फारच टोचलंय

फारच टोचलंय

तारीख

कोरोना काळामुळे अनेक गोष्टींची माध्यमं बदलली. हळूहळू हे बदल आपल्या अंगवळणी पडत चाललेत. मात्र नाटक हे माध्यम प्रत्यक्ष स्वरूपात असावं असं मनापासून वाटतं. तो जिवंतपणा अनुभवण्याची ओढ मनाला असते आणि अशा वेळी कोरोनाच्या काळात प्रदीप मुळ्ये यांनी कोप्रा मंचाच्या माध्यमातून काही नाटकं ऑनलाईन प्रेक्षकासमोर आणण्याचं ठरवलं आणि ती आणली देखील. यातलंच एकलनाट्य ‘फारच टोचलंय’ हे मी तीन-चार वर्षांपूर्वी पुण्यातल्या सुदर्शन हॉलमध्ये बघितलं होतं. त्यातला टाईपरायटरवर काम करत असलेला सर्वसामान्य माणूस, आपल्या स्वप्नांची छत्री हातात घेतलेला एक मध्यमवयीन माणूस आणि तेच ते जगणं असह्य झालेला, मनाची घुसमट सहन न होणारा एक माणूस धनंजयने साकारला होता. त्या वेळी अख्खा एक तास एकटा धनू ज्या ताकदीने त्यातलं पात्र साकारताना रंगमंचावर बघितला, तेव्‍हा त्याच्याविषयीचा अभिमान, आनंद, कौतुक, आश्चर्य असं सगळं काही मला एकाच क्षणात वाटलं. 
तर, 28 ऑगस्टला ‘फारच टोचलंय’ चा ऑनलाईन प्रयोग जाहीर झाला आणि अपूर्वने लगेचच तिकीट बुक केलं. संध्याकाळचे सहा कधी वाजतात याची मी वाट बघत होते, याचं कारण तेच एकलनाट्य पुन्हा बघताना मला तोच अनुभव येतो की आता ते तितकंसं भावत नाहीये हे तपासायचं होतं.
‘फारच टोचलंय’ मध्ये सर्वसामान्य माणसाचं जगणं घाण्याच्या बैलासारखं त्याच त्याच चक्रातून फिरतं आहे. त्याचं धाडस, त्याचा उद्वेग, त्याचा जोष सगळा त्याच्या कवितेत, त्याच्या नाटकात, त्याच्या घोषणेत दिसतो. ते तरुण वय जसंजसं पुढे सरकतं, तसंतसं ती क्रांती क्षीण होत जाते, व्‍यवस्थेतल्या अडथळ्यांमुळे. जगण्यासाठी कराव्‍या लागणाऱ्या फरफट करणाऱ्या प्रवासामुळे. यातला नायक मनातल्या मनात कैकवेळा बंडाचा झेंडा हातात घेतो, पण वास्तवाचा स्पर्श होताच त्याचं बंड मरून पडतं. प्रत्यक्षात तो एखाद्या गांडुळासारखा, कणा नसलेला, आगतिक माणूस आहे. खरं तर त्याचं हे आगतिक, लाचार रूप त्याला नकोय. त्यापासून पळण्याचा तो आटोकाट प्रयत्नही करतो, पण त्याला ते शक्य होत नाही. त्याच्या आतला आवाज बंद करून खोट्या मुखवट्याने तो जगतोय. 
पूर्वी घरातला रेडिओ असो की दिवाणखान्यातलं फर्निचर असतो, ते पिढ्यानंपिढ्या तेच असायचं - टिकाऊ. पण आता जागतिकीकरणाच्या काळात उपभोक्तावाद वाढला, चंगळवाद वाढला, तसंच यूज अँड थ्रो संस्कृती फोफावली आणि मग त्यातूनच नवीन तंत्रज्ञानाचं अतिक्रमण झालं. जुनं फेकून द्या, नव स्वीकारा आणि नवं देखील अगदी अल्पकाळात जुनं होणार, त्यामुळे ते पुन्हा फेकून द्या असं सांगणाऱ्या या रेट्यात आपली काही मूल्यं उराशी घेऊन जगणारा ‘तो’ भांबावून जातो. त्याला काळाबरोबर धावता येत नाही. त्याची दमछाक होते. त्याच्या टाईपरायटरशी, त्याच्या खुर्चीशी, त्याच्या कामाशी त्याचं नातं निर्माण झालेलं, एका क्षणात त्याला तोडता येत नाही. अत्याधुनिक बदलाचं प्रतिक म्हणून उभी असलेली संगणिका (या नाटकातलं कम्प्युटरचं नाव!) त्याला नको आहे, पण तिला स्वीकारणं किंवा न स्वीकारणं त्याच्या हातात आता उरलेलंच नाही. एकेक स्वप्नं बंदिस्त करावी लागताहेत, त्यांना दडपून टाकावं लागतंय. पण त्या दडपून टाकलेल्या स्वप्नांचं, इच्छांचे ओझंही तो बरोबर बाळगतोय. त्या ओझ्यानं त्याचे खांदे वाकलेत.  त्याला मोकळा श्वास घ्यायचाय, त्याला पिसासारखं हलकं व्हायचंय पण ते शक्य नाही. मनोरंजनाच्या, सुखाच्या, आनंदाच्या व्याख्या देखील कृत्रिम आवरणाखाली बंदिस्त झालेल्या आहेत. 
त्याची फरफट, त्याची आगतिकता, त्याचं नैराश्य, त्याच्या वेदना, त्याची तडफड, सगळं काही प्रेक्षकांना दिसत राहतं. आजच्या व्‍यवस्थेत सुखासाठी निर्माण केलेल्या चौकटी सुखच हिरावून घेताना दिसतात. आज सामान्य माणूस किती हतबल आहे हेच पदोपदी दिसतं. 
‘फारच टोचलंय’ या एकलनाट्यात धनंजय यानेकी धनूने ही भूमिका ज्या पद्घतीने साकारलीय, त्याला तोड नाही. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही हा माणूस नाटकावर किती प्रेम करतो हे त्याच्या भूमिकेत समरस होण्यातून दिसतं. एकटा असलेल्या ‘त्याला’ त्याचं कामच जोडीदारासारखं वाटतं आणि मग तो आपल्या टाईपरायटरशीच ज्या प्रेमानं बोलतो, तिची काळजी घेतो हे बघणं खूप सुखद आहे. भूतकाळात प्रवेश केल्यावर त्या आठवणींत रमलेला त्याच्यातला एक क्रांतिकारी विचारांचा युवक, पहिल्यांदा प्रेमात पडल्यावरचे त्याचे गुलाबी क्षण प्रेक्षकांना त्यांच्या भूतकाळात अलगद घेऊन जातात. त्यानं पाण्यात सोडलेली नाव देखील मला चिंब भिजवून गेली.
या प्रयोगाचं वैशिष्टय म्हणजे रुपाली गोडंबे हिने अनेक छोट्या प्रसंगामधून आपल्या दिग्दर्शनातून बिटविन द लाईन्स व्‍यक्‍त केल्या आहेत. त्यांना न्याय दिला आहे. अर्थातच त्याच्या अभिनयाला दिग्दर्शनाची तितकीच मजबूत साथ रुपाली गोडंबे हिची असल्यामुळे फारचं टोचलंय तितकं प्रभावी झालंय यात शंकाच नाही. यातलं संगीत अतिशय अप्रतिम आहे. आवश्यक तेव्‍हा त्या वातावरणात निर्माण केलेली करूण भावना लाजवाब आहे.
‘फारच टोचलंय’ या नाटकाचं आणखी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन बघताना कुठेही आपण प्रत्यक्ष स्टेजच्या समोर नाही आहोत याचा फिल आला नाही, उलट अशा प्रकारचे प्रयोग ऑनलाईन होण्यात एक वेगळीच रंगत आहे हे जाणवलं. कॅमेऱ्याने आवश्यक ते क्लोजअप्स टीपलेत, त्याविषयी काय बोलावं? या क्लोजअप्समुळे ‘त्या’ पात्राच्या व्‍यथा जणू काही तो आपल्या शेजारी बसून सांगतोय असं वाटत राहिलं. 
विचार करायला भाग पाडणारं ‘फारच टोचलंय’ आपल्यालाही रोजच काहीतरी टोचणारं लक्षात आणून देतं! आपल्याला समृद्घ करायला लावणारं, आपली संस्कृतीची राखण करणारं, आपल्याला नवा विचार देणारं, आपल्यातली मूल्यं जोपासणारं, आपल्याला हसवणारं, आपल्याला रडवणारं, आपल्याला अंतर्मुख करणारं आणि आपल्याला बरंच काही शिकवणारं नाटकं जिवंत राहायला हवं असेल तर या नव्‍या - ऑनलाईन - माध्यमाला स्वीकारायला हवं आणि तिकीट काढून ‘फारच टोचलंय’ सारखी नाटकं बघायला हवीत. दुसऱ्याचा बघताना देखील या नाटकानं मला पहिल्या इतकंच किंवा काकंणभर जास्तच समाधान दिलं.
तर जरूर बघा - फारच टोचलंय, लेखक आणि सादरकर्ता धनंजय सरदेशपांडे, दिग्दर्शिका रुपाली गोडंबे.
दीपा देशमुख, पुणे
 

Blog comments

Add new comment

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories