पुणे – उस्मानाबाद – लातूर – उमरगा – पुणे

पुणे – उस्मानाबाद – लातूर – उमरगा – पुणे

तारीख

उस्मानाबादचे सरस वाचक चळवळ आणि एशियन रायटर्स या संस्थांचे पुरस्कर्ते सुनिल बडूरकर उस्मानाबाद इथे मी यावं म्हणून काही वर्षांपासून मला बोलावत होते, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचणींमुळे ठरत नव्‍हतं. अखेर 2022 च्या जून महिन्यात 25 तारखेला उस्मानाबाद इथे सरस वाचक चळवळीचं उदघाटन आणि श्रोत्यांशी संवाद असा कार्यक्रम ठरला. निमंत्रण देण्यासाठी ते खास पुण्यात येऊन भेटले. उस्मानाबाद आणि जवळपासच्या वाचकांना पुस्तकं मिळावीत यासाठी सरस वाचक चळवळ काम करत राहावी या हेतूने त्यांनी मनोविकासचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर यांनाही निमंत्रित केलं होतं.
आम्ही २५ जूनला सकाळी ७ वाजता उस्मानाबादच्या दिशेने कूच केलं, मात्र पुण्याबाहेर पडायलाच जवळजवळ १० वाजले. याचं कारण वारीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले होते. अखेर मार्ग काढत काढत आम्ही 4.30 वाजता उस्मानाबाद इथे पोहोचलो.
सुनिल बडूरकर आणि त्यांची टीम यांनी अनिल नाईकवाडी यांच्या  अत्यंत उत्तम अशा पुष्पक पार्क नावाच्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्‍यवस्था केली होती. रस्त्याच्या थोडंसं आतल्या बाजूचं हे देखणं हॉटेल भरपूर मोकळी जागा असलेलं, हॉटेलच्या बाजूलाच साधंचं पण सौदंर्यपूर्ण असं रेस्टॉरंट, पार्किंगसाठी एका बाजूला तितकीच सुरेखशी रचना…तिथे असलेली हिरवाई बघून मन प्रसन्न झालं. 
लगेचच तयार होवून आम्ही उस्मानाबादच्या गोलकार,  टुमदार अशा यशवंतराव चव्‍हाण सभागृहात पोहोचलो. आत प्रवेश करताच हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी मनोविकासच्या पुस्तकांचे स्टॉल्स सजलेले होते. वर नजर जाताच गोलाकार रचनेत  सूर्यप्रकाश यावा अशी खिडकी मला दिसली. हॉल निम्माच भरलेला होता. आम्ही आसनस्थ झालो. 
दौलत निपाणीकर याने प्रास्ताविक केलं. दौलत निपाणीकर हा तरूण साऊथचा हिरो वाटावा असा. आकाशवाणीमध्ये निवेदकाचं काम करणारा. उत्तम मुलाखतकार. फार्मसीचा व्‍यवसाय करणारा.  दौलतमध्ये ऐकायलाच येत नसल्याचा एक मोठा न्यूनगंड पूर्वी होता. त्यामुळे तो लोकांमध्ये मिसळायचा नाही. ज्या वेळी त्याने स्टीफन हॉकिंगविषयी वाचलं, तेव्‍हा आपलं कारण किती क्षुल्लक आहे ही गोष्ट लक्षात आली. स्टीफन हॉकिंगने दौलतच्या एकाकी मनावर हळुवार फुंकर घातली आणि ‘ये मित्रा’ असं म्हणत मैत्रीचा हात पुढे केला. दौलतचा न्यूनंगड पार नष्टच झाला आणि त्यानंतर त्याला आपल्या ऐकू न येण्याची खंत कधीही वाटली नाही. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला आजचा दौलत आपल्या या बदलाविषयी बोलला.
बघता बघता श्रोत्यांनी संपूर्ण हॉल भरला. माझं स्वागत उस्मानाबादच्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई जगदाळे यांनी केलं. अरविंद पाटकर यांनी आपली भूमिका मांडताना सरस वाचक चळवळीचं स्वागत केलं आणि वाचक चळवळ वाढवली पाहिजे असं सांगितलं. मी पहिल्यांदाच उस्मानाबादला श्रोत्यांशी संवाद साधणार होते. माझ्या वाचन आणि लेखन प्रवासाचा धावता आढावा घेत मी जग बदलणाऱ्या ‘ग्रंथ’ या पुस्तकाबद्दल बोलले. सव्‍वा ते दीड तास मी बोलत होते आणि उपस्थित समस्त उस्मानाबादकर मन लावून ऐकत होते. 
कार्यक्रम संपला तेव्‍हा स्टॉलवरची ७० टक्के पुस्तकं संपली होती. ग्रंथच्या तर सगळ्याच प्रती संपल्या होत्या. प्रत्येकाने विकत घेतलेल्या पुस्तकावर मी स्वाक्षरी करत होते आणि त्याच वेळी त्या त्या वाचकांबरोबर माझी ओळख होत होती.
ओळखीचा वाटावा असा एक चेहरा समोर आला आणि जीनियसमधला सूक्ष्मजीव विज्ञानावरचा संच आवडला असल्याचं त्यांनी सांगितलं. ती व्‍यक्‍ती म्हणजे अखिल भारतीय सूक्ष्म जीवशास्त्र संघटनेचे अध्यक्ष आणि उस्मानाबादमधल्या नामांकित कॉलेजमध्ये मायक्रोबायलॉजी शिकवणारे प्राध्यापक डॉ. ए. एम. देशमुख सर. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचाच भाऊ म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचा नायक नंदू माधव. आपल्या विषयावर प्रेम असणारे, तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवणारे देशमुखसर – त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं. जिल्हा लेखाधिकारी बाळासाहेब फासे साहेब यांची ओळखही आनंद देऊन गेली. या वेळी एमएसडब्ल्यू करण्यासाठी मुंबईला जाणारी एक तरुणी या वेळी भेटली, तिने मला मी २५ वर्षांपूर्वी ज्या टप्प्यावर उभी होते, त्या टप्प्यावर आपण आत्ता उभे असल्याचं सांगितलं. तिच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती. पण व्‍याख्यान ऐकल्यावर आता आपण पुढचा प्रवास निर्भयपणे करू शकतो आणि प्रवासाच्या दिशेची आता आपल्याला खात्री वाटत असल्याचं तिने आवर्जून सांगितलं. खरं तर कार्यक्रमाला आलेली राज कुलकर्णीसह एकूणएक माणसं भेटून, बोलून, स्वाक्षरी घेऊन गेली. सुरेखाताई जगदाळे यांना तर माझं सव्‍वा ते दीड तासाचं व्‍याख्यान म्हणजे एक गद्यकाव्‍य वाटलं. 
कार्यक्रम संपल्यावर एक विशेष गोष्ट घडली, ती म्हणजे एक कुटुंब व्‍यासपीठाकडे लगबगीने आलं. त्यांच्या हातात एक भली मोठी फोटो फ्रेम होती. व्‍हाईट पेपरने आच्छादित केलेल्या त्या फ्रेमवरचा कागद बाजूला निघताच मी चकित झाले. माझीच प्रतिकृती जिवंत होऊन माझ्याकडे बघत उभी होती. माझं हे प्रतिबिंब उस्मानाबादचे रवि निंबाळकर आणि त्यांचं कुटुंब यांनी मला भेट दिलं होतं. रवि निंबाळकर यांना जिनियस मालिका खूप आवडलेली असून त्या मालिकेचा त्यांना नेहमीच उपयोग होतो असं त्यांनी आवर्जून सांगितलं. रवि निंबाळकरांची दोन्ही मुलं जीनियसची चाहती असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी भेट दिलेल्या या फ्रेमवर चितारलेलं, जिवंत केलेलं चित्र उस्मानाबादच्या राज ढवळे या शेतकरी तरुणाने साकारलं होतं. कार्यक्रमाच्या