भारतीय जीनियस मेघनाद साहा
मेघनाद साहा हे सुप्रसिद्ध भारतीय खगोलवैज्ञानिक (ऍस्ट्रोफिजिसिस्ट) होते. ‘साहा समीकरण’ या त्यांच्या समीकरणामुळे ते प्रसिद्ध झाले. हे समीकरण तार्यांमधली भौतिक आणि रासायनिक स्थिती यांची व्याख्या करतं. स्वप्न आणि कृतीशीलता यांचा अचूक मेळ घालणारा संशोधक कोण तर केवळ मेघनाद साहा या भारतीय वैज्ञानिकाचच नाव घ्यावं लागेल. मेघनाद साहा यांचं विज्ञानाबरोबरच अनेक शाखांमधलं काम आज बघितलं तर थक्क व्हायला होतं. त्या वेळी खगोलभौतिकीवर काम करणार्यांना नोबेल पारितोषिक दिलं जात नसलं तरी मेघनाद साहा यांचं नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवलं गेलं हेातं. त्यांचे विज्ञानावरचे ८८ च्या वर उच्च दर्जाचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले. तसंच खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी, वर्णपटलशास्त्र, परमाणू भौतिकी, विश्वकिरण, परमाणु ऊर्जा, तसंच नद्यांचं व्यवस्थापन कसं करावं, वीज, साधनसंपत्ती, औद्योगिकीकरण, युद्ध आणि दुष्काळ, शिक्षण, राज्यांची पुनर्रचना, निर्वासितांचं पुनर्वसन, दिनदर्शिका तयार करणं, अनेक वैज्ञानिक संस्था आणि संघटना यांची उभारणी करणं, पुराततृत्त्वशास्त्र आणि इतिहास यांचा गाढा अभ्यास करणं, असे राष्ट्रीय प्रश्न, शिवाय नील्स बोर, अल्बर्ट आईन्स्टाईन, रदरफोर्ड, रवीन्द्रनाथ टागोर, सर विश्वेश्वरैया या महान हस्तींवर लिखाण करणं, अनेक वैज्ञानिक नियतकालिकांमधून सातत्यानं लेख लिहिणं, इलेक्ट्रोडायनॉमिक्स ऑफ मूव्हिंग बॉडीज, प्रिन्सिपल्स ऑफ रिलेटिव्हिटी, अशा अनेक ग्रंथांचा अनुवाद करणं, विज्ञानावरचं इतर ग्रंथलेखन इतकं अफाट काम एका आयुष्यात मेघनाद साहांसारख्या माणसानं केलंय यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या शब्दकोशात ‘अशक्य’ या शब्दाला मुळीच स्थान नव्हतं. त्या काळात कुठल्याही सोयीसुविधा आणि साधनं उपलब्ध नसताना त्यांनी प्रयोगासाठी तयार केलेली उपकरणं बघितली तरी मन स्तिमित होतं. केवळ संशोधनक्षेत्रातच नाही तर दैनंदिन आयुष्यात माणसाचं आयुष्य सुखी कसं करता येईल याचाही त्यांना ध्यास लागला होता. आपण केलेल्या प्रत्येक कामात ते सगळं श्रेय स्वतःकडेच कधीच घेत नसत. प्रत्येक कामानंतर ते त्याचं श्रेय आपले विद्यार्थी, सहकारी आणि आपला जिवलग मित्र एस. एन. बोस यांना आवर्जून देत. विज्ञानच आपल्या देशाचं भलं करू शकेल हा दृढ विश्वास साहांना होता.
मेघनाद साहा या अनवाणी पायानं चालणार्या लहान मुलाचा प्रवास बालपणापासून जागतिक कीर्तीचा एक शास्त्रज्ञ होईपर्यंतचा कसा होता, याची गोष्ट खूपच विलक्षण आहे!
लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी असलेल्या मेघनाद यांना मात्र जातिव्यवस्थेशी सतत तोंड द्यावं लागलं. शिक्षणासाठी डॉ. अनंत दास यांच्याकडे राहत असतानाही त्यांना आपल्या जातीमुळेच आपली ताटवाटी वेगळी धुवून ठेवावी लागे. त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेच्या तेजानं चमकणार्या मेघनाद यांना जातीवरून अनेकदा अपमानित व्हावं लागायचं. अनेक प्रसंगांचे ओरखडे अतिशय लहान वयापासून मेघनादच्या मनावर उमटले गेले होते. जातीपातीचा पगडा त्या वेळी लहानलहान गावातच नाही, तर कलकत्यासारख्या शहरातल्या सुशिक्षित लोकांवरही प्रचंड प्रमाणात होता. कलकत्याला असताना सुरुवातीला मेघनाद एडन हिंदू वसतिगृहात राहत असत. पण इथंही उच्चवर्गीय मुलं त्याला वेळोवेळी त्यांच्या जातीवरून अपमानित करत आणि त्यांची टिंगलटवाळी करत. जेवताना इतर मुलं जेवत असतील, तर त्यांच्याबरोबर मेघनाद जेवू शकत नसत. त्या मुलांना मेघनाद यांनी आपल्याबरोबरीनं जेवणं कमीपणाचं वाटे. त्यांचं जेवण झाल्यानंतर मेघनाद यांनी जेवावं याकडे त्या मुलांचा कटाक्ष असे. एकदा व्यासपीठावर सरस्वतीपूजनाची जोरदार तयारी सुरू होती. मेघनाद देखील ती सगळी आरास बघण्यासाठी मंचावर चढले. हे दृश्य पाहताच एका खालच्या जातीचा मुलगा पूजेच्या मंचावर आला, तर सगळंच अपवित्र होणार अशा शब्दात तिथल्या पुजार्यानं मेघनाद यांना कटू शब्दांत नाही नाही ते ऐकवलं आणि पूजेच्या मंचावरून खाली जायला भाग पाडलं. अशा वेळी त्यांच्याबरोबर शिकणार्या इतर मुलांनीही पुजार्याचीच बाजू घेतली. सरस्वतीपूजेच्या वेळी तिथे मेघनाद यांनी तिथं येऊ नये आणि आमचं वातावरण अपवित्र करू नये असं सांगून तिथं यायला त्यांना मनाई केली. या आणि अशा उच्चवर्णीय मुलांच्या वर्चस्वामुळे आणि वागणुकीमुळे कंटाळून मेघनाद यांनी ते वसतिगृह सोडलं. अशा प्रकारच्या जातीय वागणुकीमुळे मेघनाद यांच्या मनात जातपात मानणार्यांविरुद्ध घृणा निर्माण झाली. पण या गोष्टीचा यांनी इतरांवर कधीच राग काढला नाही.
मेघनाद साहा यांना इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयांमध्येही खूप रस होता. एखाद्या विषयाबद्दल बोलताना त्याचा सखोल अभ्यास करून मगच ते त्यावर आपलं मत नोंदवत. मेघनाद साहांचा धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी वेद, उपनिषदं, पुराण आणि हिंदूंचे खगोलशास्त्राविषयीचे ग्रंथ यांचाही जवळजवळ २० वर्षं अभ्यास केला होता! आपल्या खोट्या राष्ट्रीय अस्मितेच्या हव्यासापोटी पाश्चात्त्य विज्ञानाला आणि वैज्ञानिकांना कमी लेखणं त्यांना मान्य नव्हतं आणि म्हणूनच इथल्या कर्मठ पोथिनिष्ठांचा रोष त्यांनी ओढवून घेतला होता.
ते पूर्णपणे नास्तिक होते. मूर्तिपूजा आणि कर्मकांडं यांना ते मानत नसत. जो माणूस आडपडदा न ठेवता बोलतो तोच स्पष्ट आणि खरं बोलतो असं त्यांचं मत होतं. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे ते जिवंत असताना त्यांना टीकेला भरपूर तोंड द्यावं लागलं. एकदा तर ते ढाक्याला गेले असताना एकानं त्यांना त्यांच्या वैज्ञानिक संशोधनांबद्दल प्रश्न विचारले. साहांनी त्याला तार्यांची जडणघडण आणि त्याबद्दलचं स्वतः केलेलं संशोधन याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. साहांनी सगळं सांगितल्यानंतरही त्या माणसाच्या चेहर्यावर प्रतिक्रियेची एक रेषाही उमटली नाही. साहांना खूपच आश्चर्य वाटलं. त्या माणसानं शेवटी एकाच वाक्यात उत्तर दिलं, ते म्हणजे, 'अहो, हे सगळं आपल्या वेदांमध्ये आधीच सांगून ठेवलंय.’ आपल्या वेदांमध्ये सांगून ठेवलंय म्हणणारे साहांना अनेक लोक साहांना भेटत. त्यामुळे आता या माणसानंही तेच उत्तर दिल्यावर साहा वैतागले आणि त्यांनी त्याला तार्यांच्या आयनीभवनाची उपपत्ती वेदांमधल्या नेमक्या कुठल्या भागात दिली आहे ते सांगाल का असा प्रश्न केला. तरीही त्या माणसाला या प्रश्नाचं काहीही वाटलं नाही. तो म्हणाला, 'मी वाचलं नाही, पण तुम्ही वैज्ञानिक लोक शोध लावला म्हणून जो दावा करता ते सगळं वेदांमध्ये आहेच अशी माझीच नव्हे तर माझ्यासारख्या शेकडो, हजारो लोकांची ठाम श्रद्धा आहे.' यावर साहांनी कपाळावर हात मारून घेतला.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment