सहलेखन: आनंददायी प्रक्रिया - सेतू दिवाळी अंक 2015

सहलेखन: आनंददायी प्रक्रिया - सेतू दिवाळी अंक 2015

मासवणसारख्या आदिवासी भागात मी आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेत शिक्षण विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना माझी ओळख अच्युत गोडबोले या चतुरा व्यक्तिमत्वाच्या अतिशय प्रसन्न आणि उत्साही व्यक्तीबरोबर झाली. पहिल्याच भेटीपासून औपचारिकता किंवा परकेपण जवळपास फिरकलंच नाही. मी ज्या भागात काम करत होते, तिथे त्या वेळी मोबाईलचे टॉवर्स वगैरे झाले नसल्यानं आमचा संपर्क होणं ही खूपच कठीण गोष्ट होती. 

त्या वेळी अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं ‘बोर्डरूम’ हेच पुस्तक मी वाचलेलं होतं. पण त्यानंतर त्यांची ‘नादवेध’ आणि ‘संगणकयुग’ ही पुस्तकंही मी वाचली. त्या वेळी लोकसत्तामध्ये ‘झपूर्झा’ ही विदेशी साहित्यावरची त्यांची मालिका गाजत होती. मीही ती वाचत असे. लेख वाचून झाला की त्यावर त्यांच्याशी बोलतही असे. त्या बोलण्यातून त्यांच्यातली ज्ञानाची असोशी आणि जिज्ञासा यांची ऊर्जा मी अनुभवत होते. ‘ज्याप्रमाणे अ‍ॅसिमॉव्हनं इंग्रजीत अनेक विषयांत काम करून ठेवलंय, त्याचप्रमाणे अच्युत आज जगभरातलं ज्ञान मराठी वाचकांसमोर आणण्याचं काम करतोय’ लोकसत्ताचे ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार, लेखक, विश्लेषक कुमार केतकर यांनी असं म्हटलंय ते काही खोटं नाही. अच्युत गोडबोले यांनी आपल्या ‘मुसाफिर’ या आत्मचरित्रात त्यांची जडणघडण सविस्तरपणे लिहिली आहेच. लहानपणी सोलापूरला असताना पुजारी सर, त्यांच्या बहिणी सुलभाताई आणि पुष्पा, तसंच त्यांचे आई आणि वडील यांच्यामुळे विज्ञान, गणित, साहित्य, संगीत आणि चित्रकला यांची गोडी लागली ती आजपर्यत! त्यातही चित्रकला, संगीत आणि साहित्य हे मानवी आयुष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याइतकेच किंवा त्यापेक्षाही किंचित जास्तच महत्त्वाचे आहेत हेही लहानपणापासूनच त्यांच्या मनावर ठसलं होतं. आयआयटीतल्या लायब्ररीमधली तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, संगीत आणि चित्रकला इतक्या वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं बघून हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. पण एवढं सगळं वाचणं आणि त्याहून ते सगळं कळणं शक्यच नव्हतं. पण या सगळ्यातले महत्त्वाचे विचार, महत्त्वाचे मतभेद, महत्त्वाच्या चळवळी यांची मूलभूत माहिती आणि त्यातली मूलतत्त्वं तरी आपल्याला माहीत हवीत असं त्यांना वाटायचं. इथेही पुन्हा हे परीक्षेला येणार नव्हतंच. पण सेमिस्टर परीक्षांपेक्षा आयुष्याची परीक्षा जास्त मोठी हे तत्त्वं त्यांच्या मनात पक्कं झालं होतं. त्यामुळे मग ‘असे अभ्यासक्रमाबाहेरचे ‘वायफळ’ विषय कशाला वाचा आणि शिका? आपल्याला हे उपद्व्याप करून काय करायचंय?  त्यांचा व्यावहारिक फायदा काय? ’ हे प्रश्न त्यांच्या मनाला कधीच पडले नाहीत. त्या काळात ३ वर्षं अभ्यासापेक्षा संगीत, साहित्य, अर्थकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवर वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्यासासाठी मित्रांबरोबर रात्रंदिवस चर्चांचे फड जमत. या चर्चांमधूनच आयआयटी झाल्यानंतर शहाद्याच्या भिल्ल आदिवासींमध्ये काम करण्याचा त्यांनी निणर्य घेतला. त्या काळात भोगलेला तुरुंगवास, चळवळीतून मुंबईत परत येणं, आयटी क्षेत्रातला प्रवेश आणि संघर्ष आणि मग त्यानंतरची ३५ वर्षं अनेक मोठमोठ्या कंपनीत सर्वोच्च पदी केलेलं काम हा त्यांचा प्रवास सर्वसामान्यांना अवाक् करणारा असाच होता. या प्रवासात त्यांना जगभर कामानिमित्त फिरायला मिळालं आणि त्या वेळी त्यांनी चारएक हजार पुस्तकं जमवली. कुठेतरी मनात हे सगळं नंतर आपल्याला लिहायचंय ही गोष्ट त्यांच्या मनात होतीच. त्यामुळेच मिळालेलं हे ज्ञान हे फक्त माहितीच्या स्वरुपात न राहता त्यातली मूलतत्त्वं त्यात मांडता आली पाहिजेत. म्हणूनच हे ज्ञान इतरांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याच्या ध्यासापोटी वर्षाला २-३ कोटी रु.च्या नोकरीवर लाथ मारून अखेरीस त्यांच्यातल्या शिक्षकानं लेखकाची धुरा खांद्यावर घेतली हेही तितकंच अचंबित करणारं होतं.

