भारतीय जीनियस - भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
आज १५ सप्टेंबर - हा दिवस ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो! विश्वेश्वरैयांच्या जन्मदिवसाचं औचित्त्य साधून त्यांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि पुढल्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करत राहावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांना ‘भारताचा आधुनिक भगीरथ’ असं म्हटलं जातं. विश्वेश्वरैयांचं काम संपूर्ण भारतभर आणि तेही अनेक क्षेत्रातलं! अल्बर्ट आईन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञालाही विश्वेश्वरैयांबद्दल कौतुक आणि प्रचंड आदर वाटायचा.
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया. यांचं देशाच्या जडणघडणीत किती मोलाचं योगदान होतं, ते त्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडताना लक्षात येतं. डॉ. एम. विश्वेश्वरैया कोण होते? एक इंजिनिअर, पाणी व्यवस्थापक, सिंचन व्यवस्थापक, औद्योगिकीकरण नियोजनकर्ता आणि निर्माता, शिक्षणद्रष्टा आणि या मातीशी इमान राखणारा एक बुद्धिवंत आणि निष्ठावंत असा असाधारण कार्यकर्ता! भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, 'विश्वेश्वरैया हे भारताला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे, तर कृष्णराजसागर हे विश्वेश्वरैयांना पडलेलं सुदंर स्वप्न आहे! हे स्वप्न आपल्या कर्तृत्वानं आणि कष्टानं विश्वेश्वरैयांना साकारता आलं. ते स्वतः कधी भूतकाळात अडकले, वा रमले नाहीत. सतत उद्याचा विचार करत तो विचार कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहिले. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करायचा हे ज्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं ते आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वेश्वरैया!’ पं. नेहरूंनी काढलेले प्रशंसोद्गारही कमीच पडावेत असं विश्वेश्वरैयांचं कर्तृत्व होतं!
विश्वेश्वरैया म्हणत, ‘शिक्षण, गुंतवणूक आणि एकत्रित येऊन प्रयत्न करणं हा प्रगतीचा मार्ग आहे. पाऊस नियमित आला नाही, तरी लोकांना जगता आलं पाहिजे आणि त्यांची पोटं भरली पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम पाहिजे. तसंच त्यानं वैयक्तिक गरजांबरोबर आणि कुटुंबाबरोबरच देशासाठीही काम केलं पाहिजे.’
लोकांच्या मनात विश्वेश्वरैया नावाच्या माणसानं कायमचा ठसा का उमटवला असेल याचं उत्तर अनेक प्रसंगांमधून मिळतं. एकदा एका कारखान्याला भेट द्यायला विश्वेश्वरैया गेले होते. त्या वेळी त्यांचं वय ८५ वर्षं इतकं होतं. तिथल्या कामाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी तिथे असलेल्या ९-१० इंजिनियर्संना ते प्रश्नही विचारत होते. एक प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देताना तिथला इंजिनियर म्हणाला, 'या प्रश्नाचं उत्तर फक्त तोंडी समजावून सांगता येणार नाही. हा प्रश्न समजवून घ्यायचा असेल तर या यंत्राच्या वरच्या शेवटच्या टोकापर्यंत जावं लागेल.’ ती उंची होती ७५ फूट आणि वरती जायला एक अरुंद अशी लोखंडी पाईपाची एक शिडी होती. इंजिनियर्संना वाटलं, आता आपण प्रश्नोत्तराच्या तावडीतून सुटलो. पण त्यांचा आनंद क्षणभरही टिकला नाही. कारण ‘ओके’ म्हणत विश्वेश्वरैयांनी तो अरुंद जिना शिडीवरून चढायला सुरुवात केली होती. त्यांच्यामागोमा बाकी इंजिनिअर्स आणि लवाजमाही नाइलाजानं तो जिना चढायला लागले. पण विश्वेश्वरैयांबरोबर ७५ फूट उंचीचा तो जिना केवळ ३ इंजिनियर्स चढू शकले. बाकीचे आपली हार स्वीकारून माघारी फिरले. वर गेल्यावरही विश्वेश्वरैया मात्र थकले नव्हतेच. त्यांनी अतिशय उत्साहानं त्या प्रश्नाचं उत्तर आणि प्रक्रिया नीट समजून घेतली. खाली उतरल्यावर त्यांनी त्याचा नीट अहवाल तयार केला. त्या वेळी उपस्थित असलेले इंजिनियर्स मात्र अवाक् होऊन बघतच राहिले. त्यांच्याबरोबर काही क्षण जरी घालवले तरी समोरच्यासाठी तो आयुष्यभराचा संस्मरणीय शिकण्यासारखा अनुभव असायचा.
१०० वर्षांहून अधिक दीर्घकाळाचं आयुष्य लाभलेले विश्वेश्वरैया जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. निर्व्यसन, मिताहार, शाकाहार, तसंच जेवण, व्यायाम आणि झोप यातला नियमितपणा आणि कामात पूर्ण मन लावून गुंतवून ठेवणं हे त्यांनी सतत पाळलं. तसंच लोकांशी केलेला संवाद आपल्याला ऊर्जा देतो असं ते म्हणत. ‘सतत उद्योगी राहा’ हा त्यांचा मंत्र होता. वयाच्या ९८ व्या वर्षीदेखील त्यांची दृष्टी शाबूत होती आणि त्यांना साधा चष्मादेखील लागला नव्हता.
दीपा देशमुख
Add new comment