आली माझ्या घरी ही दिवाळी ....
यंदाची दिवाळी सुखकर करण्यासाठी मनोविकास प्रकाशनाने अनेक अडथळे पार करून तसंच माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जग बदलणारे ‘ग्रंथ’ हे पुस्तक मला २८ तारखेला भेट दिलं, तसंच ते वाचकांसाठी देखील उपलब्ध करून दिलं आहे. मनोविकास आणि माझं नातं लेखक आणि प्रकाशक म्हणून तर आहेच, पण आम्ही एका विस्तारित कुटुंबाचा भाग देखील आहोत. त्यामुळे हातात ग्रंथाची प्रत घेऊन आज आपल्याशी संवाद साधताना विशेष आनंद होतो आहे. ‘ग्रंथ’चं अप्रतिम असं मुखपृष्ठ विख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचं आहे. हातात घेतल्याक्षणी ‘दुनिया मेरी मुठ्ठी मे’ चा फिल येतो! जरूर वाचा, दिवाळीत आपल्या जिवलगांना भेट द्या आणि आपली प्रतिक्रिया मला कळवा.
जग बदलणारे
‘ग्रंथ’...... ब्लर्ब
माणसाची प्रगती होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. चाकाचा शोध लागला आणि त्याच्या जगण्याला गती मिळाली. विज्ञान आणि शोधांनी माणसाला डोळस बनवलं. कलेनं त्याचं आयुष्य सुंदर केलं. औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्या आयुष्यानं वेगळी वाट पकडली. तंत्रज्ञानानं त्याच्या आयुष्यात खूप मोठी जागा व्यापली आणि त्याचं आयुष्य सुखकर केलं. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात माणसाची मग एक एक गोष्ट नीट समजून घेण्याची धडपड सुरू झाली, कधी त्यानं विज्ञानाची साथ घेतली, तर कधी तंत्रज्ञानाची मदत घेतली. कधी त्यानं स्वत:ला समजून घेण्यासाठी मानसशास्त्राची शाखा निर्माण केली. कधी त्यानं व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अर्थशास्त्राची सोबत घेतली. कधी त्यानं आपली मूल्यं विकसित करताना त्यांना तत्त्वज्ञानाची जोड दिली. माणसाच्या वाटचालीत स्त्रीवर लादलेलं दुय्यमत्व झुगारण्यासाठी तिनं संघर्ष केला आणि आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी ठाम भूमिका घेतली. या सगळ्या गोष्टींचा दस्तावेज ‘ग्रंथ` रुपात जतन करण्याची प्रक्रिया माणसानं सुरू ठेवली. त्यामुळेच जगभरात आज धर्म, अर्थ, काम, कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, अनुवंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, चरित्र अशा अनेक शाखांमधलं लिखाण ग्रंथांच्या रुपानं निर्माण झालं. यातल्या अनेक ग्रंथांनी जगावर प्रभाव टाकला. यातले निवडक 50 ग्रंथ घेऊन त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न ‘ग्रंथ` मध्ये करण्यात आला आहे. कुतूहल, ज्ञानाची आस असणाऱ्या प्रत्येकानं आपलं जगणं अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्यासाठी दीपा देशमुख लिखित हा ‘ग्रंथ` वाचायलाच हवा.
Add new comment