मासवण ते मुंबई या माझ्या सातत्यानं होणार्‍या प्रवासामुळे अच्युत गोडबोले यांच्याशी होणार्‍या भेटीतून संवाद वाढला आणि त्यातूनच एकमेकांच्या आवडीनिवडी कळत गेल्या. मी लिहिलेल्या अनेक कथा आणि कविता त्यांनी वाचल्या. माझं मनापासून कौतुकही केलं. त्याचबरोबर मी त्यांना त्यांच्या लिखाणात मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी माझ्यासमोर ठेवला. सुरुवातीला सहजपणे होकार दिलेला तो प्रस्ताव माझ्यासाठी एका मोठ्या जगाचं दालन उघडवणारा ठरणार आहे याची मला त्या क्षणी खरोखरंच कल्पना नव्हती. या भेटीत अच्युत गोडबोले अनेक विषयांवर बोलत. चर्चा करत. त्यातले अनेक विषय माझ्यासाठी नवे असत. मला त्यातली माहिती फारशी नसे. पण मी त्यावर माझी मतं मांडू शके. मग त्या मतांवरून आमच्यात चर्चा घडत. त्यांना मदत करताना मी सुरुवातीला त्यांनी हस्ताक्षरात पुस्तकासाठी लिहिलेल्या नोट्स कम्प्युटरवर आणण्याचं काम करायला लागले. माझी टाईप करण्याची गती खूपच जास्त असल्यानं ते काम मी सहजपणे पटकन करत असे. त्या वेळी आपलं लिखाण करतानाच कसं शुद्ध असायला हवं हे त्यांनी मला सांगितलं. कुठेही शंका आली की तो शब्द न चुकता डिक्शनरीत बघायची सवय त्यांनीच लावली. त्यामुळे कुठलंही लिखाण करताना, ‘नंतर दुरुस्त्या करू या’ विचारापेक्षा करतानाच ते अचूक करू ही सवय लागत गेली. मग त्यानंतर त्यांनी मला त्या त्या पुस्तकासाठी लागणार्‍या संदर्भासाठी वापरण्यात येणारी पुस्तकंही द्यायला सुरुवात केली. ही पुस्तकं वाचून पुस्तकाला लागणारे त्यातले अनेक संदर्भ वाचणं, त्यांच्या नोट्स काढणं त्या सगळ्या नोट्स एकत्र गुंफण, त्यांचा क्रम लावणं, त्यातली पुनरावृत्ती काढणं आणि पुन्हा एकदा शुद्धलेखन आणि वाक्यरचना तपासणं अशी अनेक कामं मी करायला लागले. 

अच्युत गोडबोले यांच्याबरोबर मी गेली ९-१० वर्षं काम करते आहे. त्यामुळे मी त्यांची कामाची पद्धत खूप जवळून बघितली आहे. अच्युत गोडबोले यांनी आत्तापर्यंत मूलभूत विषयांना स्पर्श करणारी ५००ते ६०० पृष्ठसंख्या असलेली अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांना ते सहजशक्य आहे. पुस्तकाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंतच्या निर्मितीप्रक्रियेत त्यांच्याबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभव असतो. एखादं पुस्तक लिहिताना त्यासाठी त्या विषयाशी संबंधित १००-१२० पुस्तकं जमवणं, त्यातली बरीचशी महत्त्वाची पुस्तकं पूर्णपणे वाचणं आणि इतर पुस्तकातली पाहिजेत ती प्रकरणं वाचणं आणि नंतर त्यातल्या तज्ज्ञांशी चर्चा करणं, तसंच त्या विषयातली मूलतत्त्वं आणि त्या विषयाचा इतिहास आणि त्या विषयातल्या मुख्य नायकांची आयुष्य समजून घेणं अच्युत गोडबोले सातत्यानं करत असतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या लिखाणात ते समीक्षकाची भूमिका घेत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर ‘शेक्सपिअर आणि बर्नार्ड शॉ यांच्या नाटकातल्या स्त्रियांच्या चित्रणाचा तौलनिक अभ्यास’ अशा तर्‍हेचे विषय हाताळण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांचं साहित्य आणि आयुष्य यांची ओळख करून द्यावी आणि सामान्य वाचकाला उद्युक्त करावं हाच त्यांचा हेतू असतो. हेच मग साहित्याबरोबरच चित्रकला, संगीत आणि इतर विषयांना लागू होतं. त्यांच्यामुळे विषयाच्या मुळापर्यंत कसं जायचं आणि चिकाटीनं ते काम पूर्णत्वाला कसं न्यायचं हे मी शिकले. ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘गुलाम’, ‘स्टीव्ह जॉब्ज’, ‘थैमान चंगळवादाचे’, ‘नॅनोदय’, ‘मनात’, ‘गणिती’, ‘मुसाफिर’ आणि  ‘झपूर्झा (भाग १)’ या पुस्तकात त्यांना मदत करताना कामाकडे काम म्हणून न बघता तो विषय शिकत असतानाच त्यातलं सौंदर्य शोधत राहणं हा प्रवास किती आनंददायी असतो हे समजलं.

अच्युत गोडबोले आणि माझी ओळख झाली, तेव्हा मी मासवणला १५ आदिवासी गावांमधल्या ७८ पाड्यांवर काम करत करतेय या गोष्टींचं त्यांना प्रचंड कौतुक होतं. त्यांनी स्वतः धुळे जिल्ह्यात शहादा इथल्या भिल्ल आदिवासींमध्ये काम केलं होतं. त्यामुळे आमच्यात एक समान धागा होताच. लहानपणापासून मला वाचनाची आवड होतीच, पण माझं बहुतांशी वाचन हे मराठीतून झालं होतं आणि अच्युत गोडबोले यांचं मराठी आणि इंग्रजी या भाषांतून केलेलं वाचन अफाट होतं आणि आहे. तसंच त्यांचा मित्रसमुदाय प्रचंड बुद्धिमान असल्यानं त्यांच्या जागतिक पातळीवरच्या चर्चाही त्यांना समृद्ध करत गेल्या. तसंच मी सर्जनशील लेखनात रमणारी तर ते स्वतःला एक ‘इंटिग्रेटर’ समजत असल्यानं काही बाबतीतलं साम्य आणि काही बाबतीतलं वेगळेपण आमच्या सहलेखनासाठी पूरकच ठरलं. त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या आग्रहामुळे मी इंग्रजी पुस्तकंही वाचायला लागले आणि त्यामुळेच अनेक पाश्चिमात्य विषयांची माझी ओळख झाली. ती कशी वाचावीत, त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ लावताना काय करायला हवं याबद्दल अच्युत गोडबोले वेळोवेळी मला मार्गदर्शन करत आणि आजही करतात. 

