कामसूत्र आणि वात्स्यायन - पुरुष उवाच दिवाळी २०२0

कामसूत्र आणि वात्स्यायन - पुरुष उवाच दिवाळी २०२0

आजपासून 2400 वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली, जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत माणसासाठी आवश्यक असणार होता. त्या ग्रंथाचं नाव होतं कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेमध्ये पुढे अनुवादित केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणून हा ओळखला गेला. सुरुवातीची काही वर्षं तर अनेक देशांत या ग्रंथावर बंदीही घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटिश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन यानं मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या ग्रंथाचं इंग्रजीत भाषांतर केलं, तेव्हा त्यानं म्हटलं, की ‘कामसूत्र या भारतीय ग्रंथानं प्रेम कसं करावं याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.’ कामसूत्र या ग्रंथाला 1963 सालापर्यंत ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं की ‘खजुराहो आणि कामसूत्र आपल्या इतिहासातली सोनेरी पानं आहेत.’ 
लैंगिक विषयावर भाष्य करणार्‍या आणि वादळ निर्माण करणार्‍या या ग्रंथाचा लेखनकर्ता आहे वात्स्यायन! ‘काम’ पवित्र असून यामुळेच सृजन होतं. ‘काम’ हाच सृष्टीचा आधार आहे.  सृष्टीचा निर्माता प्रजापती यानं धर्म, अर्थ याबरोबरच काम महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. काम म्हणजेच सत्य, काम म्हणजेच शिव आणि काम म्हणजेच सुंदर असं वात्स्यायनानं सांगितलं. त्यानं जो उपदेश केला, त्या उपदेशाला अनुसरून महादेवाचं वाहन, महादेवाचा साथी नंदी यानं पृथ्वीवर वात्स्यायनाच्या रुपात जन्म घेतला आणि कामसूत्राची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे. 

कामसूत्राची निर्मिती होण्यामागे एक (दंत) कथा निमित्त ठरली. शंकर आणि पार्वती यांचा प्रणय नंदीनं चोरून बघितला आणि त्या प्रणयक्रीडेचं वर्णन करणारा ग्रंथ त्यानं लिहिला. आपल्या एकांतातल्या गोष्टी अशा जाहीररीत्या ग्रंथातून मांडल्याबद्दल पार्वतीला नंदीचा खूपच राग आला आणि तिनं त्याला तो ग्रंथ नष्ट होईल असा शाप दिला. इतकंच नाही तर नंदीला मनुष्याचा जन्म घेऊन पृथ्वीवर वणवण फिरावं लागेल असंही तिनं म्हटलं. नंदीला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आपण हा ग्रंथ लोकांच्या कल्याणासाठी, त्यांना दिशा देण्यासाठी लिहिला होता असं त्यानं म्हटलं. हा ग्रंथ या जगातून नाहिसा होण्याइतकं दुःख दुसरं नाही असं म्हणत नंदीनं पार्वतीकडे उःशाप मागितला.  त्या वेळी हा ग्रंथ जरी नष्ट झाला असला तरी कामशाा हा ग्रंथ पुढे श्वेतकेतू पाचशे अध्यायांमध्ये लिहील, तर बाभ्रव्य 150 अध्यायांमध्ये लिहील असं पार्वतीनं सांगितलं. ते ग्रंथ लिहिलेली गेले, पण ते ग्रंथ लोकांच्या आठवणीतही राहिले नाहीत आणि ते जनमानसात रुजलेही नाहीत. त्यामुळे ‘कामा’च्या बाबतीत लोकांमध्ये अज्ञान जास्त पसरलं आणि ते दुःखी झाले. अशा वेळी हाच नंदी पृथ्वीवर मल्लनाग वात्सायन म्हणून जन्म घेईल आणि कामसूत्र हा ग्रंथ लिहील असं पार्वतीनं म्हटलं. या ग्रंथाला जगभरातले लोक ‘वास्त्यायनाचं कामसूत्र’ म्हणूनच ओळखतील आणि त्याला ते कधीही विसरणार नाहीत असाही तिनं आशीर्वाद दिला. 

