खून, हत्त्या, कत्ल, मर्डर.....इत्यादी दिवाळी 2019

खून, हत्त्या, कत्ल, मर्डर.....इत्यादी दिवाळी 2019

‘खून’ या शब्दाची उत्पत्ती फारसी भाषेतून झाली. याचा अर्थ रक्त, रुधिर, कत्ल आणि हत्या असा होतो.  खून म्हणजे एक जीव जगातून नष्ट करणे. असं करण्याची भावना मनात कशी जन्म घेत असावी? जन्म-मृत्यूच्या खेळात कधी स्वतःच्या आयुष्याचा वीट आल्यानं, नाईलाज झाल्यानं, दुर्धर प्रसंग कोसळ्यानं, आर्थिक हतबलता आल्यानं, वैफल्य आल्यानं काही लोक स्वतःहून मृत्यूला कवटाळतात आणि आपलं आयुष्य संपवतात. सानेगुरूजींपासून ते गुरूदत्तपर्यंत आणि व्हॅन गॉघपासून ते हेमिंग्वेपर्यंत, हिटलर पासून फ्रॉईडपर्यंत, या सगळ्यांनी मृत्यूला आपलंसं केलं आणि आपलं जीवन संपवलं. इथं नाईलाज असो वा इच्छा या लोकांनी स्वतः मृत्यूला बोलावलं होतं, जवळ केलं होतं. 

काही वेळा मात्र जग बदलवण्याचं कार्य करत असताना केवळ एखाद्याच्या वाईट प्रवृत्तीमुळे तुमचं आयुष्य तुमच्यापासून हिरावलं जात असेल, कोणाएकाच्या सूडाचा बळी तुम्ही ठरत असाल, युद्धाच्या वेळी देखील हजारो/लाखो निरपराध लोकांची हत्त्या होत असेल,  तर तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्यावर तुमचा मृत्यू लादला जातो, तेव्हा केवळ त्या जाणार्‍या व्यक्तीचंच नाही तर अनेक लोकांचं जगणं थांबतं. हा सूड, ही हिंसा, हा उदवेग, काही क्षणांचा खेळ असतो, मात्र त्याचे परिणाम दूरगामी राहतात. जगातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग, जॉन एफ केनेडी, जॉन लेनन, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, असे अनेक लोक येतात. ज्यांना त्यांचं कार्य संपण्याआधीच या जगातून संपवलं गेलं. 

अब्राहम लिंकन 

अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६ वे राष्टाध्यक्ष! अमेरिकेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं संकट मानल्या गेलेल्या यादवी युध्दात त्यांनी समर्थपणे देशाचं नेतृत्व केलं. गुलामगिरीची घृणास्पद परंपरा संपवण्यासाठीचं पहिलं पाऊल त्यांनीच उचललं. यादवी युध्दाचा शेवट जवळ आल्यावर लिंकन यांची हत्या करण्यात आली.

अब्राहम लिंकन यांचा जन्म १२ एप्रिल १८०९ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून लिंकन यांना वाचनाची प्रचंड आवड होती. लहान असतानाच त्यांनी बायबल, अमेरिकेचा इतिहास, जॉर्ज वॉशिंग्टन यांचं चरित्र अशी अनेक पुस्तकं वाचली होती.  आपण वाचलेल्या गोष्टी मित्रांना जमवून अतिशय रंजक पद्धतीनं ते सांगायचे.  पुढे अमेरिकेचा राष्टाध्यक्ष झाल्यावर त्यांची ही सवय मोठमोठी आणि अतिशय प्रभावी भाषणं द्यायला उपयोगी पडली. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

 
राजकारण आणि वकिली अशी दुहेरी भूमिका निभावत १८६२ सालच्या अखेरीला लिंकननं गुलामगिरी ही बेकायदेशीर गोष्ट असल्याचं जाहीर केलं आणि जिथे गुलामगिरीची प्रथा सुरु होती त्या राज्यांनी १ जानेवारी १८६३ या दिवसापर्यंत गुलामगिरीच्या प्रथेवर बंदी घालावी असा आदेश दिला. १८६४ साली लिंकनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दणदणीत बहुमतानं फेरनिवड झाली. 

हे सगळं घडत असतानाच अमेरिकेचा इतिहासच पूर्णपणे बदलून जाणारी एक घटना घडली! मेरिलँडमधला जॉन वाईक्स बूथ नावाचा एक प्रसिध्द नट बंडखोर सैन्याचा गुप्तहेर म्हणूनही काम करायचा. त्यानं लिंकनचं अपहरण करुन त्याच्या बदल्यात बंडखोरांची अमेरिकन सैनिकांनी पकडून तुरुंगात टाकलेली माणसं सोडवायचा बेत आखला होता. पण ११ एिाल १८६५ या दिवशी लिंकननं कृष्णवर्णीय लोकांनाही मतदानाचा अधिकार देण्याविषयी भाष्य करताच बूथ पार बिथरलाच. त्यानं लिंकनचं अपहरण करायचा आपला आधीचा बेत रद्द करुन त्यांची हत्या करायचं ठरवलं. लिंकन आणि त्यांची बायको फोर्ड्स थिएटरमध्ये जाणार असल्याचं त्याला समजलं होतं. नाटक सुरु असताना लिंकनचा शरीररक्षक वेगळीकडे जाऊन बसला होता. मग बूथ सगळ्यांची नजर चुकवून हळूच लिंकनच्या मागे येऊन उभा राहिला. त्या नाटकात एक अतिशय गंमतीदार संवाद होता. तो चालू असताना सगळे प्रेक्षक जोरजोरात हसतील आणि त्या आवाजात आपण लिंकनवर झाडलेल्या गोळीचा आवाज कुणालाच ऐकू येणार नाही असा बूथचा हेतू होता आणि त्यानं तसंच केलं! तो संवाद सुरु होताच लिंकन बसले होते त्या भागात बूथ उडी मारुन आला आणि त्यानं नेम धरुन लिंकनच्या डोक्याच्या दिशेनं एक गोळी झाडली. पुढचे ९ तास कोमात असताना मृत्यूशी अवघड झुंज देऊन लिंकन यांचं अखेर निधन झालं! या सगळ्या गोंधळात बूथची एका मेजरशी झटापट झाली, पण त्यातून बूथनं कसाबसा पळ काढला आणि तो तिथून पसार झाला! तब्बल १२ दिवसांची शोधाशोध आणि पाठलाग केल्यानंतर बूथचा सुगावा तपास करणार्‍या यंत्रणेला लागला. तिथे झालेल्या झटापटीत बूथला गोळी लागून तो जखमी झाला आणि त्यानंतर काही काळानं त्याचा मृत्यू झाला.  

जॉन एफ केनेडी 

जगभरात अत्यंत चर्चेत असलेलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे जॉन एफ केनेडी! जॉन एफ केनेडी हा दिसायला देखणा, कुटील राजनितिज्ञ, चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि आर्थिक पाठबळ भक्कम असलेला यशस्वी राजनितिज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. स्वतःच्या आकर्षक व्यक्तिमत्वानं त्यांनी अख्ख्या अमेरिकेला मंत्रमुग्ध केलं होतं. ‘प्रोफाईल्स इन करेज’ नावाचं जॉन केनेडी यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याबद्दल त्यांना मानाचा ‘पुलित्झीर पुरस्कार’ मिळाला. १९५६मध्ये उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नामांकित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अवघ्या चारच वर्षानंतर राष्ट्राध्यक्ष पदासाठी त्यांचं नामांकन झालं. रिपब्लिकन पक्षाचा रिचर्ड निक्सन याच्यासोबत त्यांचे झालेले जाहीर वादविवाद करोडो लोकांनी दूरदर्शनवर पाहिले.

‘‘देश तुमच्यासाठी काय करेल यापेक्षा असा विचार करा की तुम्ही देशासाठी काय करू शकता?’’ या केनेडीच्या विचारांनी अमेरिकेच्या नागरिकांवर जबरदस्त मोहिनी पडली. ‘बे ऑफ पिग्ज’ च्या आक्रमणानं केनेडीच्या राजनैतिक जीवनाला पहिलं गालबोट लागलं. फिडेल कॅस्ट्रो या क्युबाच्या नेत्याला मारण्यासाठी क्युबातून विस्थापित झालेल्या दीड हजार तरुणांना अमेरिकेनं शा चांलवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि क्युबात पाठवलं. परंतु कॅस्ट्रोच्या बुद्धिमत्तेचा आणि लोकप्रियतेचा केनेडीला अंदाजच आला नाही आणि त्यांनी केलेला हा कट फिस्कटला. यात ३११ सैनिक एक तर मारले गेले किंवा पकडले गेले. उरलेल्या ११८९ जिवंत राहिलेल्या सैनिकांना परत आणण्यासाठी केनेडींना क्य्ाुबा सरकारशी तह करावा लागला. या सैनिकांना सुखरुप परत आणण्याच्या मोबदल्यात ५३ करोड डॉलर्स किंमतीची औषधं आणि अन्नाचा पुरवठा करावा लागला. ही घटना अमेरिकेसाठी लाजिरवाणी ठरली. केनेडीनं या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.

तसंच पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यातले वाद जॉन केनेडीच्या पुढे होणार्‍या हत्येला कारणीभूत ठरले. केनेडीच्या या राजनैतिक अपयशामुळे लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता.  २२ नोव्हेबर, १९६३ रोजी डलासला जात असताना केनेडीला विरोध दर्शवणारे फलक घेऊन त्याचे विरोधक रस्त्याच्या दुर्तफा उभे होते. वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. रस्त्यावरनं जात असताना अनेक ठिकाणी थांबून केनेडी लोकांशी हस्तांदोलन करीत होते. १२.३० वाजता केनेडीवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि ही हत्या इतिहासात अत्यंत वादग्रस्त ठरली. 

तपासाच्या वेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या. पावसाची जराही शक्यता नसतानाही एक माणूस छत्री घेऊन उभा होता. खून होण्याआधी एक क्षण त्यानं ती छत्री उघड-बंद केली. तसंच एका कृष्णवर्णीय व्यक्तीनं हवेत हात वर केला. असं मानलं जातं की या दोघांनी लपलेल्या बंदुकधारी व्यक्तीसाठी इशारा केला होता. या कृष्णवर्णीय व्यक्तीचा शोध त्यानंतर कधीही लागला नाही. तसंच या छत्रीधारकानंही पोलीस तपासात कुठलाच सुगावा लागू दिला नाही. 

ओसवाल्ड यानंच खून केला असावा या संशयानं त्याला आरोपी म्हणून उभं केलं.  ओसवाल्ड याला वयाच्या १५व्या वर्षापासूनच अमेरिकेच्या धोरणांविषयी तिरस्कार होता. क्युबातील अन्यायविरोधक संस्थेचा तो सभासद होता. तो एक उत्तम नेमबाज होता. तो नेव्हीत असताना त्याला सोव्हिएत रशियात पाठवण्यात आलं. रशियात असताना अमेरिकेनं क्युबाबाबत जी धोरणं अवलंबली त्याचा त्याला संताप येत असे. आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात त्यानं म्हटलं, ‘‘जर युद्ध झालं तर मी अमेरिकन सरकारच्या संरक्षणार्थ जो कोणी उभा असेल त्याचा मी खून करू शकतो’’ आणि म्हणूनच एफबीआयचा ओसवाल्डवरचा संशय वाढत गेला. अनेकजण म्हणतात ओसवाल्ड फक्त एक प्यादं म्हणून वापरला गेला. कारण दोनच दिवसांनंतर पोलीस मुख्यालयातून डलास तुरंगात नेत असताना त्याला गोळी मारुन ठार मारण्यात आलं. गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या मारेकर्‍याचं नाव जॅक रुबी होतं. जॅक रुबी एका नाईट क्लबचा मालक होता. खुनाचा खरा सूत्रधार कोणी वेगळाच होता. मादकद्रव्यांच्या तस्करी करणार्‍या माफियांकडून केनेडीची हत्या झाली असावी असा काहीजणांचा कयास आहे. रुबीची केस सुनावणीस येण्यापूर्वीच तो लंग कॅन्सरनं मरण पावला.  केनेडींच्या हत्येचा खरा सूत्रधार कोण हे अखेरपर्यंत एक गूढच राहिलं!
अब्राहम लिंकन आणि जॉन एफ केनेडी या अमेरिकेच्या दोघा राष्ट्राध्यक्षांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना कमालीच्या सारख्या होत्या. क्रॉग्रेसच्या निवडणुकीत लिंकन १८४६ ला निवडून आले तर  केनेडी १९५६ मध्ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून १८६० ला लिंकन तर १९६० मध्ये केनेडी राष्ट्राध्यक्ष झाले. व्हाईट हाउसमध्ये असताना लिंकनच्या मुलाचा मृत्यू झाला तर केनेडीच्या बाबतीतही हीच घटना व्हाईट हाउसमध्ये रहात असताना घडली. दोघंही सिव्हिल राईटशी संबंधित होते. लिंकनच्या सेक्रेटरीचं नाव केनेडी होतं आणि हत्येच्या दुदैर्र्वी घटनेच्या दिवशी त्यानं लिंकनला थिएटरमध्ये न जाण्याची विनंती केली होती. तर केनेडीच्या सेके्रटरीचं नाव लिंकन होतं आणि त्यानंही केनेडीना त्या दुर्दैवी घटनेच्या दिवशी डलासला न जाण्याचा सल्ला दिला होता. लिंकन आणि केनेडी यांच्या दोघांच्याही डोक्याला मागच्या बाजूनं गोळी लागली आणि त्यावेळी दोघांच्याही सोबत त्यांच्या बायका घटनास्थळी उपस्थित होत्या. दोघांनाही गोळी शुक्रवारीच लागली. लिंकन हे वयाच्या ५६ व्या वर्षी तर केनेडी वयाच्या ४६व्या वर्षी मरण पावले!  

मार्टिन ल्यूथर किंग 

मार्टिन ल्यूथर किंग हा अमेरिकेच्या इतिहासात सर्वसामान्य कृष्णवर्णीय नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा युगपुरुष म्हणून ओळखला जातो. मानवतावादी आयकॉन म्हणून इतिहास त्याला ओळखतो.
जॉर्जिया राज्यातल्या अ‍ॅटलांटामध्ये जन्मलेल्या किंगवर येशू ख्रिस्ताच्या शिकवणूकीचा पगडा होता. तो लहानपणी एका गोर्‍या मुलाबरोबर नेहमी खेळायचा. एके दिवशी त्या गोर्‍या मुलाची आई अचानक त्याला त्या मुलाबरोबर खेळायला मज्जाव करायला लागली. त्यानं कारण विचारलं तेव्हा तिनं ‘तू काळा आहेस म्हणून’ असं सांगितलं. मार्टिनला ते खूपच लागलं. तेव्हापासून त्याच्या मनात गोर्‍यांविषयी राग निर्माण झाला. एकदा प्रवास करताना गोर्‍यांना जागा देण्यासाठी ९० मैलांचा प्रवास त्याला उभ्यानं करावा लागला होता. मार्टिनचा गोर्‍यांबद्दलचा राग वाढतच होता. 

समाजसेवेच्या विषयात पदवी घेतलेल्या किंगनं पुढे ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ची पदवीही मिळवली. तरुणवयात सामाजिक हक्कांशी संबंधित चळवळींमध्ये भाग घेणार्‍या हॉवर्ड थर्मनचा किंगवर खूप प्रभाव पडला. नंतर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक मार्गांनी क्रांती घडवून आणायच्या चमत्कारामुळं भारावून गेलेल्या किंगनं १९५९ साली भारतात येऊन गांधीजींच्या आठवणीत काही दिवस घालवले. यामुळे त्याच्या मनावर अहिंसा, सगळ्यांना समतेनं वागवणं आणि सामाजिक न्यायासाठी लढणं या गोष्टी आणखीनच ठसल्या. 

यानंतर कृष्णवर्णियांच्या चळवळीतून मार्टिन ल्यूथर किंगचं नेतृत्व पुढे आलं. त्याच काळात ‘माँटगोमेरी इंप्रूव्हमेंट असोसिएशन (एमआयए)‘ ही एक कृष्णवर्णियांची एक संघटना स्थापन झाली आणि मार्टिन ल्यूथर किंग तिचा अध्यक्ष झाला. प्रथम येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार, पण नंतर महात्मा गांधींच्या तत्त्वांनी ही चळवळ वाढत गेली. या सगळ्या काळात किंगवरती प्रचंड टीका, घरावरती बाँबहल्ले आणि खुनाच्या धमक्या असे अनेक प्रकार घडले. कित्येक लोकांनी जशास तसे या न्यायानं गोर्‍यांवर हल्ला करावा असंही म्हणणं मांडलं. पण किंगनं असहकाराचं आणि अहिंसेचं तत्त्व सोडलं नाही. मार्टिन ल्य्ाूथर किंगनं ‘आय हॅव अ ड्रीम’ हे जगप्रसिद्ध भाषण २८ ऑगस्ट १९६३ रोजी वॉशिंग्टनमधल्या लिंकन मेमोरियलच्या पायर्‍यांवरुन २ लाख लोकांसमोर केलं. त्यात कृष्णवर्णीय लोकांच्या भयानक परिस्थितीचं दर्शन त्यानं घडवलं तेव्हा हजारोंचे डोळे पाणावले होते. 

यानंतर किंगनं वॉशिंग्टनमधे ऐतिहासिक ठरलेली एक मोठी शांतीयात्रा काढली. इतर अनेक राज्यातून हजारो माणसं यात सामील झाली. एवढंच नव्हे तर गोर्‍यांच्या चर्चनंही त्याला पाठिंबा दिला. १४ ऑक्टोबर १९६४ या दिवशी किंगला शांततामय मार्गानं वर्णद्वेषाशी लढा दिल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारा तो सगळ्यात तरुण माणूस ठरला.

आपल्या अल्पायुष्यात किंगनं बरंच लेखन केलं आणि भाषणंही दिली. ३ एप्रिल १९६८ रोजी त्यानं आयुष्यातलं सगळ्यात शेवटचं भाषण केलं. मेम्फिसमध्ये किंग एका मोटेलमध्ये राहायचा. त्या मोटेलच्या दुसर्‍या मजल्यावरच्या बाल्कनीमध्ये ४ एप्रिल १९६८ या दिवशी संध्याकाळी ६.०१ वाजता किंग उभं राहून जेसी जॅक्सन या आपल्या सहकार्‍याशी बोलत असतानाच त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. संध्याकाळी ७.०५ वाजता किंगचं निधन झालं! 

मार्टिन ल्यूथर किंगच्या मृत्यूनंतर अमेरिकेत दंगलींची एक लाटच उसळली. प्रक्षुब्ध झालेल्या कृष्णवर्णीयांनी सुमारे १०० शहरांमध्ये थैमान घातलं. राष्ट्रपती लिंडन जॉन्सन यांनी ७ एप्रिल हा दिवस किंगच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर शोकदिन म्हणून जाहीर केला. किंगचा खुनी जेम्स अर्ल रे लंडनच्या हीथ्रो विमातळावर पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडला गेला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान १० मार्च १९६९ या दिवशी त्यानं आपला गुन्हा कबूल केला. पण तीनच दिवसांत त्यानं आपला शब्द फिरवून आपला किंगच्या खुनाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं! रेनं केलेली दयेची याचना आणि त्याचे सुटण्यासाठीचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.  २३ एप्रिल १९९८ रोजी वयाच्या ७०व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. रेचा कबुलीजबाब हा दबावाखाली घेण्यात आला होता असं काहींचं म्हणणं होतं. 

जॉन लेनन

शास्त्रीय्य संगीताशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसलेला चार तरुणांचा एक ग्रुप युरोपमध्ये निर्माण झाला आणि त्यांनी पाश्चिमात्य संगीतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. जागतिक संगीत विश्वावर त्यांनी राज्य केलं. या चार तरूणांचा गट १९६० च्या दशकात बीटल्स या नावानं जगभर ओळखला गेला. बीटल्सचा बेडरपणा, युद्धविरोध, शांतिप्रियता, पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संगीत आणि जीवनप्रणाली यांना जवळ आणण्याचा प्रयत्न, छानछौकी आणि दिखाव्यापुढे आणि सत्तेपुढे न झुकणं किंवा त्यापुढे मान न तुकवणं, त्यांचे कपडे, वाढवलेले केस ही सगळीच प्रस्थापितांविरुद्धची बंडाळी होती. ‘बीटल्स’ या ग्रुपचा संस्थापक, नेता, गीतकार आणि गायक होता जॉन लेनन! आपल्या ४० वर्षांच्या आय्ाुष्यात जॉन लेनननं चाहत्यांचं प्रचंड प्रेम अनुभवलं.

किशोरवयीन मुलांची तर बीटल्सच्या कार्यक्रमांची तिकिटं मिळवण्यासाठी अक्षरशः भांडणं होत. केवळ बीटल्समुळे देशभरात जास्तीचे हजारो पोलीस आवश्यक झाले होते. जगानं डोक्यावर घेतलेल्या जॉन लेननचा वयाच्या ४० व्या वर्षी अत्यंत हृदयद्रावक तर्‍हेनं खून झाला.

८ डिसेंबर १९८० या दिवशी मार्क डेव्हिड चॅपमन नावाच्या वेडगळ चाहत्यानं गोळ्या झाडून जॉन लेननला  ठार मारलं. ‘बीटल्स हे येशूपेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत’ हे जॉन लेननचं वाक्य ऐकून तो चवताळला होता. चॅपमनच्या बायकोच्या सांगण्यानुसार ‘जॉन लेनन सगळ्यांना शांतता आणि प्रेम यांचाच संदेश देत असायचा. इमॅजिन या गाण्यामधून देखील तो ‘नो पझेशन’ असंच सांगत होता. पण प्रत्यक्षात मात्र त्यानं प्रचंड संपत्ती जमवली होती.’, असं चॅपमनला वाटायचं. एके दिवशी ‘ऑर्डिनरी पीपल’ हा चित्रपट बघून त्यानं आपल्या बायकोला आपल्याला जॉन लेननला मारून टाकावं वाटतं असा विचारही बोलून दाखवला. चॅपमनवर ‘कॅचर इन द राय ’ या कादंबरीतल्या होल्डन या व्यक्तिरेखेचा प्रचंड प्रभाव पडला होता. या कादंबरीमध्ये असलेल्या  होल्डन या पात्राप्रमाणे तो स्वतःला रक्षणकर्ता समजायला लागला होता. 
८ डिसेंबर १९८० या दिवशी संध्याकाळी ५ च्या दरम्यान चॅपमननं जॉन लेननच्या ‘डबल फॅन्टसी’ या अल्बमवर जॉनची स्वाक्षरी देखील धडपडत जाऊन मिळवली आणि रात्री १०.५० वाजता जॉन लेनन परत येत असताना चॅपमननं जॉनवर ४ गोळ्या झाडल्या. जॉन लेनन जागीच कोसळला! हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. चॅपमननं जॉन लेननवर गोळ्या झाडल्यानंतर तो पळून गेला नाही तर त्याच ठिकाणी ‘कॅचर इन द राय’ ही कादंबरी वाचत बसला होता. 
    
जॉन लेननच्या खुनाच्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातं. चॅपमनला स्वतःची ओळख म्हणजे आपणच जॉन लेनन आहोत असं वाटायचं. तो सतत जॉन लेननची गाणी गिटारवर वाजवत असायचा. स्वतःच्या ओळखपत्रावर त्यानं स्वतःचं नाव खोडून जॉन लेनन असं लिहिलं हेातं. जॉननं जपानी मुलीशी लग्न केलं म्हणून चॅपमननं देखील त्याचं अनुकरण करत एका जपानी मुलीशी लग्न केलं. सायकॉलॉजिस्टनी या सगळ्या गोष्टींची नोंद घेतली होती. जॉन लेननला मारण्यापूर्वी चॅपमननं स्वतःचाही जीव घेण्याचा दोन वेळा प्रयत्न केला होता. काही सायकॅट्रिस्टच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे आत्महत्येचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानं त्यानं मग जॉन लेननलाच संपवण्याचा निर्णय घेतला. जॉन लेननच्या अकाली मृत्यूनं संगीत जगताची अपरिमित हानी झाली. विशेषतः त्याच्या मृत्यूचा पॉप कल्चरवर खूप परिणाम झाला. जॉन लेनन गेला, तरी त्याची जादू आजही जनमानसावर आहे. 

मोहनदास करमचंद गांधी 

‘फक्त पंचा नेसणारा एक किडकिडीत सुमार देहयष्टीचा माणूस पण, तो गेल्यावर अख्खं जग हळहळलं’ असा मजकूर या महात्म्याच्या मृत्यूनंतर जवळपास सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकला होता! गांधीजींचा मृत्यू झाला नसता तर भारतीय राजकारणानं एक वेगळं वळण निश्चित घेतलं असतं. भारतीय राज्यघटना तयार करण्यात त्यांचा फार मोठा प्रभाव पडला असता. शांततेसाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं असतं. १९८९ मध्ये जेव्हा दलाई लामांना शांततेसाठी नोबेल मिळालं तेव्हा ‘‘हे पारितोषिक म्हणजे गांधीजींच्या आत्म्याला एक श्रद्धांजली आहे’’ असं समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं.  ‘‘येणार्‍या पिढीचा विश्वासही बसणार नाही, अशी व्यक्ती म्हणजे  गांधीजी! ’’ असे अल्बर्ट आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाचे गांधीजींविषयीचे उद्गगार आहेत!

