‘ग्रंथ’ भेट

‘ग्रंथ’ भेट

तारीख

एखादं काम करताना ते पूर्णत्वाला जाईपर्यंत आपली जवळची अनेक माणसं सतत आपल्याला प्रोत्साहन देत असतात. ‘ग्रंथ’ च्या निर्मिती प्रक्रियेत खरं तर खूप अडथळे आले, पण त्यातून मार्ग काढत असताना जी माणसं माझ्या आसपास होती, मला सतत सकारात्मक राहण्यासाठी मदत करत होती. त्या सगळ्यांना भेटून जग बदलणारे ‘ग्रंथ’ची भेट प्रत देण्यासाठी मन उत्सुक होतं. अर्थातच तेही ग्रंथचं रूपडं पाहण्यासाठी उत्सुक होते. 
‘ग्रंथ’च्या प्रती मनोविकासमध्ये पोहोचताच, मी आणि अपूर्वही वाऱ्याच्या वेगानं तिथे पोहोचलो. आशिश पाटकरने चितळेंच्या मिठाईसह ‘ग्रंथ’च्या प्रती हातात ठेवताच मन वेगानं माझ्या मित्र-मैत्रिणींजवळ जाऊन पोहोचलं. 
‘ग्रंथ’च्या लिखाणाची सुरुवात झाली आणि गीता या तरुणीने काही लेखांसाठी मला टीपणं काढून पाठवली, सतत माझ्यासोबत चर्चा करत राहिली. मी कंटाळले, थकले तर आसावरी ‘बोल ग चिमणे’ करत माझं म्हणणं ऐकत राहिली. यमाजी तर माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या वेळी माझं त्या त्या टप्प्यावर काय काय लिखाण चाललंय याची विचारपूस करत असतो, याही वेळी तो कधी फोनवर तर कधी प्रत्यक्ष भेटून करत होता. किशोर मासिकाचा संपादक किरण हा वाचनवेडा मित्र, याला माझ्या लिखाणाविषयी आत्यंतिक प्रेम, तर कल्याण हा मित्र माझ्या प्रत्येक पुस्तकाची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. वंदना पोतेकर हिलाही माझ्या लिखाणाचं नेहमीच कौतुक असतं. स्वागत हा मित्र माझ्या स्वतंत्रपणे येणाऱ्या ‘मोठ्या’ पुस्तकाची कधीपासून वाट पाहत होता. ‘ग्रंथ’ आल्याची बातमी कळताच तोही चितळेंची आंबा बर्फी आणि काजू कतलई घेऊन घरी पोहोचला.
‘ग्रंथ’ शेवटच्या टप्प्यात असताना मनोविकासमध्ये काम करणारा आमचा आवडता गणेश दिक्षित कोविडमुळे कायमचा आम्हाला सोडून गेला. मन सुन्न झालं होतं, काम पुढे जावं, पूर्ण करावं अशी इच्छाच राहिली नव्‍हती. अशा वेळी नयन या मैत्रिणीने खूप समजून घेतलं, मी माघार घेण्याची भाषा करताच तिने मला ‘तू हे सगळं नव्‍याने करू शकतेस, पाऊल पुढेच टाक’ असं म्हणत ती खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. याच दरम्यान पुन्हा नव्‍याने काही अडथळे समोर येऊन उभे ठाकले. अशा वेळी ‘मै हूं ना’ असं म्हणत डावकिनाचा रिच्याने आलेले अडथळे दूर करून मार्ग मोकळा करायला मदत केली. माझी बहीण श्वेता म्हणजे माझं शेपूट आहे, सतत दीपाताई, दीपाताई करणाऱ्या या गोड मुलीला ‘ग्रंथ’ची प्रत बघताच अत्यानंद झाला. तिच्यासारखाच आनंद बाबा (अनिल अवचट) ला झाला. हातात प्रत घेऊन त्यानं मला शाबासकी दिली. मुक्‍ता मनोहर या मैत्रिणीने आवर्जून घरी येऊन ‘ग्रंथ’ बद्दल माझं कौतुक करत दिवाळी फराळाने माझं तोंड गोड केलं. या सगळ्यांबरोबरच माझा मित्र धनंजय सरदेशपांडे, आशा साठे आणि सुवर्णसंध्या  यांना ‘ग्रंथ’ची प्रत देणं बाकी आहे. लवकरच देईन. या सगळ्यांची साथ आणि सोबत माझ्यासाठी खूप मोलाची आहे. 
तुम्ही सगळे - ग्रंथची पोस्ट वाचताच माझं अभिनंदन केलं, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. विशेषत: ग्रंथ उपलब्ध आहे कळताच ज्यांनी आपापल्या ऑडर्स करून मला कळवलं त्यांचे देखील खूप खूप आभार. दिवाळीच्या आनंददायी वातावरणात इतकंच सांगेन, आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी जग बदलणारे ‘ग्रंथ’ नक्की वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवा.
दीपा देशमुख, पुणे.
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories