'भारतीय जीनियस' येती घरा | तोचि दिवाळी दसरा || लॉरी बेकर
'भारतीय जीनियस' येती घरा |
तोचि दिवाळी दसरा ||
गरिबांचा विचार करणारा, गरिबांसाठी झटणारा, पर्यावरणाचा विचार करणारा आणि निसर्गाला बरोबरीनं घेऊन चालणारा भारतीय जीनियस वास्तुशिल्पी कोण असा प्रश्न केला तर एकच नाव डोळ्यासमोर येईल ते म्हणजे - लॉरी बेकर ! ‘वास्तुशास्त्रातले गांधी’ ही लॉरी बेकरची खरी ओळख! गरिबांसाठी अतिशय किफायतशीर दरात घर बांधून देणारा वास्तुशिल्पी असं देखील त्यांना म्हटलं जातं. आपलं काम हे प्रोफेशन म्हणून न करता पॅशन म्हणून करणारा हा अवलिया! लॉरी बेकर यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’सह अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार मिळाले.
कमीत कमी ऊर्जा वापरून स्वस्त दरात घरं कशी बांधली जातील हाच विचार लॉरी बेकर यांनी आयुष्यभर केला आणि तो अंमलातही आणला. बांधकामात सिमेंटचा वापर शून्य प्रमाणात व्हायला हवा असं त्याचं ठाम मत होतं. कुठलीही वास्तू बनवताना त्यांनी ती ठोकळेबाज पद्धतीनं कधीही बनवली नाही. ती उभारताना त्यांचा नेहमी सौंदर्यवादी दृष्टिकोन जागा असे. स्वभावानं अत्यंत खेळकर, मिश्किल वृत्तीचे असलेले लॉरी बेकर हे मानवतावादी विचारसरणीचे होते. बोलताना ते सतत विनोद करत आणि आसपासचं वातावरण हलकं, खेळकर आणि प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत. जगण्याचा आनंद भरभरून घेतला पाहिजे असं त्यांना वाटे.
संपूर्ण आयुष्य लॉरी बेकर यांच्यावर गांधीजींचा प्रभाव राहिला. गांधीजींबरोबर झालेल्या पहिल्या भेटीत गांधीजी त्यांना म्हणाले होते, 'लॉरी तुझ्यासारख्या तरुणांचीच या देशातल्या गरिबांना गरज आहे’ ‘गांधीजींचं तेवढं एक वाक्य समजायला मला ५० वर्षं लागली.’ असं नंतर लॉरी बेकर यांनी म्हणून ठेवलंय.
घर कसं असायला हवं? स्थानिक संसाधनांच्या उपयोगानं, निसर्गाचा आदर राखून, कमीत कमी ऊर्जा वापरून, उच्च दर्जाचं, सुंदर आणि तरीही कमी खर्चात असंच असायला हवं असं लॉरी बेकर म्हणत आणि तोंडात बोट घालायला लागावं इतक्या स्वस्त दरात ते ती बांधूनही दाखवत हे विशेष! कॉस्ट इफेक्टिव्ह घरं फक्त गरिबांसाठीच नाहीत, तर सगळ्यांसाठीच असायला हवीत! असं त्यांना वाटे.
एकदा माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी लॉरी बेकर यांना एका सेमिनारसाठी दिल्लीला बोलावलं होतं. त्या सेमिनारसाठी दिल्लीला जायचं म्हणजे विमानानं जाण्या-येण्याच्या सरकारी खर्चाची त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीत राहण्याची उंची व्यवस्थाही अर्थातच करण्यात आली होती. दिल्लीत जाण्याआधी एक दिवस लॉरी बेकर यांनी ‘हाऊ टू रिड्यूस बिल्डिंग कॉस्ट?’ नावाचं पुस्तक लिहून काढलं आणि राष्ट्रपतींना आपण दिल्लीत येऊ शकत नसल्याचं कळवलं आणि सांगितलं, ‘माझ्या प्रवासाच्या आणि राहण्याच्या व्यवस्थेच्या खर्चामध्ये हे पुस्तक छापून होईल आणि मला तिथे येण्यापेक्षा त्या खर्चात हे पुस्तक प्रसिद्ध होऊन घरोघर पोहोचलेलं जास्त आवडेल.’
'बोले तैसा चाले’ प्रमाणेच लॉरी बेकर आपलं ९० वर्षाचं आयुष्य जगले. त्यांच्या भौतिक गरजा त्यांनी इतक्या कमी ठेवल्या होत्या की कमीत कमी खर्चात ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. त्यांना जेव्हा युनायटेड नेशन्सचा अतिशय मानाचा ‘ हॅबिटाट पुरस्कार’ जाहीर झाला तेव्हा, तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी देखील ते गेले नाहीत. त्यांनी नम्रपणे आपला नकार कळवत म्हटलं, 'इकडे कोणी येणार असल्यास तो पुरस्कार त्याच्याबरोबर पाठवा.’ तो पुरस्कार स्वीकारताना शेकडो लोकांची नजर आपल्यावर रोखलेली आहे, शेकडो लोक टाळ्यांचा कडकडाट करताहेत आणि प्रशंसा करताहेत असं चित्र नाकारून लॉरी बेकर म्हणाले, 'आपली स्तुती आपणच ऐकण्यापेक्षा आपला वेळ कामात गेलेला बरा.' विनाकारण उधळपट्टी करणं, लोकप्रियतेसाठी भुकेलं असणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.
जरूर वाचा!!
दीपा देशमुख.
Add new comment