३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी प्रार्थनेसाठी निघालेल्या महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. देशभरातून त्यांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आलेल्या त्यांच्या शिष्यगणांमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जो माणूस आयुष्यभर अहिंसेसाठी झटला त्याचा मृत्यू मात्र हिंसेनं झाला! नथुराम गोडसेनं त्यांना ठार मारण्यापूर्वी दोनच दिवस आधी गांधीजी म्हणाले होते, की ‘‘जर मी एखाद्या माथेफिरुच्या हातून मरणार असेल तरी मी हसत हसत त्याला सामोरं जाईन. देव माझ्या ह्वदयात अणि ओठांवर त्याही क्षणी असला पाहिजे’’. 

भारताच्या स्वातंत्र्यानंतर हिंदू आणि मुसलमानांमधली तेढ संपवण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. हिंसा, दंगली तात्पुरत्या का होईना थंडावल्या होत्या. ३० जानेवारीच्या १९४८च्या संध्याकाळी गांधीजींची प्रार्थना सभा होती. पाच वाजता सुमारे १०० लोक प्रार्थनास्थळी जमा झाले होते. लोकांचं येणं चालूच होतं. गांधीजी खरं तर कधीही प्रार्थनेची वेळ चुकवत नसत. पण वल्लभभाई पटेलांबरोबर रंगलेल्या गप्पांमुळे त्यांना वेळ कसा गेला हे समजलंच नाही. त्यांची पुतणी मनु आणि आवा यांच्या खांद्यांचा आधार घेत ते आपली वाट बघत असलेल्या गर्दीपुढे आले. या गर्दीतून वाट काढत असताना एका भल्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे याची त्यांना जरा देखील कल्पना नव्हती. गर्दीतून कट्टर हिंदुत्ववादी असलेला नथुराम गोडसे गांधीजींच्या जवळ गेला. मनुला वाटलं तो गांधीजींच्या पाया पडणार आहे पण, नथुरामनं आपलं पिस्तुल काढून दोन गोळ्या गांधीजींच्या छातीत आणि एक गोळी त्यांच्या पोटात मारली. गांधीजींच्या पांढर्‍या शुभ्र खादीच्या पंचावर रक्त उडालं आणि क्षणार्धात ‘हे राम’ असे शब्द उच्चारत गांधीजी कोसळले!

त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि जमावात संतापाची आणि दुःखाची लाट उसळली. मारेकरी नथुराम गोडसेनं पळण्याचा जराही प्रयत्न केला नाही. ८ नोव्हेंबर, १९५० रोजी हत्त्येच्या कटात सामील असलेल्या आरोपींवर सुनावणी झाली आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांना सोडून इतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या सगळ्या आरोपींना १५ नोव्हेंबर १९५० रोजी शिक्षा देण्यात आली तेव्हा त्यांनी अखंड भारताचा नकाशा आणि हिंदू राष्ट्राचा ध्वज सोबत बाळगला होता. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, विवेकानंद यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव होता. सावरकर आणि गांधीजींच्या विचारांचा त्यानं खूप खोलवर अभ्यासही केला हेाता. ‘कट्टर देशभक्त आणि जगाचा नागरिक’ म्हणून हिंदूच्या वतीनं लढणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींचा प्रभाव काँग्रेसमध्ये जास्त वाढला आणि त्यामुळे गांधीजी मुसलमानांच्या बाजूनं विचार करत होते असं नथुरामचं मत झालं. भारतसरकारनं फाळणीच्या वेळी ५५ कोटी रुपये रक्कम पाकिस्तानला द्यावी यासाठी गांधीजींनी आमरण उपोषण केलं. हिंदू मुस्लिम दंगल वाढू नये, पाकिस्तानमधील मुस्लिमांची अस्थिरता कमी होण्यास मदत व्हावी यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला. या सगळ्यामुळे नथुरामचा संताप अनावर झाला. गांधीजी पित्याच्या कर्तव्यात कमी पडले, त्यामुळेच देशाची फाळणी झाली असा नथुरामचा समज होता. ते खर्‍या अर्थानं पाकिस्तानचेच ‘राष्ट्रपिता’ आहेत असंही त्याला वाटत होतं.  आपण महात्मा गांधींची हत्या केली तर जग आपला किती तिरस्कार करेल हेही तो आधीपासूनच जाणून होता!

इंदिरा गांधी 

भारताची राजधानी दिल्ली, एक ऐतिहासिक शहर! या शहरानं अनेक मोठमोठ्या राजेरजवाड्यांच्या सत्ता, त्यातील चढउतार बघितले आहेत. १९४७ नंतर भारतीय लोकशाहीत जास्त काळ सत्तेत असलेलं कुटुंब म्हणजे नेहरु-गांधी कुटुंब होय. जवाहरलाल नेहरु भारताचे पहिले पंतप्रधान, तर त्यांची मुलगी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी ही भारताची पहिली महिला पंतप्रधान!
‘गरिबी हटाओ’ चा नारा देणार्‍या इंदिरा गांधी १९ जानेवारी १९६६ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून  विराजमान झाल्या. ७३० वर्षांनंतर घडलेली ही एक महान ऐतिहासिक घटना ठरणार होती. १२३६ मध्ये भारतात पहिली महिला राज्यकर्ती म्हणून रझिया सुलतान हिनं राज्य केलं होतं. 

प्रियदर्शिनी इंदिरेचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद शहरात झाला. घरातच राजकारणाचा वारसा असल्यामुळे इंदिरेनं बालपणीच राजकारणाचे धडे घेतले. घरात एकटं असताना त्या घरातल्या सर्व नोकरांना एकत्र करत आणि एका उंच टेबलवर उभं राहून त्यांना अत्यंत प्रभावी पध्दतीनं राजकीय भाषणं देत. इंदिरेचं भाषण ऐकून ऐकणार्‍याचं रक्त उसळायचं. 
इंदिरा एका सधन कुटुंबातल्या असल्या तरी त्यांना कायम अस्थिर परिस्थितीत राहावं लागलं. घरातल्या इतर व्यक्ती सदोदित तुरुंगवासात असत. त्यामुळे त्यांचं शिक्षणही आज इथे तर उद्या तिथे असं बदलत असायचं. राजकारण, समाजकारण यांचे धडे इंदिरा गांधींना आपल्या वडिलांकडून मिळाले. ताश्कंद येथील दौर्‍यावर असताना लालबहादूर शााींचं तीव्र ह्दयविकारानं निधन झालं. २४ जानेवारी १९६६ इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. 

