भारतीय जिनियस - डॉ जयंत नारळीकर

भारतीय जिनियस - डॉ जयंत नारळीकर

एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विश्‍ववैज्ञानिक हा एक लेखक कसा बनतो याची गोष्ट खूपच विलक्षण आहे. १९७४ साली नववं मराठी विज्ञान साहित्य संमेलन आयोजित केलं होतं, त्यातल्या विज्ञानरंजन स्पर्धेत या खगोलशास्त्रज्ञ महाशयांनी भाग घेतला होता. त्यांची नावाची आद्याक्षरे ‘जविना’ अशी होती. त्यांनी ती उलटी ‘नाविज’ अशी करून नारायण विनायक जगताप असं एक टोपणनाव स्वतःसाठी निवडलं आणि ‘कृष्णविवर’ नावाची कथा लिहून ती या स्पर्धेसाठी पाठवली. गंमत म्हणजे या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं. विज्ञानकथा या उपेक्षित वाडमयप्रकाराला त्यांनी जनमानसात दर्जा मिळवून दिला. त्यांनतर लोक आवडीनं विज्ञानकथा वाचायला लागले. या 'नाविज' म्हणजेच नारायण विनायक जगताप यांचं खरं नाव 'जविना' म्हणजेच जयंत विष्णू नारळीकर होतं! केवळ आपल्या नावाच्या दबदब्यामुळे आपल्याला पारितोषिक मिळू नये, तर फक्त गुणवत्तेवरच मिळावं या हेतूनं त्यांनी टोपणनाव धारण केलं होतं! गणित आणि विज्ञान हे मुळातच किचकट वाटणारे विषय अगदी सामान्य माणसांपर्यंत रंजकपणे पोचवणारं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व,जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक, ‘विज्ञाननिष्ठा’ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्यं भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक म्हणून डॉ नारळीकरांचं नाव आज घेतलं जातं. ‘मराठी वैज्ञानिक’ म्हटलं की नारळीकरांचाच चेहरा सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो. 

२०१६ ची दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपलीये आणि या दिवाळीत आम्ही - अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख- आपल्याला कबूल केल्याप्रमाणे आपल्या भेटीला घेऊन येत आहोत, महाराष्ट्राचा मान आणि शान असलेले शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर! डॉ. जयंत नारळीकर या महाराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञानं विश्‍वविज्ञानामधलं ‘स्टेडी स्टेट’वरचं संशोधन आणि विज्ञानाच्या प्रसारासाठी लिहिलेलं साहित्य यानं जगात आपली मान अभिमानानं उंचावली आहे. पुण्यात ‘आयुका’ सारख्या विज्ञानसंस्थेची उभारणी त्यांनी केली.

डॉ. नारळीकर खर्‍या अर्थानं ’महाराष्ट्र भूषण’ आहेत. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांच्या नुसत्या पुरस्कारांची आणि सन्मानांची यादी बघितली तरी त्यांचं मोठेपण लक्षात येतं. केंब्रिजचे बेरी रॅम्से फेलो म्हणून बहुमान, केंब्रिजचे रिसर्च फेलो म्हणून सन्मान, केंब्रिजमध्ये व्याख्याता म्हणून काम, भारतात मुंबईच्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई इथे प्राध्यापक म्हणून काम, पुणे इथल्या आयुका विभागाचे संचालक म्हणूनही कार्यरत, जगातल्या अनेक विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक, सैद्धांतिक भौतिकी आणि खगोल विज्ञान या विषयांवर अनेक पुस्तकांचं लेखन, मराठी, हिंन्दी आणि इंग्रजी या भाषांमधून विज्ञानकथांचं लेखन, व्याख्यानं, आकाशवाणी दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार, मराठी विज्ञान परिषद आणि संमेलन यांचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान, १९६५ साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण, युनेस्कोचा कलिंग पुरस्कार, जगातल्या आणि भारतातल्या अनेक विद्यापीठांच्या सन्मानीय डॉक्टरेट्स, पुस्तकांना राज्य, राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकं, ऍडम्स, एम. पी. बिर्ला पुरस्कार,  भटनागर पुरस्कार, जवाहरलाल नेहरू, गोदावरी, राष्ट्रभूषण, पुण्यभूषण, शाहू, बीबीव्ही (स्पेन) पुरस्कार तसंच २००४ मध्ये भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार, २०१० साली महाराष्ट्र भूषण असे असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून २०१२ साली अमेरिकेतल्या फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. तसंच त्यांच्या ‘चार नगरातले माझे विश्‍व’ या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. 

नारळीकरांना नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांच्याविषयी प्रचंड आदर वाटत असे. त्यांच्या दोघांच्या अनेकदा चर्चाही होत असत. तसंच आईन्स्टाईन आवडत असल्यानं बर्नमधल्या त्याच्या घराला त्यांनी भेट दिली कारण ते घर त्यांना सतत ओढ लावत असे. आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आणि त्यावरचं संशोधन त्याच घरात झालं होतं. नारळीकरांना रिचर्ड फाईनमनची लेक्सर्च ऐकणं हा सगळ्यात संस्मरणीय अनुभव वाटतो. फाईनमनची लेक्चर द्यायची पद्धत, आवाजातले चढ-उतार, एका जागी उभं न राहता इकडून तिकडे सहजगत्या फिरत बोलणं आणि प्रत्येक श्रोत्याकडे लक्ष केंद्रित करणं ही गोष्ट नारळीकरांना विलक्षण भावते. 

जयंत नारळीकरांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रसन्न असून बोलका स्वभाव असल्यानं ते समोरच्याला क्षणात आपलंसं करतात. त्यांची राहणी अतिशय साधी असून विनम्रता अंगी बाणलेली आहे. नारळीकरांना आपला देश, आपली भाषा आणि आपली संस्कृती यांचा प्रचंड आदर आहे. परमेश्‍वरावर कोणी श्रद्धा ठेवत असेल तर ते त्याची चेष्टा मुळीच करत नाहीत, ही श्रद्धा अंधश्रद्धेत बदलू नये असं मात्र त्यांना मनापासून वाटतं. आपल्याला अजून खूप काही शिकायचंय हाच भाव मनात घेऊन डॉ. जयंत नारळीकर विज्ञानाची जागरूकता लोकांमध्ये आणत अखंड वाटचाल करत आहेत!

लवकरच भेटूया या जीनियस जयंत नारळीकर यांना!!!! 

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.