ही सगळी कामं करताना अच्युत गोडबोले ‘हे पुस्तक आपलं आहे’ अशीच बोलण्याची सुरुवात करत. त्यामुळे त्या त्या वेळी लिहीत असलेलं पुस्तक हे ‘फक्त त्यांचं’ न राहता ते ‘आमचं’ होऊन जात असे. मग पुस्तकाच्या कच्च्चा आराखड्यापासून ते पुस्तक पूर्ण होईपर्यंतच्या निर्मितीप्रक्रियेत आमचा हा सहप्रवास सुरू होत असे आणि आजही असतो. ही कामं एकीकडे सुरू असताना त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठंही मी बनवायला लागले. मुखपृष्ठ बनवताना ते पुस्तक बघून वाचकाला पटकन त्यात काय आहे हे कळलं पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन असल्यानं मला तेही जमायला लागलं. त्यांच्यामुळे मला फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ यातली तंत्रं समजत गेली. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत प्रकाशकाशी संपर्क साधणं ही देखील जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकल्यामुळे या कामात पुस्तकाचा कच्चा आराखडा ते पुस्तक पूर्ण होणं या सगळ्यातले सगळे टप्पे मला नीटपणे बघता आले आणि शिकताही आले. त्यांच्याबरोबर काम करताना एकीकडे ‘किमयागार’मधले वैज्ञानिक, तर दुसरीकडे ‘झपूर्झा’तले साहित्यिक, तिसरीकडे ‘अर्थात’मधले मार्क्सपासून केन्सपर्यंतचे अर्थतज्ज्ञ, तर ‘मनात’ मधले सगळे मानसशााज्ञ समोर येऊन माझ्याशी अच्युत गोडबोले यांच्या शैलीदार लिखाणामधून बोलायला लागले. कॉलेजात शिकताना इकॉनॉमिक्स विषय नकोसा वाटणारी मी आता नोटा, नाणी आणि जीडीपीमध्ये रस घ्यायला लागले. विज्ञानाची आणि गणिताची मला वाटणारी भीती तर ‘किमयागार’ आणि ‘गणिती’ या पुस्तकांनी घालवलीच. ‘गुलाम’ या पुस्तकावर काम करताना त्यातली गुलामगिरीचं वर्णनं अंगावर काटा आणत. त्यातही स्पार्टाकसच्या आयुष्यानं मन स्तिमित झालं होतं. ‘स्टीव्ह जॉब्ज’ या पुस्तकाच्या वेळी स्टीव्ह जॉब्ज आणि त्याचा मित्र स्टीव्ह वाझ्नियाक यांची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली झेप पाहून मी थक्क झाले. ‘थैमान चंगळवादाचे’ ही पुस्तिका तर एकाच बैठकीत अच्युत गोडबोले यांनी लिहून पूर्ण केली होती. ही पुस्तिका जास्त जिव्हाळ्याची वाटण्याचं कारण त्यातला विषय हे एक आहेच, पण आणखी एक कारण म्हणजे त्या वेळी ही पुस्तिका प्रसिद्ध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं त्या नरेंद्र दाभोळकरांनी आग्रह धरला होता. ‘नॅनोदय’ या पुस्तकाच्या वेळी तर नॅनोटेक्नॉलॉजीमधल्या गमतीजमती बघताना मी ‘माऊस’ या दिवाळी अंकासाठी त्यावर चक्क मुलांसाठी एक कथा लिहिली आणि ती प्रसिद्धही झाली. ‘झपूर्झा’च्या वेळी तर शेक्सपिअरपासून ते चेकॉव्ह, बाल्झॅक, टॉलस्टॉय, ऑस्कर वाइल्ड, शॉ, कामू आणि सार्त्र पर्यंतचे जगभरातले साहित्यिक माझे मित्र झाले आणि त्यांनी अक्षरशः मला मोहिनीच घातली. या काळातही मला इंग्रजीतून बरंच वाचन करता आलं.

