‘माय नेम इज बाँड, जेम्स बाँड!’

‘माय नेम इज बाँड, जेम्स बाँड!’

जेम्स बाँड हे पात्र रॉजर मूरच्या आधी शॉन कॉनरीसह तिघांनी रंगवलं. रॉजर मूरनंतरही अनेकांनी जेम्स बाँडचे चित्रपट करत त्याला जिवंत ठेवलं. असं असलं तरी जेम्स बाँड हे पात्र खरंखुरं वाटावं इतकी जान या पात्रात रॉजर मूर यानं आणली होती. २३ मे हा रॉजर मूरचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्याच्याबद्दलचा हा लेख...
...............
तो आला....सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा, देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा, धाडसी, बुद्धिमान....हातात पिस्तुल आणि त्याच्या प्रवेशाबरोबरच मनाला भिडणारी खास संगीताची धून...हृदयात धडधड निर्माण करणारी......हातातलं पिस्तुल समोर करून तो उभा. त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघताच तो म्हणाला, ‘माय नेम इज बाँड, जेम्स बाँड!’ चेहऱ्यावर किंचित मिश्किल भाव आणत बोलणाऱ्या या माणसाची ओळख क्षणात पटली. या रॉजर मूरच्या जेम्स बाँडनं आबालवृद्धांच्या हृदयावर तब्बल १२ वर्षं राज्य केलं.

जेम्स बाँड हे प्रकरण आहे तरी काय? इयान फ्लेमिंग नावाच्या ब्रिटिश लेखक महोदयांनी आपल्या १२ कादंबऱ्यांमधून जेम्स बाँड या काल्पनिक पात्राला जन्म दिला. जेम्स बाँड हा ब्रिटिश गुप्तहेर संघटनेचा हेर (सर्व्हिस एजंट) असतो. जेम्स बाँडचा लेखक आयन फ्लेमिंगनं आपल्या कादंबरीत जेम्स बाँड हे नाव अमेरिकेत पर्यावरण क्षेत्रात पक्षी निरीक्षणाचं काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावावरून घेतलं. त्याला सुरुवातीला हे नाव अतिशय साधं, डल, अनरोमँटिक असं वाटलं होतं आणि त्याला ते नाव तसंच हवं होतं. त्याच्या कादंबरीतही हे पात्र तसंच असणार होतं; मात्र लेखकाचं वाटणं खोटं ठरवत जेम्स बाँड हे काल्पनिक पात्र पुढे संपूर्ण जगभर काय धुमाकूळ घालेल याची त्यानं कल्पनाही केली नसेल. 

जेम्स बाँड हे पात्र रॉजर मूरच्या आधी शॉन कॉनरीसह तिघांनी रंगवलं. रॉजर मूरनंतरही आजपर्यंत अनेकांनी जेम्स बाँडचे चित्रपट करत त्याला जिवंत ठेवलं. असं असलं तरी जेम्स बाँड हे पात्र खरंखुरं वाटावं इतकी जान या पात्रात रॉजर मूर यानं आणली होती. जेम्स बाँड हे पात्र जनमानसात इतकं लोकप्रिय झालं होतं, की दूरदर्शन, रेडिओ, कार्टून्स, व्हिडिओ गेम्स आणि चित्रपट या सगळ्या माध्यमांना त्यानं काबीज केलं होतं. त्यावर अनेक चित्रपट आणि कार्टून्स मालिका निघाल्या. जेम्स बाँडवर १९६२ ते २०१७ या कालावधीत एकूण २४ चित्रपट निघाले. थायलंडमधल्या एका बेटाला तर ‘जेम्स बाँड बेट’च म्हटलं जातं. 

जेम्स बाँड याचा दमदार प्रवेश, त्याच्या प्रवेशाबरोबरच संपूर्ण चित्रपट संपेपर्यंतचं त्याचं राज्य बाँडमय करून सोडणारं....जेम्स बाँड हे चित्रपटातलं मध्यवर्ती पात्र असून त्याचा कोड नंबर ००७ असतो. त्याच्या चित्रपटात त्याला अनेक सुंदर सुंदर स्त्रियाही भेटतात. एकाच चित्रपटात अनेक तरुणी त्याच्या सहवासात येत असूनही आपल्याला ते प्रेक्षक म्हणून खटकत नाही. अॅक्शनबरोबरच त्याचे रोमँटिक प्रसंगही तो तितकेच समरसतेनं खुलवत असे. 

रॉजर मूर याचा जन्म १४ ऑक्टोबर १९२७ या दिवशी लंडन इथे झाला. त्याचे वडील जॉर्ज अल्फ्रेड मूर हे पोलीस, तर आई लिली ही एक गृहिणी होती. गंमत म्हणजे त्याची आई - लिली हिचा जन्म भारतात कोलकाता (त्या वेळचं कलकत्ता) इथे झाला होता. रॉजर मूरची शाळेतली प्रगती चांगली होती. तो एक चांगला स्विमरही होता. वयाच्या १५व्या वर्षी तो शाळेतून बाहेर पडला आणि लंडनच्या पब्लिसिटी पिक्चर प्रोडक्शन या फिल्म कंपनीत कामासाठी दाखल झाला. तिथे त्याला अॅनिमेशनच्या विभागात काम मिळालं. दिसायला रॉजर मूर देखणा होता. त्यानं ‘सीझर अँड क्लिओपात्रा’ या १९४५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. खरं तर डेस्मंड हर्स्ट या दिग्दर्शकानं त्याला हेरलं होतं; पण त्याला पुढल्या संधी मिळायच्या आतच त्याला वयाच्या १८ व्या वर्षी आर्मीमध्ये जाण्यासाठी बोलावणं आलं. तीन वर्षं तो आर्मीत काम करत राहिला. १९४५ साली त्यानं आपल्या फिल्म करिअरला सुरुवात केली. १९४० ते १९५० या कालावधीत त्यानं दूरदर्शनवर काम केलं; मात्र तो खरा ओळखला गेला तो जेम्स बाँडच्या भूमिकेनंच. रॉजर मूरनं काही काळ कार्टून अॅनिमेटर म्हणूनही काम केलं. जेम्स बाँडच्या भूमिकेत शिरण्याआधी त्यानं १९५३ साली ‘द सेंट’ ही टीव्ही मालिका केली होती. त्यानं दूरदर्शनवरही अनेक मालिकांमध्ये काम केलं असलं, तरी तो खरा प्रसिद्धीच्या झोतात आला तो ‘द सेंट’ या मालिकेतल्या भूमिकेमुळेच. त्यातलं त्याचं सायमन टेंपलर हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. या सगळ्यात रॉजर मूर याचं पदवीपर्यंतचं शिक्षण मात्र अर्धवटच राहिलं. 

१९५३ साली रॉजर मूर अमेरिकेला गेला. त्याला तिथे ‘द लास्ट टाइम आय सॉ पॅरिस’, ‘इंटरप्टेड मेलडी,’ ‘द किंग्ज थिफ,’ ‘डायना’ अशा चित्रपटांतल्या भूमिका करायला मिळाल्या. त्याचा चित्रपटातला आदर्श स्टेवर्ट ग्रँजर हा होता. त्यानं नामांकित ‘वॉर्नर ब्रदर्स’बरोबरही चित्रपट केले.

शॉन कॉनरीनं रंगवलेला जेम्स बाँड लोकांच्या मनात आपली एक प्रतिमा निर्माण करून होता. खरं तर रॉजर मूरसमोर प्रेक्षकांच्या मनातली पहिल्या जेम्स बाँडची छबी पुसून आपली छबी तयार करण्याचं फार मोठं आव्हान होतं; मात्र त्यानं ते लीलया पेललं. आधीच्या जेम्स बाँडच्या वलयातून त्यानं स्वतःला वेगळं कसं केलं हे खूपच विलक्षण आहे. रॉजर मूरनं गंभीर असलेल्या जेम्स बाँडला विनोदी खेळकर स्वभावाची किनारही दिली. त्यामुळे त्याची भूमिका लोकांना खूपच आवडू लागली. १९७३ ते १९८५ या कालावधीत म्हणजे १२ वर्षांत त्यानं सात बाँडपटांत काम केलं. ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ (१९७४), ‘द स्पाय हू लव्ह्ड मी’ (१९७७), ‘मूनरेकर’ (१९७९), ‘फॉर युवर आइज ओन्ली’ (१९८१), ‘ऑक्टोपसी’ (१९८३) आणि ‘ए व्ह्यू टू अ कील’ (१९८५). यानंतर मात्र रॉजर मूरनं आपण जेम्स बाँडच्या भूमिकेतून आता निवृत्त होत असल्याचं १९८५च्या डिसेंबर महिन्यात जाहीर केलं. यातला ‘द स्पाय हू लव्ह्ड मी’ हा चित्रपट रॉजर मूर याला स्वतःलाही खूप आवडत असे. तो चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. यातल्या पात्रांची अचूक निवड आणि अत्युत्कृष्ट संगीत यांमुळेही हा चित्रपट गाजला. या चित्रपटाचा शेवट कोणीही विसरू शकणार नाही. त्याच्या ‘ऑक्टोपसी’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं, की त्यातलं काही शूटिंग भारतात उदयपूर इथे झालं असून, त्यात कबीर बेदी आणि प्रसिद्ध टेनिसपटू विजय अमृतराज यांच्याही भूमिका आहेत. यात रॉजर मूरला तीन चाकी रिक्षातून उदयपूरच्या गर्दीतून फिरताना बघणं हा खूप सुंदर अनुभव होता. 

रॉजर मूरनं अनेक चित्रपटांमधून काम केली असली, तरी त्यानं वेगवेगळ्या क्षेत्रांतही स्वतःला आजमावून बघितलं. त्यानं जाहिरात क्षेत्रात काम केलं. तो एक चांगला लेखकही होता. रॉजर मूरनं ‘लिव्ह अँड लेट डाय’ हे डायरी स्वरूपातलं पुस्तक लंडनमध्ये ‘पॅन बुक्स’द्वारे १९७३ साली प्रसिद्ध केलं. ‘लास्ट मॅन स्टँडिंग’ आणि ‘बाँड ऑन बाँड - रिफ्लेक्शन्स ऑन ५० इयर्स ऑफ जेम्स बाँड’ अशी पुस्तकंही त्यानं लिहिली. २००८ साली त्याचं आत्मचरित्र ‘माय वर्ड इज माय बाँड’ हे ‘कॉलिन्स’तर्फे अमेरिकेत प्रसिद्ध झालं. २०१२ साली ‘जेम्स बाँड फिल्म्स’ हे मूरच्या आठवणी, विचार, अॅनेक्डॉट्स आणि फोटोज असलेलं ‘जेम्स बाँड ००७’शी निगडित पुस्तक प्रसिद्ध झालं. 

आपल्या कारकिर्दीत त्यानं मानाचे अनेक पुरस्कार पटकावले. १९८० साली त्याला ग्लोब पुरस्कारानं, तर २००३ साली ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याच्या चित्रपटांनाही अनेक पुरस्कार मिळाले. खरं तर त्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी मोजता येणार नाही इतकी मोठी आहे. १९९९ साली ब्रिटिश एम्पायरद्वारा ‘कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्याच्या सामाजिक कामातल्या योगदानाबद्दल २००० साली त्याला ‘लंडन व्हरायटी क्लब’च्या वतीनं आंतरराष्ट्रीय ह्यूमॅनिटेरियन अॅवार्डनं गौरवण्यात आलं. २००३ साली फ्रान्सच्या ‘नॅशनल ऑर्डर ऑफ आर्टस् अँड लेटर्स’नं सन्मानित करण्यात आलं. लोककल्याण आणि समाजसेवा यातल्या येागदानामुळे रॉजर मूरला ‘नाइटहूड’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती. लोकांना त्याच्याबद्दल विलक्षण आदर होता. 

रॉजर मूरनं आपल्या आयुष्यात एकूण चार लग्नं केली. त्याची चौथी पत्नी ख्रिस्तिना हिच्याशी त्याचं २००२ साली लग्न झालं आणि त्याच्या मृत्यूपर्यंत तिनं त्याला साथ दिली. रॉजर मूर आपल्या तीन मुलांबरोबर राहत होता. रॉजर मूरचा धाकटा मुलगा ख्रिस्तियन हा चित्रपट निर्माता आहे. 

रॉजर मूर कॅन्सरबरोबरच हृदयाच्या समस्येनंही ग्रस्त होता. त्याला दोन प्रकारचे डायबेटिस होते; मात्र तरीही तो अनेक धर्मादाय संस्थांच्या बरोबर कामांमध्ये सक्रिय होता. १९९१पर्यंत त्यानं युनिसेफ संस्थेचा अॅम्बेसेडर म्हणून काम बघितलं. अखेर २२ मे २०१७ या दिवशी वयाच्या ८९ व्या वर्षी प्रोस्टेट कॅन्सरमुळे स्वित्झर्लंडमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबानं त्याच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर टाकली. अंत्यविधी मोनाकोमध्ये केला जावा, अशी त्याची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्यात आली.

रॉजर मूर या जगातून गेला असला, तरी पण जेम्स बाँडच्या रूपात तो कायमच आपल्या मनात राहणार आहे, हे मात्र नक्की! त्याची एंट्री आणि त्याच्याबरोबर येणारं संगीत आणि त्याचे ‘माय नेम इज बाँड, जेम्स बाँड!’ हे शब्द आपण कधीच विसरू शकणार नाही!

- दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.