आयुष्य समृध्द करणाऱ्या ग्रंथाची ओळख
पुस्तक फक्त आपले आयुष्य समृध्द करतात असे नाही तर एक समाज घडवतात. समाजमनाला विचारमंथन करायला लावतात. प्रेरणा देतात. गेल्या ३५ वर्षांपासून मनोविकास प्रकाशन ही संस्था अंधश्रद्धा-निर्मूलन, गणित, विज्ञान, मानसशास्त्र, आरोग्य, शिक्षण, राजकारण, संस्कृती, चरित्र अशा विविध विषयावरील उत्तमातील उत्तम असे साहित्य वाचकांना पुरवण्याचे काम अविरतपणे करत आहे. आता ह्या संचांमध्ये आणखी एक शिरपेच नुकताच खोवला गेला आहे तो म्हणजे दीपा देशमुख लिखित जग बदलणारे “ग्रंथ”!
दीपा देशमुख यांनी जग बदलणारे ‘ग्रंथ’ या पुस्तकात धर्म, अर्थ, काम , विज्ञान, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, गणित, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेकविध विषयांना स्पर्श केला असून त्यांनी जगावर प्रभाव पाडणाऱ्या 50 ग्रंथांची निवड करून त्यांना यात सामील केले आहे. या 50 ग्रंथांची आणि ग्रंथकर्त्यांची ओळख त्यांनी 50 लेखांद्वारे या पुस्तकामधून जिज्ञासू आणि अभ्यासू वाचकांना अतिशय रसाळपणे करून दिली आहे.
तसे बघितले तर वरवर पाहता कोणालाही वाटेल की जगातल्या कुठल्याही ग्रंथाची/पुस्तकाची माहिती सहजगत्या गूगलवर शोध घेतला की उपलब्ध होतेच की, मग जग बदलणारे ‘ग्रंथ’ या पुस्तकाचे वेगळे वैशिषट्य ते काय? या प्रश्नाचे उत्तर देताना मी म्हणेन की एका ग्रंथाची सर्वांगीण माहिती शोधताना जी दमछाक होते आणि मिळालेली माहिती देखील इंग्रजीमधूनच मिळते, तीही परिपूर्ण मिळेल की नाही अशी शंका असताना दीपा देशमुख यांनी वाचकांना ५० अशा महत्वपूर्ण ग्रंथांचा परिचय त्या त्या लेखकांसहित एकाच पुस्तकामधून वाचकाला करून दिला आहे. तसेच वेळ, क्षमता यांच्या मर्यादेमुळे जगावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक ग्रंथांचे वाचन करता येणे कठीण आहे अशा वेळी एकाच वेळी एकच नव्हे, तर ५० ग्रंथांविषयी वाचकाला यातले महत्वाचे तपशील अतिशय सखोलपणे कळतात.
जग बदलणारे ‘ग्रंथ’ हे पुस्तक का वाचावे, तर यातल्या ग्रंथांचे विषय धर्मशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, गणित, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, असे वेगवेगळे असून, त्यांच्यातील समान धाग्यांचा तौलनिक अभ्यास इथे करता येतो अणि शिवाय एक व्यापक दृष्टिकोन या ग्रंथांमागचा लक्षात येतो. ह्या ग्रंथाविषयी माहिती व लेखकाचे जीवन, स्वभाव वैशिष्ट्यासहित समोर आल्याने वाचकही समृद्ध होत जातो.
‘ग्रंथ’ मध्ये भगवदगीता, कुरआन, त्रिपिटक, बायबल असे धर्मग्रंथ आहेत, तर त्याच वेळी दुसरीकडे कौटिल्याचे अर्थशास्त्र, आर्ट ऑफ वॉर, युटोपिया, द एलिमेंट्स, डॉयलॉग, प्रिन्सिपिया, असे अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, गणित या विषयांना स्पर्श करणारे देखील वैविध्यपूर्ण ग्रंथ आहेत. रवींद्रनाथ टागोरांची गीतांजली, गांधीजींचे सत्याचे प्रयोग एकीकडे आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे स्त्री-वादावर भाष्य करणारे बेट्टी फ्राईडनचे फेमिनाईन मिस्टिक, सिमॉन द बोव्हाचे द सेकंड सेक्स आणि रसेलचे मॅरेज अँड मॉरल्स हे ग्रंथही आहेत. एकीकडे फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाचे ड्रीम्स इंटरप्रिटेशन, फ्रॉमचे द आर्ट ऑफ लव्हिंग, एलिसचे आरईबीटी आहे, तर दुसरीकडे मॅकलुहानचे अंडरस्टँडिंग मीडिया, डायमंडचे गन्स, जर्म्स अँड स्टील, हरारीचे सेपियन्स तर पिकेटीचे कॅपिटल हे जागतिकीकरणामुळे झालेल्या परिणामांचे दर्शन घडवणारे ग्रंथ आहेत.
ह्या सर्व ग्रंथांमध्ये मला समान धागा असा जाणवला तो म्हणजे ‘ग्रंथ’ या पुस्तकातील विचार, तत्वज्ञान, शास्त्रीय सिद्धांत मांडणारे सर्व ग्रंथकर्ते प्रवाहाविरुद्ध पोहणारे, क्रांतिकारी आणि बंडखोर असे होते. त्यांच्या लिखाणाने त्या वेळी समाजात प्रचंड खळबळ माजवली आणि त्याविरुद्ध टीकेचा सूर उठला. अनेक संकटांना, अडथळ्यांना सामना करत या ग्रंथकर्त्यांना पुढे जावे लागले, पण कालांतराने त्यांच्या याच ग्रंथांनी ग्रंथविक्रीचा उच्चांक गाठला. इतकेच नाही तर आजही हे ग्रंथ जगभरात आपले स्थान अढळपणे राखून आहेत.
जग बदलणारे ‘ग्रंथ’ यातल्या 50 ग्रंथकर्त्यांमधल्या बहुतांशी लेखकांची अखिल मानवजातीचे कल्याण हीच धारणा होती. प्रखर राष्ट्रवाद व ध्रुवीकरण त्यांना मान्य नव्हते. ह्या लेखकांची राहणी अगदी साधी होती. शिष्टाचाराला धरून नव्हती. थोडा विक्षिप्तपणा अंगी होता. तसेच त्यांना भौतिक गोष्टींविषयी आकर्षण नव्हते.
‘ग्रंथ’ ने माझ्यासारख्या वाचकासमोर पुस्तकांचे एक नवीन दालन खुले केले आहे. खरे तर काही पुस्तके मुळातून वाचायलाच हवीत. अन्यथा आयुष्य व्यर्थ आहे ही भावना मला दीपा देशमुख लिखित ‘ग्रंथ” ने दिली. किंबहुना सजग, सुजाण वाचक म्हणून मी नेमके काय वाचायला हवे याची दिशा मला ‘ग्रंथ’च्या वाचनातून मिळाली.
“Globalization is about transformimg the lives of the people and not just transforming economics” जोसेफ स्टिग्लिट्झ या अर्थशास्त्रज्ञ असलेल्या लेखकाने मांडलेला महत्वाचा विचार ‘ग्रंथ’ने मला दिला. ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकालाच यातून निश्चितपणे भरीव काही मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. जरूर वाचा, मनोविकास प्रकाशन प्रकाशित आणि दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे ग्रंथ’
डॉ. ज्योति शिरोडकर, पुणे.
drjyotishirodkar@gmail.com
Add new comment