जगावर प्रभाव टाकणारी पुस्तकं - शब्द दीप दिवाळी 2019
पुस्तकं जशी वैयक्तिक आयुष्य बदलून टाकतात, तशीच ती समाजालाही बदलून टाकण्याची ताकद बाळगतात. हिंदीतले विख्यात साहित्यिक निर्मल वर्मा म्हणतात की मी पुस्तक वाचण्याआधी जो होतो, तो पुस्तक वाचल्यानंतर तसा राहत नाही. माणसाला आरपार बदलून टाकण्याची किमया ही पुस्तकं जशी करतात तशीच ती संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकत असतात. पुस्तकांचं महत्व अधोरेखित करणार्या सफदर हाश्मी, गुलजार यांच्या कविता अतिशय सुरेश आहेत. संपूर्ण जग बदलण्याची ताकद असलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांची ओळख करून घ्यायला हवी.
‘डॉयलॉग’ आणि गॅलिलिओ
हजारो वर्षांच्या जगाबद्दलच्या चुकीच्या समजुतींना तडा देण्याचं काम 1632 साली प्रकाशित झालेल्या ‘डॉयलॉग’ या ग्रंथानं केलं. या ग्रंथकर्त्याला सत्य लिहिण्याची किंमतही मोजावी लागली. हा ग्रंथ लिहिणारा माणूस कोणी साधासुधा नव्हता, तर ज्याला जग आधुनिक विज्ञानाचा पितामह म्हणून ओळखतं तो गॅलिलिओ गॅलिली होता!
गॅलिलिओनं डॉयलॉग लिहिण्यामागची प्रेरणा आणि कारणं कोणती होती? डॉयलॉगमुळे कुठल्या रूढ समजुतींना तडा गेला आणि त्याच्या सत्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली? त्या काळात ख्रिश्चन धर्म आणि अॅरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्वज्ञान यांचा पगडा समाजावर प्रचंड प्रमाणात होता. अॅरिस्टॉटल, टॉलेमी यांच्या मते पृथ्वी ही महत्त्वाची आणि म्हणून केंद्रस्थानी असून तिच्याभोवती सूर्य फिरतो. या म्हणण्याच्या विरोधात जर कोणी आपलं मत नोंदवलं तर त्याला धर्मद्रोही ठरवून त्याला कठोर शिक्षा होत असे. असं 2000 वर्षं चाललेलं होतं. त्यानंतर पहिल्यांदा कोपर्निकसनं मात्र पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हटलं होतं. पण त्याकडे फारसं कोणी लक्षच दिलं नव्हतं. असं सगळं असतानाही गॅलिलिओनं वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी पृथ्वी भोवती सूर्य फिरत नसून सूर्याभोवती पृथ्वी फिरते असं म्हटलं आणि तिथूनच खरा गोंधळ सुरू झाला.
आपलं म्हणणं मांडण्यासाठी गॅलिलिओ पडुआ विद्यापीठात प्रोफेसर असताना त्यानं ‘डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स’ या शीर्षकाचं पुस्तक लिहिलं. याचंच सुटसुटीत नाव म्हणजे ‘डॉयलॉग’! हे पुस्तक लिहिताना त्यानं धर्ममार्तंड आपल्याला त्रास देऊ नयेत म्हणून खूप सावधगिरी बाळगली. ‘डायलॉग’ या पुस्तकात कोपर्निकसचे विचार आणि आधुनिक गतिशाा यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला. या पुस्तकातले संवाद किंवा संभाषण चार दिवसांमध्ये विभागलेले दाखवले होते. पहिल्या दिवशी त्यांची अॅरिस्टॉटलच्या पद्धतीमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातल्या मूलतत्त्वांमध्ये दाखवलेला फरक, दुसर्या दिवशी पृथ्वीचं रोजचं परिभ्रमण, तिसर्या दिवशी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं वर्षाचं फिरणं आणि चौथ्या दिवशी समुद्राची भरती-ओहोटी असं या पुस्तकाचं स्वरूप होतं.
‘डायलॉग’ या पुस्तकात त्यानं तीन माणसांचा संवाद मोठ्या नाट्यपूर्ण तर्हेनं लिहिला होता. ‘सिंप्लिसिओ‘ नावाचा एक जुनाट माणूस त्यात चितारला होता. तो त्या वेळच्या पोपप्रमाणेच काहीतरी चुकीचं अवैज्ञानिक बोलतोय असं त्यात दाखवलं होतं. पण त्याचबरोबर सॅल्व्हिएटी नावाचा एक मनुष्य खगोलशास्त्रातले, कोपर्निकसचे आधुनिक विचार मांडतांना दाखवला होता आणि सॅग्रडो नावाचा एक निवेदक दाखवला होता. सिंप्लिसिओ आणि सॅल्व्हिएटी यांच्यातल्या वादविवादात गॅलिलिओनं चातुर्यानं सिंप्लिसिओ जिंकतो असं वरवर दाखवलं असलं तरी ‘सॅल्व्हिएटीचेच युक्तिवाद खरं तर बरोबर कसे आहेत असंच त्यातून व्यक्त होत होतं. ‘डायलॉग’ हा ग्रंथ म्हणजे वाचकांसाठी बौद्धिक मेजवानीच होती. वैज्ञानिक दृष्टिकोन, रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत वापरून लिहिलेला हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला.
15 फेब्रुवारी 1564 या दिवशी इटलीमधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे एका कुटुंबात गॅलिलिओचा जन्म झाला. अतिशय मनस्वी असलेल्या गॅलिलिओला गोष्टी रचायला आवडायचं आणि त्या गोष्टींतून कठीण विषय सोपा कसा करून सांगायचा याचं कसबही त्याच्याकडे होतं. गणितासारखा रूक्ष, किचकट विषय देखील तो गोष्टींमध्ये गुंफून अशा काही तर्हेनं सांगत असे की ऐकणार्याला गणिताची गोडी निर्माण झालीच पाहिजे. त्यानं पुढे समुद्री यात्रा करणार्यांसाठी उच्चत्तम प्रतीचा एक कंपास बनवला होता. त्यानं थर्मामीटर, सूक्ष्मदर्शक, पेंड्युलमचं घड्याळ, खूप कमी वजन मोजण्यासाठी केलेला तराजू आणि पंप अशा अनेक गोष्टींचे शोध लावले. तसंच त्यानं भौतिकशास्त्रातले गतीचे नियम सिद्ध केले. त्यानं सांगितलेला जडत्वाचा नियम तर जगप्रसिद्ध झाला. गॅलिलिओनं पिसाच्या मनोर्याद्वारे आपला प्रयोग सिद्ध केला आणि वस्तूच्या खाली पडण्याचा वेळ हा त्याच्या वस्तूमानावर अवलंबून नसतो हे सिद्ध करून दाखवलं. वेग (व्हेलॅसिटी) याची कल्पना वैज्ञानिक परिभाषेत त्यानंच मांडली. 1609 साली त्यानं दुर्बिण (टेलिस्कोप) बनवली. आपलं कुतूहल फक्त ‘का?’ विचारून थांबायला नको, तर ‘कसं?’ असा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि त्या दिशेनं शोध घेतला पाहिजे असं तो म्हणे. कोणतीही गोष्ट प्रयोगानं सिद्ध केल्याशिवाय त्यानं खरी मानली नाही.
गॅलिलिओला खरं बोलण्याची किंमत आयुष्याच्या अखेरपर्यंत मोजावी लागली. त्याबरोबर चर्चनं गॅलिलिओविरोधात मोहीम उघडली आणि त्याच्या पुस्तकांवर बंदी आणली. त्याच्याकडून जबरदस्तीनं सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं लिहून घेतलं आणि एवढ्यावरच समाधान झालं नाही म्हणून त्याला तुरुंगात डांबलं. त्याचा अतोनात छळ केला. आयुष्याच्या अखेरीस तर गॅलिलिओची दृष्टीही अधू झाली. मात्र तरीही तो आपलं काम करतच राहिला.
8 जानेवारी 1642 रोजी गॅलिलिओ मृत्यूमुखी पडला. गॅलिलिओच्या मृत्यू नंतर तब्बल 340 वर्षांनी म्हणजे 1982 साली ‘सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो या विषयीची जुनीच केस पुन्हा चर्चमध्ये उभी राहिली. मग त्यावर 10 वर्ष विचार आणि उलटसुलट वाद-प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून 1992 साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी ‘गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच (सूर्याभोवती) फिरते’ हे कबूल केलं. तेव्हा ही बातमी ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या मथळ्यावर झळकली होती! गॅलिलिओ आणि त्याचा डायलॉग हा ग्रंथ याचं ऋण जगातला कुठलाही माणूस कधीच विसरू शकणार नाही हे मात्र खरं!
‘प्रिन्सिपिया’ आणि न्यूटन
ज्या वर्षी गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी आयझॅक न्यूटनचा जन्म झाला. न्यूटन हा एक महाविक्षिप्त माणूस होता. त्यानं ग्रहांचं भमण लंबवर्तुळाकार का असतं यावर संशोधन केलं होतं. मात्र हे संशोधन आपल्या विचित्र स्वभावामुळे त्यानं तब्बल 10 ते 15 वर्षं लपवून ठेवलं होतं. त्या संशोधनावर आधारित असलेल्या ग्रंथाचं नाव ‘द मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी’ असं असलं, तरी लोक ‘प्रिन्सिपिया’ या छोटेखानी नावानं या ग्रंथाचा उल्लेख करतात आणि तो विज्ञानाच्या इतिहासातला सगळ्यात महान ग्रंथ मानला जातो. या ग्रंथानं विज्ञानाचा चेहरामोहराच बदलून गेला!
‘प्रिन्सिपिया’ या ग्रंथात सुरुवातीला काही व्याख्या आणि गतिविषयीचे नियम मांडले आहेत. त्यानंतर पहिल्या भागात कसलाही प्रतिरोध (रेझिस्टन्स) नसणार्या वस्तूंच्या गतिविषयी (गणितं) आहेत. दुसर्या भागात कुठल्याही माध्यमातून जात असणार्या वस्तूंच्या गतिविषयी प्रमेयं आहेत. तिसर्या भागात अवकाशातल्या ग्रहतार्यांच्या रचनेविषयीची स्पष्टीकरणं दिलेली आहेत. ‘प्रिन्सिपिया’त न्यूटननं गुरुत्वाकर्षणाविषयी देखील लिहिलं होतं. 1686-87 मध्ये हा ग्रंथ तयार झाला. न्यूटनचा मित्र हॅली यानं प्रिन्सिपिया प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती.
खरं तर न्यूटनचा प्रिन्सिपिया ग्रंथ प्रसिद्ध करणं हे काही सोपं काम नव्हतं. याला कारण विचित्र स्वभावाचा न्यूटन ग्रंथ छापायला दिल्यावरही पुन्हा त्यात हस्तक्षेप करून काही माहिती टाकायचा, तर काही कमी करायचा. असं सगळं करत त्यानं हॅलीला जे भलंमोठं बाड छापायला दिलं, ते दिल्यावर या ग्रंथाचा तो पहिलाच भाग असून दुसरा आपण लिहीत असल्याचं सांगितलं. हे ऐकून हॅली उडालाच. मात्र काहीच दिवसांत न्यूटननं हॅलीला तितकाच जाडजूड दुसरा भागही दिला. एकदाच काय ते सगळे भाग दे असं हॅलीनं सांगितल्यावर शेवटी न्यूटननं हॅलीला प्रिन्सिपियाचा तिसराही भाग पूर्ण करून दिला.
न्यूटननं लिहिलेला ‘प्रिन्सिपिया‘ हा ग्रंथ संशोधक मंडळींना पटकन समजण्यासारखा असला तरी सर्वसामान्य लोकांना मात्र तो अजिबात कळण्यासारखा नव्हता. त्यातली गणितं खूप किचकट होती, तसंच त्यातली भाषासुद्धा क्लिष्ट होती. ‘कुठलेही फालतू लोक आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे उगीच नसत्या शंकाकुशंका काढतील‘ असं वाटून न्यूटननं प्रिन्सिपिया मुद्दामच बोजड आणि क्लिष्ट केला. त्यामुळे तो ग्रंथ कुणी ते वाचायलाच तयार होईना. एका उमरावानं तर त्यात काय लिहिलंय हे जर कुणी समजावून सांगितलं तर त्याला चक्क 500 पौंडांचं बक्षीसही ठेवलं होतं! एकदा न्यूटन केंब्रिजमधल्या आपल्या खोलीजवळून चाललेला असताना तिथला एक विद्यार्थी म्हणाला ‘तो बघा न समजणार्या प्रिन्सिपिया पुस्तकाचा लेखक!’ तरीही ‘प्रिन्सिपिया’मुळे न्यूटनला प्रचंडच प्रसिद्धी मिळाली. तो रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. त्याचे फोटो अनेक घरांत टांगलेले असत. ‘सर’ हा किताब मिळालेला तो पहिलाच शास्त्रज्ञ होता!
‘प्रिन्सिपिया‘ या ग्रंथामध्ये जगाचा आणि अवकाशाचा व्यवहार कसा चालतो याविषयीचं विवेचन होतं. उदाहरणार्थ, झाडाला लागलेलं एखादं सफरचंद तुटतं तेव्हा ते वर न जाता किंवा तिथेच न थांबता जमिनीकडे ज्या नियमांनी आकर्षित होतं त्याच गुरुत्वाकर्षणाच्या नियमांमुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहतो आणि इतर अनेक ग्रह सूर्याभोवती फिरतात. याचाच अर्थ असा की हा समजायला अतिशय सोपा असलेला गुरुत्वाकर्षणाचा नियम विश्वात सगळीकडेच सारखेपणानं वापरता येतो असं न्यूटनची थिअरी सांगत होती. यामुळे अर्थातच प्रचंड खळबळ माजली. न्यूटननं हे सगळं लिहिण्यापूर्वी लोकांची समजूत एकदम वेगळी होती. पृथ्वीवर जे घडतं त्याचा अवकाशातल्या कशाशीच काहीही संबंध नसतो असं सगळ्यांना वाटायचं. म्हणजेच दोन्हीकडची परिस्थिती तर पूर्णपणे वेगळी असतेच, पण शिवाय दोन्हीकडचे नियमसुद्धा एकदम वेगळे असतात असंच सगळ्यांचं मत होतं. न्यूटननं आपले सिद्धांत मांडण्याच्या आधी अवकाशातला सगळा कारभार देवाच्या इच्छेनं चालतो हे मत बहुतेक सगळ्यांनी मान्य करण्याला दुसरा पर्यायच नव्हता. कारण तिथे नक्की काय चालतं आणि ते कोण घडवतं हे समजून घेणं माणसाच्या कल्पनाशक्तीच्यासुद्धा पलीकडचं आहे असं मानलं जायचं. आता न्यूटननं या सगळ्या विचाराला जोरदार धक्का दिला होता.
‘प्रिन्सिपिया‘नं तर हे सगळं थोतांड बंद करून अख्ख्या विश्वाच्या कारभाराला अतिशय सुसूत्रतेनं चालणार्या आणि तर्कबुद्धीला पटतील अशा नियमांमध्ये बांधून टाकलं होतं. विज्ञानाच्या जगानं घेतलेली ही गरूडभरारीच होती. सगळीकडे खळबळ माजवणारी आणि त्या काळच्या रूढ विचारांना उलथून दूर फेकणारी ही घटना होती. साहजिकच ‘प्रिन्सिपिया’नं जगभर सनसनाटी निर्माण केली.
25 डिसेंबर 1642 या ख्रिसमसच्या दिवशी इंग्लंडमध्ये आयझॅक आणि हॅना या जोडप्याच्या पोटी आयझॅक न्यूटनचा जन्म झाला. न्यूटनचा जन्म होण्याच्या तीन महिने आधी त्याचे वडील वारले. तो तीन वर्षांचा असताना त्याच्या आईचं दुसरं एका श्रीमंत आणि विधुर असलेल्या माणसाबरोबर झालं. सासरी जाताना तिनं न्यूटनला आपल्या आई-वडिलांजवळ ठेवलं. वृद्धावस्थमुळे न्यूटनचे आजी-आजोबांना त्याच्यावर चिडचिड करायचे. यामुळे न्यूटन एकलकोंडा आणि विक्षिप्त बनला. त्याचा हा विचित्र स्वभाव शेवटपर्यंत कायम राहिला.
न्यूटननं अनेक विचारवंतांची आणि तत्त्वज्ञांची, वैज्ञानिकांची पुस्तकं वाचली. अनेक क्लिष्ट आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गणितांच्या पायर्यांनी भरलेले हिशेब न्यूटन अगदी सहजपणे मनातल्या मनात करायचा. न्यूटननं प्रकाश या विषयावर संशोधन केलं. त्यानं कॅल्क्युलसचा शोध लावला. त्यानं गुरूत्वाकर्षणाची थिअरी मांडली. तसंच त्यानं गतीचे नियम शोधून काढले.
20 मार्च 1727 या दिवशी वयाच्या 83व्या वर्षी लंडनमध्ये न्यूटनचा मृत्यू झाला. न्यूटनच्या ताकदीचा शास्त्रज्ञ पुढची अनेक शतकं झाला नाही. पुढे भारतीय नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांनी न्यूटनच्या प्रिन्सिपियामधलं गणिताचं वैभव आणि सौंदर्य सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या हेतूनं हा ग्रंथ पुन्हा लिहायला घेतला. ‘न्यूटन्स प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर’ हा चंद्रशेखर यांनी लिहिलेला ग्रंथ न्यूटनच्या प्रिन्सिपियावर लिहिलेल्या ग्रंथांपैकी जगातला सगळ्यात उत्कृष्ट ग्रंथ समजला जातो.
