मनात रेंगाळणारी पुस्तकं

मनात रेंगाळणारी पुस्तकं

कळायला लागलं तसा पुस्तकांन आयुष्यात प्रवेश केला, मी पकडलेलं त्यांचं बोट त्यांनी कधी सोडलं नाही हे विशेष! प्रवास कसाही असो, चढ असो वा उतार....ही पुस्तकं मूकपणे सोबत करतच राहिली. लिहिणं-वाचणं येण्याआधी गोष्टींच्या रुपातून त्यांनी माझ्याशी मैत्री केली. माझा औंदुबर नावाचा एक मावसभाऊ होता. मूळात औंदुंबरच धिप्पाड शरीरयष्टीचा, सावळ्या वर्णाचा, उंचापुरा आणि चित्रपटातल्या अमरिशपुरीसारखा वगैरे दिसायला होता. तो कधीही कुठेही स्थिर राहिला नाही. काही कालावधी त्यानं आमच्या घरी काढला. आम्ही सगळीच भावंडं त्या वेळी लहान होतो. रात्रीची जेवणं झाली की औदुंबर आम्हाला गोष्टी सांगायचा. या गोष्टी बरेचदा भूताच्या असायच्या. तो गोष्टी इतक्या रंगवून सांगायचा की ते भूत त्यानं बघितलंच असावं इतका विश्‍वास त्याच्यावर बसायचा. गोष्टीतल्या वातावरणाप्रमाणे त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव आणि आवाजातले चढउतार बदलत राहायचे. मग रात्रीच्या काळोखात एकटं असण्याची भीतीच वाटायची कारण अचानक औदुंबरच्या गोष्टीतलं भूत प्रत्यक्षात अवतरलं तर असं वाटायचं. 
त्या वेळी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं मिळायची. राजा-राणी, परी, ठकसेन वगैरे....त्यानंतर हळूच चांदोबा आयुष्यात आला. मग किशोर, अमृत, किलबिल, फास्टर फेणे......या सगळ्या पुस्तकांनी पर्‍यांचं राज्य दाखवलं. उडत्या गालिच्यावर बसून आकाशात सैर करवली, तर राक्षसाच्या तावडीतून राजकन्येला कसं सोडवायचं याचेही धडे दिले. या पुस्तकांनी कधी आजीच्या मायाभरल्या स्पर्शाची आठवण दिली, तर कधी मनातल्या द्विधा अवस्थेला निर्णायक स्थितीपर्यंतही पोहोचवलं. ही पुस्तकं कधी मित्र बनली, कधी मार्गदर्शक आणि कधी सल्लागार झाली कळलंच नाही. वयाच्या त्या त्या टप्प्यांमध्ये त्या त्या लेखकांनी, त्या त्या कवींनी साथ दिली. 'मामाची रंगीत गाडी' असो की 'सदैव सैनिका पुढेच जायचे' असो पुस्तकातली गाणी मनात कितिक वेळ रेंगाळत राहू लागली. 'अनामविरा कुठे जाहला तुझा जिवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात'.....या कवितेनं डोळे भरून आले होते. वसंत बापटांच्या कवितांनी तर मनाच्या तळाशी प्रवेश केला होता....मग अनेक पुस्तकं येत राहिली. दहावीच्या परीक्षेच्या वेळी आदल्या दिवशी रात्रभर जागून वाचलेली 'मर्मभेद' कादंबरी आजही विसरता आली नाही.....भयकथा, गूढकथा, साहसकथा, रहस्यकथा, प्रेमकथा, जगभराची सैर करवणारी पुस्तकं आयुष्यात मित्र म्हणून येत गेली. यातून जगभरातली माणसं वाचता आली, त्यांची सुखदुःख, त्यांचं कार्य, त्यांचं झपाटलेपण अनुभवता आलं. या पुस्तकांमधून अनेक कलाकार भेटले, अनेक वैज्ञानिक भेटले आणि अनेक तत्वज्ञही भेटले. तुकाराम आणि कबीर यांनी तर 'इतरांच्या मनापर्यंत पोहोचणारी भाषा बोला' असं म्हटलं. खरंच, पुस्तकांनी समृद्ध जीवन कसं असावं याची दिशा दाखवली. 
