तकाचा वापर केला जातो. थॉमस मोरचं ‘युटोपिया` हे आदर्श राज्याविषयी बोलणारा ग्रंथही तितकाच शिकवून गेला आणि स्वप्नाचं जग वास्तवात आणता येतं याचा प्रत्यय देऊन गेला. आज स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अशा पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतात.  निसर्गातल्या प्रजातींचं वगीकरण करताना झपाटलेला लिनियस हा ‘सिस्टिमा नॅचरे` या पुस्तकातून भेटला, तर हॉकिंगसारखाच आपल्या शरीराची स्नायू दुर्बलता स्वीकारून ‘डिक्शनरी`चं महाकाय शब्दकोशाचं काम करणारा सॅम्युअल जॉन्सन ग्रंथ लिहिताना ‘प्रयत्नांती परमेश्‍वर` सांगून गेला. 

गॅलिलिओचं ‘डायलॉग’, असो की न्यूटनचं ‘प्रिन्सिपिया` असो, की आईन्स्टाईनचं ‘रिलेटिव्हिटी` असो त्यातलं विज्ञान समजून घेताना त्यांच्या आयुष्यानं, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यानं माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. स्टीफन हॉकिंगच्या दुदर्म इच्छाशक्तीकडे बघून मन केव्हाच नतमस्तक झालं होतं, पण त्याच्या ‘ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम` या पुस्तकानं सोपं कसं लिहावं याचा वस्तूपाठ घालून दिला. कार्ल मार्क्सचं ‘दास कॅपिटल` असो की ॲडम स्मिथचं ‘वेल्थ ऑफ नेशन्स` असो, अथवा केन्सची ‘जनरल एम्प्लॉयमेंट थिअरी` असो, स्टिग्लिट्झचं ‘ग्लोबलायझेशन अँड इट्स डिसकंटेट्स` असो, की थॉमस माल्थसचं ‘पॉप्युलेशन`वरचं पुस्तक असो, मिल्टन फ्रीडमनचं ‘कॅपिटॅलिझम अँड फ्रीडम` असो, या अर्थतज्ज्ञांची ओळख ‘ग्रंथ` लिहिताना अधिक विस्तारानं झाली. ‘ग्रंथ` लिहिताना त्यात मानसशास्त्रीय अंगाचा विचार करणारे मानसशास्त्रज्ञ आणि त्यांचे ग्रंथ यांचाही समावेश झाला. विशेषतः ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स` हे फ्रॉईडचं पुस्तक सखोल वाचता आलं. स्किनरचं बिहेरिअरिझम, पिॲजेचं मुलांच्या मानसशास्त्राविषयी, तर व्हिक्टर फ्रँकेल, एरिक फ्रॉम, अल्बर्ट एलिस, मिल्टन फ्रीडमन, डॅनियल गोलमन यांचे ग्रंथ या ‘ग्रंथदिंडीत` सामील झाले. थोरोचं निसर्गप्रेम आणि त्याचं ‘सिव्हिल डिसओबिडियन्स` आणि डार्विनचं ‘द ओरिजीन ऑफ स्पिशिज` अभ्यासताना डोळेच पांढरे झाले. संशोधन कशाला म्हणतात, झपाटल्यासारखं काम कसं केलं जातं हे डार्विननं शिकवलं. ग्रेगॉर मेंडेलचं आनुवंशिकतेविषयीची तत्वं अभ्यासता आली. प्रसारमाध्यमांवर नियंत्रण असणारे कॉर्पोरेट्स, राजकारण, जाहिराती अशा अनेक गोष्टींविषयी नोम चॉम्स्की यानं ‘मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट` या ग्रंथातून सजग केलं.

सगळ्यात खरी मौज आली ती वास्त्यायनाचं ‘कामसूत्र` या 2400 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रंथाचा अभ्यास करताना. कामसूत्राविषयी माहिती मिळाली, पण वात्स्यायनाचं वैयक्तिक आयुष्य सापडत नव्हतं. अखेर तेही महत्सप्रयासानं सापडलं आणि कामसूत्राला परिपूर्ण रूप देता आलं. मनुष्यानं कसं जगावं याची दिशा देणारा ‘कामसूत्र` हा ग्रंथ किती महत्वाचा आहे हेही कळलं. रसेलच्या ‘मॅरेज अँड मॉरल्स`नं नव्यानं या विषयाकडे बघायचं शिकवलं. ‘द सेकंड सेक्स` या सिमॉन द बोवाँ या लेखिकेनं स्त्री म्हणून मला अंतर्मनात डोकावून बघायला लावलं. त्याचबरोबर ‘फेमिनाईन मिस्टिक` लिहिणारी बेट्टी फ्राईडन हिनं तर माझ्या अस्तित्वाचीच जाणीव करून दिली.

टागोरांच्या ‘गीतांजली`नं विश्‍वाशी नातं जोडायचं कसं हे अलवारपणे सांगितलं, तर त्याच वेळी महात्मा गांधींच्या ‘सत्याच्या प्रयोगा`नंही चकित करून सोडलं. माणसांच्या प्रेरणांविषयी अब्राहम मॅस्लो यानं विचार करायला भाग पाडलं. तर आजच्या काळात प्रसारमाध्यमांची भूमिका  1964 सालीच मार्शल मॅकलुहान यांनी त्याच्या ‘अंडरस्टँडिंग मीडिया` या ग्रंथातून गांभीर्यानं करून दिली होती. सामाजिक परिस्थितीची जाणीव ‘सायलेंट स्प्रिंग` या ग्रंथातून रॅचेल कार्सननं करून दिली आणि ‘सेपियन्स`नं मानवाच्या प्रवासाची गाथाच युवाल नोआ हरारीनं उलगडून दाखवली. सेपियन्स लिहिताना कथा मानवप्राण्याची हे सेपियन्सशी साधर्म्य दर्शवणारं नंदा खरे यांनी लिहिलेलं पुस्तक सतत आठवत राहिलं. विशेष म्हणजे सेपियन्सच्या 10 वर्ष आधीच हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. 

पुस्तकं आणि माझं नातं दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत चाललं आहे. जेव्‍हा पुस्तक माझ्या हातात असतं, तेव्‍हा काळ/वेळ/स्थळ ह्या सगळ्या बाबी गौण वाटतात. भौगोलिक सीमांची बंधनं गळून पडतात आणि काळाची सीमा शिल्लक राहत नाही, असं वाटतं. एखाद्या ग्रंथांची सोबत असली, की कुणावरही अवलंबून राहावं लागतं नाही. अगदी आजारपण सुद्धा सुसह्य होतं!! ‘ग्रंथ’ कधी माणसाचं रूप घेतात, तर कधी निसर्ग बनून दर्शन देतात. कधी हेच ‘ग्रंथ‘ परिस्थिती बनून समोर येतात आणि आपल्याला सशक्त, सजग आणि सुजाण बनवतात. खरं तर आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न करणारे, आपला राग-लोभ-मत्सर न करणारे, तरीही भरभरून देणारे ‘ग्रंथ‘ आपले जीवलग मित्र आहेत असं मला वाटतं. 

कधी या पुस्तकांनी मला तू लिहू शकतेस असं कौतुकानं म्हटलं, तर कधी तू गाणं गाऊ शकतेस असं म्हणून गायला प्रेरित केलं. याच पुस्तकांनी मला संवेदनशील माणूस व्‍हायला शिकवलं. जात, धर्म, पंथ, वर्ण, स्तर या सगळ्या पलीकडे जाऊन मानवता हा एकच धर्म सांगून तो जपण्याचं बळ दिलं. पुस्तकांनी मला संयमाचं भान दिलं, जगण्यासाठीचं ज्ञान दिलं. 

अशा रीतीनं कितीतरी पुस्तकांनी माझ्या जगण्याचा एक मोठा हिस्सा व्‍यापून टाकला. माझं आणि त्यांचं नातं हे लिहिण्या-सांगण्यापलीकडचं आहे.  आपल्यातच सामावून गेलेल्या या नात्याबद्दल पुस्तकांना म्हणावसं वाटतं : 

नातं तुझं नि माझं, 
माझ्यातल्याच ‘मी’ला अधिक समृध्द करणारं...
नातं तुझं नि माझं, 
कधी इवलासा बिंदू, तर कधी अवघं विश्व होणारं...

दीपा देशमुख, पुणे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.