अच्युत गोडबोलेंच्या बहुतांशी पुस्तकात मी मदत करत असले तरी त्यातही ‘मनात’ या पुस्तकाचं स्थान माझ्यासाठी खूप वेगळं आहे. एके दिवशी अच्युत गोडबोलेंनी मनाविषयी बोलायला सुरुवात केली आणि त्याच वेळी मानसशास्त्रावरच्या ‘मनात’ या पुस्तकानं जन्म घेतला. मला या विषयाचं प्रचंड कुतूहल होतं. शिवाय मी मानसशास्त्र घेऊन त्यात पदवी मिळवावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. ती इच्छा या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत मोठा सहभाग घेता आल्यानं पूर्ण करता आली आणि याचं श्रेय अच्युत गोडबोले या व्यक्तीलाच जातं. एवढंच नाही तर मनातच्या लेखननिर्मितीच्या काळात ‘सकाळ’मध्ये ‘मनात’ नावाची मालिकाही सुरू झाली. त्यामुळे पुस्तकासाठी लिहिलेल्या लेखांचं संक्षिप्तिकरण करणं, ते संपादकांना पाठवणं या सगळ्या गोष्टी करण्याची मोकळीक मला अच्युत गोडबोलेंमुळे मिळाली. या पुस्तकाच्या निर्मितीत आम्ही इतके झपाटून गेलो होतो की शेवटचे तीन महिने तर दिवसांतले १५-१५ तास आम्ही फक्त ‘मनात’ मध्येच बुडून गेलो होतो. माझा अनेक दिवस मुक्काम मुंबईला त्यांच्याच घरी असायचा. त्यामुळे आता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्यच होता आलं. अच्युत गोडबोले यांनी ‘मनात’ हे पुस्तक जेव्हा मला अर्पण केलं तेव्हा माझ्यासाठी ती खूपच अभिमानाची गोष्ट होती आणि आहे.  
अच्युत गोडबोले यांच्या कामाचा झपाटा अवाक् करणारा आहे आणि ते सतत उत्साही असतात. त्यामुळे ५०० ते ६०० पानी पुस्तकं वर्षभरात ते लीलया लिहू शकतात. पण अलीकडे गेल्या २-३ वर्षांपासून त्यांना असं वाटायला लागलं, की आपल्या डोक्यात आलेल्या कल्पना जेवढ्या संख्येनं आहेत, तेवढ्या संख्येनं आपण ही पुस्तकं प्रत्यक्षात आणू शकणार नाही. तसंच त्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांना जरी प्राधान्यक्रम दिलं आणि लिहायला घेतलं तरी आणखी किमान १० वर्ष तरी त्यासाठी लागतील आणि त्यातली फक्त सात-आठ पुस्तकंच बाहेर येऊ शकतील. तसंच याच दरम्यान स्पाँडिलायटिस आणि सायटिका यांच्यामुळे होणारा त्रास त्यांच्या लिखाणाच्या बैठकीत बाधा आणू लागला. तसंच त्यांना ३-४ वर्षांत यातले अनेक मोठे प्रकल्प पूर्ण करायचे होते. अशा वेळी जर आपले विचार पटणारा, चिकाटीनं काम करणारा, अभ्यासू वृत्तीचा, कुतूहल असणारा, विद्यार्थी होऊन शिकणारा, हाती घेतलेल्या विषयात बुडून जाणारा आपल्यासारखाच असा सहलेखक जर मिळाला तर हे काम लवकर होऊ शकेल असं त्यांना वाटलं आणि त्यातूनच त्यांनी मला सहलेखनाबद्दल विचारलं असावं. ‘कॅनव्हास’ हे पुस्तक लिहिण्याचा विचार मनात येताच अच्युत गोडबोले यांना सहलेखक म्हणून मी या पुस्तकाला न्याय देऊ शकेल असं वाटलं आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. अनेक वर्षं आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची लिखाणाची शैली मला आत्मसात करता आली होती. ‘‘तुझ्यातले साहित्यगुण, चिकाटी, कलात्मक दृष्टिकोन, नवीन गोष्टी शिकण्याची आवड आणि धडपड, वाचन आणि लिहिण्याची पद्धत बघून मी खूपच प्रभावित झालो. कुठल्याही विषयानं झपाटून जाणं आणि एक्सलन्सचा ध्यास घेणं हे मी जेव्हा तुझ्यात बघितलं, तेव्हा ‘कॅनव्हास’ हे पुस्तक आपणच करावं असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं’’ असं बोलून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला त्यांचा हा विश्वास सार्थ करायलाच हवा असं वाटलं. खरं तर माझे लिखाणाचे स्वतंत्र प्रकल्प सुरू होते. मुलांसाठी ‘सुपरहिरो’ या मालिकेवरचं काम सुरू होतं. पण अच्युत गोडबोलेंसारख्या व्यक्तीबरोबर लिहिणं ही माझ्यासाठी खूपच मोलाची गोष्ट होती. त्यांच्या बोलण्यानं माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. मग आमच्यामध्ये या विषयावर चर्चा सुरू झाल्या. अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. त्यांची उत्तरं शोधत आम्ही ‘कॅनव्हास’च्या पुस्तकयात्रेला आरंभ केला!
आम्ही कुठलंही पुस्तक लिहिणं सुरू करताना सर्वप्रथम त्या पुस्तकाचा कच्चा आराखडा तयार करतो. तसंच याही वेळी झालं. मग ‘कॅनव्हास’ या पुस्तकात काय काय असायला हवं, त्यातल्या प्रकरणांची रचना कशी करायची यावर आम्ही विचार केला. पुस्तक लिहिताना काय टाळायला हवं हेही आम्ही कटाक्षानं ठरवलं. प्रत्येक प्रकरणांची शब्दसंख्या किती असावी आणि त्या प्रकरणासाठी अनेक अडचणी आल्या तरी एकूण किती दिवस लागतील याचंही प्लॅनिंग केलं. पुस्तक किती कालावधीत पूर्ण करायचं आणि संपूर्ण पुस्तकाची पृष्ठसंख्या किती असावी इथंपासून सगळं नियोजन व्यवस्थितरीत्या पार पडलं. त्या पुस्तकासाठी लागणारी विशिष्ट विषयांवर असलेल्या खंडीभर पुस्तकांनी टेबल आणि एकूण खोलीची जागा व्यापली. त्यानंतर मग आम्ही एकत्र मिळूनच आपण कामाची विभागणी कशी करायची हेही ठरवलं. आम्ही लिहिलेलं एकमेकांना सतत ई-मेल द्वारे पाठवत होतो. त्या त्या वेळी त्यात भर टाकू शकतील असे अनेक मुद्दे आम्हाला सापडले, की आम्ही ते त्या त्या प्रकरणात सामीलही करत गेलो आणि त्यावर अनेकदा चर्चाही केल्या. इतकंच नाही तर ‘कॅनव्हास’ तयार होण्यापूर्वीच आम्ही त्याचं मुखपृष्ठही तयार केलं होतं. साधी, सोपी आणि रंजक भाषा पण तरीही दर्जाबाबत तडजोड नसणं, लिखाणाविषयीची चर्चा करणं हे सगळं आखताना अच्युत गोडबोले खूप उत्साही असतात. पुस्तक पूर्ण होईपर्यंत त्यांचा उत्साह तसाच खळाळता असतो. अच्युत गोडबोलेमधला संगणकतज्ज्ञ, व्यवस्थापक आणि शिक्षक इथं आपली कौशल्यं दाखवतो हे मात्र तितकंच खरं.