इंदिरा गांधींची कारकिर्द ही अत्यंत झंझावाती होती. अनेक महत्वाचे आणि भारताला नवा चेहरा देणारे निर्णय इंदिरेनं धडाडीनं घेतले. निवडून येताच सगळ्या बँंकांचं राष्ट्रीयीकरण त्यांनी केलं. २० कलमी कार्यक्रमांच आयोजन करुन गरिबी हटवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानच्या वादात इंदिरेनं ठाम भूमिका घेतली आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली.  
याच काळात भारतात काश्मीर प्रश्न, आसामचा प्रश्न आणि पंजाबचा प्रश्न उग्र रुप धारण करीत होते. काश्मीरमध्ये स्वतंत्र काश्मीरचा मुद्दा चिघळत होता. छुप्या रीतीनं पाकिस्तान या प्रश्नात मदत करीत होता. आसाममध्ये बांगलादेशींचे लोंढे येत होतेच, तर पंजाब असंतोषानं धुमसत होता. स्वातंत्र्यानंतर केंद्रानं पंजाबबाबत अन्याय केलाय अशी मनोभूमिका काही लोकांची होत होती आणि यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणी त्यांच्याकडून वारंवार येत होती. या विचारांच्या लोकांचं नेतृत्व संत भिंद्रनवाले यांनी केलं. त्याकाळात अमृतसरमधलं सुवर्णमंदिर शिखाचं पवित्र स्थान होतं. मात्र ते अतिरेक्याचं आश्रयस्थान बनलं. इंदिरा गांधीनी जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आखून अतिरेक्यांवर कारवाई केली आणि देशाच्या एकात्मतेला बाधा येऊ दिली नाही. ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी झालं. त्यानंतर इंदिरा गांधीना निकटवर्तियाकडून असाही सल्ला मिळाला की त्यांचे सुरक्षा रक्षक हे शिख धर्माचे असल्यामुळे ते बदलावेत. पण, इंदिरा गांधी धर्मनिरपेक्षता मूल्य जपणार्‍या असल्यामुळे त्यांनी हा सल्ला मानला नाही आणि याचाच परिणाम असा झाला की ३१ आक्टोबर १९८४ रोजी सतवन्त सिंग आणि बियान्तसिंग या सुरक्षा रक्षकांकडूनच अखेर इंदिरा गांधींची हत्या झाली. हत्येच्या दिवशी घरातून निघताना बियान्तसिंगनं इंदिरा गांधीच्या दिशेनं बंदुकीच्या ३ फैरी झाडल्या. इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला जागीच ठार केलं आणि सतवन्तसिंगला ताब्यात घेतलं. हल्ल्यानंतर लागलेल्या १९ गोळ्यांपैकी ७ गोळ्या शस्त्रक्रियेनंतर काढल्या. घटनेनंतर एकाच तासात इंदिरा गांधीचा मृत्यू झाला. इंदिरा गांधीच्या हत्येनंतर त्यांचा थोरला मुलगा राजीव गांधींचा राजकारणात प्रवेश झाला.  पुढे त्यांचीही एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम एलटीटीई) या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली. राजीव गांधीच्या हत्येत मानवी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. 

जोशी- अभ्यंकर हत्याकांड, पुणे

अनेक वर्ष ‘विद्येचं माहेरघर’ म्हणून गाजलेल्या भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची ओळख शांत आणि सुरक्षित शहर म्हणून होती पण त्यानंतर जोशी-अभ्यंकर हत्याकांडानं पुणे शहरच नव्हे तर अख्खा देश हादरून गेला होता. या खुनानंतर पुणे शहरात तर संध्याकाळी ६ नंतर शहरातले सगळेच रस्ते, रेस्टारंट्स, बागा ओस पडलेल्या असत. कित्येक दिवस सर्वत्र शुकशुकाट आणि दहशतीचं वातावरण झालं होतं.

 राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनावर शहा हे चौघजणं पुण्यातल्या कर्मशियल आर्ट्सचे अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. धक्कादायक गोष्ट ही की एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या या तरुणांनी फक्त थ्रील म्हणून कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेल्या १०निरपराध लोकांचे जानेवारी १९७६ ते मार्च १९७७ च्या दरम्यान पुण्यात  खून केले. 

संपूर्ण कॉलेजमध्ये ही चौघं चांडाळ चौकडी म्हणूनच प्रसिद्ध होती. चोर्‍या करणं आणि दारू पिणं अशा सवयी त्यांना आधीपासूनच होत्या. प्रकाश हेगडे हाही अभिनव महाविद्यालयाचा एक विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचं ‘विश्व’ नावाचं एक छोटं हॉटेल कॉलेजच्याच मागं होतं. (अजूनही आहे!)  १५ जानेवारी १९७६ या दिवशी जक्कल आणि कंपनीनं आपला वर्गमित्र प्रकाशचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडून पैसे उकळायचे ठरवलं. या मंडळींनी त्याच्याकडून जबरदस्तीनं आपण घर सोडून जात असल्याचं लिहून घेतलं. त्याच रात्री त्यांनी त्याला ठार मारून नायलॉनच्या दोरीनं त्याचं प्रेत बांधलं आणि एका लोखंडी ड्रममध्ये काही दगडं टाकून पेशवेपार्कमधल्या तळ्यात तो ड्रम टाकला. दुसर्‍या दिवशी त्यांनी खंडणीची चिठ्ठी प्रकाशचे वडील सुंदर हेगडे यांना पाठवली. प्रकाशच्या वडिलांना चिठ्ठी वाचून यात काहीतरी काळंबेरं असल्याचं लक्षात आलं. कारण प्रकाश देवदास या त्याच्या घरगुती नावानं स्वाक्षरी करत असे. या चिठ्ठीत मात्र देवदास अशी स्वाक्षरी नव्हतीच. त्यामुळे प्रकाशच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिस तपासात प्रकाशचं प्रेत पोलिसांना मिळालं. पण खुन्याचा शोध काही लागला नाही. 

त्यानंतर या चौकडीनं ऑगस्ट १९७६ मध्ये कोल्हापूरला एका व्यापार्‍याला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.  त्यानंतर ३१ ऑक्टोबर १९७६ मध्ये पुण्यातल्या विजयनगरमधल्या अच्युत जोशी यांच्या राहत्या घरावर त्यांनी हल्ला केला. अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा ही दोघंच त्या रात्री घरी होती. जक्कल आणि कंपनीनं त्या दोघांचे हात पाय बांधले. नायलॉनच्या दोरीनं अच्युत जोशीचा गळ्याभोवती फास टाकून खून करण्यात आला आणि उषा जोशींचा गुदमरवून खून केला. हे सगळं होत असतानाच त्यांचा लहान मुलगा आनंद आत आला. जराही दयामाया न दाखवता त्याचाही मग त्यांनी त्याच पद्धतीनं खून केला. मंगळसूत्र, घड्याळ आणि काही हजार रुपये घेऊन तिथून खुनी पसार झाले. 

यानंतर १ डिसेंबर १९७६ या दिवशी त्यांनी प्रसिद्ध संस्कृत पंडित काशिनाथ शास्त्री अभ्यंकर यांच्या भांडारकर रोडवरच्या बंगल्यात प्रवेश केला. त्या वेळी काशिनाथ अभ्यंकर, त्यांची पत्नी इंदिराबाई, मोलकरीण सखुबाई वाघ, नात जाई आणि नातू धनंजय हे पाचजणं घरात होते. दारावरची बेल रीतसर वाजवून ही चौकडी घरात शिरली. धनंजयनं दार उघडताच त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला. नंतर त्यांनी सगळ्यांचेच हात पाय बांधून, त्यांच्या तोंडात बोळा कोंबून नायलॉनच्या दोरीनं त्यांना ठार मारलं. यानंतर या चौकडीला खुनाची चटक लागली होती. जयंत गोखले हा अभिनव कॉलेजचाच जयंत गोखले नावाचा विद्यार्थी आणि त्याचा लहान भाऊ अनिल हे अलका टॉकीजजवळ भेटणार होते. जयंतला भेटायला निघालेला अनिल जक्कलला दिसला. जक्कलनं त्याला आपल्या मोटरसायकलवर लिफ्ट दिली आणि अलका टॉकीजकडे न  सोडता आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेलं. तिथं नायलॉनच्या दोरीनं पुन्हा नेहमीच्याच पद्धतीनं त्याला ठार मारण्यात आलं. त्याचं प्रेत एका वापरात नसलेल्या लोखंडी शिडीला बांधलं आणि मोठमोठ्या शिळांनी बांधून त्याचं प्रेत यावेळी बंडगार्डनजवळच्या मुळा-मुठा नदीच्या पात्रात फेकून दिलं. खरं तर याच खुनानं हे हत्याकांड उघडकीस आलं. 

२४ मार्चला संध्याकाळी नायलॉनच्या दोरीनं बांधलेल्या अवस्थेतलं अनिल गोखलेचं प्रेत येरवड्याला संध्याकाळी सापडलं.  प्रेताला ज्या नायलॉनच्या दोरीनं बांधलं होतं, त्या दोरीच्या गाठी बघून पोलिसांना संशय आला. प्रकाश हेगडेचं प्रेत अशाच नायलॉनच्या दोरीनं बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडलं होतं. त्यानंतर पुणे परिसरात जितके खून झाले त्यात प्रेतांना बांधण्यासाठी नायलॉनच्या दोरीचा वापर करण्यात आला होता. या नायलॉलनच्या दोरीच्या विशिष्ट प्रकारे प्रेतांना बांधलेल्या गाठी एकसारख्या होत्या. तसंच बघणार्‍यांनी अनिल गोखले याला जक्कलच्या मोटरसायकलवर शेवटचं बघितलं होतं. यामुळेच पोलिसांनी चौकशीसाठी जक्कल आणि त्याच्या मित्रांनाही ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांची तपासाची चव्रं भराभर फिरली. आरोपी लवकर न सापडण्यामागं एक कारण म्हणजे या चौकडीनं खून करताना त्या त्या ठिकाणी हातमोज्यांचा केलेला वापर, तसंच उग्र वासाचा स्प्रे वापरल्यामुळे पोलिसांना माग काढणं अवघड गेलं होतं. न्यायालयात या आरोपींची केस चालू असताना ते एकमेकांना टाळ्या देत आणि हास्य-विनोद करीत. 

उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात या चौघांवरील फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. २७ नोव्हेंबर १९८३ रोजी चौघांना फाशी देण्यात आली. जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘माफीचा साक्षीदार’ नावाचा नाना पाटेकरची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट निघाला. तसंच २००३ मध्ये अनुराग कश्यप यानंही याच घटनेवर ‘पाँच’ नावाचा चित्रपट काढला. याआधी चार्ल्स शोभराज, रामन राघवन यांनीही एका पाठोपाठ खून करून भारतभर दहशत निर्माण केली होती. काही वर्षांपूर्वी नोएडा इथल्या निठारी हत्याकांडानं संपूर्ण भारत हादरला होता. 
जॅक दी रिपर

जर एकाच माणसानं एकापाठोपाठ एक असे अनेक खून केले असतील, तर त्याला ‘सीरियल किलर’ असं म्हणतात. बहुतांशी सीरियल किलर्संच्या घरी खूपच उध्वस्तता असते. आईवडिलांचा घटस्फोट, सतत भांडणं, मारामार्‍या, हिंसा किंवा पळून गेलेले वडील आणि अतिशय कडक, शिस्तप्रिय आई अशा अनेक गोष्टी कित्येक गुन्हेगारांच्या घरात आढळलेल्या आहेत. गुन्हेगारी इतिहासात असे अनेक सीरियल किलर्स होऊन गेले, पण त्यात ‘जॅक दी रिपर ’ हा सगळ्यात कुप्रसिद्ध ठरला.१८१८ साली ‘जॅक द रिपर’ यानं लंडनमध्ये केलेलं खूनसत्र प्रचंड गाजलं. वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांचा खून खुनी करत असे आणि तिचे अंतर्गत अवयव शाक्रिया केल्याप्रमाणं काढत असे. हा खुनी एक होता की अनेक लोक यात सामील होते? त्याचं नाव काय होतं? या कशाचाही तपास कधीही लागला नाही. अखेरपर्यंत हे एक गूढच राहिलं.
    
गुन्हेगाराच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्यासाठी १८व्या शतकात ‘फिजिओग्नॉमी’ मध्ये चेहर्‍याच्या ठेवणीवरुन तर फ्रेनॉलॉजीमध्ये कवटीच्या खाचखळग्यावरुन माणसाचा स्वभाव ओळखण्याचे प्रयत्न व्हायचे आणि ठरावीक तर्‍हेच्या चेहर्‍याची किंवा ठरावीक तर्‍हेच्या कवटीची माणसं गुन्हेगार होतात का याचाही अभ्यास झाला. पण त्यात संशोधकांना फारसा संबंध आढळलाच नाही. 

पोर्नोग्राफीचा आणि खुनी मनोवृत्तीचा काही संबंध आहे का हेही मग संशोधकांनी तपासलं. १९७९ ते १९८३ च्या दरम्यान एफबीआयच्या ‘बिहेवियरल सायन्स युनिट’ नं ३६ खुन्यांच्या मानसिकतेवर संशोधन केलं. या ३६ पैकी २५ हे सीरियल किलर्स होते. यातल्या ४३ % खुन्यांवर लहानपणीच लैंगिक अत्याचार झाले होते, तर ३२% खुन्यांवर तरुणपणी असे लैगिक अत्याचार झाले होते. बहुधा खून करताना अचानकपणे होणार्‍या दुर्घटनेपेक्षा विचारानं, कट करुन, नियोजनबद्ध पद्धतीनं, कधी कधी सुपारी देऊन खून केला जातो. हिंसा ही मानवाची नैसर्गिक भावना आहे की विकृती? पशुपक्ष्यांमध्येही हेच आढळतं का? रानटी, हिां प्राणी केवळ भुकेपोटी किेंवा स्वसंरक्षणार्थ दुसर्‍या प्राण्याला मारतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते खुनी व्यक्तीचा प्रश्न हाताळताना, अभ्यासताना अशा व्यक्तीचं घर, कौंटुंबिक पार्श्वभूमी, बालपण, आजूबाजूचं वातावरण या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. 

पाश्चात्य देशात आपल्याच मुलांचे खून करणारे पालक हे अपरिपक्व आणि विकृत म्हणता येतील. अशा पालकांच्या बाबत मानसशााज्ञ केपे म्हणतो,‘आपला मुलगा आपल्यावर प्रेम करीत नाही, लक्ष देत नाही असं पालकांना वाटलयानं ते प्रचंड चिडतात आणि त्यांच्या मनात खुनाची भावना निर्माण होते’. ‘बहुसंख्य मनोविकृत गुन्हेगारांचं कौटुंबिक आयुष्य अत्यंत उदध्वस्त झालेलं आढळून आलं आहे. उदा. वडिलांचं व्यसन, घरातली सततची भांडणं, आईचं एकटेपण यात या मुलांना त्यांचं बालपण उाभोगता आलेंलं दिसत नाही’ असं ब्राँडेनबर्ग या मानसशााज्ञाचं संशोधन आहे. जॉइस स्मॉल यानं मनोवैज्ञानिक पद्धतीनं जवळपास १०० गुन्हेगारांचा अभ्यास केला.‘वय, लिंग आणि वंश यांचा गुन्हेगार असण्याशी संबंध असतोच असं नाही. लहान वयात मेंदूत काही बिघाड झाला तर चोरी, घरफोडी तर प्रौढावस्थेत मेंदूत काही बिघाड असेल तर लैंगिक गुन्हे दिसून येतात’ असं त्याचं म्हणणं होतं. लैंगिक खुनाबद्दल फेनिकल या मानसशााज्ञाचं संशोधन अत्यंत बोलकं आहे. बलात्कारीत स्त्रीचा खून करण्यामागील कारणं म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्याची शिक्षा होईल या भीतीनं पुरावा नष्ट करण्यासाठी पुन्हा दुसरा गुन्हा करणं आणि त्यांच्या दुर्देवानं त्यात पकडलं जाणं. कधी कधी तर खून केल्यावर हा गुन्हेगार प्रेतासोबत संभोग करतो. पाश्चिमात्य देशात अशा घाणेरड्या आणि विकृत गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं चाललेलं दिसून येतं. अशा प्रकारच्या विकृतीला मानसशााात ‘नेक्रोफिलिया’ असं म्हणतात. अमेरिकेत अर्ल नेल्सन या गुन्हेगारानं १९२६ साली २२ महिलांचे खून केले. गळा दाबून खून करणं आणि नंतर त्या ाीवर बलात्कार करणं ही त्याची पद्धत होती. १९३६ मध्ये अ‍ॅडॉल्फ सीफोल्ड नावाचा घड्याळ विव्रेता लहान मुलांना गोड बोलून घरी बोलवायचा. औषधी काढ्यात विष मिसळून गोडीगुलाबीनं मुलांना पाजून नंतर खून करायचा. तपासाअंती पोलिसांना त्याच्या घरात १२ मुलांची प्रेतं मिळाली. क्लिरलॅड या खुन्यानं तर १९३५-३८ या तीन वर्षात १२ ाी-पुरुषांना ठार केलं. त्यानं आपल्या खोलीत खुनानंतर या प्रेतांचे तुकडे करुन त्यांचा ढीग करुन रचून ठेवला होता. एवढं सगळं करुन मात्र हा खुनी पोलिसांना कधीच सापडला नाही.
पूर्वी एफबीआयचे एजंट्स सरकारी नियमानुसार या खुन्यांचा तुरंगात एकट्यानंच इंटरव्ह्यू घेत असत. पण एकदा ३०० पौंड वजनाच्या, ६ फूट, ९ इंच उंचीचा असा एक आडंदाड खुनी तुरंगात होता. अनेकांचे खून करुन त्यात त्यांची चक्क मुंडकी कापून टाकली होती. आत जाताच ‘तू इंटरव्ह्यू बंद कर, नाहीतर तुझं मुंडकं छाटून आत्ताच टेबलावर ठेवतो’ असं त्या खुन्यानं सांगितलं. तेव्हापासून एकट्या एजंटनं इंटरव्ह्यू घेणं बंद झाले. आता दोघंजण इंटरव्ह्यू घ्यायला जातात.
    
लॉस अँजेलिस येथील प्रख्यात मानसशास्त्रज्ञ पॉल डी रिव्हर यांनी ‘दी सेक्शुअल क्रिमिनल’ या पुस्तकात अशा लैंगिक विकृतीनं पछाडलेल्या गुन्हेगारांचं मनोविश्लेषण केलंय. हा गुन्हेगार एका शाळेत चौकीदार होता. त्यानं त्या शाळेतल्या ६ ते ९ वयोगटातल्या तीन मुलींना गोड बोलून एका अनोळखी ठिकाणी नेलं. खरं तर त्याचं स्वतःचं वैवाहिक आयुष्य अत्यंत समाधानकारक होतं. एवढंच नाही तर आपल्या शेजारणीबरोबरही त्याचे प्रेमसंबंध होते. तरीही आपली कामतृप्ती होत नव्हती असं त्याचं म्हणणं होतं. त्याला एका कुमारिकेसोबत संभोग करायचा होता. त्यामुळे त्यानं या तिघी मुलींना गळफास लावून ठार मारलं आणि नंतर त्यांच्यासोबत संभोग केला. त्यावेळी ‘आपल्याला खूप समाधान मिळालं; आपण मालक आहोत आणि या मुली म्हणजे आपल्या गुलाम’ असं त्यानं म्हटलं. 

१९४६ साली  पॅरिसमध्ये राहणार्‍या डॉ. मार्सेल पेरिऑट या माणसानं एक नाही, दोन नाही तर तब्बल ६३ व्यक्तींचे खून केले. त्यानं आपल्या तळघरात एक भट्टी बांधली होती. त्याच्याकडे येणार्‍या पाहुण्याचे तुकडे करुन तो या भट्टीत टाकत असे. त्याच्या घरातल्या धुरांड्यामधून नेहमी घाणेरडा वास येतो अशी शेजार्‍यांनी वारंवार तक्रार केल्यामुळे हे सत्य अखेर बाहेर पडलं. कोर्टात सफाई देताना डॉ. महाशयाचं म्हणणं होतं की आपण ज्यांना मारलंय त्या व्यक्ती जर्मन नागरिक असून त्यांचं फ्रान्सशी शत्रुत्व होतं. पण त्या व्यक्तींबद्दल त्याला धडपणे त्यांचं नावगाव अशी साधी माहितीही सांगता आली नाही.
१९४९ मध्ये अल्बर्ट गॉय यानं आपल्या बायकोला ठार मारण्यासाठी फारच कल्पक युक्ती शोधून काढली. तिच्या नावानं भला मोठा विमा होताच. त्यानं तिला तिकीट काढून विमानात बसवून दिलं. विमान सुरु होताच त्याचा स्फोट होऊन ते लगेचंच खाली कोसळलं. अल्बर्टनं जाताना प्रेमानं आपल्या बायकोला एक पुतळा भेट दिला होता. आणि या पुतळ्यात त्यानं तो बाँबही ठेवला होता. हे सगळं करण्यामागं विम्याची रक्कमी मिळावी एवढाच त्याचा ‘उदात्त’ हेतू होता! वर्नर बुस्ट हा जर्मन तरुण बागेतल्या एकांतात गुपचुप प्रेम करणार्‍या जोडप्यावर हल्ला करुन त्यातल्या तरुणीवर बलात्कार करत असे. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा ‘सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य (प्रेमक्रिडा) करणं हा गुन्हा आहे; अशा लोकांना शिक्षा करण्याच्या सद्हेतूनं मी हे कृत्य केलं’ अशी सफाई त्यानं दिली. हाइनशी पॉमरनेक यानं २० स्त्रियांवर बलात्कार केले आणि १० जणींचे खून केले. ‘टेन कमांडमेंट्स’ हा सिनेमा बघितल्यावर की जगातल्या सगळ्या दुःखाचं कारण म्हणजे ‘स्त्रिया’ असून त्यांना नष्ट करायलाच पाहिजे अशी त्याची खात्रीच झाली होती. 

 
१९५८ साली रुडाल्फ हा जर्मन गुन्हेगार स्वतःला उत्तम ‘डेथ मेकर’ समजत असे. त्यानं ५० स्त्रियांचे खून केले होते. त्याचं म्हणणं अजबच होतं, तो म्हणाला, ‘प्रत्येक माणसाला काही ना काही नाद असतोच की! कुणाला पत्ते खेळण्याचा, कुणाला पुस्तक वाचण्याचा, कुणाला दारु पिण्याचा. तसा मला खून करायचा नाद आहे आणि खून करणं हा प्रतिष्ठित धंदा असून लोकांनी उलटपक्षी या प्रकाराची तारीफ करायला पाहिजे’.

जून १९६२ ते जानेवारी १९६४ या काळात संपूर्ण बॉस्टन शहरात घबराहट निर्माण करणारा खुनी म्हणजे आल्बर्ट डी साल्वो उर्फ ‘बॉस्टन स्ट्रँगलर’ होय. त्यानं सुरुवातीला ५० ते ७५ या वयोगटातील तेरा स्त्रियांचे चार खून केले. ‘आपण घरदुरुस्तीसाठी आलो आहोत’ असं सांगून तो घरात प्रवेश मिळवायचा. घरात शिरताच त्या स्त्रीची पाठ वळताच तो मागून तिचा गळा दाबून तिला बेशुद्ध करीत असे. नंतर फडक्यानं तिला फास देवून ठार मारुन तिच्या अंगावरचे कपडे काढून तिला खुर्चीत बसवून अगदी दाराच्या समोर ती खुर्ची ठेवत असे. नंतर नंतर त्यानं खून करणं थांबवून फक्त बलात्काराचं सत्र काही काळ चालू ठेवलं. कधी कधी बलात्कार करण्यापूर्वी तो त्या मुलींशी गप्पाही मारत असे. फारच त्रासलेली,  वैतागलेली स्त्री असेल तर कधी कधी तो बलात्कार न करता परतही जात असे. त्यानं केवळ दहा महिन्यात (जानेवारी ते ऑक्टोबर १९६४) एकूण २०० स्त्रियांवर बलात्कार केले होते! याबद्दल त्याला विशेष अभिमान वाटे. पोलिसांना त्याला शोधण्यात कधीच यश आलं नाही. शेवटी त्यालाच पोलिसांची कीव आली असावी म्हणून तो स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. तुरंगात असताना १९७३ साली एका कैद्यानं डी साल्वोचा खून केला. प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जेम्स ब्रसेल्स यांच्या मते त्यानं सुरुवातीला केलेले खून म्हणजे त्याचा त्याच्या आईबद्दलच्या तिरस्काराचं प्रतीक होतं. 

१९६६ साली अमेरिकेत शिकागो येथे एकापाठोपाठ एक असे ८ परिचारिकांचे खून झाले. पोलिसांनी  कारण विचारल्यावर आपलं नाव व्हावं, एनकेन प्रकारे प्रसिद्धी मिळावी या हेतूनं आपण हे कृत्य केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. मुलीन नावाच्या एका तरूणानं स्वतःचं कुठल्याही प्रकारचं शत्रूत्व नसतानाही रस्त्यात दिसलेल्या एका वृद्धाला, एका कॉलेज तरुणीला, आपला मित्र आणि त्याच्या बायकोला, शेजारीण आणि तिच्या दोन मुलांना, पाच विद्यार्थ्यांना ठार केलं. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर ‘दुष्काळ, भूकंपासारखी नैसर्गिक संकटं देशावर येऊ नयेत’ या भावनेतून आपण हे खून केले असं त्यानं सांगितलं.

अमेरिकेत १९४५ पासूनच अशा हिंसक गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. लैंगिक गुन्हे करणारे हे विभक्त कुटुंबातले बहुतांशी होते. १९७० नंतर अमेरिकेत घटस्फोटित कुटुंबाचं प्रमाण प्रचंडच वाढलं. त्याचाच परिणाम म्हणून १९८० नंतर गुन्ह्याचं तर प्रमाण वाढलंच पण हे गुन्हे अत्यंत व्रूरपणे केलेले होते. पूर्वी एखादी खुनासारखी दुर्घटना घडली तर वर्तमानपत्रात प्रचंड प्रमाणात उलटसुलट बातमी छापून येई. या वाढत्या गुन्ह्यांमुळे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ प्रमाणे रोजच गुन्हे घडत असल्यामुळे त्याबद्दलचं वाचकांचं कुतूहल संपलं होतं.