‘वेल्थ ऑफ नेशन्स’ आणि अॅडम स्मिथ
अर्थशास्त्रात 1776 साली प्रसिद्ध झालेलं अॅडम स्मिथचं ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे एक अर्थशास्त्रातलं लँडमार्क पुस्तक ठरलं. त्याच्याशी बरोबरी करु शकेल असं एकच पुस्तक तब्बल 100 वर्षांनंतर लिहिलं गेलं आणि ते म्हणजे कार्ल मार्क्सचं ‘दास कॅपिटल’! आणि खरं तर असंही म्हणता येईल की ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ निर्माण झालं नसतं तर कार्ल मार्क्सचं ‘दास कॅपिटल’ही तितकं प्रभावी ठरलं नसतं! त्या वेळी भांडवलशाहीची नुकतीच सुरूवात होत होती. ‘वेल्थ ऑफ नेशन्स’नं याच काळात स्पर्धात्मक भांडवलशाहीचं समर्थनच फक्त केलं नाही, तर त्याची तत्वंही मांडली.
‘या पुस्तकात अॅडम स्मिथनं गोष्ट सांगावी तसं अगदी सोप्या भाषेत अर्थशास्त्र शिकवलंय. या पुस्तकात अर्थशास्त्राशिवाय समाजशास्त्र, नैतिकता, अशा अनेक विषयांवर त्यानं भाष्य केलंय. त्यातला प्रत्येक युक्तिवाद एवढा सखोल आहे आणि त्यात स्मिथनं इतकी उदाहरणं दिली आहेत की वाचक त्यात गुंतून जातो!
यात स्मिथनं पिळवणूक झालेल्या गरिबांविषयीही आस्था आणि कणव दाखवली आहे. वाढत्या उद्योगविश्वानं आणि भांडवलदार वर्गानं स्मिथला आपला पुरस्कर्ता मानला असला तरीही त्याचं मन तळागाळातल्या माणसांकडे झेपावत असे. ‘कष्टकर्यांचे पगार वाढले तर किंमती वाढतील आणि त्याचा देशातल्या विक्रीवर आणि देशाबाहेरच्या निर्यातीवर वाईट परिणाम होईल’ अशी मालकवर्ग नेहमीच तक्रार करतो. पण आपण स्वत: भरमसाठ नफा घेतल्यामुळेही तोच परिणाम होतो याविषयी मात्र तो गप्प राहातो’ अशीही टीका स्मिथनं केली आहे. किंवा त्याच उद्योगातले लोक सहसा एकत्र भेटत नाहीत, अगदी मजा मारण्यासाठीही नाही. आणि एकत्र आलेच तरी ते एकत्र येऊन वस्तूंच्या किंमती कशा वाढवता येतील याविषयीच चर्चा करतात असं स्मिथ म्हणे. खुल्या स्पर्धेच्या आड येणार्या कुठल्याही गोष्टीचा स्मिथला तिटकारा होता.
स्मिथचं पुस्तक आशावादी होतं आणि गंमत म्हणजे हा आशावाद माणसाच्या दयाळूपणातून निर्माण न होता प्रत्येक माणसाच्या स्वार्थीपणातून निर्माण झाला होता! प्रत्येकजण स्वत:ची स्थिती सुधारण्यासाठी योग्य तो उद्योग किंवा नोकरी करेल असं स्मिथनं गृहीत धरलं होतं. प्रत्येकानं स्वतःचं हित आणि स्वार्थ याकडे लक्ष दिलं तर सगळ्यांचंच त्यातून कल्याण होईल, असं तो म्हणायचा. उदाहरणार्थ, समजा अनेक कारखानदार हातमोजे तयार करताहेत. आता जास्त नफा मिळवण्यासाठी जर त्यातल्या एकानंच त्यांची किंमत वाढवली तर लोक त्याच्या इतर स्पर्धक कारखानदारांकडून हातमोजे घ्यायला सुरुवात करतील. त्यामुळे तो अव्वाच्या सव्वा किंमत वाढवूच शकणार नाही. म्हणजे कारखानदार आणि लोक हे सगळेच जरी स्वहिताच्या दृष्टीनंच वागत असले तरी त्यात सगळ्यांचंच भलं होतं. तसंच बाजारपेठेची यंत्रणा कुठल्या गोष्टीचं किती उत्पादन करायचं हेही ठरवते. समजा लोकांची मागणी हातमोज्यांऐवजी बुटांची वाढली पण त्यांचा पुरवठा कमी असेल तर त्यांची किंमत वाढेल. त्यामुळे आता बूट विकून जास्त नफा मिळायला लागेल. त्यामुळे बरेच कारखानदार बूट जास्त बनवायला लागतील. त्यामुळे बुटांचं उत्पादन वाढून पुरवठा वाढल्यामुळे त्यांची किंमत कमी होईल. आणि त्यामुळे पुन्हा ग्राहकांचाच फायदा होईल. अशा तर्हेनं किती उत्पादन करावं आणि ते केवढ्याला विकावं हे बाजारपेठेचा ‘अदृश्य हात’ ठरवत असतो आणि त्यातूनच सगळ्यांचं भलं होतं. स्मिथचा हा अदृश्य हात खूपच गाजला.
शिवाय या बाजारपेठेत असंख्य स्पर्धक आहेत आणि त्यांना प्रत्येक वस्तू उत्पादन करण्याची सारखीच संधी आहे असं गृहीत धरलं तर या व्यवस्थेमुळे सगळ्या वस्तूंचं योग्य प्रमाणात, चांगल्या दर्जाचं आणि कमीतकमी किंमतीला उत्पादन स्मिथच्या मॉडेलमध्ये होत होतं. कारण एखाद्या कंपनीच्या एखाद्या वस्तूची किंमत जास्त असेल किंवा तिचा दर्जा कमी असेल तर ग्राहक त्या कंपनीकडून वस्तू विकत घेण्याऐवजी त्या कंपनीच्या स्पर्धकाकडून वस्तू विकत घेतील आणि मग ती कंपनी स्पर्धेमधून बाहेर तरी फेकली जाईल किंवा तिला नवं तंत्रज्ञान वापरुन मालाचा दर्जा वाढवावा लागेल आणि शिवाय किंमत कमी करावी लागेल. थोडक्यात स्पर्धेमुळे आपोआपच तांत्रिक प्रगती होते आणि मालाचा दर्जाही सुधारतो आणि हे करण्यासाठी कुठलंही सरकार किंवा कुठलंही नियोजन करणारी बाहेरची यंत्रणा लागत नाही. बाजारपेठेचे नियम (म्हणजेच बाजारपेठेचे अदृश्य हात) सगळं आपोआप हे सगळं साध्य करतात!
‘वेल्थ ऑफ नेशन्स’च्या पहिल्या भागात श्रमविभागणी आणि त्याचे फायदे यांच्याविषयी स्मिथनं लिहिलं आहे. ‘जितकी बाजारपेठ समृद्ध होईल आणि वाहतुकीमुळे ती जशी सगळीकडे पसरेल तशी श्रमविभागणीची गरज आणि त्यामुळे प्रत्यक्ष श्रमविभागणी वाढेल’. स्मिथनं इंग्लंडची आर्थिक वाढ का झाली हेही या पुस्तकात लिहिलं. इंग्लंडमध्ये हवामान आणि जमीन यांची अनुकुलता इतर देशांपेक्षा कमी असूनही या प्रगतीचं कारण स्मिथला श्रमविभागणीत सापडलं. इंग्लंडमध्ये उत्पादनात श्रमविभागणी बरीच जास्त होत होती.
स्मिथच्या पुस्तकात प्रचंड आकडे किंवा समीकरणं नव्हती. त्यानं सोपी भाषा वापरली होती. तसंच त्यानं मांडलेली तत्त्वं उथळ नव्हती. देशाची सुबत्ता ही स्पेशलायझेशन म्हणजेच श्रमविभागणीवर अवलंबून असते असं स्मिथनं मांडलं. स्मिथच्याच श्रमविभागणीच्या कल्पना हेन्री फोर्डनं अमेरिकेत 1912 साली त्याची ‘मॉडेल टी’ ही मोटारगाडी तयार करण्यासाठी वापरल्या होत्या आणि या पद्धतीमुळे एक संपूर्ण मोटारगाडी फक्त 93 मिनिटात तयार व्हायला लागली होती! याच तत्त्वावर पुढे मोठमोठे कारखाने निघाले. पुढे मॅनेजमेंटमधे ‘कोअर कॉम्पीटन्सी’च्या बाबतीत वापरलं जाणारं आणि मायकेल पोर्टर, सी.के.प्रल्हाद वगैरे मंडळींनी 1880च्या दशकात लोकप्रिय केलेलं तत्त्व यावरच आधारित होतं.
अॅडम स्मिथनं त्याच्या अर्थव्यवस्थेचं एक परिपूर्ण, भव्य चित्र उभं केलं होतं. स्पर्धात्मक भांडवलशाहीत लोकांना पाहिजे त्या गोष्टीचं, परवडेल अशा किंमतीत, चांगल्या दर्जाचं योग्य प्रमाणात उत्पादन होत राहील. असं जो कोणी करणार नाही तो स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल आणि यामुळे सगळ्यांचाच फायदा होईल अशी त्याची मांडणी होती.
सुरुवातीला स्मिथच्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’कडे फारसं कुणी लक्षच दिलं नाही. नंतर मात्र त्याचा खप प्रचंडच वाढला. जवळपास सगळ्याच युरोपियन भाषांत त्याची भाषांतरं झाली. त्या पुस्तकाला खरी मान्यता मिळायला चक्क 1800 साल उजाडावं लागलं! त्यावेळेपर्यंत इंग्रजीत त्याच्या 9 आवृत्त्या निघाल्या होत्या आणि ते युरोप आणि अमेरिका या खंडात सगळीकडे पोहोचलं होतं. त्याकाळी उगवत्या भांडवलदारांना मात्र ते बायबलसारखंच वाटलं. त्यांच्याचसाठी ते लिहिलं आहे असं त्यांना वाटायचं.
प्रत्यक्षात मात्र भांडवलशाहीमध्ये थोड्याच काळात मक्तेदारी निर्माण झाली आणि तिनं अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं. तरीही अॅडम स्मिथ काळाच्या खूप पुढे असलेला अर्थतज्ज्ञ होता. आधुनिक अर्थशास्त्राचा त्याला पितामह म्हणतात ते काही उगाच नाही!
‘अॅन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन’ आणि थॉमस माल्थस
थॉमस माल्थस हा राजनितिक अर्थव्यवस्था आणि जनसंख्या या क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. 1798 साली प्रसिद्ध झालेलं ‘अॅन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन’ हे त्याचं पुस्तक खूपच गाजलं. माल्थसच्या ‘एसे’ची पहिली आवृत्ती रातोरात खपली. 1978 साली मायकेल हार्टनं इतिहासातल्या शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये माल्थसच्या नावाचा उल्लेख केला होता.
थॉमस रॉबर्ट माल्थसचा जन्म 13 फेब्रुवारी 1766 या दिवशी इंग्लंडमधल्या वोटन या गावी झाला. केंब्रिजमध्ये त्यानं रँग्लरची पदवी मिळवली. त्यानंतर 1788 साली माल्थस चक्क चर्चमधला‘रेव्हरंड’ झाला. लांब वाढवलेले गुलाबीसर सोनेरी कुरळे केस यामुळे माल्थस उंच आणि देखणा दिसायचा. तो हुशार आणि खिलाडू वृत्तीचाही होता.
माल्थस आणि त्याचे वडील यांच्यात अनेकदा वाद-चर्चा झडत. असंच एकदा विल्यम गॉडविनच्या पुस्तकात लिहिलेल्या ‘स्वर्गा’वर वाद सुरू झाले. माल्थसच्या वडिलांना गॉडविनचा युटोपिया खूपच पटायचा. पण माल्थस वडिलांएवढा आशावादी नव्हता. त्यांचा हा वाद विकोपाला गेला. शेवटी माल्थसनं वाद थांबवून स्वतःचे सगळे मुद्दे लिहून काढले आणि वडिलांना दाखवले. थॉमसनं काढलेले मुद्दे इतके वास्तववादी होते की ते वाचून त्याचे वडील प्रचंड खुश झाले आणि त्यांनी माल्थसला यावर पुस्तक लिहायचा सल्ला दिला आणि अशा तर्हेनं ’एसे ऑन पॉप्युलेशन’ या ऐतिहासिक पुस्तकाची सुरुवात झाली!
हे पुस्तक गॉडविनसारख्या विचारवंताच्या मतांना आवाहन देणारं असल्यामुळं माल्थसनं ‘अॅन एसे ऑन दी प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, अॅज इट अॅफेक्टस् दी फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ सोसायटी, विथ रिमार्कस् ऑन दी स्पेक्युलेशन्स ऑफ मिस्टर गॉडविन, एम. काँडोरसेट अँड अदर रायटर्स’! असं त्या काळच्या प्रथेप्रमाणे प्रचंड लांबलचक नाव या पुस्तकाला दिलं होतं. एवढं मोठं नाव कोणालाच पुन्हा एका दमात उच्चारणंही शक्य नव्हतं. म्हणून मग त्याचं ‘अॅन एसे ऑन पॉप्युलेशन’ असं सोपं, सुटसुटीत नाव ठेवण्यात आलं.
19 प्रकरणांच्या या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ‘जेवढी माणसं पोसण्याची क्षमता पृथ्वीची आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात आपली संख्या वाढवण्याचा माणसाचा आणि कुठल्याही सजीवाचा स्वभाव आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास करणं’ हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे हे त्यानं स्पष्ट केलं होतं. अन्न ही माणसाची मुख्य गरज आहे. कुठलाही प्राणी, पक्षी, वनस्पती किंवा माणूस यांना आपली संख्या वाढवण्यावर कुठलंच बंधन नसतं. त्यामुळे माणसाची संख्या वाढतच जाते. माणसांची संख्या ‘जिओमेट्रिक प्रपोर्शन’नं वाढते. याचाच अर्थ माणसांची संख्या 1, 2, 4, 8, 16, 32 अशा प्रमाणात झपाट्यानं वाढत जाते. म्हणजे यामध्ये कुठलाही आकडा हा पूर्वीच्या एका ठरावीक पटीनं (आपल्या उदाहरणात दुप्पटीनं) वाढत जातो. पण अन्नपुरवठा मात्र ‘अॅरिथमेटिक प्रपोर्शन’नं म्हणजेच 1,2,3,4,5....असा वाढत जाणं. म्हणजे यातल्या दोन आकड्यातलं गुणोत्तर सारखं नसून त्यांच्यातला फरक सारखा असतो. (आपल्या उदाहरणात 1 चा फरक) मग हळूहळू अन्नपुरवठा आणि लोकसंख्या यांच्यात दरी निर्माण होते. जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी ही दरी अधिकाधिक वाढतच जाते आणि त्यातून भयानक अरिष्ट निर्माण होतं. त्यामुळे थोडक्यात, ‘लोकसंख्येवर अंकुश लावणं’ हाच एकमेव पर्याय माणसाकडे आहे असं माल्थसचं मत होतं.
लोकसंख्येवर अंकुश ठेवण्यासाठी माल्थसनं दोन पर्याय सुचवले. एक पर्याय नैसर्गिकच होता. लोकसंख्या वाढली की अन्नपुरवठ्यावर अतिरिक्त भार येतो. मग माणसाला अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यातूनच युद्धं, दुष्काळ किंवा रोगराई हे निर्माण होतात. याचा परिणाम म्हणून माणसाला आणि जनावरांना अन्न कमी पडायला लागतं. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते आणि माणसं तसंच जनावरं हळूहळू मरायला लागतात. यामुळेही लोकसंख्या कमी होते. याच पर्यायाला माल्थसनं ‘पॉझिटिव्ह चेक’ असं नाव ठेवलं. दुसरा पर्याय मात्र लोकसंख्या वाढूच नये यासाठी माल्थसनं सुचवला होता. या पर्यायाखाली त्यानं अनेक उपाय दिले होते. उशिरा लग्न केलं तर मुलांना जन्माला घालण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे लोकसंख्या वाढणार नाही असं माल्थसला वाटे. माल्थसनं आपल्या दुसर्या पर्यायाला ‘प्रिव्हेंटिव्ह चेक’ असं नाव दिलं.
आगामी काळात जर या दोन पर्यायांमुळे लोकसंख्या नियंत्रित झाली नाही तर अन्नपुरवठा कमी होईल, प्रदूषणात भर पडेल, गर्दी वाढेल आणि बेकारीही वाढेल. ही परिस्थिती अशीच राहिली तर कालांतरानं या समस्या आणखीन तीव्र होऊन उपासमार, रोगराई, गरिबी, गुन्हेगारी आणि युद्धं यांचा सामना माणसाला करावा लागेल. आपण सांगितलेल्या पर्यायांमुळे मात्र मृत्यू चं प्रमाण वाढेल आणि जन्माचं प्रमाण खाली येईल. यामुळे लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्यामधली दरी कमी होईल असा अंदाज माल्थसनं काढला होता. बालहत्त्या, खून, गर्भनिरोधन (कॉन्ट्रासेप्शन) आणि समलिंगी संबंध यांच्यामुळेही लोकसंख्यावाढ थांबू शकते’ असं त्यानं मांडलं होतं.
या पुस्तकाचा एक महत्त्वाचा आणि चांगला फायदा ब्रिटनला झाला. ब्रिटनमध्ये सेन्सस अॅक्ट लागू केला गेला. इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड इथली जनगणना 1801 सालापासून दर 10 वर्षांनी करावी असं सांगणारा हा कायदा होता.
माल्थस एक चांगला प्रोफेसर म्हणूनही विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध होता. त्याचे विद्यार्थी त्याला प्रेमानं चक्क ‘पॉप माल्थस’ किंवा ‘पॉप्युलेशन माल्थस’ या नावांनी संबोधत! माल्थसचं ‘एसे ऑन पोप्युलेशन’ या पुस्तकाच्या सगळ्या आवृत्त्या चर्चेत राहिल्या. प्रसिद्धीबरोबरच त्याला अनेक शत्रूही निर्माण झाले. शेली तर त्याला ‘हिजडा’ आणि ‘जुलमी’ म्हणे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी त्यानं सांगितलेल्या उपायांमुळे तर त्याला अनेक लोक चक्क ‘मानवतेचा शत्रू’ म्हणायचे.
एकीकडे टीका होत असतानाच 1819 साली माल्थसला रॉयल सोसायटीचं सदस्यत्व मिळालं. माल्थसच्या थिअरीचा अनेक क्षेत्रातल्या अनेकांवर प्रभाव पडला. जीवशास्त्रामध्ये तर अल्फ्रेड वॉलेस आणि चार्लस डार्विन यांनी तो प्रभाव मान्यच केला. हर्बर्ट स्पेन्सरवरही माल्थसच्या थिअरीचा खूपच प्रभाव पडला. याशिवाय जेरहार्ड लेन्स्की आणि मार्विन हॅरिस यांच्या आधुनिक इकॉलॉजिकल-एव्होल्युशनरी सोशल थिअरीवरही माल्थसचा खूपच मोठा प्रभाव दिसत होता. आश्चर्य म्हणजे गर्भनिरोधक उपाय आणि गर्भपात यांना अनैसर्गिक आणि पाप मानणार्या माल्थस याच्या पॉप्युलेशनच्या थिअरीमुळे प्रभावित होऊन फ्रॅन्सिस प्लेस (1771-1854) या नवमाल्थसवाद्यानी, चक्क गर्भनिरोधनाचा पुरस्कार करणारी एक चळवळच उभी केली! 1968 साली पॉल एलरिच्नं ‘द पॉप्युलेशन बाँम्ब’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. या खूपच वादग्रस्त ठरलेल्या आणि गाजलेल्या पुस्तकातही माल्थस पानोपानी डोकावत होताच! पण वाढत्या उत्पादकतेमुळे अन्नाचं उत्पादन खूपच वाढल्यामुळे माल्थसच्या थिअरीज प्रत्यक्षात मात्र खर्या ठरल्या नाहीत.
माल्थस हा जगातला लोकसंख्येच्या आणि जन्ममृत्यूच्या बदलत्या प्रमाणाविषयी मोजमापं आणि अभ्यास करणारा पहिला ‘डेमोग्राफर’ होता. 23 डिसेंबर 1834 या दिवशी सर्वत्र ख्रिसमसचं वातावरण असताना माल्थसचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला. मृत्यू नंतर माल्थसला इंग्लंडमधल्या बाथ अॅबेमध्ये दफन करण्यात आलं. मात्र माल्थस त्याच्या ‘अॅन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन’ या पुस्तकामुळे आजही जगभर चर्चेत आहे!
‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज’ आणि चार्ल्स डार्विन
पृथ्वी कधी आणि कशी निर्माण झाली, सजीव कधी आणि कसे निर्माण झाले किंवा मानवाची उत्क्रांती नेमकी कशी झाली या विषयांबद्दल लोकांच्या मनात पूर्वीपासून नेहमीच कुतूहल होतं. 18व्या शतकाच्या आधी मानवाची किंवा कुठल्याही सजीवांच्या उत्कांतीमागे दैवी शक्तीचाच हात आहे आणि त्यानं निर्माण केलेला प्रत्येक जीव हा सुरुवातीला जसा निर्माण केला होता तसाच कायम आहे असा समज अनेक लोकांचा होता. पण चार्ल्स डार्विनच्या 1859 साली प्रसिद्ध झालेल्या ‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या पुस्तकानं मानवाची उत्कांतीबाबतची विचारधाराच बदलून टाकली!
सजीवांमध्ये सुरुवातीपासून कुठलेच बदल झाले नाहीत, कारण सजीवांची निर्मिती परमेश्वरानं निर्माण केलीये असं अॅरिस्टॉटलनं म्हणून ठेवलं होतं आणि अॅरिस्टॉटल जे म्हणेल ते चर्चसाठी प्रमाण होतं. इतकंच काय पण खुद्द चार्ल्स डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन यांचंही अॅरिस्टॉटलसारखंच मत होतं. उत्क्रांतीवादात चर्चच्या विरोधात जाऊन आपली लॅमार्किझमची थिअरी फ्रेंच शरीरतज्ज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञ जाँ-बॉप्तिस्ट- दी- लॅमार्क यानं मांडली. त्यानं त्यावर सविस्तर मांडणी करत ‘झुऑलॉजिकल फिलॉसॉफी’ हे पुस्तकही लिहिलं. ‘प्रत्येक जीव शिडीच्या खालच्या टोकापासून वरपर्यंत जायच्या प्रयत्नात जास्त गुंतागुंतीचा बनत जातो; आजूबाजूच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जीव आपल्या काही अवयवांचा जास्तीतजास्त उपयोग करतो आणि हे अवयव कालांतरानं बळकट होतात, परिस्थितीमुळं झालेले हे बदल म्हणजेच गुणधर्म पुढच्या पिढीकडं आपोआप जातात’ असे मुद्दे त्यानं मांडले होते. यासाठी जिराफ या प्राण्याचं उदाहरण दिलं गेलं. झाडावरचं उंचावरचं अन्न खाण्यासाठी त्याला आपली मान सतत उंच करावी लागते, त्यामुळे जिराफाची मान उंच झाली आहे . एवढंच नव्हे तर हा गुणधर्म पुढल्याही पिढीत जातो असं लॅमार्कनं मांडलं. अशी थिअरी या आधी कुणीही मांडली नसल्यानं आणि ही थिअरी चक्क देवाला आव्हान देणारी असल्यानं लॅमार्कला चर्चचा आणि लोकांचा खूपच रोष पत्करावा लागला होता! यानंतर आला तो चार्ल्स डार्विन!
चार्ल्स डार्विनचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 या दिवशी इंग्लंडमधल्या श्रॅाप्शायर शहरातल्या श्रुसबरी गावात एका सधन आणि सुशिक्षित कुटुंबात झाला. एकीकडे आपण डॉक्टर व्हावं असं, तर त्याच वेळी दुसरीकडे आपण धर्मोपदेशकही व्हावं असंही डार्विनला वाटे. त्या काळी धर्मोपदेशक बनण्यासाठी बीएची पदवी मिळवणं सक्तीचं होतं. त्यामुळे त्यानं केंब्रिज विद्यापीठात प्रवेश धेतला. इथंच विलियम पॅलेच्या ‘नॅचरल थिऑलॉजी’ या पुस्तकाचा डार्विनवर चांगलाच प्रभाव पडला. इथे असताना सजीवांची उत्क्रांती या विषयाबद्दलचं डार्विनचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं आणि याच सुमारास डार्विनच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना घडली. 23 वर्षांच्या डार्विननं वेगवेगळ्या बेटांवरचा अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी एका धाडसी जलमोहिमेवर एच. एस. एम. बीगल या बोटीवरून जाण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्याला विविध बेटांवरच्या भूशास्त्रीय विविधतेची माहिती झाली. त्याच्या या अभ्यासातून त्यानं आपलं या विषयातलं संशोधन पुढे चालू ठेवायचं ठरवलं आणि इथूनच त्याच्या ‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या पुस्तकाची सुरुवात झाली.
1842 साली डार्विननं आतापर्यंत जमवलेली माहिती पुस्तक रुपात लिहायला सुरुवात केली. पुस्तकाचं नाव त्यानं सुरुवातीला ‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर दी प्रिझर्व्हेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन दी स्ट्रगल फॉर लाईफ’ असं भलंमोठं दिलं होतं. आपल्या पुस्तकाची प्रत जेव्हा डार्विननं प्रकाशकाकडं दिली तेव्हा या नियतकालिकेचा प्रकाशक जॉन मरे चक्क घाबरला होता. हे पुस्तक अजिबात खपणार नाही असंच वाटलं होतं. त्यानं डार्विनला यापेक्षा तू कबुतरांवर लिही, मी छापतो असं म्हटलं होतं. तरीही अखेर मरेनं हिम्मत करून ‘दी अॅब्स्ट्रॅक्ट ऑफ व्हरायटीज थ्रू नॅचरल सिलेक्शन’ या पुस्तकाच्या 1200 प्रती छापल्या. पुस्तक खपावं म्हणून पुस्तकाची किंमत केवळ 15 शिलांग ठेवली. मात्र या पुस्तकाच्या 1200 प्रती पहिल्याच दिवशी हातोहात खपल्या! त्यानंतर या पुस्तकाची अनेक भाषांतरही झाली. डार्विनचं हे पुस्तक अनेक देशांत घरोघरी वाचलं गेलं. काळानुसार त्याचं नावही बदलत गेलं. सुरुवातीला असलेलं लांबलचक नाव जाऊन ’ओरिजिन ऑफ स्पीशीज’ एवढं लहान झालं. 1882 सालापर्यंत फक्त इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या जवळजवळ 24000 प्रती विकल्या गेल्या होत्या!
या पुस्तकात सुरुवातीच्या पहिल्या चार प्रकरणांत डार्विननं आपल्या थिअरीची मूलतत्वं उलगडून सांगितली, तर पुढच्या चार प्रकरणांत या थिअरीवरच्या आरोपांविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतरच्या प्रकरणांत भूरचनाशास्त्र, वनस्पतीं आणि प्राण्यांची भौगोलिक विभागणी तसंच त्यांचं वर्गीकरण, त्यांची रचना आणि त्यांची अॅम्ब्रिओलोजी यांच्याविषयी चर्चा केलेली होती. पुस्तकाच्या सुरुवातीलाच डार्विननं सजीवांमध्ये बदल घडत असतात आणि ते तसेच्या तसे राहात नाहीत हा मुद्दा सामान्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. गॅलापँगाऊस या या बेटांवर त्याला फिंच नावाचे गाणारे पक्षी दिसले. वेगवेगळ्या बेटांवरच्या फिंच पक्ष्यांच्या चोची जेव्हा त्यानं बघितल्या तेव्हा त्याला एक उलगडा झाला. ज्या बेटांवर नट्स मिळत, त्या पक्ष्यांच्या चोची आखूड पण दणकट होत्या. दुसर्या बेटांवरच्या पक्ष्यांच्या चोची लांब आणि बारीक होत्या. तिथल्या दगडांच्या फटीतलं अन्न वेचण्यासाठी त्या उपयोगी पडत. थोडक्यात, परिस्थितीप्रमाणे त्या पक्ष्यांमध्ये बदल घडून येत होते. ‘सिलेक्टिव्ह ब्रीडिंग’मुळे जन्म झालेला अनोळखी जीव हा नवीन प्रजाती म्हणून म्हणून ओळखला जावा असं मत त्यानं मांडलं. वातावरण, अन्न, मासांहारी प्राणी, उपलब्ध जागा अशा अनेक गोष्टींमुळं सजीवांचं अस्तित्व आणि प्रमाण कसं नियंत्रित होतं हेही त्यानं समजावून सांगितलं. त्यानंतर डार्विननं ’नॅचरल सिलेक्शन’ विषयी भाष्य केलं. या पुस्तकातले उत्क्रांतीवादामधले काही महत्वाचे मुद्दे म्हणजे, सजीवांच्या जातींना कायमचं अस्तित्व नसतं, तर त्या कायम बदलत असतात. सर्व जातींना अस्तित्वासाठी आणि पुनरूत्पादनासाठी झगडा करत राहावा लागतो. या अस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्या जाती अपयशी ठरतात, त्या नामशेष होतात. ज्या टिकून राहातात त्यांच्या पुनरूत्पादनातून अशा जातींची वाढ होते. यालाच ‘नॅचलर सिलेक्शन’ असं म्हणतात. डार्विननं अतिशय सोप्या भाषेत या गोष्टी समजावून सांगितल्यामुळे सामान्य माणसालाही ही थिअरी सहज समजली.
हे पुस्तक लोकांच्या हातात पहिल्यांदा पडल्यावर इंग्लंडमध्ये एकच खळबळ उडाली, नंतर मात्र हळूहळू ते पुस्तक जगभर वाचलं गेलं. काहींना डार्विनचे विचार पटले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. डार्विनचे विचार चर्चला आणि धर्मनिष्ठ लोकांना मान्य नव्हतेच. डार्विनची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रंही त्या काळी प्रकाशित होत. नाकतोडा, कुठलासा बग, फुलपाखरू यांचे वेगवेगळे अवयव कापून ते एकमेकांना जोडून ‘नवीनच’ एक प्राणी बनवून डार्विनची चेष्टा करायला लोक घेऊन येत.
डार्विनच्या ’दी ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन’ या पुस्तकानंतर डार्विननं अनेक पुस्तकं लिहिली. पण ‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज’ इतकी प्रसिद्धी त्याच्या इतर कुठल्याच पुस्तकाला मिळाली नाही. डार्विनही आपली तब्येत खालवलेली असतानाही शेवटपर्यंत काम करतच राहिला आणि 18 एप्रिल 1882 या दिवशी डार्विनचा मृत्यू झाला.
डार्विन जरी या जगात नसला तरी त्याचं ‘दी ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हे पुस्तक आजही प्रचंड लोकप्रिय आहे. या पुस्तकामुळं अनेक शास्त्रज्ञांना सजीवांकडे बघण्याची एक वेगळी द़ृष्टी तर दिलीच, पण धर्मात सांगितलेल्या चुकीच्या संकल्पना खोडून काढण्यासाठी हिम्मतही दिली. हे पुस्तक उत्क्रांतीची प्रक्रिया हळूहळू घडते असं सांगणारं असलं तरी त्यानं विज्ञानात वेगानं मोठी क्रांती केली यात मात्र शंका नाही!
‘दास कॅपिटल’ आणि कार्ल मार्क्स
कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटलचा पहिला खंड 1867 मध्ये प्रसिद्ध झाला. कार्ल मार्क्स हा जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. कम्युनिस्ट चळवळीचा पाया त्यानं घातला. तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, सौंदर्यशास्त्र, कला, नीतिमत्ता अशा आयुष्याच्या विविध पैलूंना एकत्र बांधणारी एक सुसूत्र विचारप्रणाली जर मानवी इतिहासात कुणी निर्माण केली असेल तर ती मार्क्सनंच!
16 ऑगस्ट 1867 या दिवशी मार्क्सनं ‘दास कॅपिटल’ लिहून पूर्ण केलं. त्या काळात राज्यसत्ता, अर्थसत्ता आणि न्यायसत्ता ही काही मूठभर लोकांच्या हाती होती. श्रीमंतांसाठी वेगळे कायदे आणि गरिबांसाठी वेगळे कायदे होते. गरिबांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसे. इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांतीचा काळ 1750 ते 1830 हा होता. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा माणसांच्या जागी यंत्रं आली आणि गरीब गरीबच राहिले. कारखानदार श्रीमंत बनले. कामगारांची प्रचंड पिळवूणक चालू होती. या सगळ्यांमुळे कामगारांच्या मनात असंतोष खदखदू लागला. अशा परिस्थितीत कामगारांची आर्थिक पिळवणूक कशी होते ही गोष्ट मार्क्सच्या लक्षात आली आणि त्यावर त्यानं ‘दास कॅपिटल’ या ग्रंथात याबद्दल सविस्तर मांडणी केली. ‘दास कॅपिटल’ या पुस्तकात भांडवलं आणि भांडवलशाही यांचं सखोल विश्लेषण आहे.
‘दास कॅपिटल’च्या पहिल्या भागात मार्क्सनं भांडवलशाहीचं विश्लेषण केलं. आपण बाजारपेठेत जे काही विकत घेतो त्याला त्यानं क्रयवस्तू (कमोडिटीज) म्हटलं. यासंदर्भात मार्क्सनं दोन कल्पना मांडल्या. एक म्हणजे उपयोग मूल्य (यूज व्हॅल्यू) आणि दुसरी म्हणजे विनिमय मूल्य (एक्स्चेंज व्हॅल्यू). बाजारात कुठलीही वस्तू जेव्हा विकली जाते तेव्हा त्याला या दोन्ही असाव्या लागतात. कुठल्याही क्रयवस्तूला काहीतरी उपयुक्तता म्हणजेच यूज व्हॅल्यू असावी लागते, नाहीतर ती कोण कशाला विकत घेईल? पण वस्तू बाजारात विकली जाण्यासाठी तिला फक्त यूज व्हॅल्यू असून चालत नाही. उदाहरणार्थ, हवेची उपयुक्तता तर प्रचंड आहे, पण तिला ‘एक्स्चेंज व्हॅल्यू’ नाही, कारण ती बाजारात विकली जात नाही. मार्क्सच्या मते कुठल्याही वस्तूची ‘एक्स्चेंज व्हॅल्यू’ श्रमांनीच ठरते. मार्क्सच्या मते जर एका खुर्चीची आणि एका शर्टाची ‘एक्स्चेंज व्हॅल्यू’ (किंवा किंमत) एकच असेल तर त्या दोघांसाठी लागणारे श्रमतासही तेवढेच असले पाहिजेत.
मार्क्सनं त्याची ‘थिअरी ऑफ सर्प्लस व्हॅल्यू’ मांडली आणि नफ्याचा कामगारांच्या पिळवणूकीशीही संबंध जोडला. नफ्याचं कारण मार्क्सला सापडलं ते एका विशिष्ट क्रयवस्तूमध्ये. ती म्हणजे ‘श्रमशक्ती (लेबर पॉवर)’. त्याच्या मते या श्रमशक्तीच्या देवाणघेवाणीतच पिळवणूक दडलेली आहे. याला कारण जेव्हा कामगार भांडवलदाराला आपली श्रमशक्ती विकतो तेव्हा त्याचे कामाचे तास तो त्या भांडवलदाराला बहाल करतो. म्हणजे कामगार भांडवलदाराला आपले श्रम विकत नाही तर आपली श्रमशक्ती विकतो. या श्रमशक्तीच्या मोबदल्यात त्याला पगार मिळतो आणि या पगारापेक्षाही तो जास्त व्हॅल्यू निर्माण करुन त्या भांडवलदाराला बहाल करतो म्हणजेच थोडक्यात, त्याच्या कामाच्या तासात तयार होणार्या सगळ्या मालावर तो हक्क सांगत नाही. मार्क्सच्याच म्हणण्याप्रमाणे कुठल्याही क्रयवस्तूची किंमत ही ती तयार करण्यासाठी लागणार्या सामाजिक आवश्यक श्रमांइतकी असल्यानं हेच तत्त्व त्यानं ‘कामगारांची श्रमशक्ती (लेबर पॉवर)’ या क्रयवस्तूला लावली. या श्रमशक्तीची किंमत (म्हणजेच पगार) हे ती श्रमशक्ती पुन्हा तयार करण्यासाठी लागणारे श्रम म्हणजेच कामगारांना जेमतेम जगून पुनरुत्पादन करण्याइतके पैसे. म्हणूनच मार्क्स हा कामगारांना फक्त ‘सबसिस्टन्स वेजेस’ मिळतात असं म्हणे. मार्क्सनं याचं कारण भांडवलशाहीमध्ये असलेल्या बेकारीत शोधलं. या बेकारीमुळेच कामगार कमीत कमी म्हणजेच सबसिस्टन्स वेजेसवरती काम करायला तयार होतात. त्यामुळे भांडवलशाहीला बेकारी ही हवीच असते. आता हा पगार एवढा कमी असतो की कामगारानं भांडवलदाराला बहाल केलेल्या तासांपैकी काही तासातच कामगार स्वत: तयार केलेल्या उत्पादनामुळे स्वतःचा पगार वसूल करतो आणि यंत्राची झीज आणि कच्च्या मालाची किंमतही भरून काढतो. आणि यानंतरच्या उरलेल्या तासांमध्ये तो जे उत्पादन करतो ते मात्र भांडवलदारासाठी ‘वरकढ उत्पन्न (सरप्लस व्हॅल्यू)’ निर्माण करतं. अशा तर्हेनं मार्क्सच्या मते नफा निर्माण होतो. थोडक्यात, कामगाराला त्यानं केलेल्या श्रमांचा पूर्ण मोबदला न मिळाल्यामुळे हा नफा निर्माण होतो आणि म्हणूनच तो पिळवणूकीवर अवलंबून असतो असं मार्क्सचं म्हणणं होतं. शोषणाबरोबरच आपण कुठे, काय, केव्हा आणि कशा तर्हेनं उत्पादन करायचं यातल्या कुठल्याच गोष्टींवर त्याचं नियंत्रण तर सोडाच, पण साधा सहभागही नसतो. त्यामुळेच भांडवलशाही ही कामगारांना ‘एलियनेट’ करते असं मार्क्सनं मांडलं.
कार्ल मार्क्सचा जन्म जर्मनीमधल्या ट्रायर इथे हेन्रीच मार्क्स आणि हेन्रिट प्रेसबर्ग या मध्यमवर्गीय दांपत्याच्या पोटी 5 मे 1818 या दिवशी झाला. शिकत असताना मार्क्सनं फ्रेंच राज्यक्रांती, बेल्जियन राज्यक्रांती अिाण पोलंडचा उठाव यांचा खूप सखोल अभ्यास केला. कायद्याबरोबरच त्यानं तत्त्वज्ञान, लोकशाही, समाजवाद, भांडवलशाही, निसर्ग, इतिहास, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती यांचा अभ्यास केला. रशियन, जर्मन, फ्रेंच आणि इंग्लिश या सगळ्या भाषांवर मार्क्सचं प्रभुत्व होतं.
आपल्या वर्तमानपत्रातून कष्टकरी समाजाचे प्रश्न तो सातत्यानं मांडत असल्यानं तत्कालीन सरकारनं त्याच्या वर्तमानपत्रावरच बंदी घातली. त्याला अनेक ठिकाणांहून स्थलांतरित व्हावं लागलं. मार्क्सच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कारखान्यांमधले कामगार जागृत होऊन आपल्या हक्कांसाठी आंदोलनंही करायला लागले. याचा परिणाम मार्क्सलाही भोगावा लागला. त्याच्या परखड लिखाणामुळे त्याला सतत कोर्टाच्या फेर्या कराव्या लागत.
याच वेळी त्याची ओळख कम्युनिस्ट विचासरणी असलेल्या फ्रेडरिक एंगेल्स या तरुणाबरोबर झाली आणि त्यांची मैत्री दृढ झाली. एंगेल्समुळे मार्क्सला कामगारांचं कष्टातलं जगणं, त्यांची घुसमट, ओढाताण, त्यांच्या वाट्याला आलेलं बकालपण कळत गेलं. मार्क्सनं एंगेल्सबरोबर ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ लिहिला.
मार्क्सचं आयुष्य प्रचंडच दारिद्य्रात, कायम पैशांच्या चिंतेत आणि झगड्यात गेलं. त्याला एंगेल्सनं सातत्यानं आर्थिक मदत केली. ‘दास कॅपिटल’ लिहीत असतानाच मार्क्सला आपला मृत्यू जवळ आलाय असा भास सतत होत असे. मार्क्सचा मृत्यू 14 मार्च 1883 या दिवशी लंडन इथे झाला. ‘दास कॅपिटल’ लिहायला त्याला तब्बल 18 वर्षं लागली! 1867 साली पहिला खंड प्रकाशित झाला. मार्क्सच्या मृत्यू नंतर एंगेल्सनं दुसरा खंड 1885 साली प्रसिद्ध केला आणि तिसरा 1894 साली. ‘थिअरीज ऑफ सरप्लस व्हॅल्यू’ हा चौथा आणि शेवटचा खंड बाहेर यायला 1910 साल उजाडलं. मार्क्सचं नाव उच्चारलं की ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ आपोआपच डोळ्यासमोर येतो!
‘रिलेटिव्हिटी ः द स्पेशल अँड द जनरल थिअरी’ आणि अल्बर्ट आईन्स्टाईन
न्यूटननंतर आपल्या वैज्ञानिक सिद्धांतांनी दुसर्या कोणी जग प्रचंड गाजवलं आणि हादरवलं असेल तर ते अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञानं. न्यूटन या नावाचा 300 वर्षांचा दबदबा आईन्स्टाईनच्या येण्यानं कमी झाला. त्याचं ‘रिलेटिव्हिटी ः द स्पेशल अँड द जनरल थिअरी’ हा ग्रंथ 1916 साली प्रसिद्ध झाला.
आईन्स्टाईनच्या जगभर गाजलेल्या रिलेटिव्हिटीमध्ये काय होतं? क्लासिकल मेकॅनिक्सप्रमाणे स्पेस आणि टाईम हे अॅब्सोल्यूट होते. म्हणजे ते सगळ्यांसाठी सारखेच होते. पण वेग मात्र सापेक्ष होता. उदाहरणार्थ, आपण स्थिर असताना जर आपल्याकडे एक आगगाडी 40 किमी वेगाने येत असेल, तर आपल्याला आगगाडीचा तोच वेग जाणवेल. पण आपणसुद्धा त्याच दिशेने, त्याच वेगाने जाणार्या दुसर्या आगगाडीत बसलेलो असलो तर मात्र आपल्याला ती पहिली आगगाडी स्थिर आहे असं वाटेल, म्हणजेच आगगाडीचा वेग शून्य आहे असं वाटेल. थोडक्यात वेग हा सापेक्ष असतो. पण स्पेस आणि टाईम हे अॅब्सोल्यूट असतात.
आईन्स्टाईननं हीच थिअरी मोडून काढली. आणि त्याने स्पेस आणि टाईम हेच मुळी सापेक्ष असतात आणि ते माणसाच्या वेगावर अवलंबून असतात हे दाखवून दिलं. आईन्स्टाईनच्या अगोदर मॅक्स्वेल या शास्त्रज्ञानं प्रकाशाचा वेग कोणीही कसाही कितीही वेगानं आपण स्वतः जात असताना (कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समधून) मोजला तरीही तो तेवढाच येतो (निर्वात पोकळीमध्ये 3 लाख किमी/सेकंद) हे दाखवून दिलं होतं आणि मायकेलसन आणि मोर्ले यांनी ते प्रयोगानं सिद्धही केलं होतं.
आईन्स्टाईननं याच थिअरीचा उपयोग करून आपली स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. एका उदाहरणावरून ती समजावून सांगता येईल. समजा, प्रकाशाचा एक किरण एका ठिकाणाहून दर सेकंदाला 3 लाख किमी वेगानं निघालाय. आणि त्याच वेळी त्याच बिंदूपासून एक यान दर सेकंदाला त्याच दिशेने 2 लाख किमी वेगानं निघालंय. आता एका सेकंदानंतर त्या यानात बसलेले आपण तो प्रकाशाचा किरण आपल्यापासून कुठपर्यंत पोहोचला आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला तर काय उत्तर मिळेल? क्लासिकल मेकॅनिक्सप्रमाणे ते अंतर तीन वजा दोन म्हणजे एक लाख किमी असायला हवं होतं. पण मॅक्सवेलच्या थिअरीप्रमाणे आपण यानात बसलेलो असताना आपला वेग कितीही असला तरी आपल्याला प्रकाशाचा वेग तेवढाच म्हणजे दर सेकंदाला तीन लाख किमी एवढा जाणवेल म्हणजेच एका सेकंदानंतर प्रकाशाचं टोक आपल्याला आपल्यापासून तीन लाख किमी अंतरावर सापडेल. मग हे कसं होतं? याचा अर्थ मी वेगानं चाललेल्या यानात बसलेलो असताना माझी पट्टी आणि माझं घड्याळ म्हणजेच माझ्या स्पेस आणि टाईम यांची मोजमापंच बदलत असली पाहिजेत. म्हणजेच म्हणजेच स्पेस आणि टाईम हे सापेक्ष असतात असं आईन्स्टाईननं सांगितलं. याविषयी नंतर त्यानं समीकरणाद्वारे मांडलं.
आईन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही एका तर्हेनं गुरूत्वाकर्षणाचीच थिअरी होती. त्यानं असं कल्पिलं की कुठल्याही वस्तूच्या आजूबाजूचीं स्पेस (खरं तर अचूकपणे बोलायचं झालं तर स्पेसटाईम) ही वक्र होते. म्हणूनच पृथ्वी भोवतीची स्पेससुद्धा वक्र होते. हे समजण्याकरता नेहमी स्पंजच्या गादीचं उदाहरण देतात. एखाद्या स्पंजच्या गादीवर आपण धातूचा एक मोठा जड गोळा ठेवला तर एक खोलवर खड्डा निर्माण होईल. आता त्या गादीच्या वरच्या टोकाला एक लहान चेंडू जर आपण ठेवला, तर तो त्या वाकलेल्या गादीमुळे त्या मोठ्या जड धातूकडे घरंगळत जाईल. जेव्हा वरून एखादी गोष्ट जमिनीवर पडते, तेव्हा दुसरं तिसरं काही नसून ती पृथ्वीभोवती झालेल्या वक्र स्पेसवरून घरंगळत येत असते अशी गुरूत्वाकर्षणाची थिअरी आईन्स्टाईननं मांडली. ती मांडण्याकरता त्याला अर्थातच वक्र स्पेसची गणितं वापरावी लागली. त्यासाठी रीमानच्या फोर्थ डिमेन्शनल जॉमेट्रीचा फायदा झाला.
‘एखादी गोष्ट तुम्हाला सोपेपणानं सांगता येत नाही याचा अर्थ ती तुम्हाला समजलेली नाही’ असं आईन्स्टाईन म्हणायचा. आज विज्ञानात आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ओलांडून पुढेच जाता येत नाही. विश्वाची रचना, निर्मिती आणि विश्वाचा शेवट कसा होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या थिअरीजशिवाय अशक्यच आहे. 1999 साली ‘टाईम’ मॅगॅझिननं तर त्याला या शतकातला ‘सर्वश्रेष्ठ माणूस’ म्हणून गौरवलं.
14 मार्च 1879 या दिवशी अल्बर्ट आईन्स्टाईनचा जन्म जर्मनीतल्या उल्म या शहरात हर्मान आणि पॉलीन या जोडप्याच्या पोटी झाला. लहानपणी तो चक्क ‘स्लो लर्नर’ होता असंच अनेकांना वाटे. आईन्स्टाईनला नोकरी मिळवण्यासाठी खूपच वणवण करावी लागली. त्यानं अनेकदा आत्महत्येचाही विचार केला होता. अखेर एका मित्राच्या ओळखीतून त्याला कशीबशी एक नौकरी मिळाली. ती करत असतानाच त्यानं सापेक्षतावादावरचा अभ्यास केला. त्यानं लिहिलेल्या सहा प्रबंधातले ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’, ‘बाऊनियन मोशन’ आणि ‘सेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’ हे तीन प्रबंध अतिशय महत्त्वाचे आणि युगप्रवर्तक होते! यातला रिलेटिव्हिटीवरचा प्रबंध तर त्यानं फक्त पाच आठवड्यात काम करता करता लिहिला होता! यात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रबंधांसाठी आईन्स्टाईननं कुठलीही प्रयोगशाळा वापरली नव्हती. त्याचे प्रयोग वैचारिक असत (थॉट एक्सरिमेंटस्). फक्त तर्काच्या जोरावर या अचाट माणसानं जग हलवून सोडलं होतं. ‘माझी प्रयोगशाळा (म्हणजे माझं फाउंटन पेन) माझ्या नेहमी खिशात असते,’ असंच तो म्हणायचा. 1904 साली त्याच्या ‘ऑलिंपिया अॅकेडमी’मधल्या मायकेल बेसो या मित्राबरोबर सहज गप्पा मारताना आईन्स्टाईनला साोक्षतावादाचं (रिलेटिव्हिटीचं) कोडं सुटलं आणि e = mc2 हे जगप्रसिद्ध समीकरण झालं. पुढे ते आईन्स्टाईन इतकंच गाजलं!
1921 साली आईन्स्टाईनला जेव्हा प्रत्यक्ष नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा नोबेल कमिटीचं ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’च्या संबंधी एकमत होत नव्हतं. शेवटी मग यातून तोडगा म्हणून त्याला त्याच्या ‘फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट’साठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं!
आईन्स्टाईननं कधीही मदतनीस ठेवला नाही. ‘स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे’ असं तो म्हणायचा. पहाटे चार वाजता उठून तो लिहायला सुरुवात करत असे. लिहिण्याचं साहित्य, व्हायोलिन, टेबल-खुर्ची, अंथरूण इतक्या वस्तूंच त्याला आवश्यक वाटत. आईन्स्टाईन मोत्झार्टच्या संगीताचा निस्सिम चाहता होता.
18 एप्रिल 1955 च्या पहाटे वयाच्या शहात्तराव्या वर्षी आईन्स्टाईनचा मृत्यू झाला. आईन्स्टाईनची आठवण म्हणून 99 क्रमांकाच्या धातूला ‘आईन्स्टाईनियम’ असं नाव देण्यात आलं आणि ते Es म्हणून ओळखलं जातं! आईन्स्टाईन आणि रिलेटिव्हिटी हे दोन शब्द एकमेकांपासून विलग करताच येत नाहीत.
गॅलिलिओनं लिहिलेलं ‘डॉयलॉग’ असो, की न्यूटनचं ‘प्रिन्सिपिया’ असो, अॅडम स्मिथचं ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ असो की थॉमस माल्थसचं ‘अॅन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन’ असो, चार्ल्स डार्विनचं ‘ओरिजिन ऑफ स्पिशिज’ असो की मार्क्सचं ‘दास कॅपिटल’ असो वा अल्बर्ट आईन्स्टाईनचं ‘रिलेटिव्हिटी ः द स्पेशल अँड द जनरल थिअरी’ पुस्तक असो, या आणि अशा अनेक पुस्तकांनीच जगभरातल्या माणसाला विचार करायला लावला. या पुस्तकांनी संपूर्ण जग हलवून सोडलं. या युगप्रर्वतक पुस्तकांना ओलांडून आपल्याला पुढे जाताच येत नाही हे तितकंच खरं!
Add new comment