‘कॅनव्हास’ लिहिताना या विषयावर मराठीतून उपलब्ध साहित्य खूप कमी होतं. आम्हाला इंग्रजीतून अनेक पुस्तकं वाचावी लागणार होती. त्यासाठी पुण्यातली सगळी वाचनालयं आम्ही पालथी घातली. त्यानंतर मुंबईचं एनसीपीए आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अशा अनेक वाचनालयांतल्या पुस्तकांसाठी ‘पुणे ते मुंबई’ वार्‍या सुरू झाल्या. तिथली ती पुस्तकं बघून आम्ही अक्षरशः खजिना मिळाल्यासारखे वेडावून गेलो. कधी एकदा लिहून होईल असं मग वाटायला लागलं. मुंबईतलं जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे आम्ही गेलो, तेव्हा अच्युत गोडबोले यांनी तिथल्या प्राचार्यांना भेटून आपल्याला त्यांच्या ग्रंथालयात बसू देण्याची एका सर्वसामान्य माणसासारखी रीतसर अर्ज करून विनंती केली. त्या ग्रंथालयानं तिथली पुस्तकं बाहेर नेण्यास मनाई असल्याचा नियम सांगितला. मात्र तिथे आम्ही १० ते ५ या वेळात बसून ती पुस्तकं कॉपी करू शकणार होतो किंवा आमच्या कॅमेर्‍यानं फोटोही काढून घेऊ शकणार होतो. मग आम्ही प्राचार्य आणि ग्रंथपाल यांचे आभार मानत एखाद्या विद्यार्थ्यासारखं जे. जे. मध्ये जायला लागलो. सकाळी साडेआठ नऊ वाजता बाहेर पडलेलो आम्ही लोकलच्या खच्चून गर्दीतून प्रवास करत जे. जे. ला जायचो आणि काम संपल्यावर तितक्याच उत्साहानं रात्री आठ नऊ पर्यंत घरी पोहोचायचो. ग्रंथालयात आमच्यासमोर शेकडो पुस्तकांचा ढीग होता. काय घेऊ आणि काय नको अशी आमची अवस्था होती. पण अच्युत गोडबोले यांची तरबेज नजर कुठलं पुस्तकं चांगलं आहे हे पारखण्यात तयार झालेली असल्यानं आम्ही प्रत्येक चित्रकाराची ८-१० पुस्तकं निवडली. त्या पुस्तकाचं प्रत्येक पान उलटवून ते माझ्यासमोर धरण्याचं काम अच्युत गोडबोले यांनी न कंटाळता केलं आणि मी त्या प्रत्येक पानाचा माझ्या मोबाईलनं फोटो काढायची. अशी अनेक पुस्तकं आम्ही मोबाईलमध्ये बंदिस्त करायचो. मोबाईलचा डाटा भरला की आम्ही तो बरोबर नेलेल्या लॅपटॉपमध्ये रिकामा करायचो. तोपर्यंत पुढची पुस्तकं आपल्या फोटोसाठी पोझ देऊन सज्ज असायची. त्यानंतर आम्ही एनसीपीएच्या लायब्ररीतही गेलो. तिथलं रीतसर सदस्यत्व घेतलं आणि तिथेच बसून पुन्हा हेच काम आम्ही करायचो. हे पुस्तक लिहिताना ज्याप्रमाणे अनेक वाचनालयातून आम्हाला अनेक पुस्तकांचे संदर्भ मिळाले, त्याचप्रमाणे बीबीसी आणि यू-ट्यूबवरच्या अनेक फिल्मसही बघून अभ्यास करता आला. जवळजवळ १००-१२० इंग्रजी भाषेतली पुस्तकं या लिखाणासाठी उपयोगी पडली. तसंच अच्युत गोडबोले यांच्या वैयक्तिक संग्रहातली अनेक पुस्तकं मदतीला धावून आली.

