मार्जारांच्या राज्यात....
मार्जारांच्या राज्यात.... नयनकडे तीन आठवड्यांपूर्वी गेले होते. दिवसभराचा थकवा होताच, पण लेखाचं प्रकरण गळ्याशी आल्यामुळे तिची मुलाखत घेणं सुरू होतं. नयनचा बंगला पाषाण या भागात असून तिच्या प्रत्येक गोष्टीतून तिचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन दिसतो. तिची बाग, तिच्या घरातल्या फोटोफ्रेम्स, तिची साधी, पण सुबक सजावट...सगळं काही मस्तच! पण सगळ्यात काही मस्त असेल तर ते मात्र तिच्या घरातली सात-आठ मांजरं! म्हणजे नयनच्या घरात कुत्री देखील पाळलेली आहेत, पण त्या कुत्रेरावांचं या कजाग मांजरांपुढे काहीही चालत नाही.
म्हणजे नयन मला सांगत होती, की सूर्या नावाचा जो बोका आहे, त्याला घरात कुत्र्याचं आगमन आवडलं नव्हतं. त्यानं सरळ त्या कुत्रेमहोदयांना दमच दिला, की ‘आपल्या पायरीनं राहायचं, जास्त गमजा इथं चालणार नाहीत, इथं फक्त माझं राज्य आहे.’ त्या दिवसापासून कुत्रोबा अतिशय गरीब गाईसारखं खालमानेनं आश्रितासारखं राहायला लागले. मी गेले तेव्हा सूर्या बोकोबा दिवाणवर मस्त ताणून आराम करत होते. त्यानंतर तारा नावाच्या मांजरीनबाईंनी माझ्याजवळ येऊन आपली ओळख करून दिली. ही बया स्वभावानं खूपच गरीब होती. तिचा भिडस्तपणा बघून हिच्यावर सगळेच दादागिरी करत असणार हे मला कळून चुकलं. त्यानंतर दोन पर्शियन मांजरं....त्यांच्यातल्या ज्येष्ठ बोक्याचं नाव अँन्टेना होतं.
त्याला तर चक्क स्वतंत्र खोली होती. एकूणच त्या बंगल्यात मांजराचंच राज्य होतं. आमची मुलाखतवजा गप्पा रंगात आल्या आणि सूर्याच्या अंगात संचारलं. त्याला माझा त्या घरातला हस्तक्षेप आवडला नसावा. सूर्यानं डायनिंग टेबलवर उडी मारत मी लिहीत असलेल्या डायरीवर हव्या त्या पोझमध्ये बसून घेतलं. तो त्या जागेवरून ढिम्म हलेना. मी हलवण्याचा प्रयत्न केला, तर उलट त्यानं मला मी त्याच्या कपाळावरून, मानेवरून हात फिरवावा आणि त्याचे लाड करावेत अशी मागणी केली. माझा नाईलाज झाला. मी पेन खाली ठेवला. आणि स्मरणशक्तीवर भरोसा ठेवत नयनशी पुढल्या मुद्दयावर बोलायला सुरुवात केली. आपल्या घरातलं आपल्यावरचं लक्ष आता नयन माझ्यावर केंद्रित करतेय हे बघून सूर्याचा संयम सुटला. सूर्यानं मग डायरीवरनं अंग झटकत उठत, नयनकडे भूक लागल्याची सूचना दिली.
नयन आज्ञाधारकपणे उठली आणि त्याला चिकण वगैरे तत्सम त्याच्या आवडीचे पदार्थ बशीमध्ये घालून त्याला त्याच्या स्वतंत्र रूममध्ये घेऊन गेली. काही वेळ आमचं बोलणं पुन्हा एकदा फॉर्मात आलं. तीही भरभरून बोलू लागली. तोपर्यंत सूर्याचं जेवण आटोपलं होतं. त्यानं काही वेळ आमचं आटोपण्याची वाट बघितली आणि मग त्याला असह्य होऊन त्यानं पुन्हा एकदा टेबलावर उडी घेतली. माझ्याजवळ येऊन त्यानं माझी गळ्याभोवतीची ओढणी रागानं तोंडात पकडून खेचून काढली. मला कडक म्यॉव या शब्दात ‘आता बास कर, नाही तर तुला बघून घेईन’ असा सज्जड दमही भरला. मी मनातून घाबरले, पण वरकरणी मात्र नयनला 'हा असा का करतोय' असं मवाळ स्वरात विचारलं.
नयननं त्याला जायला सांगितलं, पण सूर्यानं शेपूट उंच करत ती रागानं आपटत चक्क नकार दिला. नयनचाही नाईलाज झाला, मग ती सरळ उठली आणि सूर्याला बाजूच्या बेडरूममध्ये चक्क कोंडून आली. माझी मुलाखत मी संपवली. लेखही प्रसिद्ध झाला. पण माझ्या मनात मात्र तारा, अँटेना,सूर्या आणि इतर सगळी मांजरं घर करून होती. माझ्याशी ती मांजरं जरा कठोरपणे वागली असली तरी त्यांच्या राज्यात मी आंगतूकपणे प्रवेश केल्यामुळे त्यांचं वागणं क्षम्यच होतं! ती कशीही वागली तरी माझं तिथलं यापुढेही त्यांना भेटायला जाणं, त्यांच्याशी दोस्ती करणं अटळ असणार आहे!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment