भारतीय जीनियस - सर सी. व्ही. रामन
सर सी. व्ही. रामन या झपाटलेल्या संशोधकानं संपूर्ण आयुष्य विज्ञानाच्या क्षेत्रातल्या संशोधनाला दिलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ४५० शोधनिबंध लिहिले. वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर पाच दीर्घ लेख (मोनोग्राफ) लिहिले. क्वॉंटम मेकॅनिक्स, किरणोत्सर्गता, स्फटिकांचं रसायनशास्त्र, खनिजद्रव्यांचं शास्त्र, प्राणिशास्त्र, श्रवणशास्त्र अशा किती वैविध्यपूर्ण विषयांवर त्यांनी संशोधन केलं. तसंच केवळ विज्ञानावर त्यांनी ४००० पानं लिहून ती प्रसिद्ध केली. एकूण १५०० प्रबंध प्रकाशित करणार्या रामन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाचा कामाचा झपाटा आणि वेग किती प्रचंड असला पाहिजे याची कल्पनाच केलेली बरी! ‘रामन इफेक्ट’ हा शोध २८ फेब्रुवारी १९२८, मंगळवारी रामन यांनी जाहीर केला. म्हणूनच आपण २८ फेब्रुवारी या दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करतो! १९३० साली भारताला विज्ञानातलं पहिलं नोबेल पारितोषिक सर सी. व्ही. रामन यांना मिळालं! १९५४ साली भारतसरकारनं सी. व्ही. रामन यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा सत्कार केला. १९५८ साली त्यांना रशियानं लेनिन पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.
रामन यांना स्वतःच्या कामाविषयी इतका आत्मविश्वास होता, की आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार याची त्यांना खात्रीच होती. १९२४ साली रामन अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात व्याख्यानासाठी गेले असताना या व्याख्यानाला खूपच कमी लोक उपस्थित होते. त्या वेळी रोझलँड या आपल्या मित्राला रामन म्हणाले, 'आज कोणी मला ओळखत नाही, त्यामुळे व्याख्यानासाठी उपस्थितांची इतकी कमी संख्या असणं स्वाभाविक आहे. पण मी काहीच दिवसांत असा शोध लावेन की मला नोबेल पारितोषिक मिळेलच आणि संपूर्ण जगात माझं नाव होईल.’ रामन यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यावर तिकीट काढून युरोपला पोहोचणं केवळ तेवढ्या कालावधीत अशक्य होतं. पण रामन एकटेच नाही तर आपली पत्नी लोकसुंदरी हिच्यासह स्वीडनमधल्या स्टॉकहोम इथं या समारंभाला उपस्थित राहिले. याचं कारण रामन यांना इतकी खात्री होती की त्यांनी जुलै महिन्यातच बोटीच्या प्रवासाची दोन तिकीटं आगाऊ काढून ठेवली होती. (नोबेल मिळणार अशीच खात्री याआधी आईन्स्टाईनलाही होती!)
नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी रामन आणि लोकसुंदरी स्वीडन इथं स्टॉकहोमला गेले. १० डिसेंबर १९३० या दिवशी साजर्या झालेल्या या कार्यक्रमासाठी ४००० मान्यवर प्रचंड भव्य अशा सजवलेल्या सभागृहामध्ये स्थानापन्न झाले होते. स्वीडनचे राजे गुस्तॉव्ह यांनी स्वतः रामन यांना नोबेल पारितोषिक प्रदान केलं. या समारंभाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमातही रामन आपल्या नेहमीच्या वेशभूषेत - म्हणजे फेटा घालूनच गेले होते आणि त्यामुळे ते सगळ्यांमध्ये वेगळे आणि उठूनही दिसत होते. नोबेल पारितोषिक स्वीकारून रामन जेव्हा आपल्या जागेवर येऊन स्थानापन्न झाले, तेव्हा त्यांना गहिवरून आलं होतं. त्याचं कारण त्या वेळी कुणालाच समजलं नाही. संध्याकाळी पारितोषिक मिळालेल्या मान्यवरांसाठी शाही भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी केलेल्या व्याख्यानात रामन यांनी आपल्या संशोधनाचा प्रवास सगळ्यांबरोबर अस्खलित इंग्रजीतून शेअर केला. त्याचबरोबर आपल्या सहकारी विद्यार्थ्याचा उल्लेख आवर्जून केला. रामन यांच्या व्याख्यानानं सगळेच भारावून गेले होते. आपल्याला सकाळी आपल्या सध्या तुरुंगात असलेल्या एका मित्राची अभिनंदनाची तार आली असून ती आपल्या अतिशय आवडत्या मित्राची असल्याचं रामन यांनी सांगितलं. त्या मित्राचं नाव होतं - मोहनदास करमचंद गांधी! त्या वेळी भारत पारतंत्र्यात होता आणि रामन यांच्या शेजारी ब्रिटिश राजदूत (ऍम्बेसेडर) बसलेला असतानाही रामन यांनी आपलं मनोगत कुठलाही दबाव न घेता व्यक्त केलं. नोबेल पारितोषिक मिळणं हा खरं तर त्यांचाच नाही तर देशाचा आणि विज्ञानाचा सन्मान होता. मात्र तिथे आपल्या भारत देशाचा नाही तर इंग्लंडचा झेंडा फडकत होता, आपण पारतंत्र्यात आहोत, कुणाचे तरी गुलाम आहोत या आठवणीनं त्यांच्या डोळ्यांतून तेव्हा अश्रू वाहायला लागले.
दीपा देशमुख २८ फेब्रुवारी २०१८.
Add new comment