आमचं ‘कॅनव्हास’ या पुस्तकाचं प्रत्यक्ष लिखाण सुरू झालं, तेव्हा आम्ही आपसांत ठरवलेल्या वेळात फोनवरून कधी, तर कधी प्रत्यक्ष भेटून चर्चां सुरू केल्या. त्यामुळे आम्ही आपापल्या जागी केलेलं लिखाण एकमेकांना त्या त्या टप्प्यावर कळत होतं आणि ते एकत्रित गुंफताही आलं. त्या वेळी पुस्तकात आम्ही निवडलेल्या मग मायकेलअँजेलोपासून ते पॉल सेजानपर्यंत आणि लिओनार्दो व्हिंची पासून तुलूझ लॉत्रेकपर्यंत  सगळे कलावंत आमच्याशी मूकपणे संवाद साधायला लागले. त्यांच्या कलाकृती अभ्यासताना अवाक् व्हायला झालं. त्यांचं विलक्षणपण त्यांच्या भव्यदिव्य निर्मितीतून हळूहळू कळायला लागलं होतं. मग त्या कलाकृतींना पोषक असणारा आणि नसणारा तो काळ, तो देश, ती परिस्थिती, ती माणसं, ती युद्धं आणि त्या वेळचे शासनकर्ते यांच्या अनुषंगानं शोध घेणं सुरू झालं. या लेखनप्रवासात त्या कलावंतांची वैयक्तिक आयुष्यं आणि त्यांच्या कलाकृतींचा प्रवास यांचा अनुभव हे शब्दातीत होतं. कलेचा इतिहास आणि त्यातले त्या त्या काळातले कलावंत हेच इतके विलक्षण होते की त्यांनी अक्षरशः त्यांच्या विश्वात आम्हाला खेचून घेतलं. या कामात एकदाही कंटाळलेलं किंवा थकलेलं मी अच्युत गोडबोलेंना बघितलं नाही. ‘कॅनव्हास’ लिहिताना आम्हाला दोघांनाही खूप आनंद आणि समाधान मिळालं. 
पुस्तक निर्मिती प्रक्रियेत कधी कधी मतभेदाचा मुद्दा आमच्यातही उपस्थित होतो. नाही असं नाही. पण त्यासाठी वादावादी, भांडण वगैरे होत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर अच्युत गोडबोले यांची लिखाणाची एक स्वतंत्र शैली आहे. सहलेखन करताना पुस्तक एकाच व्यक्तीनं लिहिलं आहे इतकं ते एकरूप होणं आवश्यक असल्यानं त्याची खूपच काळजी घ्यावी लागते. ‘कॅनव्हास’ हे पुस्तक लिहिताना चित्रकार आणि शिल्पकार यांची पोट्रेट्स शब्दांतून रंगवताना माझ्यातला कवी वेळोवेळी जागा होत होता आणि अनेक ठिकाणी मग कविता उमटायला लागल्या. अशा वेळी अच्युत गोडबोले यांना अशा लिखाणात कविता असाव्यात का असा प्रश्न पडला. सुरुवातीला त्यांना त्या कविता पुस्तकात असू नयेत असंच वाटलं आणि त्यांनी तसं मत मांडलं. पण मला मात्र त्या हव्या आहेत असं वाटलं. मग आम्ही निर्णय घेतला की पुस्तक पूर्णत्वाला आलं की ठरवूया. पूर्ण पुस्तक तयार झाल्यावर आम्ही जवळच्या काही मित्रमैत्रिणींनाही वाचायला देतो आणि त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतो. यातून पुस्तक परिपूर्ण व्हावं असा आमचा उद्देश असतो. अशा वेळी बहुसंख्य मित्रमैत्रिणींनी कवितांसाठी पसंतीची पावती दिली आणि त्या कविता ‘कॅनव्हास’मध्ये तशाच सामील झाल्या. त्यांना स्वतःलाही तो निर्णय पटला. मूळ लिखाणाला बाधा येत नाही ना, याची काळजी घेण्याच्या दृष्टीनंच ते बारकाईनं विचार करत असतात इतकंच! एखादा मुद्दा पटला तर तो स्वीकारण्याची लवचिकता त्यांच्यात आहे. म्हणूनच ‘कॅनव्हास’ लिहिताना माझ्यातला कल्पक लेखक आणि त्यांच्यातला इंटिग्रेटर एकत्र आले आणि त्यातूनच कॅनव्हास रंगत गेला. 