आधी काहीच तास तो आपल्या शेतात असताना त्याने हे हे पोट्रेट तयार केलं होतं आणि कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत अगदी धावत येऊन त्यानं ते रवि निंबाळकरांच्या हाती सोपवलं होतं. ही भेट इतकी अप्रतिम होती/आहे, की मी त्यांना ना थँक्यू म्हणू शकले ना कृतज्ञता व्‍यक्‍त करू शकले. राज आणि रवि, तुमच्या या स्नेहाबद्दल मी तुमची ऋणी आहे. कार्यक्रमासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर येणार होते, पण अचानक त्यांना लातूरला जावं लागल्यामुळे त्यांनी मी लातूरला तुम्हाला भेटेन असा निरोप ठेवला होता. कौस्तुभ दिवेगावकर हा तरूण कलेक्टर खूप चांगला वाचक असून वाचलेल्या पुस्तकांची सांगड त्याने आपल्या जगण्यात घातलेली आहे. आनंद नाडकर्णींच्या वेधमध्ये दोन वेळा कौस्तुभ दिवेगावकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 
कार्यक्रमाच्या सभागृहातून त्यानंतर आम्ही एम एच 25 या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. संपूर्ण हॉटेल अगदी आतल्या छतापासून, भिंतींपर्यंत, प्रत्येक कोपऱ्यालाही फुलांनी, फुलझाडांनी, वेलींनी सजवलेलं होतं. जिकडे नजर टाकावी तिकडे फक्‍त फुलंच फुलं. मला तर पुण्यातल्या एम्प्रेस गार्डनची आठवण झाली. दिल खुश हो गया. हॉटेलचा स्वप्निल नावाचा एक पंजाबी वाटावा असा मालक, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रीयन असलेला – त्यानं स्वत: आमचं स्वागत तर केलंच, पण स्वादिष्ट जेवण आम्हाला लवकर कसं मिळेल हेही बघितलं. निघताना सुरेखसा पुष्पगुच्छ देऊन फोटोसेशनही केलं. पर्यटकांचं आकर्षण ठरत असलेलं एम एच 25 हे हॉटेल आणि स्वप्निलचं अगत्य मनात साठवून आम्ही निरोप घेतला.
हॉटेलवर परतताच डावकिनाच्या रिच्याला फोन केला. कारण तिथे आलेल्या बहुतेकांनी त्याची आठवण काढली होती आणि त्याला का आणलं नाही अशी विचारणाही केली होती. रिच्याचे फॅन फॉलोअर्स असे दूरवर पसरलेले पाहून खूप छान वाटलं. दिवसभर झालेल्या प्रवासामुळे पटकन झोप लागली.
खिडकीबाहेरची डोलणारी पानं मला 26 ची सकाळ झाल्याची सूचना देत राहिली. पटकन तयार होवून हॉटेलच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी पोहोचले. काहीच वेळात अरविंद पाटकरही त्यांच्या नेहमीच्या पांढरा शर्ट आणि गडद पँट अशा ऐतिहासिक वेषात डुलत डुलत पोहोचले. टेबलवरचा सुरेखसा फुलांचा गुच्छ मनाला आणखीच प्रसन्न करत होता. पोहे, दही, पपई, फळांचा ज्यूस असा भरपेट ब्रेकफास्ट करत असतानाच सूनिल बडूरकर गूड मॉर्निंग म्हणत आत आले. मी वाट बघत होते, ती राज कुलकर्णी या तरुणाची. नेहरूंच्या व्‍यक्‍तिमत्वाने, कार्याने, विचाराने, दूरदृष्टीने, माणुसकीने हा तरूण झपाटला गेलाय. त्याचा प्रत्येक श्वास आणि उच्छवास नेहरूंच्या अस्तित्वाने भरलाय. आदल्या दिवशी उपस्थितांशी संवाद साधताना माझी नजर त्याला शोधत असताना तो आला होता. त्याच्याकडे बघून मी त्याला नवं पुस्तक लिहिण्याचं आव्‍हान केलं होतं आणि त्यानेही माझं म्हणणं आदेश समजून मान्य केलं होतं. मी विचार करत असतानाच काहीच वेळात राज कुलकर्णी आणखी ताज्यातवान्या हवेची झुळूक घेऊन आला.