अमेरिकेत अनेक मानसोपचारतज्ज्ञ या गुन्हेगारांवर उपचार करताना या गुन्हेगारीवर सखोल संशोधन करीत आहेत. मानसाची शरीरप्रकृती आणि वर्तणूक यांचा परस्परसंबंध असतो यावर सगळ्याच संशोधकांचं एकमत आहे. विल्यम शेल्डॉन या मानसोपचारतज्ज्ञानं याविषयावर सातत्यानं संशोधन केलं आणि काही निष्कर्ष काढले. गुन्हेगाराच्या शरिराचे तीन मुख्य भाग पडतात. पहिला भाग‘एर्न्डोमॉर्फी’ या विभागातल्या व्यक्ती  गोल असतात, राकट नसतात. या स्वभावानं हेकेखोर, हट्टी, ताकदीची कामं करणार्‍या, इतरांवर अधिकार गाजवणार्‍या असतात.  तर दुसरा भाग म्हणजे ‘मेसोमॉर्फी’. यातल्या व्यक्ती काटक, पैलवानासारख्या बलदंड असतात. यातल्या व्यक्ती अत्यंत लहान वयातच गुन्हेगारीकडे वळतात आणि तिसरा विभाग म्हणजे ‘इक्टोमॉर्फी’. यातल्या व्यक्ती उंच, सडसडीत असतात.
बहुतांशी खून करणारी व्यक्ती ही अनोळखी नसते. ती खून करणार्‍या व्यक्तीला ओळखत असते. पाश्चात्य देशात अशा गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय कारण दूरदर्शन, वर्तमानपत्रं, मासिकं, सिनेमे, आकाशवाणी या सगळ्याच प्रसारमाध्यमातून हिंसेचं भयानक दर्शन सातत्यानं दाखवलं जातं. सारखे पिस्तुलातून झालेले गोळीबार, कुर्‍हाडीनं केलेले खून, पोलीस कोठडीतील पोलिसांची मारहाण, बॉम्बस्फोटामुळे झालेले मृत्यू, युद्ध, गँगवार हे सारं सातत्यानं पाहून मुलांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होतोच. प्रख्यात मानसशााज्ञ ब्रूनो बेट्टेलहाईम यांना हे म्हणणं मान्य नव्हतं. त्यांना वाटतं की ‘मानव हा मूलतः हिंसक प्रवृत्तीचा आहे आणि ही प्रवृत्ती आपण वेगवेगळ्या कारणांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. अमेरिकेत तर आर्थिकदृष्ट्या मुलं ही जास्त काळ आपल्या पालकांवर अवलंबून असतात. त्यांना त्यांच्या पालकांच्या कलानं वागावं लागतं. यामुळे त्याच्या नैसर्गिक सुप्तावस्थेतील मानसिक, शारीरिक उर्मी दडपल्या जातात आणि यातूनच ते गुन्हेगारीकडे वळतात’. रॉबर्ट कॉस्टेनबॉमच्या मते ब्रूनो बेट्टेलहाईमच्या मताला शााीय आधार नाही. अमेरिकाच काय पण इतरही अनेक राष्ट्रात, अगदी भारतातही काही प्रमाणात हीच अवस्था आहे. भारतातही शिक्षण होईपर्यंत मुलांना पालकांवरच अवलंबून राहावं लागतं. पण भारतातली तरुण पिढी इतकी हिंसक नाही. अपवादानं अशा प्रकारचा गुन्हा भारतात घडतो..

अमेरिकेत वॉल्फँग या मानसोपचारतज्ज्ञानं ५६६ खुनांच्या केसेसचा अभ्यास केला. त्यात त्याला २५% स्त्रियांनी या कृत्यास उद्युक्त केल्याचंही आढळून आलं. उदाहरणार्थ काही वेळा स्त्रियाच एखादी गोष्ट कशी वाढवतात हे दिसून आलंय. ‘ जा, काय करायचं ते करा, काय कराल? मारुन टाकाल? टाका, खुशाल टाका, सुटेन मी यातून कायमची’. किंवा अमेरिकेत तर स्त्रिया स्वतःच पिस्तुल नवर्‍याच्या हातात देवून म्हणतात, ‘मारुन टाक एकदाच आणि मग खुशाल तुला हवी ती मजा कर!’ किंवा कधी कधी एखादी स्त्री पुरुषाला डिवचते, ‘तुझ्यात काय हिम्मत आहे? साधी माशी मारू शकत नाहीस, तर मला काय मारशील? आरशात तोंड बघ’ अशा प्रकारच्या डिवचण्यातूनही अनेक कौटुंबिक गुन्हे घडल्याचं आढळून आलंय. अर्थात असं डिवचण्यामागे अनेकदा पुरुषांनी स्त्रियांवर केलेले अत्याचारच कारणीभूत असतात ही गोष्ट मात्र ही पुरुषप्रधान संस्कृती सोयीस्कररीत्या विसरते.

कौटुंबिक पार्श्वभूमी, उतावळेपणं, कुटुंबांचं दुर्लक्ष, आर्थिक परिस्थिती, शिस्तीचा अभाव यासारख्या अनेक गोष्टींमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती जन्म घेतात असं मानसशााज्ञ म्हणतात. कधी कधी सूडभावना जास्त तीव्रतेनं उफाळून आली की त्यामुळेही विकृत वर्तन घडतं. अशा गुन्हेगारी वागणुकीविषयी क्रोमोझोनल पॅटर्नविषयी बोललं जातं. आईला अल्कोहोलची सवय असेल तर त्याचेही न्यूरॉलॉजिकल परिणाम दिसतात. यालाच ‘अल्कोहोल सिन्ड्रोम’ असं संबोधलं जातं. तर कधी आय क्यू कमी असेल तर योग्य आणि अयोग्य यातला फारसा फरक लक्षात न येता कृती घडते. तसंच हार्मोनल असंतुलनामुळेही वागणुकीत एकदम विकृत कृती घडून येते. अँटिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर मध्ये व्यक्तीला मी कोणालाही आवडत नाही अशी भावना तयार होत जाते. कधी कधी समाजातल्या मान्यता असलेल्या गोष्टी, नीतिनियम, रुढी यांच्या विरोधातलं वर्तन हेही गुन्हेगारी प्रवृतीत वाढ करु शकतं. माणसाच्या मेंदूत डाव्या बाजूला लॉजिकल थिंकिंग होते तर उजव्या बाजूला जास्त आर्टिस्टिक क्रिया घडताना आढळतात. आई-वडिलांच्या जिन्समधून अनेक घटक मुलांमध्ये कार्यान्वित होतात. असं असलं तरी एक पाठीवर पडलेली कौतुकाची थाप त्या मुलाला आयुष्यात उत्तम कलावंत बनवू शकते तर त्याच मुलाला सतत उपेक्षित वागणूक मिळाली तर तोच मुलगा पुढे चालून गुन्हेगार बनू शकतो.

फ्रॉईडसारख्या  मानसशास्त्रज्ञानंही म्हटलंय, ‘आजच्या सुसंस्कृत माणसापेक्षा प्राचीन काळातील रानटी समजल्या जाणार्‍या माणसाचा मृत्यूविषयीचा दृष्टिकोन जास्त सुसंस्कृत होता.’ अगदी ऐतिहासिक महाभारताचा दाखला घेतला तरी त्यात प्रचंड प्रमाणात हत्याकांड आहे. मानवी इतिहासाची गेली शेकडो वर्षं अनन्वित खून, रक्तपात यांनी भरलेली आहेत. खून ही जणू मानवी संस्कृती बनू पहातेय. गेल्या दोन महायुद्धात प्रचंड प्रमाणात झालेले निरपराध लोकांचे मृत्यू, हिरोशिमा, नागासाकी या शहरांची बॉम्बस्फोटामुळे झालेली संपूर्ण राखरांगोळी, अतिरेकी कारवायांनी लक्ष्य बनलेली, उदध्वस्त झालेली शहरं, स्वतंत्र प्रांतांची मागणी करताना झालेल्या हिंसक चळवळी, व्हिएतनाम, कोरिया, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान, इराक, इराण, पाकिस्तान यासारख्या देशांत चाललेला प्रचंड प्रमाणातला हिंसाचार हा समस्त मानवजातीला काळिमा लावणारा आहे! हे सगळं हिंसेकडून अहिंसेकडे कसं परावर्तीत होईल हाच खरा प्रश्न आहे 

दीपा देशमुख, पुणे 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.