एक चांगला शिक्षक कसा असावा असा प्रश्न कोणी विचारला, तर त्याचं उत्तर निर्विवादपणे अच्युत गोडबोले असंच सांगता येईल. कारण ते समोरच्या व्यक्तीची बलस्थानं आणि उणिवा दोन्हींना नीट हाताळतात. उणिवांवर सारखं बोट ते कधीच ठेवत नाहीत. उलट ‘मला देखील अमूक अमूक एक गोष्ट येत नाही’ असं मोकळेपणानं सांगून मान्य करतात. तसंच समोरच्याची त्यालाही माहीत नसलेली कौशल्यं मात्र ते त्याच्यासमोर मांडतात आणि त्या गुणांची सतत प्रशंसाही करतात. त्यांच्या प्रशंसेनं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. सहलेखन करताना दोन स्वतंत्र मतं आणि विचार असलेल्या व्यक्ती एकत्र येणं म्हटलं तर खूपच सहज आहे आणि म्हटलं तर कठीण आहे. पण मुळातच अच्युत गोडबोले ही व्यक्ती दुसर्‍याला खूप समजून घेणारी अशी आहे. इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं त्यांना आवडत नाही, तर वेगवेगळया विषयांवरचं ज्ञान आणि त्यावरच्या चर्चा त्यांना खूप आवडतात. 

सर्जनशील लेखनासाठी कदाचित दोन लेखकांनी एकत्र मिळून काम करणं थोडंसं अवघड असू शकतं. उदाहरण घ्यायचं झालं तर कथा किंवा कविता, ललित लेखन या प्रकारात आपल्या मनात त्या वेळी उमटलेले, उस्फूर्ततेनं आलेले विचार आणि कल्पना यांच्या एकत्रिकरणातून हे लिखाण जन्माला येतं. 

आमचा दोघांचा जग बदलवणार्‍या शोधकांचा ‘जीनियस’ हा प्रकल्प हा नुकताच दिवाळीचं औचित्त्य साधून मनोविकास प्रकाशनातर्फे वाचकांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे. जीनियस ही अनेक पुस्तकांची मालिका असून ती १२-१२ पुस्तिकेच्या संचात वाचकांसमोर येत आहे. ‘जीनियस’च्या पहिल्या संचात गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, एडवर्ड जेन्नर, डॉ. रॉबर्ट कॉख, लुई पाश्चर, अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग, लीझ माइट्नर, मेरी क्युरी, जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि रिचर्ड फाईनमन ही सगळी वैज्ञानिक मंडळी वाचकांबरोबर संवाद साधणार आहेत. या मालिकेत जग बदलणार्‍या अनेक क्षेत्रातल्या ‘जीनियस’ मंडळींचं कार्य आणि त्यांचा अनोखा जीवनपट आम्ही उलगडला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, चित्र, संगीत आणि सामाजिक बदल या सगळ्या क्षेत्रांत ज्यांनी आख्ख्या जगाला एक वेगळा विचार करायला भाग पाडलं आणि जग बदलण्याचा ध्यास घेतलेल्या या शोधकांनी आपल्या जगण्याची दिशाच बदलवली. ही सगळी मंडळी सतत कशाचा ना कशाचा तरी शोध घेत होती, त्यासाठी त्यांनी आडवळणाची काटेरी वाट निवडली आणि झपाटल्यासारखे ते आपल्या ध्येयासक्तीच्या दिशेनं प्रवास करत राहिले. अशा सगळ्या ‘जीनियस’ शोधकांची सखोल ओळख करून देणारी ही अभ्यासपूर्ण मालिका अत्यंत सोप्या, सुटसुटीत, रसाळ आणि खुमासदार शैलीत वाचकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या पुस्तिकांचा संच वाचकांना नक्कीच आवडेल अशी आशा आम्हाला वाटते.

‘कॅनव्हास’ पुस्तकानं आम्हाला वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्या ई-मेल आणि पत्रं यांनी आम्ही भारावून गेलो आणि पुढच्या लिखाणासाठी आम्हाला त्यांच्या प्रतिसादानं आणखीनच बळ आणि उत्साह मिळाला. यानंतर अच्युत गोडबोले आणि मी - आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं पाश्चात्त्य संगीतावर आधारित ‘सिंफनी’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. यापुढचे आमचे दोघांचे आर्किटेक्चर, जग बदलवणारं साहित्य, भारतीय साहित्यिक आणि साहित्य, स्त्री, याशिवाय संगीत (भक्तिसंगीत, हिंदी सिनेसंगीत) असे अनेक प्रकल्प प्रतीक्षेत ऊभे आहेत. त्यांच्यावरचं कामही वेगात सुरू आहे. एकत्रित लेखनातून होणारा पुस्तक निर्मितीचा आनंद आणि त्या विषयाचा होणारा सखोल अभ्यास यांचा प्रवास असाच चालू राहणार आहे हे मात्र खरं!    

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.