खरंच पुस्तकांनी आयुष्याबरोबर असलेलं नातंच बदलून टाकलं. हिंदीमधले प्रसिद्ध कथाकार निर्मल वर्मा म्हणतात, तसं 'मी पुस्तक वाचण्याच्या आधी जो होतो, तो नंतर राहत नाही.' खरंच आपलं जगच बदलवून टाकतात ही पुस्तकं! जेव्हा मनाची द्विधा अवस्था होते, तेव्हा आपल्यातल्या विचारांचं संक्रमण, बदल याची चाहूल लागलेली असते. झाडाची जुनी, वाळलेली पानं गळून पडावीत तशा कित्येक विचारांची पानगळ ही पुस्तकं आपल्यात करवून आणतात. आणि मग नवी पालवी फुटलेल्या मनाला ती नव्या विचारांचे रस्तेही दाखवतात. 
सफदर हाश्मी यांनी म्हटलं आहेच, 
किताबे कुछ कहना चाहती है,
तुम्हारे साथ रहना चाहती है,
किताबे करती है बातें, बिते जमानोंकी
दुनियाकी, इंसानोकी
आजकी, कलकी, एक एक पलकी
खुशियोंकी, गमोकी, फूलोंकी और बमोंकी
जीत की, हारकी, प्यार की, मार की,
क्या तुम नही सुनोगे, इन किताबोंकी बाते?
किताबे कुछ कहना चाहती है,
तुम्हारे साथ रहना चाहती है, 
किताबोंमे चिडियॉ चहपहाती है
किताबोंमे खेतियॉं लहलहाती है
किताबोंमे, झरने गुनगुनाते है,
परियोंके किस्से सुनाते है
किताबोंमे राकेट का राज है
किताबोंमे साइंसकी आवाज है
किताबोंमे कितना बडा संसार है
किताबोंमे ज्ञान का भंडार है
क्या तुम इस संसारमे नही आना चाहोगे?
किताबे कुछ कहना चाहती है,
तुम्हारे साथ रहना चाहती है

इंग्लंडची प्रसिद्ध लेखिका व्हर्जिनिया वुल्फ हिनं आपल्या एका पुस्तकात पुस्तकांविषयीच लिहून ठेवलंय, ते खरंच खूपच रंजक आहे. एकदा पुस्तकप्रेमी सेंट पीटर यांच्याजवळ गेले तेव्हा पीटर यांनी विचारलं की ‘या लोकांनी काय काय कामं केली आहेत? त्यावरून यांना स्वर्गात पाठवायचं की नाही हे ठरवता येईल.’ तेव्हा पीटरला सांगितलं गेलं की, ‘ही सगळी मंडळी पुस्तकांची भक्त आहेत.’ तेव्हा ते त्वरेनं उत्तरले, ‘अरे, मग यांना काहीच प्रश्‍न विचारू नका. कारण स्वर्गात जे काही प्राप्त झालं असतं ते सगळंच यांनी पुस्तकांतून आधीच मिळवलं आहे. या मंडळींना स्वर्गाचीही आवश्यकता नाही.’ मुक्तीचा क्षण या पुस्तकांनी त्या लोकांना बहाल केला.  खरंच, पुस्तकांविषयी यापेक्षा आणखी सुंदर भाष्य काय असू शकतं? 
प्रख्यात कवी गुलजार यांनी म्हटलंय,
किताबें झॉंकती है बंद आलमारी के शिशो से
बडी हसरत से तकती है
महिनो अब मुलाकाते नही होती
जो शामे उनकी सोहबत मे कटा करती थी
अब अक्सर गुजर जाती है कम्प्युटर के पर्दो पर
बडी बेचैन रहती है किताबे
उन्हे अब निंद मे चलने की आदत हो गयी है
जो कदरे वो सुनाती थी कि जिनके सैल कभी मरते नही थे
वो कदरे अब नजर आती नही
जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधडेउधडे है
कोई सफा पलटता है तो इक सिसकी निकलती है
कई लफ्जोके मानी गिर पडे है
बिना पत्तो के सुखे टुंड लगते है वो सब अल्फाज
जिनपर अब कोई मानी नही उगते
बहोतसी इसतलाहे है जो मिट्टी के सिकूरों की तरह
बिखरी पडी है गिलासों ने उन्हे मतरुक कर डाला
जुबॉ पर जो जायका आता था जो सफा पलटने का
अब ऊंगली क्लिक करने से बस एक झपकी गुजरती है
बहोत कुछ तह-ब-तह खुलता चला जाता है परदे पर 
किताबों से जो जाती राब्ता था, वो कट गया है
कभी सिने पर रखकर लेट जाते थे
कभी गोदी मे लेते थे
कभी घुटनो को अपने रिहल की सूरत बनाकर
नीम सजदे मे पढा करते थे, छूते थे जबीं से
वो सारा इल्म तो मिलता रहेगा आइंदा भी
मगर वो जो किताबोंमे मिला करते थे सूखे फूल
और महके हुये रुक्वे
किताबे मॉंगनेने, गिरने, उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा 
वो शायद अब नही होंगे

हे खरंय, कम्प्युटर आला आणि हातात जिवंत होऊन बोलणारी ती छापील पुस्तकं आता मूक होतील अशी खंत गुलजार यांच्या कवितेतून जुनी पिढी व्यक्त करते आहे. छापील पुस्तकांचं वाचन कम्प्युटरच्या आगमनानंतर कमी झालंय की काय अशीही भीती कवीला वाटते आणि पुस्तकांच्या माध्यमातून परस्परांत निर्माण होणारं प्रेम, संवाद, जवळीक आता कशी होणार असा काळजीनं भरलेला प्रश्‍न तो विचारतो.
माझी मैत्रीण नीलिमा पालवणकर हिनं पुस्तकांवर अतिशय सुंदर कविता केलीये. ती म्हणते,
पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतात
तेव्हा आपण जमीन व्हावं लागतं
आणि मुरवावं लागतं त्यांना
आपल्यात
कधी ती झाडं होतात घनदाट
तेव्हा आपण पांथस्थ होऊन
बसायचं असतं त्यांच्या सावलीला
निवांत
कधी कधी तर ती पक्षी होतात
तेव्हा पंखात बळ घेऊन
उडावं लागतं आपल्याला, त्यांच्या 
बरोबरीनं
पुस्तकांतून कधी कधी शिशिरही भेटतो
मग आपण उजाड माळ होतो
तेव्हा तीच वसंताची चाहूल होतात
आपल्यासाठी
पुस्तकांना स्पर्श असतो, वास असतो
पण त्यासाठी मनाला फुटाव्या लागतात
संवेदनांच्या लक्ष पाकळ्या
मग पुस्तकं उधळून टाकतात
वसंतातले सगळे रंग
पुस्तकांना कळतं सगळं, सगळं
आपल्याला कळतं का?
पुस्तकांचं आभाळमन?

जग हजारो रंगांनी चितारलं गेलंय. त्या प्रत्येक रंगांच्या परत अनेक तरल छटा आणि त्या सगळ्या रंगांना घेऊन पुस्तकं आपल्या मनात प्रवेश करतात. कित्येक रंगांना तर आपण बघितलेलंही नसतं. पुस्तकांची शक्ती दृश्य माध्यमापेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे असंच मला नेहमी वाटतं. कारण एखादा चित्रपट आपण बघतो तेव्हा ते कथानक काय सांगू पाहतं ते दिग्दर्शक आपल्याला त्याच्या नजरेतून बघायला लावतो. पण पुस्तकं वाचकागणिक एक वेगळंच दृश्य तयार करतात. कथा तीच असते, पण वाचणारा त्याच्या नजरेतून वेगळे रंग भरतो. या संदर्भात लॅटिन अमेरिकन नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक गैब्रियल आर्सिया माक्रवेज यांचा एक किस्सा खूपच बोलका आहे. हे लेखक महोदय त्यांच्याकडे कोणी चित्रपट निर्माता आला की आपल्या पुस्तकांवर चित्रपट बनवायला मनाई करत. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक ‘हंड्रेड ईयर्स ऑफ सॉलिट्यूड’ या पुस्तकावर आधारित चित्रपट काढण्यासाठी हॉलिवूडवाल्यांनी त्यांना करोडो डॉलर्सचा प्रस्ताव दिला.  पण तरीही महाशय आपल्या मतावर, आपल्या नकारावर ठामच होते. कोणा एकाने त्यांना विचारलं, की तुम्ही तुमच्या पुस्तकांवर चित्रपट बनवण्यास नकार का देता? उत्तरादाखल ते म्हणाले, माझ्या लाखो वाचकांच्या मनात माझ्या पुस्तकातल्या पात्रांच्या प्रतिमा त्यांनी वाचून बनवल्या आहेत. त्या त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. आणि जर चित्रपट बनवला तर या प्रतिमांचं बहुवैविध्य नष्ट होईल, त्यांची कल्पनाशक्ती थांबेल तिचाही एकप्रकारे तो अंतच होईल आणि नेमकं तेच मला नकोय. पुस्तकं ही अशी असतात.
सतीश काळसेकर म्हणतात, 
पुस्तके साठत जातात पुराण पुरुषांनी देवघरात ठेवलेली रेशमी बासनात बांधून सुरुवातीला
नंतर येतात कुठल्या कुठल्या स्पर्धातून बावचळल्यासारखी एकदमच
सिंदबाद, रणाविण स्वातंत्र्य ते थेट सुखी संसार
पुस्तके पाहतात त्यांच्या निष्पाप छपाईतून संसारातल्या खस्ता
पुस्तके तशी विक्रीस काढता येत नाहीत स्थावर जंगम मालमत्तेसारखी
किंवा ठेवता येत नाहीत गहाणवट दागिन्यांसारखी
प्रथम पुस्तकें दारोदार हिंडत राहिली, माझ्या वळकटीसारखी
पुस्तकांना तेव्हा आपले म्हणावे तसे छप्पर नव्हते मााथ्यावर
पुस्तकांना साथीचे रोग फार लवकर जडतात
म्हणून प्रथम एका संस्कृतीवरचे टाकाऊ ग्रंथ
प्रेम कवितांच्या भन्नाट पंक्तीही त्यांच्या जोडीनेच साजर्‍या होतात
पुस्तके पाहत नाहीत, अथंरूण पाहून कसे पाय पसरावेत
पुस्तके निराश होत नाहीत अंगावर कितीही चढली धूळ तरीही
पुस्तकांना येताना जाण्याची खंत नसते
रोगांची लागण वयपरत्वे बदलावी हे सहजपणे
पुस्तके आपलेलसे करतात
ती जातात अडगळीच्या जागी अनाथ वाचनालयाच्या कपाटात
पुस्तके सहसा रद्दीत जात नाहीत

पुस्तकं वाचकाला एक कल्पक कलाकार, एक संवेदनशील माणूस आणि एक समृद्ध व्यक्ती बनवतात. पुस्तकं आम्हाला  काय देत नाहीत? आमच्याशी काय बोलत नाहीत? सगळं काही - भरभरून. असं म्हणतात, माणसाची श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या, त्यानं वाचलेल्या पुस्तकांवरून कळते! 
दीपा देशमुख, पुणे.
deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.