त्यानंतरचा तास कसा उलटला ते कळलंच नाही. तो नेहरूंवर बोलत होता. बोलताना त्याला मध्येच थांबवणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. त्याचं बोलणं ऐकत राहावं असं आणि त्याच बरोबर त्याचा अभ्यास देखील लक्षात येत होता. नेहरूंविषयी बोलताना त्यानं सांगितलं, की त्याने नेहरूंवर इतरांनी लिहिलेलं लिखाण आजवर कधी वाचलेलंच नाही. मी चकित झाले. कारण नेहरूंविषयी काहीही न वाचता हा त्या माणसाबद्दल इतकं छातीठोकपणे बोलतो कसा? माझ्या चेहऱ्यावरचे भाव टीपत तो म्हणाला, मी आजवर नेहरूंनी स्वत: जे जे लिखाण केलंय, मग ते लेख असोत, वा पत्रं वा पुस्तकं, ते मी सगळं वाचलंय. त्यातूनच त्याला नेहरूंच्या मनापर्यंत पोहोचता आलं होतं. मी त्याच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघत होते. 
मनोविकास आणि राज कुलकर्णी आणि एका महत्वाच्या विषयावरचं पुस्तक १४ नोव्‍हेंबर २०२२ या दिवशी उस्मानाबाद इथे प्रकाशित करण्याचा एक ऐतिहासिक करार ताबडतोब करण्यात आला. या करारावर अरविंद पाटकर, राज कुलकर्णी, सुनिल बडूरकर आणि मनोविकासच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून दीपा देशमुख यांनी आपल्या अनमोल अशा स्वाक्षऱ्या केल्या. राज आणि माझा असा एक ऐतिहासिक सेल्फी काढून माझी सोल सिस्टर सुवर्णरेहा हिला ताबडतोब ‘नजराना, भेजा किसिने प्यारका’ असं म्हणत राजने तिला पाठवून दिला. मला आणि अरविंद पाटकर यांना राजने त्याची ग्रंथालीने प्रकाशित केलेली वेताळ पंचविशी, दक्षिणेची मथुरा तेर आणि आठवडी बाजार आणि समाज जीवन अशी तीन पुस्तकं भेट दिली. इथे रंगा एकदमच खुश झाला.
आम्ही उस्मानाबादकरांचा निरोप घेणार तेवढ्यात पुष्पक हॉटेलच्या मालकांचे व्‍याही नितीन तावडे, जे उस्मानाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, ते अगत्याने आम्हाला भेटायला आले. त्यांनी आमचं मनापासून स्वागत केलं आणि आपला आनंद व्‍यक्त केला. मग सगळ्यांबरोबर अर्थातच फोटो सेशन पार पडलं. 
सुनिल बडूरकर, तुम्हाला हा कार्यक्रम आखताना आणि संपन्न करताना अनेक अडथळे आले. आम्ही तुम्हाला आपण हा कार्यक्रम सध्या रद्द करू आणि पुन्हा कधीतरी करू असंही सुचवलं. पण तुम्ही मात्र तसं न करता, समोर आलेल्या अडथळ्यांशी दोन हात करत, कार्यक्रम घडवून आणला. अत्यंत सुरेख असं आयोजन केलंत, आमचा पाहूणचार केलात. तुम्ही आणि भेटलेले सर्व उस्मानाबादकर – यांची भेट आम्हाला समृद्घ करून  गेली. तुमची बोलण्याची शैली, तुमचं व्‍यक्‍तिमत्व माझ्या आगामी कथेतलं पात्र म्हणून माझ्या मनात साकारलं गेलं आहे. नक्‍कीच ते लवकर कागदावर उतरेल. एकूच उस्मानाबादची माणसं म्हणजे संगीत, साहित्य, कला, विज्ञान अशा अनेक विषयांवर भरभरून प्रेम करणारी, झपाटलेली, आणि वेगळंच रसायन असलेली भन्नाट अशी आहेत हे लक्षात आलं. 
आता लातूरच्या दिशेनं कूच करायचं होतं. लातूरच्या हरिती बुक गॅलरीचे अनिल जायभाये, राहुल लोंढें यांचे प्रतीक्षा करत असल्याचे फोन येताच आम्ही सगळ्यांचा निरोप घेतला आणि आमचा रथचालक विशाल याने आपल्या रथाला लातूरच्या दिशेने मार्गस्थ केलं. (क्रमश:)
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories