भारतीय जीनियस -- डॉ. होमी जहॉंगीर भाभा
३० ऑक्टोबर १९०९ या दिवशी एका कुटुंबात एक बाळ जन्मलं. एकदा काय झालं, एका रात्री ते बाळ जोरजोरात रडायला लागलं. त्याला झोपवण्यासाठी मग वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. पण ते कशालाच दाद देईना. त्याला काही त्रास होतोय का हेही मग घरातल्या जाणत्या स्त्रियांनी बघण्याचा प्रयत्न केला. पण तशीही काही लक्षणं दिसेनात. रात्रभर आपल्या रडण्यानं घर दणाणून सोडणार्या बाळाला शांत कसं करावं हे कोणालाच कळत नव्हतं. पाळण्याला झोके देऊन झाले, खेळणी दाखवण्यात आली, वेगवेगळे आवाज काढण्यात आले, बाळाला कडेवर घेऊन उगी उगी करण्यात आलं, पण छे! कशाचाच उपयोग होत नव्हता. अखेर डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. त्या वेळचे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आले आणि त्यांनी बाळाला तपासलं आणि ‘बाळाची प्रकृती अगदी उत्तम असून काहीही काळजी करू नका’ असं सांगितलं. बाळाची बुद्धी तल्लख असल्यानं त्याला कमी झोप असावी आणि ती पुरेशी आहे असा निर्वाळा डॉक्टरांनी दिला. ते ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. पण बाळाचं रडणं कसं थांबवायचं हे मात्र अजूनही कोणाच्याच लक्षात येत नव्हतं. अचानक कोणालातरी युक्ती सुचली आणि बाळाच्या आईनं रेकॉर्ड प्लेअरवर गाण्याची एक रेकॉर्ड लावली. आश्चर्य म्हणजे संगीताचे स्वर कानावर पडताच बाळ शांत झालं आणि आवाज कुठून येतोय त्या दिशेनं आपल्या इवल्या इवल्या डोळ्यांनी बघायला लागलं.
संगीताची गोडी लागलेल्या या मुलानं पुढे भारतीयच नाही, तर पाश्चात्त्य संगीताचे धडे गिरवले आणि विज्ञानाच्या क्षेत्रातही नेत्रदीपक भरारी मारली. त्याचं नाव होतं डॉ. होमी जहॉंगीर भाभा! नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न सी. व्ही. रामन हे होमी जहांगीर भाभा यांना भारताचा ‘लिओनार्दो दा व्हिंची’ असं अभिमानानं म्हणत असत.
भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉ. भाभा एक कुशल वैज्ञानिक आणि इंजिनिअर तर होतेच, पण एक वास्तुशिल्पी (आर्किटेक्ट), कुशल नियोजक, उत्कृष्ट व्यवस्थापक आणि निपुण कार्यकारी व्यक्ती होते. त्यांना ललित कला आणि संगीत या कलांविषयी विशेष प्रेम होतं. ते उत्कृष्ट व्हायोलिनवादक होते. ते एक उत्तम चित्रकार होते. तसंच ते पर्यावरणवादी होते. लोकांच्या कल्याणासाठीचा विचार सतत त्यांच्या डोक्यात असे. पाच वेळा भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिकासाठी भाभांचं नामांकन केलं गेलं होतं.
भारतीय आणि विदेशी विश्वविद्यालयांच्या अनेक मानद पदव्या त्यांना प्राप्त झाल्या होत्या. भारत सरकारनं १९५४ साली त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन गौरवलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक सन्मान त्यांना मिळाले. १९४५ साली भारतात संशोधनात अग्रेसर असलेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टीआयएफआर) स्थापना करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता!
डॉ. भाभा हे भारतीय अणुऊर्जेचे जनक म्हणून ओळखले जातात. ते म्हणत, ''मला आयुष्याकडून काय हवंय ते मला स्पष्टपणे माहीत आहे. आयुष्य आणि माझ्या भावना या दोन्हींबाबत मी सावध आहे आणि माझ्या आयुष्यातल्या या सावधपणावर माझं प्रेम आहे. प्रत्येकाचा आयुष्यकाळ मर्यादित असतो, मलाही तो जेवढा मिळेल तेवढाच हवा आहे. मृत्यूनंतर काय? हे कोणालाच ठाऊक नाही आणि त्याची मला पर्वाही नाही. आयुष्यकाळ वाढण्यापेक्षा त्या आयुष्याची प्रखरता वाढवून त्याचा आशय वाढवण्याचा मी प्रयत्न करेन.’’
दीपा देशमुख, पुणे
Add new comment