जग बदलणारे ‘ग्रंथ’
आपण वाचतो. पुस्तकामागून पुस्तकं वाचतो. पण कितीही वाचलं तरी केवढं तरी वाचायचं राहूनच जातं. काही ग्रंथांची नावं माहित असतात. वाचलंच पाहिजे या यादीत ती ठळकपणे जागाही पटकावतात. पण काहीना काही कारणांनी ती वाचायची राहूनच जातात. यात ज्यांना सर्वार्थाने महाग्रंथ म्हणावे असे ग्रंथ देखील असतात. अशा 50 महाग्रंथांचा नेटका परिचय दीपा देशमुख यांनी ' जग बदलणारे ग्रंथ ' या ग्रंथात करून दिला आहे. आदीम काळापासून ते आजपर्यंत ते पुढचा काळ असा मानवी संस्कृतीचा मोठा पट या महाग्रंथांनी आपल्या कवेत घेतला आहे. त्यामुळे हे ग्रंथ वाचले की सबंध मानवी संस्कृती समजून घ्यायला मदत होऊ शकेल असा त्यांचा आवाका आहे. या पन्नास ग्रंथांची ओळख करून देतानाच त्याच लेखकांची इतर पुस्तकं शिवाय त्याच विषयावरची इतर लेखकांची पुस्तकं यांचाही त्यांनी परिचय करून दिला आहे. मोजली नाहीत परंतु ही सर्व पुस्तकं मिळून सहज पाचशेच्या वर होतील. सर्वच वाचक एवढी पुस्तकं वाचणार नाहीत परंतु ज्यांना ज्या विषयात रस असेल तेवढी पुस्तकं त्यांनी वाचावीत एवढं प्रेरणादायी काम दीपा देशमुख यांनी निश्चितपणे केले आहे. शिवाय ज्याला ज्या गोष्टीचं अधिक कुतुहल असेल तसा त्याने शोध घेत निघावं इतकी रसद हा ग्रंथ पुरवतो. या सर्व लेखकांचं ग्रंथलेखन आणि त्यादिशेने त्यांनी आयुष्यभर केलेलं काम याचीही दीपा देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली आहे. एका वाक्यात या ग्रंथाचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की हा एकच ग्रंथ वाचला की जग बदलणारे हे 50 ग्रंथ आणि संदर्भासाठी आलेले इतर ग्रंथही वाचून झाले असं वाचकाला वाटू शकेल. त्यातली ही काही नावं पाहिली तरी त्याचं महत्व अधोरेखित होतं.
जग बदलणारे हे ग्रंथ आहेत -
भगवदगीता, त्रिपिटक, बायबल, कुरआन, प्लेटोचं द रिपब्लिक, कौटिल्यचं अर्थशास्त्र, वात्स्यायनचं कामसूत्र, गॅलिलिओचं डायलॉग, सन त्सूचं द आर्ट ऑफ वॉर, न्यूटनचं प्रिन्सिपिया, चार्ल्स डार्विनचं द ओरिजिनल ऑफ स्पीशीज, कार्ल मार्क्सचं दास कॅपिटल, सिग्मंड फ्रॉईडचं द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स, महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग,
बर्ट्रांड रसेलचं मॅरेज अँड मॉरल्स, सिमॉन द बोव्हाचं द सेकंड सेक्स, स्टीफन हॉकिंगचं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम ते अलिकडे जगभर गाजत असलेलं युवाल नोआ हरारीचं सेपियन्स : द ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड.
दीपा देशमुख यांचं विशेष कौतुक करायचं म्हणजे या महान पन्नास आणि संदर्भाने आलेल्या इथर अनेक ग्रंथांचा परिचय करून देताना त्यांनी तो अतिशय प्रवाहीपणे आणि रंजकपणे करून दिला आहे. इथे केवळ अभ्यासुनी प्रकटावे एवढेच नाही तर ' मी अनुभवले तुम्हीही अनुभवा ' असा पवित्रा आहे. त्यामुळे या पन्नास विषयातील काही विषय वाचकाच्या आवडीचे नसले तरी त्यांनीही जग कसे बदलले या कुतुहलापोटी तो तेही वाचेल आणि मूळ ग्रंथाच्या शोधात निघेल.
दीपा देशमुख यांनी या ग्रंथांचा परिचय कसा करून दिला आहे त्याची काही उदाहरणे द्याविशी वाटतात.
बर्ट्रांड रसेल याच्या ' मॅरेज अँड मॉरल्स ' चा परिचय करून देता देता त्या त्याच्या पंधरावीस महत्त्वाच्या पुस्तकांचा आणि ती लिहिण्यामागच्या त्याच्या प्रेरणांविषयी लिहितात. त्यातून विचारवंत, गणितज्ञ, तत्वज्ञ, विज्ञानवादी, विवेकनिष्ठ अशी रसेलची अनेक रूपं उलगडत जातात आणि हे केवळ 8 / 10 पानातून ! त्याची युद्धविरोधी मतं आणि त्यासाठी त्याने उभारलेला लढा याचाही परिचय आहे या मोजक्या पानात. त्याला असलेलं विविध विषयांविषयीचं कुतूहल आणि त्यासाठी त्याने अनेक धडपडी करून केलेला अभ्यास याचं रंजक वर्णनही या ग्रंथात आहे. हे एकच उदाहरण पहा.
रसेलला लैंगिकता आणि नीतिमत्ता या विषयांविषयी कुतूहल होतं. त्याकाळी लैंगिकता या विषयावर कुणी उघडपणे बोलत नव्हतं. रसेलने वैद्यकीय विषयांवरची पुस्तकं वाचून त्याविषयी समजून घेतलं. परंतु त्यावरची टिपणं कुणाला कळू नयेत म्हणून तो ग्रीक भाषेत लिहित असे.
सन त्सू या इसवी सन पूर्व पाचव्या शतकात म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या चीनमधल्या सैन्यदलातल्या जनरल आणि रणनीतीकाराने ' द आर्ट ऑफ वॉर ' हा ग्रंथ लिहिला. तो केवळ युध्दनीती ठरविण्यासाठीच उपयोगाचा नाही तर जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात अगदी कुणालाही यशस्वी होण्यासाठी डावपेच - स्ट्रेटजीस कशा आखाव्यात याचं नेमकं प्रशिक्षण देणारा ग्रंथ आहे. कधी लढावं आणि कधी लढू नये हे सांगतानाच दीर्घकाळ चालणारं युध्द कधीच कुठल्याही देशाला लाभदायक ठरलेलं नाही असं हा सन त्सू सांगतो आणि पुढे असंही बजावतो की, संताप किंवा क्रोध यातून जी युध्दं घडतात त्यात पराभवच पदरी पडतो. त्यातून अराजकता आणि अंदाधुंदीचं वातावरण निर्माण होतं आणि अधिक पीडा आणि वेदनादायी परिस्थिती उदभवते. सन त्सू जरी युध्दखोर वृत्तीच्या सत्ताधिशांना याची जाणीव करून देत असला तरी ते रोजच्या रोज जगण्याची लढाई लढत असलेल्या कुणालाही लागू पडतं. जगभरच्या मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातही हा ग्रंथ विचारात घेतला जातो. कुणाचंही दैनंदिन जगणं असो की व्यवसाय की व्यवस्थापन की राजकारण की खेळ, ' द आर्ट ऑफ वॉर ' हा ग्रंथ खरा मार्गदर्शक ठरतो.
महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांनी सदर स्वरूपात लिहिलेले ' वाचता वाचता ' चे दोन खंड पुढे प्रसिद्ध झाले. त्यांच्या या ग्रंथांपासून अलिकडच्या प्रा. नीतीन रिंढे यांच्या ' लीळा पुस्तकांच्या ' आणि ' पासोडी ' या दोन ग्रंथांपर्यंत अशी काही वाचन संस्कृतीवरची प्रगल्भ पुस्तकं मराठीत आली. त्याच प्रकारातलं दीपा देशमुख यांचं हे पुस्तक आहे. आरंभी म्हटल्याप्रमाणे सर्वांनाच एकूण एक पुस्तकं वाचणं शक्य नाही. परंतु ही पुस्तकं ज्या तमाम पुस्तकांचा परिचय करून देतात ती सर्व पुस्तकं आपलीही वाचून झाली असं वाटायला लावतात. पुन्हा वर म्हटल्याप्रमाणे ज्याला ज्या विषय, लेखकाबद्दल विशेष कुतुहल आहे त्यांना नेमकं मार्गदर्शन करतात. म्हणूनच मला दीपा देशमुख यांचं हे ' जग बदलणारे ग्रंथ ' खूप आवडलं. मनोविकास प्रकाशनगृहाचं हे पुस्तक अतिशय देखणं आहे. जितका मजकूर प्रगल्भ तितकीच या ग्रंथाची मांडणी आणि एकूणच रूपडं भारदस्त. वाचन संस्कृतीची जाण अधिक विस्तारत नेत असलेले हे ग्रंथ प्रत्येक चोखंदळ वाचकाच्या संग्रही असायला हवेत. कारण हे संदर्भ ग्रंथ, नव्हे ग्रंथकोष हे सतत वाचकाच्या आसपास हवेत. त्यामुळे खूप वाचलं तरी वाचायचं राहून गेलं याची खंत काही प्रमाणात ते निश्चितपणे कमी करतात. शिवाय जी पुस्तकं आपण वाचलीच पाहिजेत त्याचं सतत स्मरण करून देतात. दीपा देशमुख यांचं ' जग बदलणारे ग्रंथ ' हे असं एक पुस्तक आहे. खरा रसिक असतो तो स्वतः जो कलानंद घेतो तो इतरांनीही घ्यावा यासाठी धडपडत असतो. ' मी अनुभवले मी समृध्द झालो तुम्हीही व्हा ' अशी जो आंच मनाशी बाळगतो तो चोखंदळ रसिक असतो. वाचन संस्कृतीचा अवकाश अधिक भलाभक्कम करणारे हे सर्व ग्रंथ अशा चोखंदळ रसिकाच्या सहवासात ठेवतात आणि आपलं वाचनही अधिकाधिक समृद्ध, प्रगल्भ होत जातं. हे जे काही मी इथे लिहिले आहे ते रूढार्थाने पुस्तक परीक्षण नव्हे. दीपा देशमुख यांचं ' जग बदलणारे ग्रंथ ' वाचल्यानंतर याआधीची माझ्या संग्रही असलेली आणि मला सतत ' नव्या ' चा शोध घ्यायला लावणारी अशी पुस्तकं आठवली आणि मनाशी जे काही आणि जसं काही आलं ते उस्फूर्तपणे एका ओघात मी लिहिलं. जागतिक सिनेमाच्या प्रांगणात अभिजात म्हणून गौरविले गेलेल्या अनुपम कलाकृतींचा परिचय करून देणारी अशी किती तरी पुस्तकं मी वाचली आहेत. त्यात पटकन आठवतं ते मुळचा समीक्षक - अभ्यासक आणि नंतरचा जागतिक ख्यातीचा दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रूफो याचं ' फिल्म्स इन माय लाईफ ' हे अजोड पुस्तक. या अशा चोखंदळ रसिकांनी आणि आस्वादकांनी इतकं काही समोर आणून ठेवलंय की एक आयुष्य पुरणार नाही. बापहो तुमचे आभार किती आणि कसे मानायचे..?
अशोक राणे
Add new comment