कामसूत्र ग्रंथ पूर्ण झाल्यावर नंदी परत स्वर्गात येण्याची पार्वती प्रतीक्षा करू लागली. त्या वेळी शंकरानं तिला म्हटलं, ‘नंदी परत न येण्यामागे मीच कारणीभूत आहे. कारण पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर वात्स्यायनानं मनुष्य जन्मात अनेक यातना भोगल्या आहेत. पृथ्वीवरच्या माणसाला चांगल्या वाईट अनुभवांमधून जावंच लागतं. आता मात्र वात्स्यायनाला काही तरी सुख मिळावं असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या ग्रंथाची कीर्ती, पत्नी धारिणीचं सुख असं सगळं त्याला लाभण्यासाठी मी त्याचं पृथ्वीवरचं आयुष्य वाढवलं आहे. आपलं कार्य संपताच तो परत स्वर्गात येईल. मात्र पुढल्या काळात वात्स्यायनाचा कामसूत्र हा ग्रंथ जगभर गाजेल आणि हा ग्रंथ पृथ्वीवर पाचवा वेद म्हणून ओळखला जाईल.’ शंकराच्या या बोलण्यानं पार्वती समाधानानं म्हणाली, ‘तथास्तु.’ 

पार्वतीच्या उःशापानुसार वात्स्यायनानं पृथ्वीवर अवंतीनगरी इथं शैलनाग आणि गिरिजा या दांपत्याच्या पोटी जन्म घेतला. शैलनाग आणि गिरिजा हे दोघंही अतिशय धनिक असलेल्या प्रतिष्ठित घरात जन्मलेले होते. मात्र शैलनागच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काहीच दिवसांत शैलनाग व्यसनांच्या आहारी गेला आणि वेश्यांच्या (गणिकांच्या) घरात पडून राहू लागला. त्यामुळे त्याच्याजवळ असलेला पैसा तर संपलाच पण दारिद्र्यानं त्याच्यावर ताबा मिळवला. सगळं काही संपून उघड्यावर आल्यावर शैलनागनं अंवतीतल्या मोकळ्या जागी एक झोपडी बांधली आणि तो आणि गिरिजा तिथेच राहू लागले. याच ठिकाणी वात्स्यायनाचा जन्म झाला. त्याच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी देखील त्यांच्याकडे अन्नाचा एक दाणाही शिल्लक नव्हता. रोजच्या दिवशी जेवणाची भ्रांत असलेल्या अशा ठिकाणी वात्स्यायन वाढू लागला. 
शैलनागनं गणिकांच्या घरात वास्तव्य केल्यामुळे त्याला त्यांच्यातले व्यवहार ठाऊक झाले होते. त्या काळी वेश्यांकडे गिर्‍हाईक नेऊन देणार्‍याला ‘विट’ असं म्हणत. गिरिजेला आपल्या नवर्‍याचा विटाचा व्यवसाय मुळीच आवडला नव्हता. त्यामुळे तिनं सार्वजनिक सणसमारंभाला जाणं बंद केलं होतं. इतकंच काय, पण तिनं स्वतःच्या माहेरी जाणं देखील सोडलं होतं. आपल्या नवर्‍याच्या व्यवसायाची सावली आपल्या मुलावर पडू नये यासाठी तिनं वात्स्यायनाला गुरूगृही शिकायला पाठवलं. वात्स्यायन 9 वर्षांचा होईपर्यंत विटाच्या व्यवसायातून शैलनागाने चांगलीच कमाई केली होती आणि त्यानं आपलं गेलेलं वैभव पुन्हा मिळवलं होतं.

वात्स्यायन 12 वर्षांचा असताना (गुरूगृही असताना) गणिकेवरून विटांच्या दोन गटात मारामारी झाली आणि त्यात शैलनागचा  मृत्यू झाला. पतीच्या मृत्त्रयू काही काळातच गिरिजेनं वात्स्यायनाला गुरूगृहातून परत आणलं आणि अवंतीपासून दूर अंतरावर शेती करत ती राहू लागली. गुरूगृहात असताना वात्स्यायनानं धर्म, अर्थ, युद्ध आणि राजनीती यांचं शिक्षण घेतलं.

पाटलीपुत्र (आताचं बिहारमधलं पाटणा) इथेेेे धर्म, अर्थ, युद्ध आणि राजनीती या विषयांचा आचार्य म्हणून वात्स्यायन शिक्षण देत असे. सुरुवातीच्या काळात युद्ध आणि आपल्या राष्ट्राची सुरक्षा यांची वात्स्यायनावर मोठी जबाबदारी होती. एके दिवशी आपल्या राजाशी मतभेद झाल्यानं वात्स्यायनाचं आपल्या कामावरचं लक्ष उडालं आणि त्यानं राजनीतीपासून संन्यास घ्यायचं ठरवलं. इतकंच नाही तर पाटलीपुत्र सोडून आपण अज्ञातवासात पुढला काळ व्यतीत करायचं ठरवून वात्स्यायनानं पाटलीपुत्राचा निरोप घेतला. असं म्हणतात त्यानं पाटलीपुत्र सोडलं खरं, पण त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी धारिणी त्याच्याबरोबर गेली. धारिणी ही एका धनिकाची मुलगी होती. तसंच ती  अतिशय सुंदर होती.  वात्स्यायनानं धारिणीबरोबर गांधर्वविवाह केला. तिच्या सहवासात वात्स्यायनाला कामक्रीडेतले अनेक पैलू कळले. पुरुषाचं जीवन हे ाीशिवाय अपूर्ण असल्याचं त्याच्या लक्षात आलं. प्रेम आणि काम यांचा मिलाफ झाला तर माणसाच्या आयुष्यात एक अपूर्व शांती नांदू लागते, हे त्यानं जाणलं आणि अनुभवलं.

वात्स्यायनानं पाटलीपुत्र सोडल्यानंतर त्यानं उज्जैन नगरीत काही काळ वास्तव्य केलं. त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण करत त्यानं ‘काम’ या विषयावर अभ्यास केला. वात्स्यायनाच्या आय्ाुष्यातले अनुभव, प्रवास, यातून त्या वेळची संस्कृती, जगण्याची पद्धत, भारताचा तो समृद्धीचा काळ, नगरांमधली रसिकता, युद्धं, अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊन त्यातून कामसूत्राची निर्मिती झाली. या प्रवासात वात्स्यायनाचा मित्र महेश्वरदत्त याची देखील त्याला साथसंगत लाभली. तसंच वात्स्यायनाला कामसूत्र लिहिण्यासाठी महेश्वरदत्तनं प्रोत्साहित केलं. (एका दंतकथेनुसार महेश्वरदत्तची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे त्यानं काही काळ विटाचा व्यवसाय केला होता आणि या व्यवसायातले अनेक बारकावे त्यानं वात्स्यायनाला सांगितले.) प्रवासात केलेल्या अभ्यासावर वात्स्यायनानं मनन अिाण चिंतन केलं. त्यानंतर त्यानं कामसूत्र हा ग्रंथ लिहायला घेतला. कामसूत्र लिहिण्यासाठी त्याला योग्य ते वातावरण धारिणीनं करून दिलं. खरं तर वात्स्यायनानंच धर्म आणि अर्थ यांच्याइतकंच महत्त्व ‘कामा’ला आहे हे कामसूत्र लिहून मनुष्याला सांगितलं. स्त्री आणि पुरुष यांच्यातलं कामसुख एकसारखं असतं हे कामसूत्र या ग्रंथातून ठामपणे सांगितलं. भारतभर फिरत असताना वात्स्यायनाला अनेक माणसं भेटली आणि त्यांचे अनुभव त्याला खूप समृद्ध करून गेले. या प्रवासात त्याला वेगवेगळ्या प्रांतातल्या म्हणजे मध्यप्रदेश, पंजाब, सिंध, उज्जैन, मालवा, आंध्र प्रदेश, आसाम, अवध, पाटणा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरी बंगाल (गौड) अशा अनेक प्रदेशातल्या स्त्रियांना कशाप्रकारचा प्रणय आणि काम आवडतो, त्यांना कुठल्या गोष्टीतून सुख मिळतं आणि त्यांची वैशिष्ट्यं काय याबद्दलची विशेष माहिती मिळाली.  

त्या काळी उज्जैन नगरी अतिशय समृद्ध आणि पुढारलेली होती. तिथली राजकन्या विलासिनी किंवा वासंतिका ही सुंदर तर होतीच, पण नावाप्रमाणेच विलासी देखील होती. गंमत म्हणजे एका स्त्रीनं अशा रीतीनं भर तारुण्यात मदिरा आणि वेगवेगळ्या पुरुषांबरोबर शय्यासुख मिळवणं त्या काळी गैर समजलं जात नव्हतं. उज्जैनमध्ये कामशास्त्र या विषयावर मोठमोठ्या पंडितांचा सहभाग असलेली संमेलनं संपन्न होत असत. यात विद्वान स्त्रियाही सहभाग घेत. तसंच काम या विषयावर अतिशय स्पष्ट आणि मनमोकळी चर्चा सभागृहात घडून येत असे. कुठल्याही विषयांवर चर्चा करायला इथे मज्जाव केला जात नसे. यातल्या अनेक संमेलनांमध्ये वात्स्यायनानं सहभाग घेतला होता आणि आपली मतं दिली होती. त्यात त्यानं ‘कामशास्त्रानुसार स्त्री ही संभोगक्रियेत सुरुवातीपासूनच उद्दिपित होते, तर पुरूषाला परमसुख हे ‘वीर्यस्खलन झाल्यावर मिळतं. स्त्रीची कामेच्छा हळूहळू वाढत जाते. तिची तृप्ती झाल्यानंतर ती अलौकिक आनंदाचा अनुभव घेते. एका स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा आठपट जास्त काम असतो. मैथुन क्रियेत स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखाच आनंद मिळतो. कामाच्या वेळी स्त्रीला प्रिय काय आणि अप्रिय काय हे पुरुषानं जाणून घ्यायला हवं. सहसा पुरुष ही गोष्ट जाणून घेत नाही आणि त्यामुळे दोघंही असंतुष्ट राहण्याची शक्यता वाढते’ असं सांगितलं. कामशास्त्रात संभोगाचे 64 प्रकार सांगितले असून सर्वसामान्य माणूस यातले फार फार तर 8 प्रकार आत्मसात करून सुख मिळवू शकतो. तसंच यात अनेक प्रकारची आसनं देखील सांगितली आहेत.’ 

त्या काळात एखादी तरुणी किंवा तरूण परस्परांना आवडले, की ते लगेचच गंधर्व विवाह करू शकत. मनानं वरणं याला जास्त महत्त्व त्या काळात होतं. कर्मकांड, प्रथा, रीतीभाती आणि समारंभ असा अनावश्यक कारभार करण्याची आवश्यकता यात भासत नसे. मनाचे निर्णय अंतिम असत आणि ते निभावण्याची जबाबदारीही ते निर्णय घेणार्‍यांची असे.
 
वात्स्यायनाच्या प्रवासात अनेक पात्रं आणि अनेक उपकथानकं येत राहतात आणि त्यांचं महत्त्व देखील तितकंच आहे. पुढे वात्स्यायनाचा मेहुणा आणि धारिणीचा भाऊ अंगरिक हा वासंतिका नावाच्या राजकन्येच्या प्रेमात पडला. याच वासंतिकेचं नाव काही ठिकाणी विलासिनी असंही संबोधलं गेलं आहे. या दोघांना एकत्र आणण्याचं काम वात्स्यायनानं केलं. एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे यात या जोडीच्या प्रेमात विरोध, कट-कारस्थान असं सगळं काही घडलं. अंगरिक आणि वासंतिका यांनी पळून जाऊन अज्ञातवासात कुटी बांधून सुखानं राहायला सुरुवात केली. तेव्हा त्यांचा शोध घेऊन आपण त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांचं रक्षण करू असं वचन वात्स्यायनानं दोघांना दिलं आणि त्याप्रमाणे आपला दिलेला शब्द त्यानं पाळला. 

त्या काळात प्रत्येक नगरीत गणिकांची (आताच्या भाषेत वेश्या) एक वस्ती असे. यातल्या गणिकांची जी प्रमुख असे तिला नगरवधू असं संबोधलं जात असे. ही गणिका 64 कलांनी पारंगत असे. कामसूत्रामध्ये या 64 कला कुठल्या याचंही सविस्तर वर्णन केलेलं आहे. त्यातच गायन, वादन, नृत्य, चित्रकला, अशा अनेक कला येतात. नगरवधूकडे संपूर्ण शहरातले लोक खूप आदरानं बघत. नगराची शांती आणि नगराचं सुख तिच्यावर अवलंबून आहे असं समजलं जात असे. जेव्हा एखाद्या घरात एखाद्या मुलाचं लग्न ठरत असे, त्या वेळी त्या मुलाचे वडील या नगरवधूकडे आपल्या मुलाला स्वतः घेऊन जात आणि लग्नाच्या तारखेपर्यंत आपल्या मुलाला कामक्रीडेत तयार करण्याची विनंती करत. त्याप्रमाणे ती नगरवधू त्या मुलाला साजेशी, कामक्रीडेत तरबेज असलेली एखादी गणिका निवडून त्या मुलाला कामक्रीडेचे धडे देत असे. काहीच काळात तो मुलगा कामक्रीडेत तयार होत असे. पुढे वात्स्यायनानं जेव्हा कामसूत्र हा ग्रंथ लिहिला, तेव्हा त्यानं त्यात म्हटलं, तारुण्यात प्रवेश करण्याच्या वेळी मुलालाच नव्हे तर मुलीलाही कामक्रीडेविषयी कळलं पाहिजे. त्याचं रीतसर शिक्षण दोघांनाही मिळालं पाहिजे. तरच निकोप समाज घडू शकतो. अन्यथा एक मोठी विकृती समाजात तयार होऊन ती समाजातली शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. प्राचीन भारतात मुलं आणि मुली दोघंही कामशास्त्राचं अध्ययन करत असत. 

काम म्हणजे केवळ संभोगक्रिया समजणं इतकंच नाही, तर मनुष्याच्या पाचही इंद्रियांपासून मिळणारा अद्वितीय असा आनंदाचा अनुभव आहे. खरं तर कामसूत्र हा कामशास्त्रावरचा पहिलाच ग्रंथ नव्हता. याआधी नंदी, श्वेतकेतू आणि बाभ्रव्य या त्रषींनी कामशास्त्रावर ग्रंथ लिहिले. श्वेतकेतूचा कामशास्त्र हा ग्रंथ 500 अध्यायांचा होता. त्यानंतर काहीच काळात श्वेतकेतूचा ग्रंथ लोक विसरूनही गेले. त्यानंतर बाभ्रव्य या ऋषीनं 150 अध्याय असलेल्या कामशास्त्र ग्रंथाची निर्मिती एकूण 7 भागात केली होती. पण बाभ्रव्याच्या ग्रंथाची प्रकरणं अनेक आचार्यानी वेगवेगळी केली. त्यामुळे तोही लोक हळूहळू विसरले. तसंच श्वेतकेतू अिाण बाभ्रव्य या दोघांचेही ग्रंथ लोकमानसांत फार रुजले नाहीत. याचं कारण ते ग्रंथ एकांगी, अतिविस्तारित, पसरट आणि क्लिष्ट भाषेत लिहिल्यामुळे लोकांना ते आपले वाटले नाहीत. तसंच ते अपूर्ण होते. वात्स्यायनानं लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथानं आधीच्या ग्रंथातले सगळे दोष दूर करून एक आटोपशीर, लोकांना समजेल आणि आवडेल असा नेटका ग्रंथ लिहिला. वात्स्यायनाचं कामसूत्र माणसाला कामाचरण शिकवतं. कामसूत्राच्या लिखाणात वात्स्यायनाला त्याचे अनुभव आणि बाभ्रव्य ऋषींच्या ग्रंथाचा खूप उपयोग झाला. 

कामसूत्र हा ग्रंथ कौटुंबिक जीवनाचा पाया भरभक्कम करण्याचं काम करतो. कामसूत्राच्या पहिल्या अध्यायात जीवनाचा उद्देश किंवा हेतू, ज्ञानी लोक कसे वागतात, प्रेमीजणांचं आचरण, याबद्दल लिहिलं,  तर दुसर्‍या अध्यायात कामक्रीयेचे वेगवेगळे प्रकार (अलिंगन, चुंबन, स्पर्श, नखक्षत, दंतक्षत, (प्रणयाच्या वेळी नखांचा आणि दातांचा हळुवार उपयोग करणं) तसंच संभोगाचे वेगवेगळे प्रकार आणि आसनं वगैरे). तिसर्‍या अध्यायात पत्नीची निवड कशी करायला हवी आणि पत्नीप्रती नवर्‍याचं असलेलं कर्तव्य, तिला अत्य्ाुच्च सुख कसं देता येईल याचीही त्या पुरुषानं काळजी घेणं, चौथ्या अध्यायात पत्नीची कर्तव्यं आणि तिचे अधिकार, पाचव्या अध्यायामध्ये कामाचा अतिरेक झाल्यानं काय काय घडू शकतं याबद्दलची सावधगिरी आणि सहाव्या आणि अंतिम अध्यायात वेश्या, वेश्यांचं आचरण याबद्दल सविस्तर लिहिलं. याशिवाय सौंदर्यवर्धन, वशीकरण आणि कामवेगवृद्धी, कामतुष्टी याबद्दलचं वर्णन आणि त्यावरचे उपायही सांगितले.
 
वात्स्यायनानं कामसूत्रात रतिक्रियेची किंवा संभोग करण्याची जागा कशी असावी याबद्दलही सविस्तर वर्णन केलं आहे. ही जागा स्वच्छ, सुगंधी असेल तर वातावरण संभोगक्रियेसाठी अनुकूल होईल असं तो म्हणतो. तसंच स्त्री आणि पुरुष यांनी आंघोळ केलेली असावी, स्वच्छ कपडे परिधान केलेले असावेत आणि दोघांनीही थोड्या मदिरेचं सेवन करावं, जेणेकरून मैथुनासाठी त्यांच्या चित्तवृत्ती आणखी प्रफुल्लित होतील. तसंच संभोगक्रियेला सुरुवात करण्याआधी दोघांनी प्रेमसंवाद करावेत, चुंबन, अलिंगन यांनी सुुरुवात करावी म्हणजे मैथुनासाठी ती स्त्री तयार होईल असं वात्स्यायनानं म्हटलं आहे. माणूस फक्त संततीसाठी संभोग करत नाही, तर विषयसुखाचा आनंद घेण्यासाठी करतो असं वात्स्यायन म्हणत असे. प्राण्यांप्रमाणे माणसाचा संभोग क्षणिक नसतो, तर रात्रंदिवस, सर्व ऋतूत सर्वकाळ असतो असंही तो म्हणे. कामसूत्रामध्ये संततीनियमनासाठी देखील उपाय सुचवले आहेत. तसंच जास्तीत जास्त सुख स्त्री आणि पुरुष यांना मिळावं यासाठी वेगवेगळी साधनंही सांगितली आहेत. स्त्री जास्तीत जास्त तरूण दिसावी आणि पुरुष जास्तीत जास्त ताकदीनं जास्त वेळ सुख उपभोगू शकेल तसंच आपल्या स्त्रीला सुख देऊ शकेल यासाठी देखील अनेक उपाय सांगितले आहेत. यावरून साधारणपणे अडीच हजार वर्षांपूर्वी संभोगक्रियेचा किती सखोल अभ्यास वात्स्यायनानं केला होता आणि सुख मिळवण्यासाठी जे उपाय वात्स्यायनानं सुचवले होते हे वाचून थक्क व्हायला होतं. तसंच स्त्री आणि पुरुष यांची कामेच्छा वाढण्यासाठी आणि कामतृप्ती होण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते उपायही कामसूत्रात दिले आहेत. कृत्रिम लिंगापासून अनेक साधनं त्या काळी अस्तित्वात होती हे बघितल्यावर तो काळ किती पुढारलेला होता हेही लक्षात येतं. 

कामसूत्रात स्त्रीची योनी आणि पुरुषाचं लिंग यावरून त्या स्त्रीचे किंवा पुरुषाचे किती प्रकार पडतात हेही सांगितलं आहे. पुरुषामध्ये ससा, बैल आणि घोडा हे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात, तर हरिणी, घोडी आणि हत्तीण असे स्त्रीमध्ये मुख्य तीन प्रकार पडतात. यात अनेक उपप्रकारही वात्स्यायनानं सांगितले आहेत. कुठल्या प्रकारातल्या पुरुषाने कुठल्या प्रकारातल्या स्त्रीशी संबंध ठेवले तर ते सुखकर होतील ते या प्रकारांवरून सांगितलं आहे. तसंच कुठल्या प्रकारातल्या पुरुषानं कुठल्या प्रकारातल्या स्त्रीशी संबंध ठेवले तर ते दुःखकारी ठरतील त्याबद्दलही लिहिलेलं आहे. 

वात्स्यायनानं कामसूत्रामध्ये स्त्रियांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडत नाहीत याचाही उहापोह केला आहे. लवकर वीर्यस्खलन होणारे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. जो जास्त वेळा कामक्रीडा करतो, ज्याचं लवकर वीर्यस्खलन होत नाही असे पुरुष स्त्रीस्ला आवडतात. याचं कारण पुरुषाचं स्खलन झाल्यावर तो तृप्त होतो, शांत होतो, पण तुलनेत स्त्रीची कामेच्छा कायम राहू शकते कारण तिची कामेच्छा अर्थातच पुरुषाच्या तुलनेत आठपट जास्त असते. वात्स्यायनानं कामसूत्रात संभोगक्रियेत जंगलीपणा, कुस्करणं, जोर लावणं असे प्रकार योग्य नसल्याचं सांगितलं आहे. असे प्रकार त्रासदायक आणि निंदनीय असल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्यानं संभोगक्रियेचे कामसूत्रात 64 प्रकार सांगितले असले तरी सर्वसामान्यतः 8 प्रकार रूढ आहेत. यात अलिंगन, चुंबन, नखक्षत, दंतक्षत, मैथुनाची विविध आसनं, सित्कार (प्रणयाच्या वेळी स्त्रीच्या तोंडून बाहेर पडणारे प्रणयोत्गार), स्त्रीनं पुरुषावर चढून मैथुन करणं आणि मुख मैथुन असे ते आठ प्रकार आहेत. विशेष म्हणजे अलिंगनाचेही मुख्य चार प्रकार आहेत आणि उपप्रकार अनेक आहेत. अलिंगनानं कामवासना जागृत होते. अलिंगनाप्रमाणेच चुंबनाचे देखील अनेक प्रकार आहेत आणि चुंबन देखील वेगवेगळ्या आठ ठिकाणचे घेतले जाते. त्यात कपाळ, केस, गाल, डोळे, छाती, स्तन, ओठ, जांघा, योनी वगैरे अवयव मोडतात. 

मनुष्यजीवनाचा उद्देश काय या प्रश्नाचं उत्तर देताना वात्स्यायनानं म्हटलंय, माणसाचं आय्ाुर्मान 100 वर्षांचं धरलं तर त्यात धर्म, अर्थ आणि काम यांचा उपयोग अशा प्रकारे केला पाहिजे की या तिन्हींचा परस्पर संबंध अबाधित राहिला पाहिजे. धर्म, अर्थ आणि काम यांच्यात विरोधही असायला नको. बालपणात मनुष्यानं विद्या आत्मसात केली पाहिजे. विद्याग्रहण करताना त्यानं ब्रह्मचर्याचं पूर्णपणे पालन करायला हवं. कारण विद्येनंच धर्माचं ज्ञान प्राप्त होतं. तारुण्यात त्यानं अर्थ आणि काम यांची सांगड घातली पाहिजे आणि वृद्धावस्थेत त्यानं धर्म आणि मोक्ष यांची प्राप्ती करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भौतिक गोष्टींना मिळवणं म्हणजेच अर्थप्राप्ती होय. अिाण काम म्हणजे संपूर्ण मन आणि आत्मा यांनी य्ाुक्त आपल्या इच्छेनुसार कानानं ऐकणं, त्वचेनं स्पर्श, जिभेनं रस, डोळ्यांनी सुंदरता, नाकानं गंध, या सगळ्या गोष्टी उपभोगण्याला काम असं म्हणतात. म्हणूनच धर्म, अर्थ आणि काम हे मनुष्याच्या जगण्याचा मुख्य उद्देश आहे. यातल्या कुठल्याही गोष्टीची मनुष्यानं उपेक्षा करता कामा नये. या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. धर्म असेल तर अर्थ आहे आणि अर्थ असेल तर काम आहे. 

असं म्हटलं जातं की अर्थशास्त्रात जे काम कौटिल्यानं (चाणक्यानं) करून ठेवलं, तेच काम वात्स्यायनानं कामशास्त्रात करून ठेवलं! गुप्त घराण्याच्या काळात कामसूत्राची रचना झाल्याचं काहीजण मानतात. असंही म्हटलं जातं की पतंजलीनी ज्या वेळी योगसूत्रांची निर्मिती केली त्याच काळाच्या आसपास वात्स्यायनानं कामसूत्र लिहिलं. या कामसूत्राचा परिणाम भारतातल्या मूर्तिकलेवरही झाला. उदाहरण द्यायचं झालं तर खजुराहो आणि पुरी इथल्या मैथुन करणार्‍या मूर्ती! कामसूत्र या ग्रंथाचा हेतू कामवासना उत्तेजित करणं हा नव्हता, तर आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक भाग ‘काम’ असून त्याच्याकडे शास्त्रशुद्ध दृष्टीनं बघणं हा होता. कामसूत्र या एका ग्रंथात संपूर्ण मनुष्यजीवन कसं जगावं याची परिपूर्ण दिशाच जणूकाही वात्स्यायनानं जगाला दिली हे मात्र खरं!
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.